अजूनकाही
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या विरोधात दस्तुरखुद्द मुलानं – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलेलं बंड घराणेशाहीच्या राजकारणाकडे नव्यानं पाहायला लावणारं ठरावं. एरवी आपल्या देशात घराणेशाहीच्या राजकारणात बाप, आई, काका आपल्या घरातल्या दिवट्यांकडे सत्तेतली पदं सोपवतात. मुलं ती पदं वडीलधाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सांभाळतात. या मुलांची बुद्धी, विचार, चालचलन, वर्तन हे बेताबाताचंच असतं. त्यामुळे ते निमूटपणे वागतात. ऐतोबासारखा सगळा राजकीय व्यवहार करतात. आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या असल्याने या वारसांना वेगळे काही पराक्रम करण्याची जरुरीही नसते. त्यांच्यामध्ये वेगळं काही मांडायची, करून दाखण्याची प्राज्ञा, हिंमतही नसते. बंड करण्याची, वेगळी चूल मांडण्याची तर बातच वेगळी!
घराणेशाहीच्या या रिवाजाला छेद देणारं राजकीय वर्तन अखिलेश यादव करत आहेत. ते मुलायम यांच्या मर्जीनेच मुख्यमंत्री झाले खरे, पण त्यांनी बापाच्या पावलावर पाऊल टाकण्याचं पहिल्यापासून नाकारलं होतं. मुलायम समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या वैचारिक तालमीत तयार झाले. ते मूळ सैफइ या खेडेगावातले. छोट्या शेतकऱ्याचा हा मुलगा शिक्षक झाला. त्याला कुस्तीचा नाद होता. शिक्षकाची नोकरी करता करता त्याला समाजवाद्यांची सायकल पसंत पडली. मागास यादव जातीतला हा शिक्षक समाजवादी आंदोलनात पुढे नेता बनला.
मुलायम हे कधीच विचारवंत नेते नव्हते, पण त्यांची संघटक म्हणून शक्ती वाखाणण्याजोगी होती. स्वत:च्या संघटन कौशल्याच्या बळावर ते समाजवादी पक्षात पुढे आले. नंतर जनता पार्टीत तगडे नेते बनले. यादव आणि मुस्लीम अशा दोन्ही समूहांना त्यांचं नेतृत्व भावलं.
मुलायम यांच्या व्यक्तिमत्त्वात एक महान विरोधाभास पहिल्यापासून भरून राहिला आहे. ते दोन टोकाच्या माणसांना धरून ठेवू शकतात. एकाच वेळी एखादा साधू-बुवा त्यांच्या बैठकीत लिलया वावरू शकतो. त्याचबरोबर एखादा गुन्हेगार, दलाल, माफियाही त्यांच्या कार्यालयात संचारू शकतो. साधू आणि गुन्हेगार दोघंही मुलायम यांना ‘नेताजी’, ‘बडेभाई’ म्हणून निष्ठा अर्पण करू शकतात. मुलायम यांची मर्जी संपादन करण्यासाठी साधू, गुन्हेगार यांनी एकच पात्रता धारण करणं गरजेचं असतं. ती म्हणजे त्यांनी मुलायमवादी म्हणून स्वत:ला घोषित करावं लागतं.
अशा महान विरोधाभासी मुलायम यांनी जनता दलाच्या फाटाफुटीनंतर समाजवादी पार्टी काढली. स्वत:ला ‘नेताजी’ म्हणून घोषित केलं अन नाना तडजोडी करत, विविध राजकीय डाव टाकत उत्तरप्रदेशात स्वत:चं नेतृत्व स्थापन केलं. व्होट बँक निर्माण केली. काँग्रेस, भाजप, बसप यांना मागे टाकत साडेचार वर्षांपूर्वी समाजवादी पक्ष त्या राज्यात सत्तेवर आला. अर्थात त्या यशात अखिलेश यांच्या चेहऱ्याचाही मोठा वाटा होता. अखिलेश यांनी समाजवादी पक्षाचा जुना तडजोडवादी, गुंड-माफिया यांना पोसणारा, नावाला समाजवादाचा जप करणारा पक्ष म्हणून असलेला बदलौकिक दूर करून ‘विकासवादी तरुणांचा पक्ष’ अशी या पक्षाची प्रतिमा निर्माण केली.
मुलायम यांनी लहानभाऊ शिवपाल यादव यांच्याऐवजी अखिलेश यांना मुख्यमंत्री होऊ दिलं. आणि तिथंच त्यांनी स्वत:चा खड्डा खोदला. अखिलेश हे परदेशात शिकून आलेले आहेत. स्वत:च्या मर्जीने आंतरजातीय लग्न केलेले आहेत. त्यामुळे ते पारंपरिक यादव नेत्यासारखं वागणार नव्हते. मुलायम यांचा महान विरोधाभासी स्वभाव त्यांच्याजवळ नाही. शिवाय नव्या काळाचं भान त्यांना आहे. म्हणून त्यांनी कधीही गुंड, माफिया, गुन्हेगारांना जवळ वावरू दिलं नाही. उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री म्हणजे जवळपास अर्धा पंतप्रधान. मोठं राज्य, मोठी सत्ता. या सत्तेनं अखिलेश यांना जबर आत्मविश्वास दिला. त्यांच्या वागण्यात, देहबोलीत, बोलण्यात ते दिसतं.
या जबर आत्मविश्वासातूनच त्यांनी बापाविरोधात बंड केलं. तात्कालिक कारण म्हणून अमरसिंग आणि काका शिवपाल यांच्या विरोधातली नाराजी, निवडणुकीतल्या तिकिटांच्या समर्थकांच्या याद्या हे विषय ऐरणीवरचे असले तरी बापाची वाट मंजूर नाही हाच खरा मुद्दा आहे.
मुलायम आता ७५ वर्षांचे आहेत. आजारपणाने त्यांचं शरीर तसं थकलंय. गेली दोन वर्षं ते फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचे अमरसिंग, जयाप्रदा यांसारखे खटपटे चेले शिवपाल यांच्याभोवती गोळा झाले. या तिकडीत मुलायम यांची दुसरी पत्नी सामील झाली. या चौकडीनं अखिलेश यांचा बंदोबस्त करण्याचे अनेक उपाय करून पाहिले, पण त्याला अखिलेश पुरून उरले.
या चौकडीतला अमरसिंग हा भयानक सौदेबाज माणूस. त्याचं कौशल्य असं की, अफाट कर्तबगारीच्या भरवशावर कुणालाही मॅनेज करू असा त्याचा स्वभाव बनलेला आहे. सर्वपक्षाशी या माणसाची मैत्री आहे. त्या बळावर त्याने स्वत:चं उपद्रव मूल्य वाढवलेलं आहे. मुलायम यांना राजकारणात हा माणूस सतत उपयुक्त म्हणून ठरत आला आहे.
मुलायम या चौकडीला घेऊन पारंपरिक पद्धतीचं राजकारण रेटू पाहत होते. ते मान्य करत नाही म्हणून त्यांनी अखिलेश यांची नाकेबंदी करून पाहिली. पण आता अखिलेश यांनी स्वत:ची राजकीय जमीन कर्तबगारीनं तयार केली आहे. त्या बळावरच त्यांनी बंड करण्याचं धाडस केलं.
साडेचार वर्षांत अखिलेश यांनी विकास करणारा माणूस म्हणून सामान्य लोकांत किती स्थान मिळवलं आहे, हे येत्या निवडणुकीत दिसेल. आता बंड तर झालंच आहे. समाजवादी पक्ष खरा कुणाचा? यादव-मुस्लीम व्होटबँकेचे धनी कोण? याचा निकाल येत्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत लागेल. सध्या सायकल कुणाची हा मुद्दा किरकोळ आहे. सत्तेचा कल कुणाला मिळो न मिळो, पण या बंडाने घराणेशाही राजकारणाला नव्या वळणावर नेऊन ठेवलं, हा या बंडाचा खरा अर्थ आहे.
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment