उजवे आणि बुद्धिवादी
पडघम - सांस्कृतिक
संबुद्ध मित्र मुस्तफी, अनुवाद – अजित वायकर
  • अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि अभिनेते गजेंद्र चौहान
  • Sat , 22 October 2016
  • संबुद्ध मित्र मुस्तफी अजित वायकर Ajit Waykar अमर्त्य सेन गजेंद्र चौहान Amrtya Sen Gajendra Chauhan

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात बुद्धिवादविरोध कळसाला पोहोचला आहे. प्रख्यात नोबेलविजेत्याला विद्यापीठाच्या कुलपतीपदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याचवेळी देशातील आघाडीच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कामुक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता विराजमान होतो. परंतु, अमर्त्य सेन यांची गच्छंती आणि गजेंद्र चौहान यांची नियुक्ती या दोन गोष्टींचा अर्थ केवळ शिक्षणाच्या भगवेकरणापुरता मर्यादित नाही.

या घडामोडींचा मुख्य गाभा म्हणजे उजव्यांकडून सृजनशीलता आणि बुद्धिवादाचा करण्यात येणारा पराकोटीचा तिरस्कार. नालंदा विद्यापीठ आणि भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या बाबतीत घडलेलं नाट्य त्याकडेच निर्देश करतं. हा तिरस्कार जसा केवळ भारतीय परिप्रेक्षापुरता मर्यादित नाही, तसाच तो एकमार्गीदेखील नाही. हा दोन विचारधारांचा वैश्विक संघर्ष आहे. उदारमतवादी, शैक्षणिक- कलात्मक आदर्शवाद विरुद्ध प्रत्येक कल्पनेला विकास आणि राष्ट्रवादाच्या ताळेबंदात करकचू पाहणारी सनातनी मनोवृत्ती यांच्यामधील हे द्वंद्व आहे.

जागतिक पातळीवर जसे कलाकार, पत्रकार, अभिनेते, शिक्षणतज्ज्ञ यांच्यापैकी बहुतांश सर्जनशील व बुद्धिवादी वर्ग उजव्यांचा तिरस्कार करतो, तसेच उजवे या बुद्धिवाद्यांना पाण्यात पाहतात. अमेरिकेत बहुतांशी हॉलिवूड डेमोक्रॅटिक विचारधारा मानतं. अनेक प्रतिष्ठित अमेरिकन विद्यापीठं उदारमतवादी बुद्धिवाद्यांची केंद्रं मानली जातात. मागील वर्षी करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, केवळ सात टक्के पत्रकारांचा कल कर्मठ रिपब्लिकन विचारधारेकडे होता, तर सुमारे पन्नास टक्के पत्रकारांनी ‘आपण उदारमतवादी डेमोक्रॅट’ असल्याचं सांगितल. भारतातदेखील थोड्या-फार फरकानं याच निष्कर्षांची पुनरावृत्ती होऊ शकते.

‘बुद्धिवादी आणि समाजवाद’ या शीर्षकाखाली १९४९मध्ये ऑस्ट्रियन अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक हायेक याचा निबंध प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यानं बव्हंशी बुद्धिवादी वर्ग समाजवादाकडे का झुकलेला असतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला होता. भांडवलशहांच्या मालकीची वृत्तपत्रं, प्रतिक्रियावादी सरकारी संस्थांच्या निगराणीखाली असणारी विद्यापीठं, कर्मठ शासनाच्या अधिपत्याखालील दृकश्राव्य माध्यमं समाजवादाच्या दिशेनं जनमत प्रभावित करण्यासाठी ओळखले जातात. कारण, या संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची समाजवादाप्रतीची धारणा तितकी दृढमूल असते, असं विवेचन हायेकने केलं होतं.

हायेक हा मुक्त बाजारव्यवस्थेचा समर्थक होता. तसेच, रोनाल्ड रेगन आणि मार्गारेट थॅचर या सनातनी प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांचाही तो सल्लागार होता. त्यानं आपल्या निबंधात हे कबूलदेखील केलं होतं की, ‘या दृढसमजांमागे ना स्वहित साधणारे स्वार्थ असतात, ना दुष्कर्माकडे झुकू पाहणारे हेतू. चांगुलपणाचा हेतू आणि सद् भावाची ऊर्मी बुद्धिवाद्यांची मतं बळकट करत असतात.’

समाजवाद आदर्शांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच बुद्धिवादी समाजवादाकडे आकर्षित होतात. या आदर्शवादाला प्रभावी उत्तर शोधणं अद्यापपावेतो तरी मुक्त अर्थव्यवस्थेच्या समर्थकांना जमलेलं नाही.

आता बुद्धिवादाला विरोध करणाऱ्या उजव्या मंडळींच्या समर्थकांकडे वळूयात. उद्योजक, बँकर्स, तंत्रज्ञ ( मुक्त अर्थव्यवस्थेचे उत्साही प्रचारक) आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची तळी उचलणारा अल्प-मध्यम उत्पन्नगट यांचा यात समावेश होतो. धडक कृती आणि आर्थिक प्रगती यांनी हुरळून जाणाऱ्या या स्त्री-पुरुषांना बुद्धिवाद्यांचा वैश्विक आदर्शवाद समजत नाही. उजवे त्यांची ‘सिक्युलर’, ‘गांजेकस’ अशा शेलक्या शब्दांत जरी संभावना करीत असले, तरी या बुद्धिवाद्यांच्या विद्वत्ता आणि अभिव्यक्तीच्या प्रभावाने प्रसारमाध्यमं आणि समाजात त्यांना अनुसरणारा पंथ निर्माण होतो, ही बाब नाकारता येणार नाही.

विकास आणि संस्कृती यांचा बुद्धिवादीपुरस्कृत असंतोष आणि सामाजिक सुधारणा यांच्याशी अन्योन्य संबंध आहे, याकडे उजवे दुर्लक्ष करतात. विसाव्या शतकाच्या मध्यात झालेल्या प्रॉटेस्टंट चळवळीमुळेच आधुनिक भांडवलशाहीनं जन्म घेतला. रोमन कथॉलिक चर्च सर्वसामान्य लोकांच्या जीवनात करत असलेल्या अतिहस्तक्षेपामुळे असंतुष्ट असलेल्या बुद्धिवाद्यांनीच ही चळवळ सुरू केली होती. या चळवळीनं व्यक्तींना उदारमतवादी जगात संचारासाठी अधिकाधिक स्वातंत्र्य दिलं, स्वतःचे उद्योगधंदे सुरू करण्यास प्रोत्साहित केलं आणि संपत्तीनिर्माणास मदत केली.

पण प्रत्येक वेळी उजवेच चुकले आहेत, असंही काही म्हणता येणार नाही. कारण, आदर्शवादी डावे हे बुद्धिवादी आणि शिक्षणक्षेत्रातील मंडळींचे नैसर्गिक सहकारी आहेत. डाव्या राजवटींमध्ये शिक्षणाचे राजकियीकरण मोठ्या प्रमाणावर झालं.

“पश्चिम बंगालच्या उच्च शिक्षण व्यवस्थेवर तेथील डाव्या राजवटीनं पद्धतशीर हल्ला चढवला. यातून विद्यार्थीवर्गावर डाव्या पक्षानं अकल्पनीय वर्चस्व प्रस्थापित केलं”, असं निरीक्षण प्रताप भानू मेहता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये नोंदवलं आहे. “नालंदापेक्षाही कलकत्ता विद्यापीठाचा विध्वंस ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात घडलेली भयावह घटना आहे. त्यामुळे आजमितीस उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत पश्चिम बंगालचा क्रमांक उत्तर प्रदेशच्याही खाली लागतो.”

कदाचित अमर्त्य सेन यांच्या आदरापोटी असेल, परंतु मेहता एक महत्त्वाची गोष्ट येथे सांगत नाहीत. ती म्हणजे, बंगालच्या उच्च शिक्षण क्षेत्रावर पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी डाव्यांनी सेन आणि इतर बुद्धिवाद्यांच्या वलयाचा केलेला वापर. या सर्व प्रकारावर सेन आणि इतरांनी मात्र चुप्पी साधली होती. वैचारिक जवळीक आणि मार्क्सवादी नेत्यांशी मैत्री यातून त्यांनी गप्प राहणं पसंत केलं असावं.

त्यामुळे जेव्हा सेन ‘द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’मध्ये लिहितात की, सध्याच्या राजवटीकडून प्रत्येक बाबीमध्ये होणारा हस्तक्षेप अभूतपूर्व प्रमाणात वाढला असून तो बऱ्याचदा राजकीयदृष्ट्या तीव्र स्वरूपाचादेखील आहे, जी काळजीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालबाबतदेखील असं का लिहिलं नाही, असा प्रश्न विचारला तर वावगं ठरणार नाही. असंतोष व्यक्त करण्याच्या बाबतीत सेन यांनी डावं-उजवं केलं नसतं तर त्यांच्या भूमिकेला नक्कीच बळकटी आली असती.

दरम्यान, पुण्यात गजेंद्र चौहान यांनी निश्चिंत राहावं. ‘युधिष्ठिर’पासून ‘जंगल लव्ह’पर्यंत निर्माण केलेल्या त्यांच्या कलाकृतींना सध्याच्या सरकारमध्ये सेन यांच्या तात्त्विक विचारमौक्तिकांपेक्षा निश्चितच अधिक चाहते लाभतील. कारण, पुराणवाङ्मय म्हणजेच इतिहास यावर विश्वास असणाऱ्या आणि अंमळ जास्तच छाती असणाऱ्या कृतीबहाद्दर लोकांचं हे सरकार आहे. बुद्धिवाद्यांकडे पांडवांप्रमाणे विजनवासात जाण्याचा मार्ग आहे.

 

(www.thepoliticalindian.com या ऑनलाइन संकेतस्थळावर १८ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद.)

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......