अजूनकाही
मिलाप मिलन झवेरीच्या चित्रपटांत दृकश्राव्य माध्यम आणि साहित्यिक संवेदना एकत्र येतात. त्याची पात्रं यमक, अनुप्रास इत्यादी अलंकारांचा वापर करत बोलू लागतात. त्याच्या दृश्यचौकटी प्रेक्षकावर रूपकांचा मारा करणाऱ्या असतात. खोटं सांगत नाही, ‘मरजावां’मध्ये मदतकार्य म्हणून एका अबला मुस्लीम स्त्रीच्या (सुहासिनी मुळे) मुलाचं प्रेत हिंदू-मुस्लीम तरुण रस्त्यावरून घेऊन जात असताना कॅमेरा येशू ख्रिस्ताच्या मागे नेत दृश्याची रचना केली जाते. थोडक्यात, सूक्ष्मता किंवा तार्किक दृष्टिकोन या गोष्टींचा मिलाप मिलन झवेरीच्या चित्रपटांशी दुरान्वयानेही संबंध येत नाही.
तसं पाहायला गेल्यास झवेरीचे चित्रपट हे अनेक अर्थांनी सर्वसमावेशक ठरतात. म्हणजे त्यांत आताची चित्रपट निर्मितीची संसाधनं वापरून दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या कालखंडातील चित्रपटातील कथा-आशय-विषय हाताळले जातात. हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई यांचा एका झटक्यात उल्लेख करत भारतातील धर्मनिरपेक्षतेचं दर्शन घडवून आणलं जातं. ‘मरजावां’ या चित्रपटांत समकालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्यही केलं जातं. सुरुवातीच्याच एका दृश्यात रघू (सिद्धार्थ मल्होत्रा) हा इथला नायक म्हणतो, “मंदिर और मस्जिद दोनो मिलेंगे”. कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच मिलाप झवेरीला झालेला हा साक्षात्कार म्हणावा की, त्याला देवाचा अवतार म्हणावं, हे प्रश्न तसे अनुत्तरीत राहतात. त्यातच पुढे हे पात्र जोडतं- “गुजरेगा इस देश की जिस गली से, मदद मिलेगी हर किसी को… मांगो या अली से, या फिर बजरंग बली से.”
चित्रपटातील पहिल्याच दृश्यात “मैं मारुंगा भी और जोडूंगा भी” म्हणत विरुद्ध गटातील लोकांना मारणं नि त्यांना बँडेज लावणं अशा कृती केल्या जातात. आणखी एका दृश्यात “मैं मारुंगा, मर जाएगा, दोबरा जन्म लेने से डर जाएगा” म्हटलं जातं. ‘मरजावां’ हा असे संवाद, मल्होत्रा-सुतारिया जोडीचे अभिनयाचे प्रयत्न किंवा कोण अधिक हावभावशून्य दिसेल याची त्यांच्यात लागलेली स्पर्धा यांपैकी काय असेल ते, आणि कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत, मुख्य प्रवाहातील दाक्षिणात्य चित्रपटकर्त्यांना लाजवेल अशी मारधाडदृश्यं आणि तार्किकतेच्या अभावानं नटलेला चित्रपट आहे.
रघू हा नारायण अण्णा (नास्सर) या बड्या गुंडाचा उजवा हात आणि मानसपुत्र आहे. रघू हा अण्णाच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा असल्याच्या समजामुळे विष्णू (रितेश देशमुख) हा अण्णाचा सख्खा मुलगा रघूचा द्वेष करत असतो. साहजिकच या दोघांमधील द्वंद्व, रघूची एकनिष्ठता इथल्या कथानकाच्या केंद्रस्थानी असणारे मुद्दे आहेत. रघू-विष्णूमधील वाद अतर्क्य आहे. झवेरीच्या चित्रपटाकडून तर्काची अपेक्षा ठेवणं अतर्क्यच म्हणावं लागेल.
तर, रघू लवकरच झोया (तारा सुतारिया) या मूक मुलीच्या प्रेमात पडतो, हे इथलं एक उपकथानक आहे. शिवाय आरजू (रकुल प्रीत सिंग) या वारांगनेच्या रघूवर असलेल्या प्रेमातून निर्माण होणारा, पण पुढे ज्याचं काहीच घडत नाही असा प्रेमाचा त्रिकोणही इथं आहे. विष्णूला रघूचा मृत्यू पहायचा आहे, पण तो रघूकडून झोयाचा मृत्यू घडवून आणतो. झोयाला गोळी लागल्यावर ती मरता मरता चहाची गुळणी करते. नंतरचा तास-दीड तास सख्खा मुलगा विरुद्ध मानसपुत्र हा वाद सुरू राहतो, ट्विस्ट्स येतात, पण तेही तितकेच अतर्क्य आणि अपरिणामकारक असतात.
रघू ज्या भागात राहतो तो कुठल्यातरी सुमार चित्रपटाचा सेट आहे हे ओळखू आहे, हे कळण्याइतपत कृत्रिमता तिथं अस्तित्वात आहे. एखाद्या भिंतीला लहान मुलाने हात लावला तरी ती कोसळेल असं वाटतं. त्याच वस्तीत असलेल्या बारमध्ये आरजू काम करते. तिथल्या वातावरणात एक पूर्ण लांबीचं गाणं उकळलं जातं. याखेरीज नोरा फतेही या प्रेक्षकांच्या कामभावना चालवण्यासाठी भूतलावर अवतरलेल्या मदनेला घेऊन ‘एक तो कम जिंदगी’ नामक गाणं समोर सादर केलं जातं. त्यात नोरा आपल्या शरीराच्या लवचिकतेचं प्रदर्शन करते. झवेरीच्या चित्रपटांमध्ये आयटम साँग या प्रकाराला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व या दोन गाण्यांच्या अस्तित्वातून अधोरेखित होतं. आपले नितंब हलवणाऱ्या स्त्रीच्या शरीराला मादक म्हणून पेश करत असलेला कॅमेरा देशी-विदेशी चित्रपटांत अस्तित्वात असलेल्या ‘मेल गेझ’चं (पुरुषाने टक लावून पाहण्याची कृती) उदाहरण आहे.
दसऱ्याच्या दिवशी नायक-खलनायकात घडणारा संघर्ष म्हणजे झवेरीचं आपल्या चित्रपटात राम-रावणाचं, नायक-खलनायकाचं तत्त्वज्ञान अस्तित्वात आहे, असं म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आहे. इथंही “तेरे इन्त्काम में हम काम न आए तो हम दोस्त क्या काम के!”, “मैं बदला नहीं, इन्त्काम लूंगा”, “एक रावण, दस सर. एक विष्णू, दस का असर” असे कुणाही विचार करू शकणाऱ्या कान आणि मेंदूस हानिकारक संवाद आहेत.
इथल्या विनोदांचा दर्जा पाहायचा असल्यास पुढील दृश्याची कल्पना करा. झोयानं रघूला दिलेली हार्मोनिका आपल्या हातात घेऊन विष्णू म्हणतो (पक्षी : गातो), “हार्मोनिका, ओ माय डार्लिंग...” ऐकणारा नि:शब्द न झाल्यास नवल!
झवेरीचं दिग्दर्शन हे कमी-अधिक फरकानं कामचलाऊ राहिलेलं आहे. मात्र त्याच्या चित्रपटांत आणि लेखनात एक विलक्षणरीत्या वैचित्र्यपूर्ण अशी बी-ग्रेड, ‘सो बड, इट्स गुड’ तऱ्हेच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं असतात. इथल्या संवादांकडे, चित्रपटनिर्मितीकडे पाहिल्यास हे घटक इथं आढळतील. मात्र ते हास्यास्पदरीत्या रंजक ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरणारे अधिक आहेत.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment