अजूनकाही
‘कोती’ हा अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. मराठी चित्रपट क्षेत्राकडून दुर्लक्षित राहिलेल्या विषयावरील हा चित्रपट आहे. मराठी, हिंदी चित्रपटात तृतीयपंथी पात्र फक्त विनोद निर्मितीसाठी वापरलं गेलं आहे. मात्र ‘कोती’ या चित्रपटात एका किशोरवयीन तृतीयपंथीयाचा अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे. अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंत असलेला हा विषय दिग्दर्शक सुहास भोसले यांनी उत्तम प्रकारे मांडला आहे.
एका खेडेगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात शाम व बबऱ्या नावाचे सख्ये भाऊ असतात. वडील परिसरातील नामांकित काँट्रॅक्टर असतात. त्यामुळे नाव आणि प्रतिष्ठा टिकून ठेवण्याचं आव्हान असतं. आई चूल आणि मूल एवढंच माहीत असलेली पारंपरिक भारतीय स्त्री असते.
मुलं वयात येत असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एक बंडखोरी निर्माण होत असते. त्याची जाणीव समाज, शिक्षक आणि कुटुंबाला होत असते. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा बदल होतो- तो म्हणजे शारीरिक बदल. मात्र जेव्हा आपल्या कुटुंबात जन्माला आलेला मुलगा हा तृतीयपंथी आहे, हे समजतं तेव्हा कोणत्याही पालकाची प्रतिक्रिया काय असू शकेल?
शाळेत हुशार असलेल्या शामला टिकली लावणं, बांगड्या घालणं, साडी नेसनं आवडतं, मुलीचे खेळ आवडतात हे त्याचे आई-वडील आणि गावात माहीत होतं, तेव्हा शामचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो. त्याच वेळी भावावर प्रेम करणाऱ्या बाबऱ्याची शामला वाचवण्याची धडपड सुरू होते.
समाजात स्त्री-पुरुष या दोन जातीला मान्यता आहे. तिसऱ्या माणसाचं अस्तित्व मान्य नाही. समाजात स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, अधिकार हे फक्त पुरुषालाच आहेत. तेव्हा तृतीयपंथीयाच्या अस्तित्वाला कोण मान्यता देईल? शामच्या वडलांना पोटच्या लेकरापेक्षा समाजातील प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते. त्यामुळे एकदा ते शामला दरीत ढकलून देण्याचा विचार करतात. शामला तृतीयपंथीय समाजात सोडून देण्याचा विचार असतो, पण बबऱ्यामुळे तो सफल होत नाही.
समलिंग संबंधावर आधारित असलेल्या हॉलिवुडच्या ‘मून लाईट’ चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. त्याला ऑस्करदेखील मिळालं होतं. ‘मून लाईट’सारखाच विषय ‘कोती’मधून मांडला आहे. समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ज्या कुटुंबात तृतीयपंथीय जन्माला आले आहेत, त्या कुटुंबाची अवस्था कशी होत असेल? समाजाला तृतीयपंथीयाचा आशीर्वाद चालतो, मात्र त्यांचा माणूस म्हणून स्वीकार केला जात नाही. का?
भारतात इतिहासात तृतीयपंथीयांचे राजघराण्याशी संबंध असल्याचे अनेक दाखले आहेत. महाभारतापासून ते मुघल साम्राज्यापर्यंत उल्लेख आढळतो. चित्रपटात शाम आणि बबऱ्याचा एक संवाद आहे. बबऱ्या म्हणतो- ‘शाम, आता तुझा खरा १५ ऑगस्ट सुरू झाला!’
चित्रपटाची कथा दमदार आहेच. संवाद आणि कथेची मांडणी विचार करायला लावणारी आहे. या चित्रपटाची इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात निवड झाली होती. सरकारनं कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय आजवर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.
यामध्ये बालकलाकार अज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे, अभिनेते संजय कुलकर्णी, अभिनेत्री विनीता काळे यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश दुर्गे यांचं असून कॅमेरामन म्हणून भरत आर. पार्थसारथी आहेत. कला दिग्दर्शन देवदास भंडारे यांचं आहे.
या चित्रपटाचा शेवट खूप अस्वस्थ करणारा आहे.
.............................................................................................................................................
लेखक प्रशांत शिंदे तरुण पत्रकार आहेत.
shindeprashant798@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment