पुरोगामी कोण? प्रतिगामी कोण? आपण कोण?
पडघम - सांस्कृतिक
संदीप ताम्हनकर
  • संत ज्ञानेश्वर, शिवाजीमहाराज, लो.टिळक आणि न्या. रानडे
  • Wed , 04 January 2017
  • पडघम पुरोगामी Progressive प्रतिगामी Regressive संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwa शिवाजीमहाराज Chatrapati Shivaji Maharaj लो.टिळक Bal Gangadhar Tilak न्या. रानडे Mahadev Govind Ranade

मानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी आणि प्रतिगामी हा झगडा चिरंतन आहे. आहार, निद्रा आणि मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा झगडा असणं शक्य आहे. ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा झगडा दिसतो, आणि दिसत राहील.

पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी, मनुवादी, धर्मवादी, कर्मविपाकसिद्धान्तवादी, शब्दप्रामाण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल, या दृष्टीने पुरोगामी लोक विचार करतात. त्यांना हे माहीत असतं की, या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.

या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल, हे पाहणाऱ्या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणाऱ्या असतात.

एखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का व कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते, हे पाहणं मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो. पण सामान्यपणे आपल्याला असं म्हणता येईल की, व्यक्तीचं बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून तिची भूमिका ठरत असते. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. तर सुमार बुद्धीची पण स्वार्थ समजणारी, असुरक्षिततेच्या भावनेनं ग्रासलेली व्यक्ती सनातनी बनते, असं सुचवण्याचा दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा. मात्र या विवेचनाच्या आधारे आपण स्वतः कोण आहोत, हे समजून घेतलं तर अधिक चांगलं!

भारताच्या ज्ञात इतिहासात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी शक्तींचा संघर्ष सातत्यानं होत आलाय, असं दिसून येतं.

भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी चंद्रगुप्त मौर्य कुलीन राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता होती. महान सम्राट अशोक याच मौर्य कुळातील राजा होता. वर्णव्यवस्थेत उच्चकुलीन नसलेल्या मौर्य कुळातील बाराव्या पिढीतला बृहदत्त नावाचा राजा राज्य करत असताना, त्याच्या पुष्यमित्र शुंग या वैदिक ब्राह्मण सरदाराने, मौर्याची बहुजन व बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली. शुंगाने राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन त्याचा प्रसार केला. वेद, श्रुती, स्मृती-पुराणांचं आणि वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन घडवून आणलं. भृगुकडून ‘मनुस्मृती’ नव्यानं संकलित करवून घेतली आणि अमलात आणली. याच शुंगाने कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ हा त्या काळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथ नष्ट केला. त्यानंतर अनेक शतकं हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात, त्यातल्या बहुतेकांना हा इतिहास माहीत नसतो!)

प्रत्यक्ष युद्धातील जय-पराजय जसे ऐतिहासिक आणि राजकीय बदल घडवतात, तसेच हे संघर्ष सामाजिक बदल घडवतात. समाजमन कूस बदलतं, वैचारिक ध्रुव बदलतात.

नंतरच्या काळात हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यासधर्म सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोसा करून टाकला की, त्यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून नदीत आत्महत्या केली. सनातन्यांचं वैर पिढीजात होतं. त्यांनी मुलांना पण वाळीत टाकलं.

या पार्श्वभूमीवर तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेलं ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्राकृत मराठी लोकभाषेत आणण्याचं बंडखोर कार्य ज्ञानदेवांनी केलं. वेदांचं सार असणाऱ्या श्रीमत्भगवतगीतेचं ‘भावार्थदीपिके’त म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’त रूपांतरण करून त्यांनी जनसामान्यांसाठी एक मोठंच कार्य केलं. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली, पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी भागवत वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात सर्वदूर पसरला. याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगे महाराजांनी महाराष्ट्रात बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली.

छत्रपती शिवाजीमहाराजही पुरोगामी होते. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका व कृती शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एक जण राजा होतो, याचा आनंद होण्याऐवजी त्याच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता.

नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराममहाराजांची दुबळी कारकीर्द, त्यांचं सल्लागारांवर अवलंबून असलेलं राजकारण, नंतर शाहूमहाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच.

डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच. उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मानाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला.

१८५७चं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध हा संघर्ष जुनी राजसत्ता परत स्थापन करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र-तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला.

काँग्रेसची स्थापना होऊन रानड्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला बाजूला सारून लो. टिळकांचं युग सुरू झालं. आचार, विचार आणि कृतीनं टिळक सनातनीच होते. ‘आधी स्वातंत्र्य की, आधी समाजसुधारणा’ या वादात त्यांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली. शाहू व सनातनी यांच्या ‘वेदोक्त का पुराणोक्त’, या वादात टिळकांसमोर पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुवर्णसंधी होती. त्यांची त्या काळची राजकीय आणि सामाजिक ताकद पाहता, त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती, तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांची बाजू घेतली.

वैदिक ब्राम्हणशाही संपूर्णपणे नाकारणारे महात्मा फुले सनातन धर्माचे कट्टर विरोधक होते, तसेच आधुनिकतेची कास धरणारे कृतिशील समाजसुधारक होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी धार्मिक होते, पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी ‘प्रच्छन्न हिंदू’ असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील, याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींवर अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लीम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अतिलाड असे ठपके ठेवून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असं सनातन्यांचं व्यापक कारस्थान होतं, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेलं अपरंपार प्रेम सनातन्यांना दिसू शकलं नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचं आकलनही त्यांना होऊ शकलं नाही.

भारताची संपूर्ण जगात नावाजली गेलेली राज्यघटना सुखासुखी मान्य झालेली नाही. बहुतेक लोकांना घटनासमितीच्या अनेक बैठका, त्यामध्ये झालेली चर्चा, वादविवाद याची कल्पना नसते. पण घटनासमितीच्या माध्यमातून भारतात श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजव्यस्था आणण्याचा जोरदार प्रयत्न सनातनी विचारांच्या अनेक सभासदांकडून करण्यात आला. डॉ. आंबेडकर यांचं पांडित्य आणि पंडित नेहरू यांची खंबीर साथ, यामुळे भारताला सध्याची लोककल्याणकारी राज्यघटना प्राप्त झाली.

इंदिराजींच्या वेळी आणीबाणीपूर्व काळात नोकरशाहीनं अक्षरशः धुमाकूळ घातला. जनमानस विटलं आणि काँग्रेसच्या विरुद्ध गेलं. विद्यार्थ्यांची आंदोलनं चालू झाली. विरक्त आयुष्य जगणाऱ्या जयप्रकाश नारायणांना पुढे करून त्यांच्या मागे सनातनी शक्तींची एकजूट झाली. सैन्यानं, पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत, अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश, कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली, पण इंदिराजी या नेहरूंच्या सर्वोत्तम शिष्या होत्या. त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले.

तसंच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी स्थिरस्थावर झालेली असताना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर केल्या. त्यांचे टीकाकार म्हणतात की, स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी उठवली, पण असं कोणतंही आंतरराष्ट्रीय दडपण त्यांच्यावर नव्हतं. या निवडणुकांनंतर सनातनी शक्ती सत्तेमध्ये भागीदार झाल्या, पण ही सत्ता टिकू शकली नाही. मोजक्या समाजवाद्यांना हा प्रतिगामी कावा समजला होता आणि त्यापैकी एक मधू लिमये होते. त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्यामुळे हे सरकार पडलं.

उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. त्यानंतर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते, पण राजकारणी म्हणून कच्चे होते. रामजन्मभूमी मंदिराचं कुलूप उघडणं, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणं, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणं, या सारख्या चुका त्यांच्या हातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेविरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या नावावर जमा आहेत.

पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक अध्याय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून. ‘तुमचे विचार आम्हाला पटत नाहीत म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू’, असा हा उरफाटा तर्क आहे. सनातन्यांचं इतरांचा बुद्धिभेद करण्याचं तंत्र चांगलंच मजबूत आहे, पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे.

श्रुतिस्मृतिपुराणोक्तानं आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर थोडंही परिचलन वैदिक सनातनी सहन करू शकत नाहीत. या बाबतीत कृतीचं तर सोडाच, पण थोडंसं विचारांचंही स्वातंत्र्यही कोणाला नाही, हाच सनातनधर्म आहे. सध्याच्या आधुनिक काळात वैदिक सनातनी विचारांचे उच्चवर्णीय लोक तोंडदेखला सर्वसमावेशकतेचा मुखवटा घेऊन सतत हिंदुत्वाच्या अस्मितेचं राजकारण करतात आणि प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात.

मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे. त्याला भावनिक आणि धार्मिक उन्मादावस्थेला नेण्याचं राजकारण वारंवार केलं जातं. या सनातनी विचारामुळे भारतवर्षाची झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचं अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्यासमोर आहे!

सध्या वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, समान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटेल असं सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, भांडवलदारधार्जिणे निर्णय, हुकूमशाहीची भलावण, कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणं, संसदेचा अव्हेर, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, ‘देशप्रेमा’ची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर ‘देशद्रोह्या’चा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदानालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत.

प्रत्येकानं स्वतःची स्वभाववृत्ती तपासून वरील उदाहरणांपैकी आपण कोणाला जवळचं मानतो, आपलं मानतो हे ठरवल्यास ‘गोबेल्स प्रचारा’ला बळी पडण्यापासून स्वतःला आणि पर्यायानं देशाला वाचवता येईल. या झगड्यात जय-पराजयाचं पारडं जरी बदलत राहिलं, तरी दीर्घकालीन पटलावर नेहमीच आधुनिकतेचा आणि पुरोगामित्वाचा विजय होत राहणार, हे नक्की!

लेखक पुणेस्थित वकील आहेत.

advsandeeptamhankar@yahoo.co.in

Post Comment

Pandurang More

Tue , 10 January 2017

Good Read. Clarity of Thoughts and analytical. Thanks Adv. Sandeep Tamhankar. Paddymourya@gmail.com


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......