‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही आता शरद पवारांची जबाबदारी आहे!
सदर - #जेआहेते
अमेय तिरोडकर
  • शरद पवार
  • Wed , 13 November 2019
  • सदर #जेआहेते अमेय तिरोडकर Amey Tirodkar शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस NCP काँग्रेस Congress भाजप BJP शिवसेना Shivsena

यंदाच्या विधानसभा निवडणुकांनी महाराष्ट्राला एक दंतकथा दिली. शरद पवार नावाची. 

आजवर ते महाराष्ट्रातले मोठे नेते होते. ‘पवार काहीही करू शकतात’ असं त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं. पण असं काहीही अचाट करून दाखवायची वेळ पवारांवर मागच्या साधारण २० वर्षांत आली नव्हती. त्यामुळे हे ‘काहीही करू शकणं’ बहुतांश वेळा खिल्ली उडवण्याच्या, उपहासाच्या अंगानं यायचं. हे इतकं होतं की, चांद्रयानाला चंद्रावर लँड होताना शरद पवारांची मालकी हक्क असलेली जमिनीची पाटी दिसली वगैरे मॅसेज दिसायचे. 

या सगळ्यात विनोदाचा भाग कमी आणि बदनामीचा जास्त होता. साधारण १९९० नंतर पवारांच्या या नियोजनबद्ध बदनामीला सुरुवात झाली. आजही ती सुरू आहे. पण यामुळे झालं काय की, ही जी ‘मिलेनियल्स’ पिढी आता मतदान करू लागली आहे. तिला फक्त बदनामीनंतरचे पवार दिसलेले. ‘पवार काहीही करू शकतात’ हे या पिढीनं कुत्सितपणे ऐकलेलं, वाचलेलं. 

पण, या विधानसभा निवडणुकांनी शरद पवार राजकारणातलीच नाही तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण आयुष्यातली किती व्यापक आणि मजबूत शक्ती आहे याचं दर्शन या पिढीला झालं. आणि पुन्हा एकदा, म्हणजे ८० च्या दशकात जसं शरद पवार राज्याच्या तरुणांचे हिरो झाले होते, तसे तब्बल ३९ वर्षांनी, स्वतः वयाच्या ऐंशीत पोचल्यावर पवार तरुणांचे हिरो झाले! हो, पवार काहीही करून दाखवू शकतात या वाक्याची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती या पिढीला आली आणि शरद पवार तिच्यासाठी आता दंतकथा झाले! 

हे असं का झालं? याची कारणं या निवडणुकीआधी भाजपानं केलेल्या माहोलात आहेत आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या इतिहासात आहेत. या मातीत निकराच्या प्रसंगी, अटीतटीच्या क्षणी जीवाच्या आकांतानं लढण्याची आणि तसं लढणाऱ्याचा सन्मान करण्याची वृत्ती आहे. आपला निम्म्याहून अधिक पक्ष फुटला आहे, हे पवार बघत होते. ते हतबल होते. थकलेले तर होतेच होते. अशा वेळी भाजपच्या चाणक्यांना हा मराठी मातीचा इतिहास जर माहिती असता तर त्यांनी ‘शरद पवारने महाराष्ट्र के लिये क्या किया?’ असा सवाल विचारलाच नसता. हे कमी म्हणून की काय, महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकारणातला पवार पॅटर्न आता बाद होणार’ अशी दर्पोक्ती केली.

यातून दोन गोष्टी झाल्या. पहिली म्हणजे शरद पवारांना संधी दिसली. आणि दुसरी गोष्ट पवार पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आले. 

संधी अशा अर्थानं की, महाराष्ट्राच्या मातीत कुणाचा गर्व, उन्माद खपवून घेतला जात नाही. संयम आणि संयत हा या राज्याचा स्थायीभाव आहे. एक किस्सा सांगतो. २००९च्या लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादीला १२ ते १४ जागा मिळण्याची आशा होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या जागा २००४ च्या ०९ वरून ०८ वर आल्या. एकानेच कमी झाल्या, पण जो माहोल केला होता, तो बघता राष्ट्रवादीला हा झटका होता. या निकालानंतर आपल्या जवळच्या सहकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आपल्याला दर्प झाला होता म्हणून लोकांनी आपल्याला नाकारलं.’ अहंकार हे राज्य खपवून घेत नाही, हे चव्हाणसाहेबांच्या या मानसपुत्राला पक्कं ठाऊक होतं! २००९ ला पण आणि २०१९ ला पण!!

ज्या क्षणी खचलेल्या पवारांना नामशेष करण्याच्या मागे भाजप लागली आहे, असा मॅसेज राज्यात गेला त्या क्षणी चक्रं उलटी  फिरू लागली.

काळ ४० वर्षं मागे गेला. शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर निघाले. पहिलीच सभा सोलापुरात. समोर अक्षरशः हजारो जण. आणि आलेल्या लोकांचं सरासरी वय ३० वर्षं! मोदी आणि शहांच्या बलशाली सत्तेला ललकारणारा माणूस हा या मातीतला आहे, आपल्या परिचयातील आहे, हे या तरुण पोरांना दिसलं. या वयाला लढाईचं आकर्षण असतं. आयुष्य पणाला लावायची बेभानी या वयात असते. आणि आपल्या बघण्यातला ८० वर्षांचा म्हातारा जर लढायला तयार असेल, तर मग लढाई साधीसुधी राहत नाही. ती या मुलांसाठी कर्तव्य होऊन जाते!

सोलापुरातच पवारांनी अमित शहाना डिवचलं. म्हणाले, ‘मी काही केलं, नाही केलं लोकांना ठाऊक. पण मी कधी जेलमध्ये गेलो नाही.’ हा ट्रॅप होता. टिपिकल पवार ट्रॅप! शहा आणि भाजप यावरून उचकणार आणि दुसरी चूक करणार हे पवारांना ठाऊक होतं. आणि ती चूक झाली! पवारांना ईडीची नोटीस येणार ही बातमी आली!! त्या क्षणी जणू काही पवार याची वाटच बघत होते, अशा रीतीनं उसळून आले. टीव्हीच्या पडद्यावर ईडीची बातमी आणि त्यावरची पवारांची प्रतिक्रिया यात दहा मिनिटांचं पण अंतर नव्हतं. 

ईडी. मोदी शहांच्या सर्वशक्तिमान सत्तेचा सर्वात ताकदवान दोस्त. ज्याला या देशातले भलेभले लोक घाबरलेले आहेत. पी. चिदंबरम ते डी. के. शिवकुमार आणि राज ठाकरे ते छगन भुजबळ, सगळ्यांच्या मानगुटीवर ईडी बसलेली आहे. आता पवार कोलमडतील, घाबरतील, उरल्यासुरल्या लढाईतून पळ काढतील आणि आपण महाराष्ट्र एकहाती मारू असा माहोल भाजपनं केला! 

पण त्यांचा पवारांबद्दलचा अंदाज चुकला. हा माणूस लढायला मैदानात आला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना मागची ३० वर्षं बदनाम केलं होतं. ते प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत आले होते. पण आता ते गप्प बसणार नव्हते. ईडीला ते घाबरतात, जे भ्रष्ट असतात असं देशात सगळीकडे भाजपवाले सांगायचे. पवारांनी नेमका इथंच डाव पलटवला! जाहीर केलं, मीच ईडीला भेटायला चाललोय!! अरेच्या? हे अजबगजब होतं!! नव्या पिढीला, जिला पवारांची जगातल्या प्रत्येक देशात भरमसाठ जमीन आहे, असं पढवलं गेलं होतं तिला हे धक्कादायक होतं!! हा माणूस जर इतका भ्रष्ट असेल तर इतरांसारखा घाबरून घरात का बसला नाही, हा प्रश्न तिला पडला!! पवारांनी हा विषय ताणला! त्यांना जाणवत होतं की, तरुणांना प्रश्न पडत  आहेत, ते आपल्याबद्दल पुनर्विचार करत आहेत. पवार मग इरेला पेटले. इतके की, अखेर मुंबईचे पोलीस कमिशनर त्यांना जाऊन विनंती करते झाले. साहेब, घराच्या बाहेर निघू नका! ईडीनेही तुम्ही यायची गरज नाही म्हटलं!! जो माणूस कालपरवापर्यंत आपल्याला भ्रष्ट वाटत होता, तो इतका बिनधास्त, इतका हिंमतवान असेल हे या पिढीला ठाऊक नव्हतं. ते हा वेगळाच शरद पवार बघत होते!! इथून पुढे जवळपास १ महिना मग ते सतत वेगळं काहीतरी बघणार होते!! 

त्यानंतर सुरू झाला तो पवारांचा झंझावाती दौरा! ज्यात होतं ५५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचं संचित!! पवार जिथे जात तिथे भाषणात त्या भागात ४०-५० वर्षांपूर्वी काय होतं आणि आता काय आहे हे सांगत. अगदी गंमतदार किस्से सांगत. आणि त्यातूनच हे राज्य मागच्या ५० वर्षांत का आणि कसं समृद्ध झालं हे समजावून सांगत. ऐकायला जुनी मंडळी असायचीच, पण पोरं पण असायची. त्यांना समजायचं की आज आपल्याकडे चारचाकी आहे, मोटरसायकल आहे, मोबाईल आहे, हे सगळं आपोआप नाही आलं. मागची पन्नास वर्षं इथं समृद्धीच्या दिशेनं नेणारी धोरणं राबवली गेली. लोकांनी मेहनत केली आणि मग हे दिवस आले. 

यात आणखी एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा होता. पवार कधीही हे मी केलं म्हणायचे नाहीत. म्हणताना काँग्रेसनं केलं म्हणत आणि मग श्रेय तिथल्या तिथल्या स्थानिक जुन्या नेतृत्वाला देत. उभा महाराष्ट्र या माणसाला तळतावरच्या रेषांसारखा माहितीये आहे! पवार गावागावातले नेते नावानिशी ओळखतात. भाषणात या नेत्यांच्या नावाची छानशी पखरण असायची. सगळ्या जाती आणि धर्मांचे नेते असायचे. सभा ऐकायला येणारा माणूस स्तिमित होऊन जाई. अरे ह्यांना आपल्या तालुक्याबद्दल इतकं काही माहीत आहे, आमचे नेते माहिती आहेत, हा धक्का बसून मुलं खुश व्हायची. ‘हा आपला माणूस आहे’ अशी आपुलकी त्यातून वाढत जायची. 

पवार हे करू शकले, कारण तसे ते घडत गेले. १९६२ला ते पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संपर्कात आले. चव्हाणसाहेब हे या मातीतलं अनमोल, अजोड रत्न. आणि त्याच वेळी रत्नपारखी पण. हा मुलगा मेहनती आहे, हुशार आहे, स्वतंत्र आणि आधुनिक विचारांचा आहे, हे त्यांनी हेरलं. ताकद दिली. १९६७ला पवारांच्या वयाच्या २७ व्या वर्षी चव्हाण साहेबांनी भल्या भल्यांचा विरोध डावलून पवारांना विधानसभेचं तिकीट दिलं. १९६७ ते १९७२ या पाच वर्षांत, सभागृहात निव्वळ आमदार म्हणून बसवलं. हा काय प्रश्न विचारतो, भाषणं कशी करतो, मतदारसंघात काम कसं आहे, याची चव्हाणसाहेब माहिती घेत. वेळोवेळी सूचना करत. १९७२ला देशात इंदिरा लाट होती. महाराष्ट्रात काँग्रेसच्या २२२ जागा आल्या. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी पवारांना राज्यमंत्री करायचं ठरवलं. चव्हाणसाहेबांना पवारांनी आणखी काही काळ फक्त आमदार म्हणून काम करावं असं वाटे. त्यांनी वसंतराव नाईकांना तसं सांगितलं. पण नाईकसाहेब म्हणाले, “चव्हाणसाहेब, शरद मेहनती आहे. समजूतदार आहे. या पिढीच्या हाती सूत्रं देण्याचा काळ आलाय. तिला संधी द्यायला हवी. बाकी सगळं ऐकेन पण शरदला मंत्री करू नको हे तुमचं म्हणणं मी ऐकणार नाही. तो मंत्री होईलच आणि त्याच वेळी तो गृहराज्यमंत्री होईल!” 

पहिल्याच फटक्यात गृहराज्यमंत्री! वसंतराव स्वतः गृहमंत्री. प्रशासनाचा प्रचंड अनुभव असलेला माणूस! वरून परत चव्हाणसाहेबांची आपल्या कामावर असलेली सूक्ष्म नजर!! पवारांनी या संधीचं सोनं केलं. राज्य कसं चालतं हे नीट समजून घेतलं. पूर्णवेळ विधिमंडळात बसत. महत्त्वाच्या चर्चा ऐकत. बैठक पक्की होत गेली. आणि संधी येताच १९७८ला, आपल्या वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी पवार मुख्यमंत्री झाले!! 

पण हे होत असताना त्यांना एका मोठया आरोपाला सामोरं जावं लागलं. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं सरकार पवारांनी पाडलं होतं. ‘शरदने पाठीत खंजीर खुपसला’ हे वाक्य आजही पवारांना टोचतं. आयुष्यभर पुरलेला हा घाव आहे. सरकार वसंतदादांचं पडलं, पण जखम शरद पवारांना झाली जी आजही पूर्ण भरलेली नाही!! 

तिथून मात्र पवारांनी आपलं प्रशासकीय कौशल्य सिद्ध केलं. निर्णय घेतले. राबवले. प्रसंगी त्यासाठी स्वतःच्या पक्षात संघर्ष केला. मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार हा असाच एक निर्णय. काळाच्या खूप पुढे जाऊन घेतलेला. साहजिकच सरंजामी काँग्रेस पक्षात विरोध झाला.  शरद पवार विरुद्ध इतर सगळा पक्ष असं चित्र होतं. पण पवार डगमगले नाहीत. त्याचं कारण विचारांवर पक्की श्रद्धा. हा विचार समतेचा, पुरोगामीत्वाचा! 

अनेकांच्या हे लक्षात येत नाही की, शरद पवारांना जो वारसा मिळाला तो फक्त यशवंतराव चव्हाणसाहेबांचाच नाही. चव्हाणसाहेब हा महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा एक सोन्याचा माईलस्टोन आहेत. फुले, शाहू, आंबेडकर ही परंपरा महाराष्ट्राला आधुनिक विचारांनी समृद्ध बनवणारी परंपरा आहे. ज्या पट्ट्यात म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यात या विचारांचा आणि चळवळीचा जोर होता, तिथेच २०१९ला शरद पवारांचे बहुतांश आमदार निवडून आलेत! हे राजकारण असं इतिहासाच्या एका भरभक्कम परंपरेचं राजकारण आहे!! 

मधल्या काळात पवारांच्या चुका पण अनेक झाल्या. ज्यांना साखर कारखाने, सूत गिरण्या, कॉलेजेस आणि दूध डेअऱ्या यांच्यापलीकडे काहीही दिसत नाही असे टोळीसम्राट पवारांनी सांभाळले. त्यांच्या अनेक चुकांकडे दुर्लक्ष केलं. हे फक्त सत्तेचे दास. विचारांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ही धूडं पवारांनी खूप काळ सांभाळली. त्यांची ही खूपच मोठी चूक. त्या चुकीची शिक्षाही त्यांना जनतेने दिली. सतत दोन लोकसभा निवडणुकांत सपशेल पराभव केला. अखेर सत्तेचे लोभी परत सत्तेकडे वळले, भाजपमध्ये गेले आणि पवारांची या संकटातून सुटका झाली. 

असं नाही की सगळेच गेले. काही अजूनही आहेत. आता सत्ता येण्याची चिन्हं दिसताच आणखी काही परतीच्या वाटेवर पण आहेत. पवारांनी हे लक्षात घ्यायला हवं की, आज जी तुमची क्रेझ आहे, अपील आहे, ते या लोकांनी सोडून गेल्यावर निर्माण झालेलं आहे. ही ब्याद परत पदरात घेणं म्हणजे केल्या श्रमावर पाणी ओतणं!

दुसरा एक प्रकार काळाच्या ओघात पवारांकडून हस्ते परहस्ते घडला. तो म्हणजे जातीयवादाला खतपाणी. यातून पवारच कोपऱ्यात ढकलले गेले. त्यांना ते समजत होतं पण त्यांच्या अवतीभोवतीच्या काही मंडळींचा मूर्खपणा याला कारणीभूत होता. ते काहीही असो, नेते म्हणून पवारांनाच मग इथल्या सर्वसमावेशक परंपरेनं जबाबदार धरलं आणि त्याचा राजकीय फटका त्यांना बसलाच.

या दोन गोष्टी येत्या काळात बदलल्याच पाहिजेत. आता शिवसेनेसोबत एक राजकीय तडजोड होऊ घातलेली आहे. राजकारणात काही तात्कालिक गरजेतून तडजोडी कराव्या लागतात. याक्षणी महाराष्ट्र शरद पवारांसोबत आहे. आणि ही शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तडजोड व्हावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे. पवारांच्या चाणाक्ष मनाने ही इच्छा ओळखलीय आणि म्हणूनच बात इतनी दूर गयी है. 

या सगळ्या तडजोडीचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्र हा निव्वळ भौगोलिक प्रदेश नाही. तर वेळोवेळी आपली जबाबदारी ओळखून देशाच्या हितासाठी सर्वात पुढे उभा राहणारा आणि परिवर्तनाचा विचार कृतीतून देणारा हा प्रदेश आहे. हा या भूमीचा इतिहास जसा आहे, तशी ती जबाबदारी, कर्तव्यसुद्धा आहे. 

मुजोरांच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून उभं राहण्याची जोखीम उचलणं आणि इतरांना त्यासाठी प्रेरणा देणं हे काम महाराष्ट्र काल आज नाही, तर या पेशावर ते चित्तगाव आणि इटानगर ते सोमनाथपर्यंत पसरलेल्या भूमीवर मागची तब्बल दोन हजार वर्षं करत आलाय. आज पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन तेच करायची वेळ आलीय. शरद पवार या सगळ्या घडामोडींचे कर्ते करविते आहेत. आज संपूर्ण देशात ज्या क्षमतेने पवार उभे राहिलेत आणि ज्या तडफेनं त्यांनी लढावं कसं हे दाखवून दिलंय त्याचं कौतुक आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं हे राजकारण जमलं पाहिजे, वाढलं आणि बहरलं पाहिजे. ती या देशाची आता सर्वात महत्त्वाची गरज आहे!! 

देशाच्या गरजेला धावून जाणं हाच महाराष्ट्र धर्म आहे! याक्षणी शरद पवार ही या महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी आहेत!!! 

.............................................................................................................................................

लेखक अमेय तिरोडकर राजकीय पत्रकार आहेत. 

ameytirodkar@gmail.com

ट्विटर - @ameytirodkar 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......