अजूनकाही
‘पुष्पक प्रकाशना’चे संस्थापक प्रकाशक ह. ल. निपुणगे यांचं रविवार, १० नोव्हेंबर २०१९ रोजी वयाच्या ८३व्या वर्षी निधन झालं. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह, ‘मसाप पत्रिका’चे माजी संपादक ही त्यांची अलीकडच्या काळातली ओळख. गेली अनेक वर्षं ते ‘विशाखा’ या दिवाळी अंकाचं संपादनही करत होते.
पाचेक वर्षांपूर्वी त्यांनी ‘हलचल’ या नावानं आपलं आत्मकथन लिहून प्रकाशित केलं. हे आत्मचरित्र खऱ्या अर्थानं ‘प्रकाशकीय’ म्हणावं असं नाही. कारण निपुणगे यांनी केवळ प्रकाशन एके प्रकाशन असं काही केलं नाही. खरं तर त्यांनी प्रकाशनाचा व्यवसाय करून पाहिला, मुद्रण व्यवसाय करून पाहिला, लायब्ररी चालवून पाहिली, दिवाळी अंक चालवला, ‘कृषिवल’सारख्या वार्षिक दैनंदिनी काढल्या, मासिक चालवलं आणि उतारवयात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही काम केलं. पण यापैकी कुठेच फार उल्लेखनीय म्हणावी अशी कामगिरी निपुणगे यांना करता आलेली नाही.
अतिशय सामान्य परिस्थितीतून काबाडकष्टांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व पिढीतील निपुणगे हे एक होते. फारसं शिक्षण नसताना, जवळ कुठल्याही प्रकारचं भांडवल नसताना मंचरसारख्या ठिकाणाहून नेसत्या वस्त्रानिशी आईसह पुण्यात आले. भाड्याच्या खोलीत राहू लागले. आधी आलेपाक, मग उदबत्त्या, मग पेपर टाकणं, मग प्यून, नंतर कम्पाउंडर, लग्न व्यवस्थापक, बांधकाम मॅनेजर अशा मिळेल त्या नोकऱ्या करत निपुणगे यांनी आपली वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर ते व्हीनस प्रकाशनात कामाला लागले. त्यानंतर वोरा बुक कंपनीत. पडेल ते काम करण्याचा स्वभाव असल्यानं आणि प्रामाणिकपणा अंगात मुरलेला असल्यानं निपुणगे जातील तिथं लोकांचा विश्वास संपादन करत राहिले.
वोरा कंपनीत काम करत असतानाच त्यांनी मित्राबरोबर ‘नेपच्यून लायब्ररी’ सुरू केली. शाळा-कॉलेजमधील मुलांसाठी असलेल्या या लायब्ररीला चांगला प्रतिसाद मिळाला. लायब्ररी चालू असतानाच १ जून १९६३ रोजी निपुणगे यांनी ‘पुष्पक प्रकाशन’ सुरू करून ‘रेखन आणि लेखन’ हे आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुण्यात एका होतकरू आणि धडपड्या प्रकाशकाची भर पडली.
पुढच्या ५०-५५ वर्षांच्या काळात त्यांनी रा. चिं. ढेरे, उद्धव शेळके, ह. मो. मराठे, बाळ गाडगीळ, ग. वि. अकोलकर अशा काही लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. आचार्य अत्रे यांच्याविषयीची ‘साहेब’ ही कादंबरी उद्धव शेळके यांच्याकडून तर ग. दि. माडगूळकर यांच्याविषयीची ‘निर्मोही’ ही कादंबरी रवींद्र भट यांच्याकडून लिहून घेतली. या दोन्ही कादंबऱ्यांकडून त्यांची फार अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. पण गप्प बसतील ते निपुणगे कसले. त्यांनी आपला धडपड करण्याचा उद्योग चालूच ठेवला. १९८१ सालापासून ‘विशाखा’ या दिवाळी अंकाचं पुनर्प्रकाशन करायला त्यांनी सुरुवात केली, मग ‘बळीराजा’, ‘गृहिणी’, ‘कृषिवल’ या वार्षिक दैनंदिनींचे प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आलं. थोडेफार आर्थिक स्थैर्य आलं.
त्यांच्या पत्नी त्यांना ‘मारा अंधारात उड्या आणि धडपडा’ असे म्हणत. निपुणगे यांच्या प्रकाशन, मुद्रण, मासिक, दैनंदिनी, दिवाळी अंक या सर्व उद्योगांसाठी हेच वर्णन समर्पक ठरते. त्यांच्या या प्रयोगांना त्यांच्या पत्नीची खंबीर साथ होती हेही तितकंच खरं. शिवाय त्यांनी नोकरी करून घर सांभाळलं. त्यामुळे निपुणगे यांना ‘धाडसी प्रयोग’ करून पाहण्याचं आणि सतत धडपडण्याचं स्वातंत्र्य मिळत राहिलं!
प्रकाशकानं प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकावरून काही वादविवाद झाले नाहीत, न्यायालयीन खटले लढावे लागले नाहीत, असं सहसा होत नाही. सध्याच्या काळात या सव्यापसव्याच्या भीतीनं अनेक मराठी-इंग्रजी प्रकाशक आपली पुस्तकं सपशेल मागे घेतात किंवा नष्ट करून टाकतात. तर ते असो. विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांच्या ‘वळचणीचे पाणी’ या आत्मचरित्राविषयी वर्षभरानं फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बोकील यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून गाडगीळ आणि निपुणगे यांना न्यायालयात खेचलं. त्याची रोचक हकिकत त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.
असे संघर्षांचे छोटे-मोठे प्रसंग निपुणगे यांच्या आयुष्यात सतत आले आहेत. त्यांचं आत्मचरित्र अशा हकिकतींनी भरलेलं आहे. पण त्या सर्व आर्थिक संघर्षांच्या आणि व्यावहारिक हिकमतीच्या आहेत. निपुणगे यांनी त्यांना जमेल तेवढे आणि तसे प्रयोग करून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. पण अशा गोष्टींना मूलभूत मर्यादा असते. त्यामुळे या चौकटीत जे आणि जेवढे शक्य होतं, तेवढंच यश निपुणगे यांना मिळालं.
दिवाळी अंकासाठी, मासिकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं, याविषयी निपुणगे यांनी आपल्या आत्मचरित्रात सविस्तर लिहिलं आहे, तसंच ‘विशाखा’ या दिवाळी अंकात दरवर्षी काय काय साहित्य छापलं याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. केशवराव कोठावळे, श्री. ग. माजगावकर, वोरा कंपनीचे अमरेंद्र गाडगीळ, बाळ गाडगीळ अशा प्रकाशनव्यवहाराशी संबंधित व्यक्तींच्या स्वभावाचे काही पैलू निपुणगे यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून नोंदवले आहेत.
त्यांच्या आत्मचरित्राचं शेवटचं प्रकरण हे त्यांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कामाविषयीचं आहे. या प्रकरणातून मसापचं अंतरंग काही प्रमाणात जाणून घ्यायला मदत होते. या साहित्यिक संस्थेत कशा प्रकारचं राजकारण चालतं, त्याची चांगल्या प्रकारे माहिती होते आणि राजकारणी काय किंवा साहित्य व्यवहारात लुडबुड करणाऱ्या व्यक्ती काय, यांच्यात कसा फारसा फरक नसतो, हे आपसूकच समजायला मदत होते.
प्रकाशनसंस्थांच्या संस्थापकांची आत्मचरित्रं आणि चरित्रं मराठीमध्ये फारच कमी आढळतात. मातब्बर म्हटल्या जाणाऱ्या रा. ज. देशमुख, श्री. पु. भागवत, रामदास भटकळ या प्रकाशकांनीही आत्मचरित्र लिहिण्याचं टाळलं आहे. यातील काहींचे गौरवग्रंथ निघाले आहेत, पण आत्मचरित्र ही ‘फर्स्टहँड डॉक्युमेंटरी’ असते. संबंधित प्रकाशकानं स्वत: अनुभवलेला काळ त्यानंच सांगणं जास्त महत्त्वाचं असतं. शिवाय मराठीमध्ये मोजके अपवाद वगळता गौरवग्रंथाची परंपरा फारशी नावाजण्याजोगी नाही. अलीकडच्या काळात तर ज्या प्रकारचे गौरवग्रंथ प्रकाशित होतात, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. असो. तर पहिल्या फळीतल्या प्रकाशकांनी आपली आत्मचरित्रं फारशी लिहिली नसली तरी दुसऱ्या फळीतल्या प्रकाशकांनीही फारशी लिहिलेली नाहीतच. पण त्यातील काही मात्र अलीकडे लिहू लागले आहेत. निपुणगे यांचं ‘हलचल’ हे त्यापैकीच एक आहे.
प्रकाशनापासून सुरुवात करून पुस्तक विक्री, मुद्रण व्यवसाय, दिवाळी अंक इथपर्यंत प्रवास केलेल्या एका धडपड्या प्रकाशकाचं हे आत्मचरित्र आहे. साडेतीनशे पानांचं हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला आवडेलच असं नाही, पण प्रकाशन व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना यातून काही संदर्भ-माहिती मिळू शकते आणि ज्यांना या क्षेत्राकडे वळायचं आहे त्यांना काय करू नये आणि कशा प्रकारे करू नये, याचा धडा या आत्मचरित्रातून नक्की मिळू शकतो. त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही. काय केलं नाही, यापेक्षा जे काही केलं ते काय प्रतीचं आहे, असं पाहणं हे अधिक सयुक्तिक ठरतं. निपुणगे यांच्या या आत्मचरित्राबाबतही तोच दृष्टिकोन ठेवला तर ते फारसं निराश करत नाही. ‘थोर’ म्हणावं असं काही हाताला लागत नाही हे खरं, पण फार अपेक्षाभंगही होत नाही.
आयुष्यभर धडपडच करत राहणाऱ्यांविषयी आमचे एक लेखक मित्र गमतीनं ‘साने गुरुजींची धडपडणारी मुले’ असा शब्दप्रयोग वापरतात. निपुणगे यांनाही तो लागू पडतो. तरीही ते दखलपात्र ठरतात. त्याची दोन कारणं आहेत.
पैकी पहिलं, मराठी ग्रंथव्यवहार किंवा प्रकाशनव्यवहार या नावानं जे क्षेत्र ओळखलं जातं, ते ती मराठीची एक सांस्कृतिक ओळख आहे. या ओळखीला वैभवशाली, समृद्ध आणि उन्नत करण्याचं काम आजवर अनेक प्रकाशनसंस्था, प्रकाशक, मुद्रक, बाइंडर, मुद्रितशोधक, ग्रंथसंपादक, पुस्तकविक्रेते, पुस्तकांची दुकानं, वितरक आणि अर्थातच लेखक यांनी केलं आहे. मराठी प्रकाशनव्यवहाराचा जेव्हा साधार, तपशीलवार इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मोठी कामगिरी केलेल्यांच्या वाट्याला जास्त पानं नक्कीच येतील. पण इतिहास केवळ राजे-महाराजे यांच्यामुळेच घडत नसतो, तर तो सरदार, अमलदार, सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यामुळेही घडत असतो. कारण राजे-महाराजांचे साम्राज्य उभे राहण्यात, ते टिकून ठेवण्यात किंवा वैभवशाली होण्यात, त्यांचाही काही ना काही वाटा असतो. निपुणगे यांचं योगदान म्हणूनच दखलपात्र ठरतं.
दुसरं, अलीकडच्या काळात मराठी ग्रंथव्यवहारातल्या पुण्या-मुंबईतल्या अनेक संस्था बंद पडू लागल्या आहेत किंवा त्यांच्या संस्थापकांच्या-उत्तराधिकाऱ्यांच्या उतारवयामुळे वा निधनामुळे त्या आपला ‘सूर’ हरवू लागल्या आहेत किंवा नव्या पिढीला त्यात स्वारस्य नसल्यानं मोडकळीस येऊ घातल्या आहेत. त्यामुळे मराठी ग्रंथव्यवहाराची गंगोत्री असलेल्या या शहरांचं सांस्कृतिकपण काहीसं उणावत चाललं आहे. निपुणगे यांच्यासारख्या ‘धडपड्या’ प्रकाशकाच्या निधनानं त्याचा अजून एक चिरा ढासळला आहे, असं म्हणावं लागेल.
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment