‘हेल्लारो’ : स्त्रियांच्या संयत बंडखोरीची गोष्ट सांगणारा सिनेमा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
धनंजय श्रीराम सानप
  • ‘हेल्लारो’चं पोस्टर
  • Mon , 11 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र हेल्लारो હેલ્લારો अभिषेक शहा Hellaro Abhishek Shah

अलीकडच्या काळातल्या अंतर्मुख करणाऱ्या हिंदी सिनेमांची यादी करायची ठरली, तर बोटावर मोजण्याइतकीच नावं त्या यादीत समाविष्ट करावी लागतील. त्या दिशेनं जाणारे काही प्रयोग घडत आहेत, नाही असं नाही. पण हिंदीचा विस्तार पाहता ते चित्र फारसं समाधानकारक नाही! सिनेमाच्या अशा कठीण काळात प्रादेशिक भाषेतील सिनेमांनी मात्र आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केलेली धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यात मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, तामीळमधील एम.सेल्वाराज दिग्दर्शित ‘परियेरुम पेरूमल’ आणि यंदाचा सुवर्णकमळ घोषित गुजराती भाषेतील अभिषेक शहा दिग्दर्शित ‘हेल्लारो’ या सिनेमाची नावं घ्यावी लागतील. या तीनही सिनेमांतला समान धागा म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा अप्रस्थापितांचा बंड. भारतीय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिपेक्ष्यात त्याचा अर्थ लावताना वास्तवाची दाहकता लक्षात येते.

अशाच एका दाहकतेची जाणीव काळाच्या मागे पडलेल्या लोककथेच्या अनुषंगानं नुकताच प्रदर्शित झालेला ‘हेल्लारो’ हा सिनेमा करून देतो. या सिनेमाची कथा आजही कालसुसंगत ठरेल अशी आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा संघर्षाचा इतिहास उलगडून पाहिला की, लक्षात येतं हा संघर्ष सनातन आहे.

समाजाच्या छोट्या घटकाला नेहमीच उपेक्षित राहावं लागतं. कारण व्यवस्था विषमतेच्या मुळावर उभी आहे. तिची पाळंमुळं समाजाच्या रचनेत खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे बंड करून तिला आव्हान देण्याशिवाय पर्याय नसतो, याची जाणीव तीव्र करण्याचं काम हा सिनेमा करतो.

हा सिनेमा स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक मागासलेपणाची गोष्ट सांगतो. ‘हेल्लारो’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘मोठी लाट’ असा होतो. १९७५ सालच्या कच्छ भागातील समरपुरा नावाच्या गावाची ही गोष्ट आहे. वाळवंटातल्या या छोट्या वस्तीतल्या स्त्रियांच्या आंतरिक घुसमटीमागचं कारण अर्थातच पुरुषसत्ताक मानसिकता आहे. या काळात देवी म्हणून स्त्रीची पूजा करणाऱ्या पुरुषांची तथाकथित मर्दानगी मात्र स्त्रियांवर अत्याचार करण्यात धन्यता मानणारी आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर घेऊन जगणाऱ्या समाजात स्त्रियांना गुजराती नृत्यकला म्हणजे गरबा खेळण्याचं स्वातंत्र नाही. या स्त्रियांच्या हाती व्यवहार नाहीत, शिक्षणाशी दूरपर्यंत त्यांचा संबंध नाही.

पुरुषांची सेवा करायची आणि घरकाम करण्यात दिवस घालवायचा, अशा बंदिस्त वातावरणात जगणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात दूरच्या तळ्यातील पाणी आणण्यासाठी जाताना होणाऱ्या गप्पा हीच काय ती मोकळीक! अशातच या गावात नवीन लग्न होऊन आलेली मंजिरी सामील होते. ती शहरातून आलेली आणि शिकलेली असते. सासरी येताच गावचे सगळे रीतिरिवाज तिलाही सांगितले जातात, पण ती आपल्या परीने चौकटी ओलांडण्याचा आणि अशा जगण्यातही आनंद शोधण्याचा प्रयत्न करत राहते.

वाट चुकून तळ्याच्या काठी मरणप्राय अवस्थेत सापडलेला ढोलवादक (गरब्यासाठी ढोलसदृश पारंपरिक वाद्य वाजवणारा) आनंद बनून तिच्या व अन्य स्त्रियांच्या आयुष्यात येतो. बंद भिंतीतली घुसमट या स्त्रिया दूर वाळवंटात पुरुषांपासून चोरून गरबा खेळून मोकळी करू लागतात. ‘खेळही त्यांचे आणि नियमही, आपण मात्र बळी जातो’ असे म्हणत या स्त्रिया बंडखोरीचं पहिलं पाऊल टाकतात. अंधश्रद्धा आणि भीती यांची मनात खोलवर रुजलेली पाळंमुळं नष्ट करताना त्यांचा समाजासोबतच स्वतःशी चाललेला संघर्ष, त्यानुसार गावात घडणाऱ्या घटना, या साऱ्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मन असलेले मोजके पुरुष, पण स्त्री असूनही स्त्रीचं मन न जाणणाऱ्या पारंपरिक वृद्ध स्त्रिया आणि शेवटी सत्य उघड झाल्यावर त्याला धैर्यानं सामोऱ्या गेलेल्या स्त्रिया, यांची गोष्ट म्हणजे ‘हेल्लारो’.

सिनेमाची पटकथा पकड घेणारी आहे. त्याचबरोबर संवादातून नकळत घडणारे निखळ विनोद, प्रेक्षकांनाही पाय थिरकायला लावणारं संगीत, डोळ्याच्या पापण्या अलगद ओल्या करणारे भावस्पर्शी संवाद, स्त्री भूमिका साकारणाऱ्या स्त्रियांचा कौतुकास्पद अभिनय, दिग्दर्शन आणि पटकथा यांच्या सोबतीला तितक्याच ताकदीचा आणि सफाईदार पद्धतीनं हाताळलेला कॅमेरा, ही या सिनेमाची वैशिष्ट्यं आहेत. कथेत भूतकाळातील काही उपकथानकंही येतात. पण ती प्रवाह खंडित करत नाहीत, तर उलट सहाय्यक ठरतात.

सिनेमातली १९७५ सालची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थिती आणि आजचं समाजव्यवस्थेतलं स्त्रियांचं स्थान यात साधर्म्य असल्याचं जाणवत राहतं. जातीव्यवस्थेची झळ बसलेला पुरुष आणि पुरुषी मानसिकतेच्या अत्याचाराला तोंड देणारी स्त्री यांमध्ये फरक नसतो, याची जाणीव हा सिनेमा करून देतो. तथाकथित उच्चजातीने केलेली हिंसा अहंकारातून येते.

स्त्रियांनी मर्यादा ओलांडू नये, असा पुरुषी धूर्त कावा न जुमानता गरबा खेळणाऱ्या स्त्रिया एकाच वेळी धाडसी आणि परिस्थितीच्या गुलाम वाटायला लागतात. त्यामुळे सिनेमा गुजराती भाषेत असला तरीही त्यातलं चित्रण आपल्या आजुबाजूचं वाटतं.

या स्त्रिया गरबा खेळता यावा, म्हणून जे काही करतात, त्यात स्वातंत्र्याची किरणं दडलेली आहेत. त्यालाच पूरक म्हणून शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारी स्त्री असो किंवा विधवाच्या हेटाळणीला अयोग्य म्हणणारा एक पुरुष असो, यांच्यात एक प्रकारे समाजाच्या आधुनिकतेची बीजं पडलेली दिसतात. समाजाच्या सकारात्मक बाजूकडे पाहत त्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं असतं, कारण त्यावर समाजाची दिशा ठरत असते. अशा विविध स्तराकडे एकाच वेळी समग्र आणि तुकड्या-तुकड्यात पाहण्याची संधी हा सिनेमा देतो.

देशात १९७५ साली जी परिस्थिती होती, त्याचा उल्लेख मोठ्या गंमतीनं सिनेमात येतो. आणीबाणीचा निर्णय घेणारी बाई आहे असं जेव्हा कळतं, तेव्हा समरपुरातील एक वृद्ध म्हणतो, ‘बाईच्या हातात कारभार दिला की, असंच होणार!’ अशा गृहीतकांनी आजही आपली पाठ सोडलेली नाही.

एकीकडे देश चालवणारी एक स्त्री, तर दुसरीकडे पतीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पिळली जाणारी स्त्री, किंवा स्त्रीच्या स्वरूपातील दगडाच्या देवीची पूजा करताना प्रत्येक पुरुष तिथे नतमस्तक होतो, तर घरातल्या स्त्रीला मात्र गुलामाची वागणूक देतो...

असा परस्पर विरोधाभास दिग्दर्शकानं कुशलतेनं टिपला आहे. त्यामुळे या सिनेमाची कथा स्त्री-पुरुष संघर्ष इतक्या मर्यादित चौकटीतली नाही. त्याला अनेक पदर आहेत आणि या प्रत्येक पदराचं मिळून एक गोलाकार वर्तुळ बनतं. ज्यामध्ये स्त्रिया आपल्या मुक्ततेचा गरबा खेळताना बेधुंद होऊन जातात. जणू काही त्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक या चारही पातळ्यावर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांची झलक पाहायला मिळते. अर्थात यासाठी तथाकथित समाजाच्या रूढी, प्रथा आणि परंपरेला सावकाश पण निरंतर लढा देऊन बाजूला सारलं जातं.

हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा, कारण मानवी समाज उत्क्रांत होताना अधिक विवेकाधिष्ठित समाजरचनेसाठी या मानवी समूहाचं काय काय गळून पडावं, याचं उत्तर हा सिनेमा देतो. 

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 16 November 2019

धनंजय सानप,

हा धूर्त पुरुषी कावा म्हणजे नेमकं काय? कशावरून तो ढोलवादक धूर्त नाहीये? जर का समस्त पुरुषजात इतकी धूर्त आहे तर त्यात तो ढोलवादक पण आलाच ना? आणि जर समस्त स्त्रीजात इतकी निष्पाप आहे, तर मग बायकांनी लग्नंच करू नये पुरुषांशी. एकतर एकटं राहावं किंवा सरळ विवाह तोडून बाहेर पडावं. लग्नातली सुरक्षा पण हवीये आणि पुरुषांना दोष पण द्यायचाय तर ती दोन्ही उद्दिष्ट एकाच वेळी साध्य होणारी नाहीत.

तुम्ही म्हणता की पुरुष धूर्त असतात. पण खरंतर बायकाच भावाभावाला एकमेकांपासून तोडतात. निदान जगाचा अनुभव तरी असाच आहे. पुरुषांनी कधी बायको व मेहुणीत फूट पाडल्याचं ऐकलंय का कोणी? उगीच काहीतरी फेमिनिस्ट ठोकळेबाज शब्द वापरून लेख व सिनेमा बनवलेला वाटतो.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख