अजूनकाही
‘Once you do something, you never forget. Even if you cannot remember’ असं म्हणणारी वटारलेल्या डोळ्यांची, मोठ्या मोठ्या नाकपुड्यांची, टोकदार नखांची आजी भेटते ‘स्पिरीटेड अवे’ या हयाओ मियाझाकी यांच्या कमालीच्या प्रगल्भ आणि सुंदर अॅनिमेशन फिल्ममध्ये. या सिनेमाची नायिका फक्त १० वर्षांची आहे.
या ‘स्पिरीटेड अवे’ (२००१)ने जपानमध्ये बॉक्स ऑफीसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. टायटॅनिक सिनेमाला मागे टाकलं होतं! या फिल्मसाठी मियाझाकी यांना ऑस्कर मिळालं होतं.
मियाझाकी यांच्या सर्व फिल्म्स पाहणं हे म्हणजे ‘मरण्यापूर्वी करायच्या गोष्टी’ या यादीत येतं.
सिनेमाची फ्रेम न फ्रेम हातानं काढणाऱ्या मियाझाकी यांच्याबद्दल Walt Disney animation studioचे माजी chief creative officer आणि ‘पिक्सार’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक जॉन लेस्टर म्हणतात, “मियाझाकी हे या काळातले सगळ्यात महान दिग्दर्शक आहेत”.
तर अशा या मियाझाकी आजोबांवरची अतिशय महत्त्वाची डॉक्युमेंटरी म्हणजे ‘टेन इयर्स विथ हयाओ मियाझाकी’. ही डॉक्युमेंटरी नेटवर फ्री उपलब्ध आहे. त्यामुळे तीत रस असणाऱ्यांनी तात्काळ ती पहावी आणि जे लोक या महान कलावंताबद्दल दुर्दैवानं अपरिचित आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व फिल्म्स कशाही करून, अगदी वाट्टेल ते करून मिळवाव्यात आणि ही डॉक्युमेंटरी पाहावी.
जेव्हा कलाकाराची कलाकृती त्याच्या देशापुरती मर्यादित न राहता जगाचा अवकाश व्यापून टाकते, तेव्हा तो कलाकार वैश्विक होतो. अशी कलाकार व्यक्ती म्हणजे जपानचे जगप्रसिद्ध अॅनिमेटर, चित्रकार, दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माता हयाओ मियाझाकी. त्यांच्या अॅनिमेशन फिल्म्सनी एकूणच अॅनिमेशन फिल्म इंडस्ट्रीला मोठं केलं आहे. आज ते ७८ वर्षांचे आहेत. जपानचे दिग्दर्शक अकिरा कुरोसोवा, ओझू यांच्या मांदियाळीत मियाझाकी यांचं नाव येतं.
‘टेन इयर्स विथ हयाओ मियाझाकी’ ही अतिशय महत्त्वाची डॉक्युमेंटरी आहे. इतक्या महत्त्वाच्या कलाकाराच्या आयुष्यातली दहा वर्षं चित्रित करून ठेवल्यामुळे त्याला संदर्भमूल्य प्राप्त झालं आहे. दस्तावेज तयार करणं, त्या हेतूनं काम करणं किती महत्त्वाचं आहे, हे ही डॉक्युमेंटरी पाहून लक्षात येतं.
.............................................................................................................................................
‘टेन इयर्स विथ हयाओ मियाझाकी’चा ट्रेलर
.............................................................................................................................................
मियाझाकी यांच्या २००८ सालच्या ‘पोन्यो ऑन द क्लिफ बाय द सी’ या ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमाची सर्व प्रक्रिया या डॉक्युमेंटरीत बघायला मिळते. थकत चाललेलं शरीर आणि स्वत:च्या प्रतिभेशी चाललेली त्यांची झटापट, त्यातून त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या बोटांमधून सरसर जिवंत होत जाणारी चित्रं, हे पाहणं थक्क करणारं आहे... अगदी त्यांच्या सिनेमांइतकच. सिनेमाचं सुरुवातीचं दृश्य कसं असावं, यासाठी त्यांची तडफड होत राहते. प्रत्येक हालचाल ते हातानं काढत राहतात, किती ती चिकाटी, कष्ट, विचारांची स्पष्टता आणि भावनेचा प्रामाणिकपणा!
सोबतच मियाझाकी यांचं जगणंदेखील आपल्याला दिसत राहतं. रोज सकाळी स्टुडिओत आल्यावर त्यांचा तिथल्या अचेतन वस्तूंशी होणारा संवाद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वावलंबी आहेत. एवढे मोठे फिल्ममेकर असूनही स्वत:ची कॉफी स्वत: बनवतात. त्यांना जेवण बनवायला खूप आवडतं. त्यासाठी भाजी विकत आणायला ते भाजी बाजारातसुद्धा जातात.
मियाझाकी यांच्याइतकेच कौतुकाला पात्र आहेत, ते त्यांचे निर्माता सुझुकी. ते गेले ३० वर्षं मियाझाकी यांचे निर्माते आहेत. स्टुडिओ जिबली आणि मियाझाकी यांचा प्रवास सुझुकी यांनी जवळून पाहिलेला आहे. सुझुकी यांच्या निमितानं लक्षात येतं की, कलाकार तर महत्त्वाचा असतोच, परंतु त्याचबरोबर त्या कलाकारला पाहिजे तशी कलाकृती निर्माण करण्यासाठी जी व्यवस्था लागते, जे आर्थिक पाठबळ लागतं, जी संसाधनं लागतात ती तयार करणारा माणूसदेखील खूप महत्त्वाचा असतो. निर्मात्याला तर व्यावहारिक बाजू आणि कलाकाराची संवेदनशीलता सांभाळणं, या दोन्ही टोकांमध्ये समतोल साधावा लागतो. आणि हा समतोल सुझुकी यांना साधलेला आहे. त्यांना पाहणं, ऐकणं खूपच सुखद आहे.
मियाझाकी यांच्या सर्जनशील पैलूबरोबरच त्यांचं पूर्वआयुष्यदेखील आपल्याला कळत जातं. त्यांची आई आजारी असायची आणि आजारपणातच ती गेली, त्याची सल कायमची त्यांच्या मनाला लागून राहिलेली आहे. त्यांच्या ‘माय नेबर तोतोरो’ या सिनेमातदेखील आई आजारी आहे. “तुम्ही काय आहात, कोण आहात हे तुमचा सिनेमा सांगतो, तुम्ही कितीही लपवाछपवी करा ते शक्य होत नाही,” असे ती डॉक्युमेंटरीत एके ठिकाणी म्हणतात.
मियाझाकी यांचा मुलगा गोरो, तोदेखील त्यांच्याप्रमाणे काम करतो आहे. त्यांच्यातील आणि मुलामधील कामावरून असलेले मतभेद, दोघांमधली ‘जनरेशन गॅप’ दिसते. अजून गोरो सिनेमासाठी तयार नाही, असं वडिलांना वाटत असतानाही तो हट्टानं ‘फ्रॉम अप ऑन पॉपी हिल’ हा सिनेमा तयार करतो. वडिलांची प्रतिभा आणि प्रतिष्ठा यांचं सतत ओझं आणि दडपण घेऊन वावरणारा गोरो डॉक्युमेंटरीत आहे.
या डॉक्युमेंटरीच्या काळात मियाझाकी यांच्या ‘पोन्यो ऑन द क्लिफ बाय द सी’ आणि ‘द विंड रायझेस’ या दोन फिल्म्स तयार झाल्या. ‘द विंड रायझेस’ (२०१३) ही त्यांच्या कारकिर्दीमधली महत्त्वाची फिल्म आहे, कारण आतापर्यंत लहान मुलं, त्यातही मुली, साधारण दहा वर्षांपर्यंतच्या, या त्यांच्या नायिका राहिलेल्या आहेत. लहानग्यांचं जादूनं भारलेलं तर्कहीन आणि निष्पाप भावविश्व त्यांनी कमालीच्या प्रामाणिकपणे साकार केलेलं होतं, पण ‘द विंड रायझेस’ (२०१३) ही फिल्म वेगळी ठरली. पहिल्यांदाच त्यांनी एका तरुण पायलटची गोष्ट यात सांगितली आहे. दुसऱ्या महायुद्धात एयरक्राफ्ट डिझायनर असलेल्या जीरो होरीकोशी या पायलटचा हा चरित्रपट आहे. या सिनेमाच्या सुरुवातीला जपानमध्ये १९२३ साली कान्तोमध्ये झालेल्या प्रचंड भूकंपाचा प्रसंग आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली वाताहात, जीव वाचवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर लोकांची झालेली अतोनात गर्दी, यांचं इतकं तपशीलवार चित्रण मियाझाकी करतात की चार सेंकदाच्या दृश्यासाठी त्यांची टीम एक वर्षभर चित्र काढत होती. गर्दी दाखवायची म्हणजे काहीही करून चालत नाही. मुख्य कलाकारांसोबत त्यांच्या आजूबाजूला असलेले लोकदेखील जिवंत माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक फ्रेममधली हालचाल आणि शांततादेखील सजीव असते. अगदी फ्रेममधल्या कोपऱ्यातल्या खिडकीत कुंडीतलं फुल डोलतं आहे ना, याकडेही ते लक्ष देतात.
मियाझाकी यांच्या फिल्म्समध्ये एक निवांतपण आहे. ते निवांतपण ते सायलेन्स फ्रेममध्ये तयार करू शकतात. त्यामुळे त्यांच्या सिनेमांमध्ये एक स्पिरीट तयार होतं, जे आपल्याला माणूस म्हणून आतून खेचून घेतं.
भौतिकातल्या वस्तूंचा, कौशल्यांचा, अगदी ज्ञानाचाही फोलपणा, समजून घेण्यासाठी तिबेटी बुद्धिझममध्ये एक सराव केला जातो. रंगीत वाळूने मंडलाची कलाकृती तयार केली जाते. डोळ्याच्या खाचा होतील इतकं नाजूक काम. विशेष म्हणजे ते मंडल पूर्ण करून झालं की, ती वाळू चक्क गोळा करायची आणि पाण्यात टाकून द्यायची. फार फार मन लावून केलेलं काम, ‘मन’ त्यात न गुंतवता मोडून टाकायचं. मियाझाकी यांच्या फिल्म्स अशाच बनत राहतात. आपल्याला सजगपणे हसऱ्या ओठांनी ‘शून्यतेकडे’ नेतात, आपलं ‘हिलिंग’ आणि ‘प्युरिफीकेशन’ करत राहतात. ज्याची आज आपल्याला नितांत गरज आहे.
.............................................................................................................................................
‘टेन इयर्स विथ हयाओ मियाझाकी’ ही संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी क्लिक करा -
https://www3.nhk.or.jp/nhkworld/en/ondemand/video/3004569/
.............................................................................................................................................
लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.
madhavi.wageshwari@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment