अजूनकाही
मनोरंजन वाहिन्यावरच्या डेली सोपमध्ये एक कथानक नेहमी पहायला मिळते. श्रीमंत घरातील मुलगा कुणा गरीब मुलीच्या प्रेमात पडतो आणि खानदानी इभ्रतीच्या खेळात श्रीमंतीकडचा कुणी शकुनी गरीब मुलीला गाठतो, तिची एखादी दुखरी नस दाबतो आणि लग्नाला मान्यता देतानाच घटस्फोटाच्या कागदपत्रावर सह्या घेऊन ठेवतो, कुठल्याही अटी शर्तीशिवाय.
महाराष्ट्रात अशा पद्धतीची खेळी सध्या शिवसेना भाजपसोबत खेळतेय.
निकालानंतर युतीला स्पष्ट बहुमत पण दोघांचे आमदार घटलेले. सेनेचे आमदार घटल्याने त्यांची पत कळली. पण भाजपचेही आमदार घटल्याने युतीअंतर्गत सेनेला भाजपची शेपटी दाबायची संधी मिळाली. तशी त्यांनी दाबलीही. त्यात एक क्षण असा आला की, सेनेने नखासह पंजा मुडपून ठेवला. पण मुख्यमंत्र्यांना अचानक अहंकाराचा वारा लागला आणि त्यांनी मी आणि मीच व भाजपच सर्व महत्त्वाची पदे राखणार अशी गर्जना केली.
या गर्जनेने नखांसह पंजा मुडपून बसलेला सेनेचा वाघ बिथरला आणि रोज उठून भाजपला सळो की पळो करून सोडायला लागला.
शिवसेनाप्रमुखांपेक्षा शिवसेना नेते, खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी या नव्या पर्वाचे व पवित्र्याचे नेतृत्व स्वत:कडे घेतले. त्यांनी माध्यमांशी थेट बोलण्यासह ‘सामना’च्या संपादकीयातून भाजपचे वस्त्रहरण करण्यात रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत नेले.
हा म्हटलं तर एकप्रकारे सूड उगवायचाच प्रयत्न म्हणता येईल. २०१४ साली भाजपने अल्पमतातले सरकार राष्ट्रवादीच्या आवाजी पाठिंब्यावर स्थापन केले आणि सेनेला विरोधात बसायची वेळ आणली. मात्र पुढे बोलणी होऊन महायुतीचे सरकार शिवसेनेसह सत्तारूढ झाले.
आता त्याच राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षासह पाठिंबा घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याची गर्भित धमकी द्यायला सुरुवात केली. आणि २०१४ चा बदला आता सेना घेतेय, सूड उगवतेय.
राजकीय पंडितांना वाटतेय की, शिवसेनेसोबत राष्ट्रवादी एकवेळ जाईल, पण काँग्रेसला सेनेसोबत सत्तेत सहभागी होणे पचणारे नाही. शिवाय तो पक्ष राज्यात चौथ्या नंबरवर आहे. त्यामुळे सत्तेत सहभाग असला तरी फारसं काही हाती लागणार नाही. ज्या पक्षात दोन दोन माजी मुख्यमंत्री विधानसभेत निवडून आलेत, ते नेमका कुणाचा मान कसा ठेवणार हे त्यांनाच माहीत!
याचा अर्थ सेना जी दादागिरी करतेय, ती राष्ट्रवादीच्या जीवावर. तसंही या निवडणुकीत व निकालोत्तर राजकारणात चर्चेचा एक बिंदू शरद पवारांनी पूर्वीच्याच जोराने स्वत:कडे फिरवत ठेवलाय.
सेना मुख्यमंत्रीपदाच्या उड्या मारताना, शरद पवार सातत्याने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे असे सांगताहेत.
त्याच वेळी त्यांचे प्रवक्ते मात्र सेनेने वेगळा विचार केला तर आम्ही स्वागतच करू, असे सांगत असतात.
सोनिया गांधींचा नकार घेऊन हिरमुसलेल्या काँग्रेसजनांना पुन्हा शरद पवारांनीच सोनिया भेटीसाठी प्रयाण केल्याने थोडी थोडी सत्ता लांबवर दिसू लागली.
सोनिया-पवार भेटीनंतरही सेनेसाठी काही संदेश मिळाला नाही. आणि चर्चा, वाद, प्रतिवाद, हल्ले, प्रतिहल्ले. जोरात सुरू झाले.
यात सामान्य माणसाला म्हणजेच मतदारांना कळत नाहीए की होतेय काय व होणार काय? अडचण काय?
मतदारांना दोन गोष्टी स्वच्छ कळल्यात. त्या म्हणजे आमदार घटूनही भाजपचा तोरा कारण नसताना वाढलेला आहे. तर सत्तेत सहभागी होण्यासाठी टोकाची विधाने करण्यापेक्षा प्रत्यक्ष वाटाघाटीत राजकीय चातुर्य सेनेने का दाखवले नाही.
हा साप मुंगूसाचा खेळ खेळून शेवटी एकत्रच नांदणार असतील तर वाहिन्यातील स्वस्त मनोरंजनासारखा हा रोजचा ड्रामा कशाला?
आता मतदार या डेलीसोपमध्ये राऊतांचे, फडणवीसांचे की शरद पवारांचे पात्र महत्त्वाचे ठरणार हे कळून आपल्याला शेवटचे कधी मोठ्ठ्याने हसायला मिळणार याची वाट पाहत खऱ्या डेलीसोप पाहण्याचा रतीब पूर्ण करताहेत!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment