अजूनकाही
पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा समारोप आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना पु. ल. स्मृती सन्मान, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यां-लेखिका रेणू दांडेकर यांना पुलोत्सव कृतज्ञता सन्मान, अभिनेते शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान आणि अभिनेते-लेखक चिन्मय मांडलेकर यांना तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
.............................................................................................................................................
पं. हरिप्रसाद चौरसिया आणि अशोक सराफ यांच्या श्रेष्ठ दर्जाच्या कलाविष्काराचा गौरव त्यांना पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने पुरस्कार देऊन करणे ही फार आनंदाची घटना आहे. त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे या अभिनेत्यालाही सन्मानासाठी बसवले जावे ही मात्र फार क्लेशकारक घटना होय. नथुराम गोडसे या खुन्याची भूमिका करणाऱ्या नटाला त्याच्या धाडसाबद्दल दिलेला हा सन्मान आहे की, नथुरामची विचारसरणी रंगभूमीबाहेरही प्रचारल्याबद्दल आहे?
कोणताही नट गुन्हेगाराची भूमिका करतो, त्यात गैर काही नसते. आक्षेप त्या गुन्ह्यांमागील तत्त्वज्ञानाचे समर्थन जाहीरपणे करत बसण्याला असतो. रामन राघव, रंगा-बिल्ला, वरदराजन, हाजी मस्तान यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांवरील आणि कित्येक डाकूपट भारताने पाहिले. त्यातील मुख्य पात्राची भूमिका करणारे नट कधीही पात्राच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करत नव्हते. ते शुद्ध गुन्हेगार व खुनी होते. आणि नथुराम गोडसे तत्त्वप्रेरित खुनी होता म्हणून त्यांच्यात भेद कसा करणार? जिहादासाठी माणसे मारणारेही गुन्हेगारच आणि लुटालूट करतेवेळी खून पाडणारेसुद्धा खुनीच! परंतु जिहादींचा गौरव करणारे धर्मांध दुष्ट अन नथुरामाचा गौरव करणारे मात्र पुलंचे चाहते, असे कसे?
पुलंनी लहान मुलांसाठी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. गांधीवाद्यांची टिंगल करूनही पुलदे अखेरपर्यंत गांधींच्या बऱ्याच तत्त्वांचे पालनकर्ते राहिले. त्यांच्या पत्नी सुनीता या तर थेट समाजवादी संस्कारातून घडलेल्या! अहिंसा, खादी, अपरिग्रह, निर्भयता, सत्याग्रह, दातृत्व आदी मूल्ये देशपांडे दाम्पत्याच्या घरात व अंगांगावर दिसत.
पुलंनी त्या गांधीचरित्राच्या शेवटी लिहिले आहे, “लोक निर्भय झाले म्हणजे स्वार्थी, संकुचित विचारांवर जगणाऱ्या पुढाऱ्यांचे मरणच ओढवायचे. म्हणूनच लोकांना निर्भय करणारे तत्त्वज्ञान शिकवणारे गांधीजींसारखे संत ह्यांचा वध (पुलंनी हा शब्द वापरायला नको होता) करणे, एवढाच मार्ग ह्या संकुचित वृत्तीच्या लोकांना उरतो. ७७ वर्षे वयाच्या ईशस्मरण करायला निघालेल्या एका वृद्धाचा धर्माच्या नावाखाली वध व्हावा, ही घटनाच किती विचित्र!... नथुराम गोडसे नावाच्या माणसाने गांधीजींचा प्रेमाची शिकवण देणारा आवाज कायमचा बंद करून टाकला.” (गांधीजी, राजहंस प्रकाशन, पान ८७-८८)
पोंक्षेप्रमाणेच विक्रम गोखले, नाना पाटेकर, सुधीर फडके, राजदत्त, भालजी पेंढारकर आदी हिंदुत्ववादी कलावंत आपण पाहिले. पण त्यांची कला त्यांच्या विचारांपेक्षा वरचढ राहिली, म्हणून ती दर्जेदार होती. शिवाय त्यांनी गांधीजींच्या खुनाचे समर्थन करत राहणे टाळले.
पोंक्षे यांनी नथुरामासह अनेक पात्रेही रंगवली आहेत. मालिका व चित्रपट यांत ते असत. मात्र मराठी प्रेक्षक त्यांना ओळखतो ते नथुराम म्हणूनच. त्याची भूमिका करताना ती समजावून घ्या असे आवाहन करणारा नट म्हणूनच. अभिनय आणि तत्त्वप्रचार यांत भान ठेवणे फार महत्त्वाचे.
अमिताभ बच्चन यांची कारकीर्द गुन्हेगारांच्या भूमिका करूनच बहरली. मात्र त्यांचे मोठेपण हे की, पडद्यावरील त्या पात्रांचे तत्त्वज्ञान त्यांनी सार्वजनिकरीत्या कधीही मांडले नाही. ‘दिवार’ ते ‘अग्निपथ’मधील सारे ‘विजय’ विशिष्ट तत्त्वज्ञान सांगतात. पण तो खेळाचा एक भाग होय. ते काही प्रत्यक्ष जीवन नव्हे.
पोंक्षे यांनी नथुराम रंगवलाही आणि प्रचारलाही. पु.ल. देशपांडे नथुरामावरील नाटकाबद्दल काय म्हणाले असते?
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment