अजूनकाही
कृष्णा सुर्वे (अंकुश चौधरी) हा स्वतःचं वाहन चालवून निवांत जगणारा तरुण. त्याचे वडील दिनकर सुर्वे (विद्याधर जोशी) चोवीस तास दारू पित असतात. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होतात. परिणामी ते एकमेकांशी बोलणं सोडतात. एक दिवस मित्रांसोबत कृष्णा गप्पा मारत बसलेला असतो. त्याला अनोळखी नंबरवरून मिसकॉल येतो. तो परत कॉल करतो, तेव्हा त्याला पलीकडून एका मुलीचा आवाज येतो. तो कॉल तन्वीचा (शिवानी सुर्वे) असतो. त्याला ती सांगते- ‘माझं अपहरण केलं आहे. माझी मदत करा! माझा रिचार्ज संपलाय तेवढा करा.’ कृष्णा मदत म्हणून रिचार्ज करून थेट पोलिसात जातो. तिथं पोलीस इन्स्पेक्टर दिवाने (प्रवीण तरडे) त्याची दखल घेत नाही. कारण त्याला ते खोटं वाटतं. तेवढ्यात पुन्हा कॉल येतो आणि पलीकडून ती मुलगी बोलते- ‘माझी मदत केली त्याबद्दल धन्यवाद! आमची पैज होती अनोळखी नंबरवर कॉल करून रिचार्ज करून घ्यायची. तुम्ही मदत केली आणि मी जिंकले.’ मग दोघांत फोन कॉल्स सूरू होतात. एक दिवस कृष्णाच्या बहिणीचं लग्न ठरतं नवऱ्या मुलाची बहीण वृंदा (पल्लवी पाटील) कृष्णाला आवडते. त्यांचं लग्न ठरतं, पण मध्येच कथानक वळण घेतं. आणि पुढे अनेक वळणं लागतात.
सिनेमात अनेक विरोधाभास आहेत. शेतातल्या बोरीच्या झाडाखाली चिंचा गोळा करणारा कृष्णा असो वा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला आलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमधला नंबर न पाहता नंबर लिहून घेणारे इन्स्पेक्टर दिवाने असो, अशा गोंधळात दिग्दर्शकानं मात्र ‘आय लव अहमदनगर’चा फलक दाखवून निर्मात्यासहित पब्लिसिटी पार्टनरला सुखावण्याची एकही संधी सोडलेली नाही. जिथं संधी मिळेल तिथं फलक लावले आहेत.
‘देवा’ या सिनेमानंतर अंकुश चौधरी ‘ट्रिपल सीट’मधून पुन्हा मोठ्या पडद्यावर आला आहे. मात्र दमदार अभिनयाच्या अपेक्षेवर तो फारसा उतरत नाही. त्याची देहबोली त्याच्या संवादांना साजेशी नाही. आणि दुसरं म्हणजे कृष्णाच्या भूमिकेचं आव्हान पेलणं त्याला कठीण गेलं आहे. परिणामी संपूर्ण सिनेमात तोचतोचपणा वाटतो. विनोदही तितकेच अस्पष्ट आहेत. त्यात भर म्हणजे अंकुशचे आणि दोन नट्यांचे (शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील) तत्त्वज्ञानाचे वर्ग सुरू असल्यासारखे संवाद कंटाळा आणतात.
वैभव मांगले यांनी मात्र संतापलेल्या वडिलाची आणि पश्चाताप वाट्याला आलेला पतीची भूमिका दमदारपणे केली आहे. हिंदीतले राकेश बेदी यांनीदेखील वकिलाची भूमिका उत्तम प्रकारे केली आहे. योगेश सिरसाट आणि स्वप्निल मुनोत यांचा अभिनयही चांगला आहे.
‘ट्रिपल सीट’ या नावामागे स्पष्ट अशी संकल्पना आहे. एक नट आणि त्याच्याभोवती पिंगा घालणाऱ्या दोन नट्या, असे मिळून तीन होतात. पण हा अंकुशच्या मागे आलेल्या ‘डबल सीट’चा हा पुढचा भाग नाही. अंकुश, पल्लवी, शिवानी हे त्रिकूट जे काही गोंधळ घालतं त्याचा हा सिनेमा आहे.
सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लयबद्ध आहेत. मात्र संवाद रटाळ आणि निरस आहेत. नात्यातली भावनिक गुंतागुंत दाखवताना स्त्रियांवरील अत्याचार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जेव्हा विनोदी संवाद येतात, तेव्हा अगोदरची गंभीर मांडणी विस्कळीत होते. कृष्णाचं लग्न मोडतं, तेव्हा त्याच्या बहिणीचंही लग्न मोडतं. मात्र पुढे तिचा होणारा पती कृष्णाला अट घालतो, ‘तू माझ्या बहिणीशी लग्न केलं तरच मी तुझ्या बहिणीशी लग्न करेल.’ कृष्णाच्या बहिणीच्या लग्नाची गोष्ट मुख्य पात्राला पूरक ठरावी म्हणून घेतली आहे. पण पुढे त्या लग्नाचं काय होतं, याचा कुठे उल्लेखही येत नाही.
संगीत चांगलं आहे. तांत्रिक बाबी उत्तम आहेत. पण पटकथा ब्रेक होत राहते. त्यामुळे ‘ट्रिपल सीट’ रोमँटिक कॉमेडीचा अपूर्ण असा खेळ ठरतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment