अजूनकाही
अंतर्मुख करणाऱ्या कथानकाच्या जोडीला मोहून टाकणारा अभिनय, खिळवून ठेवणारी दिग्दर्शन शैली आणि बहीण-भावाच्या नात्याची नितळ गोष्ट सांगणारा ‘खारी बिस्किट’ हा सिनेमा भावनिक पातळीवर गुंतून ठेवण्यात चांगलाच यशस्वी ठरतो. बहीण-भावाच्या अतूट नातेसंबंधांची भावविवश करणारी गोष्ट पाहायला मिळते. प्रभावीपणे भवताल दाखवण्यात सिनेमाला सूर गवसला आहे. कथानकाची परिणामकारकता कुठेही कमी होत नाही.
कथानक मुंबईच्या झोपडपट्टीतील दोन चिमुकल्या बहीण-भावाच्या नात्याभोवती फिरतं. खारी (वेदश्री खाडीलकर) आणि बिस्किट (आदर्श कदम) हे आई-वडिलांचं छत्र हरपलेली चिमकुले भाऊ-बहीण झोपडपट्टीच्या फूटपाथलगत राहत असतात. एक खाट, अंथरायला चादर, मच्छरापासून संरक्षण म्हणून फाटकी मच्छरदाणी अशा जागेत ते राहतात. खारी जन्मतः अंध असते. त्यामुळे बिस्किट तिच्या सर्व गोष्टींची काळजी घेत तिचा सांभाळ करतो.
याच झोपडपट्टीजवळ एक माई (नंदिता पाटकर) नावाची राकट बाई राहत असते. तिचं या दोन्ही मुलांकडे विशेष लक्ष असतं. त्यामुळे सगळीच माणसं खारी-बिस्किटला जीव लावतात. झोपडपट्टीतली इतर मुलं भीक मागतात, चोरी करतात, मात्र बिस्किटला असं काम करणं पटत नाही, म्हणून तो पॅडी (सुशांत शेलार) या गुंडाच्या अवैध धंद्यात त्याला मदत करतो. कधी पैसे तर कधी अंमली पदार्थाची पोहच करण्याचं काम तो करतो. त्याच्या आईनं सांगितलेलं म्हणून तो खारीला जराही त्रास होऊ नये, याची काळजी घेतो. त्यासाठी खारीची प्रत्येक आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
या धडपडीत सिनेमाची कथा दडलेली आहे. चिमुकल्या बिस्किटच्या पदरी जे येतं, ते बहीण-भावाच्या नात्यात गोडवा वाढवत राहतं. मात्र त्याचबरोबर दिग्दर्शकानं हळूच झोपडपट्टीतील मुलांची होणारी फरफट दाखवली आहे. तिचा प्रभावीपणा पडद्यावर दिसून येतो.
मुंबईसारख्या महानगरात झोपडपट्टीतील लोकांच्या जीवनमानाचा घसरलेला स्तर असो वा बालमजूरीचं प्रमाण असो, याचं प्रभावी चित्रण कथानकातून पुढे येतं. दोन्ही मुलांची आई झोपडपट्टीत ‘खारी बिस्किट’ विकण्याचा व्यवसाय करत असते. तेव्हा तिला प्रत्येक जण ‘खारी बिस्किटवाली’ या नावानं ओळखतो. म्हणून ती मुलांचं नाव ‘खारी बिस्किट’ ठेवते. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असलेल्या किराणा दुकानदाराच्या मुलाचं नाव जतीन आहे, तर एका मुलाचं नावं किटली असं आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांचे परिणाम दोन्हीकडे होतात. याचं चित्रण काही दृश्यातून दिग्दर्शकानं प्रभावीपणे उभं केलं आहे.
एके ठिकाणी एक छोटा मुलगा चहाच्या गाड्यावरचे ग्लास साफ करण्याचं काम करतो. त्या गाड्यावर ‘येथे बालकामगार काम करत नाहीत’ असा फलक लावलेला असतो. कॅमेरा ग्लास साफ करणाऱ्या मुलाकडून अगदी सहज फलकावर अंधकुशी नजर टाकतो आणि पुढे जातो. पडद्यावर अशी अनेक दृश्यं दिसत राहतात. त्यामुळे अशा दृश्यात विरोधाभासाला हलकासा स्पर्श होतो, पण तो प्रेक्षकांना सांगायचं ते सांगून जातो. एकदा खारीच्या पायात चप्पल असते, तर बिस्किट अनवाणी पायानं चालताना दिसतो. त्या वेळी कॅमेरा पायावर काही क्षण स्थिरावतो आणि पुन्हा वर जातो. कॅमेऱ्याच्या या शैलीपूर्ण वापरामुळे हा प्रसंग भावूक करून जातो. कथानकातल्या अशा छोट्या-छोट्या बाबी प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोहचतात.
अशा चढ-उतारात सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध संथ आणि संयमानं पुढे जात राहतो. झोपडपट्टी मध्यवर्ती आहे. मात्र त्याच्याभोवती येणारं चित्रण जुळवून आणण्यासाठी चकित करणारी वळणं नाहीत.
अभिनयाची बाजू कलाकारांनी उत्तम सांभाळली आहे. आदर्श आणि वेदश्री यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हावभाव अप्रतिम आहेत. नंदिता पाटकर यांनी माईच्या भूमिकेला न्याय दिला आहे. पुरुषाची कॉलर धरून कानशिलात लगावणारी नंदिता सिनेमात लक्ष वेधून घेते. सुशांत शेलार आणि संजय नार्वेकर यांच्या भूमिका छोट्या आहेत, पण त्यांनीही प्रभावी काम केलं आहे. संवाद मराठी-हिंदी भाषेत आहेत. त्याचाही सकारात्मक परिणाम होतो.
अशा जमेच्या बाजूंचा विचार करता ‘नात्याच्या भावविश्वात फेरफटका मारून वास्तवाला नकळत स्पर्श करणारा, पण त्यातही अविरत सुख-दुःखाचं चित्रण प्रेक्षकांसमोर मांडणारा ‘खारी बिस्किट’ हा सिनेमा आहे!’ असं म्हणावं लागतं.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment