‘उजडा चमन’ : ‘दिलों की बाते करता है जमाना, मगर मोहब्बत आज भी चेहरे से शुरू होती है’
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘उजडा चमन’मधील एक दृश्य
  • Sat , 02 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie उजडा चमन Ujda Chaman

‘उजडा चमन’मधील पात्रांच्या कृती प्रचंड विरोधाभासी आहेत. कदाचित हाच विरोधाभास, हीच दांभिकता समाजात सर्वत्र दिसून येते हे चित्रपटकर्त्यांना सूचित करायचं असेल. उदाहरणार्थ, इथं प्रत्येक पात्र दुसऱ्या पात्राविषयी त्याच्या शारीरिकतेवरून मत बनवतं. आणि असं करताना ती मत बनवणारी व्यक्ती मात्र स्वतःमध्ये असलेल्या दोषांकडे आवर्जून दुर्लक्ष करते. संकल्पनात्मक पातळीवर हा विरोधाभास इथं टिपला जातो, पण त्याला लागून साचेबद्ध पात्रं, सोप्या वाटा निवडणारं कथानक, फारसं वैशिष्ट्यपूर्ण नसलेलं दिग्दर्शन हे नकारात्मक घटक येतात. 

चित्रपटाचं शीर्षक सुचवतं त्यानुसार चमन कोहली (सनी सिंग) हा तिशीतील पुरुष आणि त्याला पडलेलं टक्कल ही जोडी इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. घरच्यांच्या आग्रहानंतर पाच वर्षांपूर्वीचे, टक्कल पडण्यापूर्वीचे फोटो डकवलेल्या वैवाहिक संकेतस्थळांवरून आलेली स्थळं पाहण्याचा त्याचा कार्यक्रम सुरू असतो. मग त्याचं टक्कल पाहून त्याला शिव्या घालण्याचा रीतसर कार्यक्रमदेखील लागलीच पार पडत असतो. चित्रपटाला सुरुवात होते, तेव्हाही असंच घडतं, नि कोहली कुटुंब शिव्या खात आणि देत मुलीच्या घरातून बाहेर पडतं. चमन कथन करायला सुरुवात करतो. आई - सुषमा कोहली (गृषा कपूर), बाप - शशी कोहली (अतुल कुमार) आणि भाऊ - गोल्डी कोहली (गगन अरोरा) यांच्याशी ओळख करून देतो, नि नंतर कधीही तो प्रेक्षकांशी थेट बोलत नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे लेखन-दिग्दर्शनातील सफाईदार कामाच्या अभावाचं हे इथलं पहिलं उदाहरण. 

चित्रपटातील कथानक घडतं ते शहर ते चित्रपटातील मध्यवर्ती संकल्पना आणि अगदी मांडणीच्या पातळीवरही ‘उजडा चमन’ हा अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’च्या (२०१८) प्रभावाखाली असल्याचं स्पष्ट दिसतं. मात्र, तिथं असलेली लेखनातील, विनोदातील नि दिग्दर्शनातील सहजता इथं नाही. इथली मध्यवर्ती समस्या तशी विचारात घेण्यालायक असली तरी पात्राला जगाकडून मिळणारी वागणूक अगदीच नव्वदच्या दशकातील चित्रपटात सोज्वळ, सुशील नायकाला त्रास देणाऱ्या जगातील आहे. त्यामुळे पेशानं हिंदीचा लेक्चरर असलेल्या चमनला अख्खं कॉलेज ‘टकला’ म्हणून चिडवत आहे, किंवा तो जवळून चालत असताना त्याच्याकडे पाहत फिदीफिदी हसत आहे असे अगदीच टाकाऊ नि अतिशयोक्तीपूर्ण प्रसंग इथं एकमागून एक दिसत राहतात. समस्या विचारात घेण्यालायक असली तरी तिचं अवडंबर माजवलं जाऊन चित्रपट काही फुटकळ विनोदांपायी स्वतःच्या नायकाची खिल्ली उडवत राहतो! 

चमनचं एकटेपण, त्याचं टक्कल, वाढतं वय आणि या सगळ्या गोष्टींमुळे, शिवाय एका बाबाच्या (सौरभ शुक्ला) सांगण्यानुसारही त्याला तातडीनं लग्न करण्याची गरज आहे अशा समस्यांचा भडीमार त्यावर केला जातो. साहजिकच तो कुणीतरी मुलगी शोधून तिच्या प्रेमात पडत सगळ्यांची तोंडं बंद करण्याचा विडा उचलतो. वडिलांनी त्याच्याशी साधलेल्या संवादानंतर तो टिंडरवर जातो, ज्याची परिणीती अप्सराशी (मानवी गागरू) भेटण्यात होते. इथं दांभिकतेचं प्रकरण सुरू होतं. अप्सराची स्थूलता चमनच्या डोळ्यात खुपत असते, तर त्याचं टक्कल तिच्या दृष्टीनं त्याच्यापासून दूर जाण्यासाठी पुरेसं कारण ठरतं.

या चित्रपटात असलेला विनोद असंवेदनशील आहे का तर, हो आहे. मात्र, तो त्या पात्रांची दुहेरी भूमिका दाखवणारा असल्यानं तितकाच महत्त्वाचा ठरतो. (इथंही तांत्रिक-कथनाच्या पातळीवर गोंधळ घातलेले आहेत.) लोक आपल्याला चुकीची वागणूक देत असताना आपणही इतर कुणाला तरी तशी वागणूक देत आहोत, हे लक्षात न येणं हा इथला कळीचा मुद्दा आहे. इथं तर दोघांच्याही बाजूनं हे घडत असतं. पुढे कथानक काहीशा सोप्या, पण इथल्या विश्वात चालून जातीलशा वाटा चोखाळतं. अर्थात असे मार्ग निवडूनही चित्रपट कमी अधिक फरकानं रंजक ठरतो, हा भाग वेगळा. 

‘उजडा चमन’च्या लेखक-दिग्दर्शक अभिषेक पाठकची अप्रभावी कामगिरी, हितेश सोनिकचं कर्कश्श पार्श्वसंगीत, कामचलाऊ गाणी आणि चित्रपटाची अतिरिक्त लांबी या बाबी इथल्या थोड्याबहुत प्रभावाला मारक ठरते. नसता मानवी गागरू, अतुल कुमारसारख्या कलाकारांचे इथले परफॉर्मन्स उत्तम आहेत. नेहमीप्रमाणे गागरू इथल्या पात्राला अधिक भावनिक, मानसिक कंगोरे प्राप्त करून देते. अलीकडेच अॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॅमिली मॅन’ शारीब हाश्मीदेखील इथं लहान, पण महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसतो. 

चित्रपटातील एक पात्र म्हणतं त्याप्रमाणे, ‘दिलों की बाते करता है जमाना, मगर मोहब्बत आज भी चेहरे से शुरू होती है’ या एका वाक्यात चित्रपटाचं सार एकवटलेलं आहे. इथली पात्रं परस्परांना देत असलेल्या वागणुकीत, आणि त्यांच्यात झालेल्या बदलांमध्येही (जे भलेही रटाळ फिल्मी मार्गांनी का झाले असेनात) इथला गर्भितार्थ दडलेला आहे. 

एकुणात संकल्पनात्मक पातळीवर चांगला असला तरी ‘उजडा चमन’ याहून अधिक चांगला होऊ शकला असता, अशी भावना निर्माण करणारा चित्रपट आहे. 

(पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणं अपेक्षित असलेला आयुष्मान खुराना अभिनित आणि अमर कौशिक दिग्दर्शित ‘बाला’देखील याच विषयावर आधारलेला नि ‘उजडा चमन’चे चित्रपटकर्ते म्हणतात त्यानुसार त्यांच्याच चित्रपटाच्या कथेवर आधारित असलेला आहे. आता हे खरंच असं आहे की नाही, आणि असल्यास कौशिकसारखा दिग्दर्शक त्याच्या प्रभावी असणं अपेक्षित असलेल्या मांडणीच्या बळावर ‘बाला’ला कितपत प्रभावी बनवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.) 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख