अजूनकाही
मांजर या प्राण्याबरोबर माझं काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असणार. मांजरं ही माझ्या आयुष्याचा आणि जगण्याचा एक भाग झालेली आहेत. गेली निदान तीस-बत्तीस वर्षं आमच्या घरी मांजरं आहेत. मांजरांच्या बऱ्याच पिढ्या नांदल्या आणि अजून नांदताहेत. हा डांबरट प्राणी माझी पाठ सोडण्याची शक्यता दिसत नाही.
जसं माणसांमध्ये वेगवेगळे स्वभाव असतात, तसेच मांजरांमध्येही आढळतात. सगळ्या मांजरांशी सारखंच वागलं तरी काही मांजरं अधिक प्रेमळ किंवा मैत्री करणारी असतात, तर काही तुसडी असतात. काही गरीब असतात, तर बहुतेक जण बिलंदर असतात. पण सर्वसामान्यपणे जे असं समजलं जातं की, मांजर हे लबाड आणि स्वार्थी असतं. ते काही पूर्णत: खरं नाही. मांजर हे कुत्र्यासारखं स्वामीभक्त नसतं अशीही काहीजणांची तक्रार असते. पण मांजर आणि कुत्रा हे पूर्णत: वेगळ्या स्वभावगुणांचे प्राणी आहेत. कुत्रा हा कळपाने राहणारा आणि नेत्याच्या आदेशानुसार वागणारा प्राणी असतो. मांजर हे स्वतंत्र स्वभावाचं व एकटं राहणारं असतं. ते कुणाच्या आज्ञाबिज्ञा पाळत नाही. आणि म्हणूनच ते अधिक आकर्षक असतं. मला तर त्याचमुळे आवडतात मांजरं.
पेंटिंग - अरुणा पेंडसे
माझ्या आईला मांजरं आवडत नसतं. त्यामुळे माहेरी मांजरं पाळणं शक्यच नव्हतं. लग्नानंतर मात्र नवऱ्यालाही मांजर आवडत असल्याने आमच्याकडे मांजर कधी आलं आणि त्याने आम्हाला कधी पाळलं हे कळलंच नाही. एक छोटं पिल्लू त्याच्या आईपासून चुकलं होतं किंवा तिने सोडून दिलं होतं. त्याच्या ओरडण्यामुळे वाईट वाटून त्याला घरी आणून खायला-प्याला दिलं आणि पुन्हा बाहेर नेऊन सोडलं. पण मांजर असल्यामुळे दुसऱ्या दिवशी ते हजर झालं आणि त्याने हक्काने खाऊ मागितला. मग काय! द्यावाच लागला. हळूहळू तिने (मनी होती ती) बाहेर जाणं बंद केलं आणि आमच्याकडे मुक्काम केला. ही आमची गुड्डी. सुरेख कॅलिका मांजर होती. कॅलिको म्हणजे सोनेरी पिवळा, काळा आणि पांढरा असे तीनही रंग असणारी. ही घरात आणि बाहेर अशी दोन्हीकडे आनंदात राहात असे.
प्रत्येक मांजराचा काहीतरी आवडीचा खाऊ असतो. हिला उकडलेलं अंडं फार आवडायचं. अंडं फोडण्याचा आवाज ऐकला की, गाढ झोपेतूनही बाई जाग्या होत असत. मग हिला पिल्लं झाली. सुरुवातीला एकच पिल्लू झालं. सोनेरी पिवळ्या रंगाचं. तिचं नाव चंपू ठेवलं. चंपू आणि गुड्डीची जोडी मस्त मजली. मग चंपालाही पिल्लं झाली. पण चंपूताई जरा उनाडच होती. पिल्लं गुड्डीकडे सांभाळायला देऊन भटकायला जात असे. गुड्डीला पिल्लं भारी आवडत. स्वत:ची आणि चंपूची अशी पाच-सहा पिल्लं आनंदाने सांभाळत असे. कर्तबगार आईप्रमाणे मग उंदराची शिकार करून पोरांपुढे आणून ठेवत असे. पोरं फिरायला लागली आणि ऐकत नाही तसं दिसलं की सरळ पंज्याने फटका देत असे. हिचं एक पिल्लू बोका होतं. सुरेश काळा पांढरा मजबूत हाडाचा. हा जरा मोठा झाल्यावर त्याला कबुतरांच्या शिकारीचा नाद लागला. छोटा बोका म्हणून आम्ही याला छोबो असंच म्हणत असू. अतिशय गोड माऊ. हा गच्चीत किंवा चौथ्या मजल्यावर जाऊन पक्षी- मुख्यत: कबुतरांची शिकार करायचा. एकदा त्याच नादात हा खाली पडला. कुठेरी अंतर्गत दुखापत झाली आणि बघता बघता गेलाच तो. मला प्रचंड दु:ख झालं. त्यातून सावरायला काही दिवस लागले. नंतर चंपूला संपूर्ण सोनेरी रंगाची दोन पिल्लं झाली. दोन्ही बोकेच होते. श्यामू आमि बबलू अशी त्यांची नावं ठेवली होती. फारच गोड होते हे दोघे. अंगाखांद्यावर खेळत असत. हेही गच्चीवर जायला लागले. अर्थात ऑपरेशन कबुतर. आणि मग तो किस्सा घडला.
छकुली आणि पिल्लू, ३१ ऑक्टोबर २०१५
मी दुपारी कॉलेजमधून आल्या आमच्या शेजाऱ्यांच्या मुलीने प्रचंड एक्साईटमेंटने मला सांगितलं, “काकू, तुमचा तो पिवळा बोका आहे ना, तो आज तिसऱ्या मजल्यावरून पडला.” मी घाबरून त्यांना पाहते तर दोघेही मजेत झोपले होते. मी म्हटलं, अगं यांना तर काहीच झालं नाहीये. तेव्हा कळलं की, हे मांजर – बबलू तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधल्या लेजवर होतं आणि त्याला तिथून बाहेर पडता येत नव्हतं. हे दिसल्यावर आमच्या चांगल्या शेजाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी बादली, टब इत्यादी त्याच्याजवळ नेऊन त्याला तिथून काढण्याचा प्रयत्न केला. पण बबलूला काही विश्वास नाही. त्याने सरळ खाली उडी मारण्याचा निर्णय घेतला. मारली उडी आणि खालून एक बाई जात होत्या, त्यांच्या अंगावर पडला! म्हणून वाचला. पण कल्पना करा. अंगावरून मांजरं पडलं! तरीच बुवा आरामत होते. हे दोघे बोके नंतर निघून गेले. चंपुला झालेली एक सोनेरी रंगाची भाटी आमच्या मैत्रिणीने नेली. दुसरी एक तशीच भाटी राहिली. गुंड होती. घरात जमेल तिथे आणि तितक्या उंज जागी जाणे हा तिचा छंद होता. तिचं नाव सिंबा ठेवलं होतं. नंतर चंपू गायब झाली. सहा वर्षांनी गुड्डी अकस्मात मरण पावली. सिंबा आणि तिची मुलगी अॅश मग बरीच वर्षं राहिली. त्यांचे जोडीदारही होते – गुड्डीबरोबर गोडुल्या नावाचा बोका होता जो असाच साताठ वर्षं जगला. नंतर बबन होता. छान मोठे होऊन विभागात दादागिरी करत भटकत असत. घरात आमच्या कायमच आठ-दहा मांजरं असत आणि असतात. त्यातले बोके मोठे झाले की, निघून जातात. आणि भाट्यादेखील आईशी पटेनासं झालं की, घर सोडतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातही बरेचदा मांजरं जखमी होतात किंवा मरतात. एकटं कुत्रं आलं तर मांजर त्याला पळवून लावू शकते. ती कुत्र्याच्या नाकावरच हल्ला करते. पिल्लं असताना तर ती चांगलीच आक्रमक असते. पण भटक्या कुत्र्यांची टोळी संघटितपणे हल्ला करते. त्यात मांजर दुबळं ठरतं. आमची अनेक सुंदर मांजरं अशी कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडली आहेत.
अॅशच्या पिल्लांपैकी एक छकुली. तिला चार-पाच महिन्यांची असताना खाली खेळत होती आणि कुत्र्यांनी तिला धरून जखमी करून फेकून दिलं. बिल्डिंगमधल्या मुलांनी हे पाहून आम्हाला येऊन सांगितलं. संदीप खाली जाऊन गाडीखाली पडलेल्या या पिल्लाला घेऊन आला. तिला कोमट पाण्याने स्वच्छ करून मग औषध दिलं आणि कापडात गुंडाळून ठेवलं. जगते का मरते असं वाटत होतं. पण होमिओपॅथीच्या औषधाचा गुण आला. सकाळी मस्त उड्या मारत जवळ आली. तेव्हाच तिच्या नजरेत तिने माझ्याजवळ राहण्याचं नक्की ठरवलेलं मला जाणवलं. छकुली मला आणि नवऱ्याला दोघांनाही अतिशय जवळची झाली. लाडाचं मांजर झाली. मोठी झाल्यावर तिने अॅशला हाकलून दिलं. तिची बहीण होती, तिलाही हाकललं. अल्फा फीमेल होण्याचा हा भाग होता. ती तशी झालीच. छकुलीने नंतरही कायमच आपल्या कुठल्याही मुलीला मोठी झाल्यावर घरी राहू दिलं नाही. छकुली अतिशय निरोगी आणि टिपिकल मांजर होती. तिच्या शिकारीच्या प्रवृत्ती कधीच संपल्या नाहीत. ती आमच्याबाबतीत अतिशय पझेसिव्ह होती. पण तितकीच स्वतंत्र पण होती. ती दीर्घायुशी होती. याच वर्षी ती जानेवारीत निघून गेली आणि आता जिवंत नसणार. तिची अठरा वर्षं पूर्ण झाली होती. या संपूर्ण काळात तिला कधीही पशुवैद्याकडे न्यावं लागेलं नाही. तिला पिल्लांची अतिशय हौसच होती. पिल्लं असताना अतिशय सावध, दक्ष आणि शहाण्यासारखं वागत असे. आमच्या पहिल्या गुड्डी आणि चंपूसारखी पांढरी आणि सोनेरी मात्र अॅश किंवा छकुली नव्हती. दोघीजणी वेगळ्याच राखाडी रंगाच्या आणि अंगावर पट्टे आणि ठिपके असणाऱ्या. या प्रकारच्या मांजराला कॅलिकोर्निया स्पँगल्ड म्हणतात. हे माझ्या एका भाच्याने संशोधन करून सांगितले. त्याने आणि त्याच्या आई-बाबांनी छकुलीची दोन पोरं घरी नेली. ती त्यांच्याकडे सुखाने राज्य करत आहेत. छकुलीची आणखीही काही पिल्लं काही जणांनी अशीच नेली. जिथे तिचा वंश वाढत आहे. इतकी मांजरं घरी राहिली आणि त्यांनी लळा लावला की, त्यांचे किस्से सांगायला ही जागा अपुरी पडेल.
निळू (निळ्या डोळ्यांची) आणि चिकी
मांजरं पाळण्याने काही मर्यादाही आल्या जगण्यावर. त्यांना सोडून जाणे अवघड असते. त्यामुळे आमच्या घरी कुणीतरी आमच्यापैकी असतचं. यासाठी घरच्यांची आई आणि भावांची बोलणीही खाल्ली आहेत. मग फेसबुकच्या जमान्यात दोन वर्षांपूर्वी असं मनात आलं की, आपल्यासारखं आणखीही काही मांजरप्रेमी असतील. जरा त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्या हेतूने मग ‘मांजरप्रेमी’ हा फेसबुक ग्रूप सुरू केला. ३० जणांपासून सुरुवात केलेल्या या ग्रूपला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे की, आता ३३०० सभासद आहेत आणि सातत्याने ही संख्या वाढते आहे. त्या निमित्ताने भारतात व इतरत्रही मांजरप्रेमी किती आहेत व किती उत्साही आहेत हे लक्षात आले. सर्व वयाचे व महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील बऱ्याच देशांतून या ग्रूपवर सभासद असलेले मांजरप्रेमी आहेत. या ग्रूपवर मांजरांचे असंख्य फोटो, व्हिडिओ क्लिप्स व किस्से सातत्याने वाचायला, पाहायला मिळतात. आपापल्या व इतरांच्या मांजरांचं कौतुक, वाढदिवस इत्यादी साजरे होतात. अडचणी सांगितल्या जातात. सोडवल्याही जातात. सल्लेही मागितले आणि दिले जातात. या ग्रूपवरील सभासदांनी शिवाय आपले व्हॉटसअॅप ग्रूप्सही केले आहेत. ठाण्यात काही मांजरप्रेमींनी भटक्या व अनाथ मांजरांची व त्यांच्या पिल्लांची देखभाल व त्यांना घर मिळवून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ठाण्याच्या कचराळी तलावाच्या परिसरात हे केलं जातं. मला माझ्यासारखेच असंख्य मांजरप्रेमी भेटल्याचा विशेष आनंद आहे. या सर्व मांजरप्रेमींकडे अनेक किस्से आहेत.
लिनन. ही आमच्या मखमल माऊची. आता माझ्या मैत्रिणीकडे आहे.
माझे तरी सगळे किस्से सांगून झालेले नाहीतच. उदा. माझ्या निघून गेलेल्या बोक्याने जखमी झाल्यावर परत येऊन कशी मदत मागितली. तो किस्सा मी सांगितलाच नाहीये. किंवा माझ्याकडे आलेल्या पाहुणी मांजरीचं एक पिल्लू कसं निळ्या व दुसऱ्या हिरव्या रंगाच्या डोळ्याचं झालं. दे दूर मणिपालमध्ये राहणाऱ्या माझ्या मांजरप्रेमी मैत्रिणीने तिच्याकडे कसं नेलं हाही किस्सा सांगायचाच राहिला. पण असो. मांजर हा प्राणी आवडणाऱ्यांना इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची सवय आपोआप लागते हे निश्चित.
.............................................................................................................................................
अरुणा पेंडसे
aruna.pendse@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment