अजूनकाही
सहसा भारतीय मानसिकतेत स्पर्श ही नाकारलेली, शक्यतोवर दूर ठेवलेली संवेदना आहे. अगदी जवळच्या नात्यापलीकडे आपल्याला निर्मळ, निरागस स्पर्श फार कमी वेळा अनुभवायला मिळतो. पाळीव प्राणी ही स्पर्शाची भूक बऱ्याच प्रमाणात पूर्ण करतात असा अनुभव आहे. मऊ मऊ मांजराला कुरवाळत बसायला, त्याला हातात घेऊन त्याचे लाड करायला खूप मजा येते. सगळे मनावरचे ताण निघून जातात. गुर्रगुर्र करत बसलेलं खूश झालेलं मांजर आपल्यालाही खूश करतं.
मी लहान असल्यापासून आमच्या शनिवार पेठेतल्या वाड्यात कायम मांजरं असायची. घराच्या दारांना असलेल्या गजांमधून मांजरं त्यांना हवं तेव्हा आत बाहेर ये-जा करू शकायची. उंदीर पकडायची, घरी घेऊन यायची. झुरळं मारायची. घरी चिकन आणलं असेल की, वेडी होऊन खा खा खायची. अजूनही ती परंपरा चालूच आहे. फक्त आत्ताचं घर आठव्या मजल्यावर असल्यामुळे मांजराला बाहेर जायला बंदी! स्वभावाने भित्रं असल्यामुळे त्यालाही आवडतं घरात बसून रहायला. घरात बसून आणि कॅटफूड खाऊन इतकं ढोलं झालंय की, त्याला आम्ही ढोल्याच हाक मारतो आता.
ढोल्यानं परवा हृदयाचा ठोकाच चुकवला. रात्रीची जेवणं चालू होती आणि ढोल्या गायब. त्याचं जेवण झाल्यावर सहसा आमच्याजवळ येऊन बसतो, पण कुठेच दिसेना. स्वैपाकघराच्या खिडकीला मांजराचे केस अडकलेले दिसले, तेव्हा एकदा वाटून गेलं की खाली तर पडलं नाही ना? कारण तीन वर्षांपूर्वी आमचं आधीचं मांजर खिडकीतून पलीकडच्या कट्ट्यावर उडी मारायला गेलं, ग्रॅनाईटवरून नखं घसरली आणि थेट आठ मजले खाली पडलं. अर्ध्या मिनिटात डोळ्यादेखत तडफडून मेलं बिचारं. घरचं, लाडाचं मांजर असं डोळ्यादेखत अचानक गेल्यानं खूप वाईट वाटलं होतं. काही न बोलता ही मांजरं नुसती त्यांच्या अस्तित्वानं केवढा लळा लावतात! त्यांची पोकळी फार काळ जाणवते. ती पोकळी मुख्यत: असते स्पर्शाची. तेव्हापासून या नव्या मांजरानं तसले उपद्व्याप करू नयेत, म्हणून आम्ही सगळेच सतत लक्ष ठेवून असायचो.
प्राण्याशी घरातल्या प्रत्येकाचं नातं हे वेगळं असतं. ते शब्दहीन असतं, मुकं असतं. ते फक्त त्या दोघांना माहीत असतं. त्यात स्पर्श, रस, गंध, दृश्य, श्राव्य या पंचसंवेदनांचा समावेश असतो. त्यामुळे प्राण्याशी नातं हा एक इतर अनुभवांहून अतिशय समृद्ध अनुभव असतो. असे अनुभव इतर कशातूनही क्वचितच मिळतात. त्याचं मोल फार वेगळं आहे. त्यामुळे प्राण्याचं जाणं हे फक्त मृत्यू एवढंच नसून, आपलं संपूर्ण शरीर आणि सर्व संवेदना काहीतरी गमावतात, मिस करतात. तो होणारा त्रास अव्यक्त असतो. त्याची सवय जाईपर्यंत वाट बघणं एवढा एकाच मार्ग राहतो प्राणी गेल्यावर.
ढोल्या आत जाऊन झोपला की काय बघायला गेले तेवढ्यात मुलगा म्हणाला, ते खाली खिडकीच्या छज्जावर उतरलं आहे. सहा फुटी उंच गुळगुळीत कठड्यावर त्याने उडी मारून वर येणं केवळ अशक्य होतं. मी खालच्या मजल्यावर गेले आणि त्याला बोलावून बघितलं पण त्याला ते कळेना. अशा मोठ्या उड्या मारायची सवय नसल्याने त्याला आत्मविश्वासही वाटेना. मग मीच कठड्यावर चढायचं ठरवलं. शेजारी असलेला MNGLचा पाईप भक्कम आहे ना बघितलं आणि नवरा, मुलं, शेजारी सगळे नको नको म्हणत असताना धाडस करून चढले. एका हाताने पाईप घट्ट पकडला. मांजराला वाचवताना सात मजले खाली मीच पाय घसरून पडून चालणारच नव्हतं. त्याचं आवडतं खाणं दुसऱ्या हातानं तिथं घातलं. ते पुरेसं जवळ आल्यावर त्याचा पुढचा पाय पकडला आणि त्याला पटकन जमिनीवर टाकलं. ढगफुटीच्या धो धो पावसाच्याच दिवशी नेमके हे उद्योग. अडकलेल्या मांजराला काढायला कोणाची मदत मिळालीच नसती त्या दिवशी. मांजरं काय काय करायला भाग पाडतील याचा नेम नाही!
ढोल्या आता अडीच वर्षाचा आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतःला माकड समजणारं बाहेरचं एक मांजर, ज्याला बिल्डिंगच्या बीम्स वरून टणाटण उद्या मारून वर खाली जाता येतं, ते खास ढोल्याशी भांडायला घरी यायचं. त्याचा आवाज आला की ढोल्या अस्वस्थ. ओरडाआरडा करून दार उघडायला लावायचा. आधी दाराच्या गजाआडून एकमेकांकडे बघून शेपट्या फुलवून गुरगुरून व्हायचं. एकदा मी ठरवलं, एवढी खुमखुमी आहे भांडायची तर बघू तरी काय करतात एकमेकांना. म्हणून ढोल्याला बाहेर सोडलं तर एकमेकांना पकडून दोघं आडवे झाले आणि अस्से लचके घेतले, नखं मारली.... मीच घाबरले ती हिंसा बघून. शेवटी झाडू घेऊन आले आणि पाठीत रट्टे घातले दोघांच्या. दोघांना वेगळं केलं आणि बाहेरच्या बोक्याला जिन्यात ढकलून दार लावलं. नंतर दोन आठवडे ढोल्याचं निघालेलं नख बरं होत होतं आणि लंगडा पाय दुखत होता. घरात रहात नसतं तर अशा कित्येक लढाया ते लढलं असतंच म्हणा! आपणच अंजारून गोंजारून ठेवतो बाळासारखं आणि मग मार खातात बाहेरच्या मांजरांचा.
याच बाहेरच्या मांजराशी भांडायची खुमखुमी चालू असताना माझा मुलगा खालच्या एका मांजराला हात लावून आला आणि ढोल्याला त्या हाताचा वास दिला. त्याला वाटलं मांजरच आहे आणि त्यांनं घातली हातावर झडप. लाडाचं मांजर एवढं हिंस्त्र आणि मूर्ख असू शकेल अशी कल्पनाच करता येणार नाही. ते हाताला इतकं कडकडून चावलं की, प्रत्येक जखमेत दोन इंजेक्शन्स आणि पुढे रेबीजची अशी एकूण १४ इंजेक्शन्स घ्यावी लागली. त्या घटनेनंतर मुलगा पण खूप घाबरला होता.
आता ढोल्याला फक्त कबुतरांच्या मागे जायला आवडतं. बाल्कनीत पक्षी बघत बसतं, तेव्हा आम्ही त्याला आमचा पक्षीनिरीक्षक म्हणतो. साळुंक्या, पाकोळ्या यांना फार राग येतो मांजर बाहेर बसलं की! विशिष्ट आवाज करत पक्षी त्याला घाबरवतातसुद्धा. मागच्याच वर्षी एक मुनियाचं पिल्लू ढोल्यानं बाल्कनीत मारलं. अशा झटापटी चालायच्याच, पण पक्षी मेल्याचं वाईट वाटतंच. कबुतरं मारली तर उपयोग होईल, त्यांची संख्या कमी व्हायला, पण ती येतच नाहीत हाती.
ढोल्याच्या आधी जे मांजर होतं त्याचं नाव लाडू. एका मैत्रिणीला ते तिच्या दाराजवळ सापडलं. डोळे पण उघडलेले नव्हते अजून. तिने मला फोन करून विचारलं की, याचं काय करू? त्याला दूध कसं देऊ? कापसानं दूध प्यायला त्याला जमत होतं. इतकं चिमुकलं, हाताच्या तळव्यावर मावणारं नाजूक आणि अजून तरी अंधच पिल्लू, मग मी माझ्याकडे घेऊन आले. सर्व मांजरांची आई होण्याची आवड अगदी लहानपणापासूनच आहे. या चिमुकल्या लाडूला कापसानं महिनाभर दूध पाजलं. सात-आठ दिवसांचं पिल्लू असं का सोडून देतात मांजरी कोण जाणे! पूर्वी असंच चिमुकलं डोळे न उघडलेलं पिल्लू शनिवारातल्या घरासमोर सोडलं होतं. तेही आम्ही घरी आणून वाढवलं. तिचं नाव पिली होतं. पिलीची तीन बाळंतपणं एका वर्षात पार पडली. मग मात्र तिची शस्त्रक्रिया करून घेऊन पिल्लं होणं बंद केलं. पिली माझी सर्वांत हुशार आणि लाघवी मांजरी असेल. गावातलं घर सोडून आम्ही बिल्डिंगमध्ये रहायला गेलो, ते मात्र पिलीला सोसलं नाही. रात्रभर आरडाओरडा करून ती खूप अस्वस्थ झाली. मातीशी संपर्क नसणं काही तिला सहन होईना. मग तिला बालभवनमध्ये सोडलं. तिथं काही काळ चांगली राहिली आणि मग गायब झाली. पिलीचे अगदी स्वतःच्या बाळासारखे लाड केले होते आम्ही. तीही खूप प्रेम करायची. आपण जेवढा जीव लावू तेवढी मांजरं आपल्यावर विश्वास टाकतात. तेवढं प्रेम करतात.
मांजरांचा डौल काही औरच! किती ग्रेसफुली चालतात, बघतात, खेळतात. एवढी मोठाल्ली होऊनही काय सुंदर उड्या मारतात. झोपलेलं मांजर तर काय देखणं दिसतं! आळस देताना त्याच्या पाठीचा बाक आणि छोट्याश्या पंज्यांचा ताण बघताना किती फोटो काढू आणि किती चित्रं काढू असं होतं. त्यांची डौलदार शेपूट कशी संपूर्ण पाठीच्या कण्याच्या तोलात हलत असते. मांजराची प्रत्येक हालचाल आणि स्थिती फारच लोभस असते. ज्याला सौंदर्याची ओढ वाटते, त्याला मांजर जमातीचा डौल नाही आकर्षित करून गेला, तरच नवल!
आमचा ढोल्या वर्तमानपत्रांच्या गोळ्यांशी जो काही खेळतो, ते बघून आपलाही उत्साह वाढतो. कागद चुरगाळण्याचा आवाज आला की, याच्या डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होऊन पूर्ण डोळा घाऱ्याचा काळा होतो. झडप घालायला सगळं लक्ष एकवटून ते तयार होतं आणि ज्या दिशेनं कागद टाकू तिथं तुफान वेगात धावत जातं. एक मस्त उडी मारून कागदाचा बोळा पकडतं आणि खूष होऊन चारही पायात तो धरून त्याला लाथा मारतं. पुन्हा कागद चुरगाळल्याचा आवाज आला की, साहेब पुन्हा तयार. अक्षरशः रात्रभर हा खेळ चालू राहू शकेल. आम्हालाच झोप येते म्हणून खेळ थांबतो. घरी क्रिकेट खेळत असलं की, त्याला बॉल पकडायचा असतो आणि बॅडमिंटन खेळत असलं की शटल. मांजर इतकं दक्ष असतं की, नेम न चुकता ते कॅच पकडतंच. मांजरांमुळे हा जो काही आनंद निर्माण होतो, त्यामुळे अतिशय छान वाटत रहातं. अशी लाडाची मांजरं म्हणजे मानसिक उपचारच!
बाळासारखं वाढवलेलं मांजर म्हणजे त्याची दुखणीखुपणी पण आलीच. ढोल्याला मागे एकदा फारच बरं नव्हतं. ताप होता, काही खाईना आणि मलूल होऊन बसायचं. तोंडातून फेस गळायला लागला, तेव्हा मात्र डॉक्टरांकडे नेलं. मग रक्ताची तपासणी, त्यासाठी त्याचे हात-पाय धरणं, सुई नीट न टोचली जाणं, ते वेड्यासारखं घाबरून ओरडणं, त्याला शांत करायला त्याच्याशी बोलणं, त्याला काहीही न कळल्यामुळे त्याने आरडाओरडा करणं... अगदी सगळं सगळं करून झालं. पिसवा जाव्यात म्हणून पावडर लावणं, जंताचं औषध दर तीन महिन्यांनी ड्रॉपरनं त्याला देणं, खूप घाण झालेलं असलं तर साबण लावून आंघोळ घालणं हेही ओघानं आलंच. मला फार आवडतं हे सगळं करायला, मांजरानं कितीही विरोध केला तरी! त्याच्या शी-शूचा टब साफ करणं हे सर्वांत दुर्गंधी काम. पण एवढा जीव लावणाऱ्यासाठी थोडा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही!
मागे एका मांजराच्या पिल्लाला बोका चावला होता, तेव्हा खूप मोठी जखम झाली होती बिचाऱ्याला पोटावर. तेव्हा रोज दोन औषधं त्या जखमेला लावायला लागायची. जखम बरी होत आली, पण पिल्लू इतकं लहान होतं की, त्याला ते सहन नाही झालं आणि ते नाही जगू शकलं. गोंडस नावाच्या आमच्या अजून एका मांजराला खरुज झाली होती. त्याला महामरिच्यादी तेल लावून ती खरुज कमी होत असे. त्याला पकडून तेल चोळून देणं हेही आव्हानच होतं. पण खाज थांबत असावी. त्यामुळे ते लावून घ्यायचं तेल निमूटपणे.
मांजराला आपल्याच कुटुंबाचा भाग मानून आपण त्याला जीव लावला तरच त्याचा लळा लागतो. मांजराचा लडिवाळपणा खरं तर शब्दात काय, भावनेतही पकडणं शक्य नाही. इतकं लाडकं, जवळचं मांजर असणं म्हणजे काय ते अनुभवावंच लागतं. तेही आजारी पडू शकतं, वेड्यासारखं वागू शकतं आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, हे पक्कं असलं की मांजर आपल्याला खूप प्रेम देतं. अगदी डोळ्यात डोळे घालून बघतं. त्यालाही भावना समजतात. कधी कधी तर वाटतं की, याला भाषा पण समजतेय की काय? वेगवेगळे आवाज काढून तर गप्पा माराव्यात अशी म्याव म्याव करत राहतात मांजरं कधीकधी. प्राण्यांच्या एका मानवेतर जातीशी असा संवाद होणं म्हणजे श्रीमंतीच की!
.............................................................................................................................................
Painting credits - Kamwei Fong, Theophile Steinlen, Endre Penovac, Picasso, Kovacs Anna Brigitta.
इतर चित्र इंटरनेटवरून साभार.
.............................................................................................................................................
लेखिका आभा भागवत चित्रकार आहेत.
abha.bhagwat@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment