१.
किरर्र रात्र... सुन्न झाडी, पडकी हवेली
करकरणारे दार फडफडणारे वटवाघूळ
आणि मग पुढे आणखी दातखीळ बसवायला म्हणून क्षणार्धात धप्पकन समोर उडी मारणारं, काळेभोर, चमकत्या हिरव्यागार तीक्ष्ण डोळ्याचं, फिस्कारणारं मांजर! थेट रामसे बंधूंच्या सिनेमात शोभेलसं थरारक, भीतीनं गाळण उडवणारं दृश्य.
पण थांबा थांबा... मांजराच्या एन्ट्रीमुळे उलट काही जणांची भीती जात असणार.
माझी मुलगी लहान असताना नेहमी म्हणायची, “आई, तिथं मांजर असेल ना, तर मग त्या दृश्याची कसली आलीय भीती? उलट, चला मांजर तरी आहे सोबतीला इथं, म्हणून भीती कमी होईल! म्याव आवाजाचा नक्कीच आधार वाटेल अगदी!”
मांजरांची अनेक भीतीदायक आणि वाईट गोष्टींशी पक्की सांगड घातलेली असते. पण खऱ्या मांजरप्रेमीला, मांजर जे भेदकपणे डोळ्यात डोळे घालून बघतं ना, त्याची कणमात्र भीती वाटत नाही. त्यांच्या लेखी काळं मांजर अशुभ नसतं आणि मांजर आडवं गेलं तर ते काम नक्कीच होणार म्हणून आश्वस्त व्हायला होतं.
लेख नेहा मांजराशी खेळताना
२.
आमच्याकडे हे मांजर प्रेम चार-पाच पिढ्यांपासून चालत आलेलं आहे. माझ्या कोकणातल्या आजीपासून ते अमेरिकेत राहणाऱ्या आमच्या छोट्या नातवापर्यंत! कोकणात प्रत्येक घरात दोन गोष्टी हमखास असायच्याच. ओसरी-पडवीतला झोपाळा आणि कौलारू, अंधाऱ्या घरात, त्याच अंधाऱ्या रंगाचं, पायात-पायात येणारं मांजर. कोकणातल्या माणसांसारखीच ही मांजरंही किडकिडीत. त्यांचे फार काही लाड वगैरे मुळीच होत नसत. मनी, बोक्या, मांजरू याखेरीज त्यांना वेगळी नावं नसत. कोकणात त्या काळी दूध दुभत्याची फारच टंचाई असे. त्यामुळे मांजरांच्या वाट्यालाही दूध कमी, भात जास्त असंच असायचं. मांजरं तुमचे घास मोजतात म्हणजे काय हे मला तिथं पहिल्यांदा बघायला मिळालं. पाटावर आठ-दहा जणं ओळीनं जेवायला बसले म्हणजे हे मांजर समोरच बसायचं. ताटातला घास उचलायला गेलं की, याची नजर ताटात. हात वर तोंडाकडे गेला की, त्याप्रमाणे ते नजर आणि मान वर करणार. ही मांजरं पंगत संपेपर्यंत, प्रत्येक घासागणिक अशी मान खाली-वर करू शकत असत. मांजर म्हणजे, लाड आणि प्रेम यापेक्षा, परसात मुबलक असणारे सुरवंट, गोम, विंचू, बेडूक अशा गोष्टी घरात येऊ नयेत म्हणून केलेली तजवीज असे.
मांजरांचे तुफानी लाड आणि अनेक मानवी गुण त्यांना चिकटवण्याचा काळ अजून तिथं आला नव्हता. शास्त्रीय संगीत लावलं की, आमचं मांजर तिथं अगदी पळत येतं आणि बरोब्बर समेला शेपूट हलवतं इथपासून ते.....
जाऊ दे, मांजरप्रेमींना अशा कौतुकभरल्या गप्पा रंगवायला फार आवडतं.
अतिशयोक्ती सोडून द्या, पण मांजरं असतात मजेशीर आणि थोडी चक्रमही! (माझ्या मुलीच्या मतानुसार तर, जी माणसं मुळात थोडी चक्रम असतात त्यांनाच मांजरं आवडतात!) खाण्याच्या मजेशीर सवयी मांजरांना असतात. बाजारातून आलं की, पिशवीतली काकडी पळवणारं मांजर मला माहीत आहे! काही कुडुम कुडुम शेंगदाणे खातात. आमच्या एका मांजराला अंडं इतकं आवडायचं की, अंड्यावर चमचा किंवा सुरी टेकवल्याचा थोडा जरी आवाज आला तरी जिथं कुठे ते असेल तिथून पळत यायचं. एरवी शाकाहारी घरात मांजरांना फार काही पर्याय नसतोच म्हणा! बाहेर जर वेगळी शिकार मिळाली तरच. या शिकारीची पण एक गंमतच आहे. बाहेरच्या बाहेर खाऊन यायचं सोडून, मारलेला तो सरडा, पाल, चिमणी तोंडात धरून, एका विशिष्ट पद्धतीनं गुरगुरत मांजर घरात प्रवेश करतं. काही मांजरं तर, तुम्ही कौतुक करावं म्हणूनच जणू काही, तो बागेतला खाऊ तुमच्या समोर आणून सादर करतात.
शिकार करताना असो की खेळताना, मांजर ज्या काही चपळ आणि डौलदार हालचाली करतं, त्याला तोड नाही. मांजराच्या या हालचाली बघत मी तासन तास बसू शकते. आपल्या पंजानं स्वतःचा चेहरा साफ करताना लागलेली एकाग्र तंद्री, टेबलावरची एकही वस्तू न पाडता बरोबर जजमेंट घेऊन खिडकीत मारलेली उडी, उंचावरूनही बरोबर चार पायांवर होणारं अलगद लँडिंग. छोट्या गजातून संपूर्ण शरीर बाहेर काढण्याची करामत. किती मोहक आहे हे सगळं!
खेळणं जाऊ दे, पण आळस आणि झोप हेसुद्धा डौलदार/ कुर्रेबाज असावं म्हणजे काय? पाठीचा उंचवटा करून मग पुढचे दोन्ही पाय पुढे ताणून मग अंगाचं वेटोळं करून झोपलेलं मांजर ही बघण्याचीच गोष्ट आहे. आमच्या आजवर झालेल्या अनेक मांजरांपैकी एकाला झाडाच्या कुंडीत झोपायची खोड होती. बरोबर छोट्या कुंडीच्या गोलाकार जागेत गच्च वेटोळ करून ते झोपायचं. आणि कुंडीतलं रोप त्याच्या पोटातून उगवल्यासारखं दिसायचं.
मांजर डौलदार असतं तसं कुर्रेबाजही. कुत्र्याच्या अगदी उलट स्वभाव. मालकाचं मन जिंकण्यासाठी काहीही करायला कुत्री तयार असतात. (कुत्रा विरुद्ध मांजर या वादात मला मुळीच पडायचे नाही!) उलट मांजरं म्हणजे, घर फक्त आपल्याच मालकीचं आहे अशा तोऱ्यात असतात. ‘माझ्या घरात ही बाकीचीही फुटकळ मंडळी राहतात’ असा एकंदर त्याचा आव असतो. घरातली सर्वांत आरामशीर खुर्ची त्यांच्यासाठी असते. तुमची मांडी ही त्यांची दुसरी आवडीची जागा. बरं, तुम्हाला हवं आहे म्हणून तुमच्या मांडीत मांजर बसत नाही. त्याला हवं असेल तेव्हा आणि तेव्हाच ते बसतं. एखाद्या मांजराला मांडीवर घ्यायचा बळेच प्रयत्न करू बघा!
मांजराला तुमच्या मानेवर, पाठीवर कुठेही बसायला आवडतं. उब हवी ही गोष्ट महत्त्वाची. शाळेत असताना मला, मांजराला मांडीवर घेऊन अभ्यासाला बसायची सवय होती. त्याच्या घुर्र घुर्र आवाजात एकाग्र होऊन छान अभ्यास व्हायचा. शिवाय बैठक मोडायची नाही. एक मांजरं पुस्तक वाचायला मान खाली घातली की, मानेवर बसायचं. म्हणजे अगदी मान मोडून तुमचं काम होणार! अभ्यास आणि मांजर ही परंपरा माझ्या मुलीच्या पिढीतही चालू राहिली.
मांजरं मुळीच परंपराप्रिय नाहीत. बदलाला ती सतत तयार असतात. अगदी काळाबरोबर! म्हणजे कोकणात आजीची मांजरं चुलीशेजारी पडून असायची. अशा आवडत्या जागा शोधून तिथं बसण्यात मांजरं पटाईत असतात.
घरोघरी पीसी यायच्या थोड्या आधीच्या काळात, आमच्याकडे कॉम्प्युटर आला होता. फ्लॅट स्क्रीन नव्हते त्यावेळी. मॉनिटर स्क्रीनच्या मागे रुंद आणि किंचित उतरता भाग असायचा. एकेदिवशी नेहमीच्या जागी मांजर दिसेना म्हणून शोधाशोध केली. थोड्या वेळानं कम्प्युटर स्क्रीनच्या मागून एक पंजा हळूच बाहेर आला. महाराज त्या उबेला मस्त बसले होते.
चूल काय आणि कम्प्युटर काय, उब मिळाल्याशी कारण. अत्यंत गाढ आणि त्याच वेळी विलक्षण सावध झोप ही करामत मांजराना जमते! बारीकसा आवाज झाला तरी टुक्ककन कान टवकारतात.
३.
हक्कानं बाळंतपणासाठी येणारी मनी
आपल्याकडे, गल्लीत पाच-दहा मांजर अशीच फिरताना दिसतात. एक भटकी मनी हक्कानं बाळंतपणासाठी आमच्या बाल्कनीत न चुकता यायची. चार आठवडे पाहुणचार घेऊन जायची.
मनी आणि तिची पिल्लं म्हणजे अवीट गोडीचा विषय. मूर्तीमंत आईचं पुरेपूर प्रत्यंतर म्हणजे मांजर-आईच्या हालचाली आणि वागणं. शांत डोळे मिटून पिल्लांना चाटणं, चढाओढ लावून पिल्लांनी दूध पिणं, डोळे उघडल्यावर आपापसात खेळणं विलक्षण मोहक असतं. पिल्लांच्या या बाळलीलांचे फोटोही डौलदार येतात. डिजिटल मीडिया अवतरण्याच्या आधीच्या काळात, फोटोंचं आणि त्यातही रंगीत फोटोंचं इतकं अप्रूप असे की, आताच्या पिढीला त्याची कल्पनाही येणार नाही. भरपूर रंगीत फोटो असलेली पुस्तकं बघायलाही मिळायची नाहीत. याच काळातली शांता शेळके यांची एक हृद्य आठवण मी घट्ट जपून ठेवली आहे. १९९०च्या आधीचा काळ. त्यावेळी, मी ‘स्त्री’-‘किर्लोस्कर’ मासिकांमध्ये उपसंपादक होते. लेखनाच्या निमित्तानं शांताबाई कधीतरी ऑफिसमध्ये येत असत. एकदा बोलताना सहज मांजरांचा विषय निघाला. त्यांना मांजरं आवडायची. मी मांजरप्रेमी आहे हे कळल्यावर त्या पटकन म्हणाल्या,
“माझ्याकडे मांजराच्या फोटोंचं सुंदर पुस्तक आहे. पुढच्या वेळेला आले की, तुला दाखवायला घेऊन येईन.” विषय तेवढ्यावरच संपला. अशा गोष्टी प्रत्यक्षात फारश्या येत नाहीत. पण खरोखरच पुढच्या वेळेला शांताबाई आल्या, तेव्हा हातात मांजरांचं पुस्तक होतं. पुढचा काही काळ म्हणजे निखळ आनंद होता. आम्ही एकत्र फोटो बघितले. मांजरांच्या टिपलेल्या प्रत्येक हालचालीचं मनापासून कौतुक करत पुरेपूर दाद दिली. शांताबाई अशाच होत्या अत्यंत मनमोकळ्या, सहज आणि साध्या. मोठ्या लेखिकेचा तोरा त्यांच्या अंगी जराही नव्हता. नाहीतर नव्यानं पत्रकारितेत दाखल झालेल्या कुणासाठी तरी एवढं आवर्जून कोण करेल? त्यामुळे मांजर विषय आल्यावर शांताबाई आठवत नाहीत असं होतच नाही.
तर, आमच्याकडे बाळंतपणाला येणाऱ्या त्या मांजरीची काही पिल्लं आम्ही सांभाळली काही इतरांना दत्तक दिली.
४.
लेक, नेहा आणि मार्शमेलो
अगदी अलीकडे, असा एक ‘दत्तक सोहळा’ मी अनुभवला. तोही देशाबाहेर. सध्या अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या मुलीला बरेच दिवस मांजर पाळायचं होतं. तिथं गल्ल्यांमध्ये मांजरं भटकत नाहीत किंवा हक्कानं घरीही येत नाहीत. मांजरं विकत मिळतात. त्या ‘उच्चकुलीन’ गब्दुल मांजरांच्या किमती असतात हजार-दीड हजार डॉलर! खिशाला न परवडणाऱ्या. त्याला पर्याय असतो तो म्हणजे ‘ॲनिमल केअर अँड कंट्रोल’ विभागातून मांजर दत्तक घ्यायचं. पोलिसांनी वाचवलेली, बेवारस सापडलेली किंवा हरवलेली मांजरं, कुत्री तिथं आणली जातात. प्राणी तिथं दाखल झाला की, त्यांच्या वेबसाईटवर ती माहिती झळकते. ती बघून संपर्क साधायचा आणि तिथं त्वरा करून पोहोचायचं कारण अशा प्राण्यांना भरपूर मागणी असते. उशिरा गेलं तर हात हलवत परत यायला लागतं. तिथं सविस्तर फॉर्म भरून दहा-वीस ठिकाणी सह्या करायला लागतात. तुम्ही त्याला नीट पाळाल ना याची खात्री करून घेतात. हे झाल्यावर लगेच मांजर मिळत नाही. त्याला न्यूटर करून दुसऱ्या दिवशी हातात ठेवलं जातं. हे नसबंदी ऑपरेशन अनिवार्य. त्याशिवाय दत्तक नाही. आणखी एक गंमत म्हणजे त्याच्या पोटात एक बारीक चिप घालतात. कुठे हरवलं तर त्याचं लोकेशन कळावं म्हणून!!
मांजरघर
मुलगी घेणार होती ते मांजर दोन महिन्याचं पिल्लू होतं. घरी बाळ येण्यापूर्वी करावी तशी जय्यत तयारी झाली होती. शी-शूसाठी लिटर बॉक्स, त्यातली बारीक वाळू, पिल्लूला झोपायला गुबगुबीत आरामशीर कापडी घर, खाण्यासाठी एक आणि पिण्यासाठी एक अशी दोन भांडी, कॅट फूड, असं सगळं. शिवाय पिल्लं कशी सांभाळायची, ती कशी वागतात, त्यांचं खाणंपिणं यांची माहिती देणाऱ्या छोट्या पुस्तिका... काही विचारू नका! शिवाय, पिल्लू हातात आलं तेव्हा दोन महिन्याच्या पिल्लाचा दोन पानी मेडिकल रिपोर्टही ‘ॲनिमल होम’नं हातात ठेवला. उदाहरणार्थ, त्यातली एक नोंद अशी- १४ तारखेला त्याचा उजवा डोळा थोडा लाल झाला होता. त्यासाठी त्याला तपासणाऱ्या डॉक्टरचं नाव सही वगैरे वगैरे. शिवाय लसीकरण कधी केलं त्याची नोंद.
पूर्वी मांजर हे जणू खेळणं असायचं, आता मांजरासाठी बाजारात खेळणी मिळतात! नव्या पिल्लाला बघायला येणारे आप्त-मित्र अशी खेळणी भेट म्हणून आणतात. हौसेला मोल नाही, हा प्रत्यय सतत येत असतो.
५.
कोकणातलं मांजरू, इंदापूरचा फिरस्त्या, पुढे पुण्यातले पोत्या, सटू, मिशू, रोनाल्डो, ऐश्वर्या, दक्षू अशा आमच्या मांजर परंपरेत हे नवं, नातवानं ठेवलेलं नाव दाखल झालं- मार्शमेलो!
ही सगळी नावं का आणि कशी ठेवली? तर प्रत्येक नावामागे एक ‘स्टोरी’ आहे. पण ती पुन्हा कधीतरी.
एरवी मांजर हा खूप व्यक्तिवादी आणि स्वतःच्याच प्रेमात असलेला प्राणी आहे. तो समूहात रमत नाही किंवा टोळीनं भटकत नाही. मात्र दोनदा अशा मांजरांच्या टोळ्या मी बघितल्या आहेत. दादरला ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय’ आहे. ‘स्त्री’-‘किर्लोस्कर’ला असताना मी बरेच वेळा तिथं जात असे. ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावर लेखक, पत्रकार, अभ्यासक यांच्यासाठी अगदी अल्प दारात राहण्यासाठी खोल्या मिळत. ते सोयीचं पडे. तिसऱ्या मजल्यावर त्यावेळचे ग्रंथपाल अच्चुत तारी राहायचे. त्यांच्याकडे मांजरं असायची. म्हणजे एक दोन नव्हे... तर आख्खं कुटुंब. एकदा तर मी वरच्या जिन्याजवळ एकत्र बसलेली ११ मांजरं मोजलेली आहेत. विविध वयाची पण दिसायला अगदी सारखी. पांढऱ्यावर मोठे काळे डाग असलेली!
कितीतरी वेळ ते दृश्य मी बघत उभी होते.
दुसरा प्रसंग मुंबईच्याच लोकलमधला. अगदी सकाळच्या वेळी, चर्नी रोड स्टेशनच्या एका रिकाम्या प्लॅटफॉर्मवर मांजरांचा एक जथा दिसला. हो, अगदी गाडीची वाट बघत असल्यासारखा. अपूर्व होतं ते दृष्य! पण ती मांजरं गाडीची नसून त्यातून जाणाऱ्या-येणाऱ्या कोळणीची वाट बघत असत. त्यांनी फेकलेले माशाचे तुकडे मटकावण्यात मांजरांना रस असे. ही घटना आहे ३५-४० वर्षांपूर्वीची. रिकाम्या प्लॅटफॉर्मवर मांजरं दिसणं हे आताच्या गर्दीच्या काळात अशक्यच!
घरची काय किंवा दारची काय मांजरं खूप लळा लावतात. मार्जारलीला डोळ्यांचं पारणं फेडतात. पाळलेलं मांजर घराला चैतन्य आणतं. या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण त्याहीपलीकडची एक गोष्ट मला नेहमीच खूप भुरळ घालते. ती म्हणजे कोणताही पाळीव प्राणी तुमचं भावविश्व श्रीमंत आणि समृद्ध करतो!
दक्षू
कुटुंबात ज्या संवादानं जवळीक वाढते, त्या संवादाचा, मांजर हा संवाद-विषय असू शकतो. सगळ्या कुटुंबाला जोडणारा तो दुवा होतो. विशेषतः आई - मूल किंवा बाबा आणि मूल. याला समांतर एक उदाहरण सांगता येईल. आपण आपल्या छोट्या मुला-मुलीला मांडीत बसवून जेव्हा गोष्ट सांगतो, तेव्हा फक्त वेळ चांगला गेला एवढीच बाब शिल्लक म्हणून खाली उरत नाही. कारण ती नुसती ‘गोष्ट’ नसते. गोष्ट सांगण्यात आणि ऐकण्यात अनंत शक्यता दडलेल्या असतात. त्यात सांगणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये कितीतरी देवाण-घेवाण होते. उबदार स्पर्श, आश्वासक आवाज, बोलणारे डोळे असं बरंच काही. आनंद, दु:ख, उत्सुकता, आतुरता अशा सर्व भावना एकत्रितपणे अनुभवता येतात. आई बाप आणि मुलं यांच्यातली ती तल्लीन संवादाची जवळीक असते. एकमेकांना जोडणारा, मायेचा धागा त्यातूनच तर बळकट होतो. त्याशिवाय, गोष्टीच्या पलीकडे जाणारं, तुमचं असं एक खास विश्व तयार होतं. त्याला कल्पनाशक्तीचे पंख असतात. (आता मुलांच्या पुस्तकांचं संपादन करताना तर ही गोष्ट अधिक जाणवते.)
कल्पनाविश्वात संचार करत हरवून जाणं हा तर मोठा गुण आहे. मुलांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावणारा!
घरातलं मांजर या कल्पनाविश्वाला वेगळा आयाम आणि थोडा जास्तीचा ऐवज मिळवून देतं. या अद्भुत गोष्टींच्या विश्वात तुमचं घरचं मांजर कधी गोष्टीतलं पात्र बनतं. ते उडत्या पर्शियन गालीचावर बसून अल्लाउद्दिनच्या देशात जातं. कधी घरातले सगळे बाहेर गेलेले असताना इतर मांजरांना बोलावून पार्टी करतं. कधी तुमच्या देखण्या मनी-माऊला सिनेमाची ऑफर मिळते, पण कुर्रेबाजपणे ती नाकारते, कधी शाळेतली शिकारीची स्पर्धा ती जिंकते... असं काहीही आणि अगदी वाट्टेल ते!
एकमेकांमध्ये तयार होणारी अशी कल्पनेतली गुपितं आणि त्याभोवती तयार होणारं विश्व ही फार बहारीची गोष्ट आहे.
भावनिक समृद्धी आणि नात्यांचे पूल त्यातूनच तर तयार होतात!
.............................................................................................................................................
संध्या टाकसाळे
sandhyataksale@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment