बुल्स आय... एक दीर्घकथा (पूर्वार्ध)
पडघम - साहित्यिक
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 31 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

समकालीन राजकारणाचे संदर्भ, गाभुळलेल्या चिंचेप्रमाणे पिकत गेलेले प्रेम आणि मानवी अस्तित्वासामोरील सनातन नैतिक पेच ह्यांची गुंफण घालणारी दीर्घकथा...

.............................................................................................................................................

प्रेस कॉन्फरन्स होऊन तासभर उलटला असेल-नसेल, तोच माझा आय फोन घणघणायला सुरुवात झाली.

पहिला फोन खुद्द आय जींचा, अगदी नेमका - वेल डन माय बॉय, आय अॅम प्राउड ऑफ यू, व जाता जाता - होप टु गिव्ह यु सम गुड न्यूज सून – म्हणणारा.

मग मिनिस्ट्रीतले बडे ऑफिसर्स, जुने पत्रकार मित्र... संध्याकाळी बातमी न्यूज चॅनेलवरून पसरत गेली, तसे मग नातेवाईक, मित्र... एकेकाचे फोन यायला सुरुवात झाली. पण आमच्या हरामखोर डिपार्टमेंटमधल्या सगळ्यांची जणू दातखिळी बसली होती. बास्टर्ड्स. सगळे जळून खाक !

रात्रीचेसाडेदहा वाजले, तेव्हा कुठे पोलीस अॅकॅडमीत माझ्या सोबत असलेल्या कलीगचा नंबर माझ्या आयफोनवर झळकला –

‘हाय टायगर!’

‘स्साला खुराणा तू? कैसे याद किया ?’

‘याद? बल्ले बल्लेए सी. पी. तेजसिंगराव देशमुख, तेरी तो निकल पडी. साले, पुरी मीडिया पे छा गया है तू!!’

‘तेरे को अभी पता चला?’

‘तू तो आपुन को जानता है. तेरे आय जी का रिपोर्ट मिनिस्ट्री मे सुबह ग्यारा बजे पहुंचा और सवा ग्यारा को अपने टेबल पे...’

‘और तेरे को अभी टाईम मिला? अरे इतना भी मत जलो. तुम दिल्लीवाले तो हमेशा छाये रहते हो. एकाध बार आबुजमाड–गडचिरोली वाला बंदा मीडिया में चमका, वो भी जान की बाजी लगाकर, तो तुम्हारे मुंह को ताला?’

‘अबे, जलता तो तेरे को अभी फोन करता? सुन, मैं तेरे को कुछ खास खबर सुनाने के लिये रुका था. तेरा प्रेसिडेंट्स मेडल अब पक्का समझ. प्रमोशन तो वैसे ही ड्यू  है.’

‘हंड्रेड पर्सेंट पक्की खबर?’

‘दिल्ली की कोई खबर हंड्रेड पर्सेंट नही होती. वैसे छब्बीस जनवरी बहोत दूर नही है. इसलिये इसे पक्की  ही समझ. फिर अपनी पार्टी?’

‘खबर पक्की तो पार्टी पक्की. एनी वे, थँक्स बॉस!’

‘बॉस?’

‘फील्ड मे काम करनेवाली हम जैसी पब्लिक के लिये दिल्ली-बॉम्बे वाले बॉसही तो होते है और खुराना साब तो सब की खबर जो रखते हैं...’

(इतक्या दुरूनही खुरानाच्या चेहऱ्यावर ओघळणारे तुपाळ समाधान मला दिसलं.)

खुशीत येऊन तो म्हणाला-

‘साले, तूने स्टोरी तो बढिया बनाई. क्या हेडलाईन है –

टायगरबी टायगर बी, वॉक्स लाईक अ टायगर अँड हिट्स ऑन द‘बी’. चलो, इस बहाने आम जनता को ‘बी’ याने ‘बुल्स आय’ क्या चीज होती है, इतना तो समझ में आयेगा. खैर, गुड नाईट ...’

‘गुड नाईट’ म्हणून मीही फोन ठेवला. मनात म्हणालो –‘टायगर बी’ काय चीज आहे हे पब्लिकला कळलंय. फक्त तुमच्या सारख्या रेम्याडोक्यांना ते कळलं नाही आणि कळणारही नाही. हा खुराणा! पाच-सात वर्षं फिल्डवर काम केले नाही, तोच लग्गा लाऊन थेटदिल्लीत मिनिस्ट्रीत जाऊन बसला. ह्यांना रिस्क नको, फक्त मलिदा खायला हवा. वरून आपल्याला पब्लिसिटी मिळत नाही म्हणून रडणार! तो हरयाणाचा जाट – बेनिवाल! नुसती रग, डोकं काही नाही. गुरगावला एन्काऊंटर करून दोघांना मारलं, पब्लिसिटीही मिळवली. पण ह्युमन राईट्सवाले मागे लागले तेव्हा तोंड लपवत फिरला. हिम्मत आणि अक्कल दोन्ही वापरणारा एखादाच असतो – माझ्यासारखा, वाघाच्या सावध, चपळ चालीचा व बरोबर लक्ष्याचा वेध घेणारा - वॉक्स लाईक अ टायगर अँड हिट्स ऑन द ‘बी’...

चला टायगर देशमुख, इट्स टाईम फॉर युवर स्कॉच...

‘गुडमॉर्निंग बेबी’

‘गुड मॉर्निंग हनी. मला लौकर का नाही उठवलंस?’

‘यु बॅडली नीडेड रेस्ट’.

‘फोन होते कोणाचे?’

‘बरेच होते, पण तुला उठवण्याइतपत महत्त्वाचा कोणताही नव्हता. मी लिस्ट करून ठेवली आहे. वेळ मिळेल तेव्हा कर्टसी कॉल कर. आधी कॉफी घे, मग पेपर्स बघ. आज तर स्टॉलवर मिळणारे सगळे पेपर आणून ठेवले आहेत. सगळ्यांनी हेडलाईन दिलीय तुला आणि फोटोही. ‘प्रजावाणी’ने तर कमालच केली आहे’.

‘वा! चांगला तीन कॉलम फोटो टाकलाय– तीन नक्षलवाद्यांच्या बॉडीज, त्यांच्या ए के 47 व त्या पार्श्वभूमीवर मी. हेडलाईनही भारी आहे – ‘नक्षल्यांच्या जंगलावर टायगरचे राज्य’. काय म्हणतोय आमचा भिडू?

आमच्या विशेष प्रतिनिधीकडून –

काल अहेरीच्या जंगलात ए सी पी तेजसिंगराव देशमुख व त्यांच्या टीमने इतिहास घडवला. नक्षल्यांचे राज्य असलेल्या दाट जंगलात शिरून त्यांनी तीन नक्षल्यांचा खात्मा केला आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे काबीज केली. काल रात्री अहेरीपासून तीस किलोमीटरवर खोल जंगलात उडालेल्या चकमकीचा हा चित्तथरारक वृत्तांत.

एसीपी तेजसिंगराव उर्फ टायगर देशमुख ह्यांची नक्षलग्रस्त भागात नेमणूक झाल्यापासून त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने इथल्या वातावरणावर आपला ठसा उमटविला आहे. थंड डोक्याने केलेले नियोजन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चपळ हालचाली, शत्रूला अंधारात ठेवून त्याच्यावर चाल करण्याचे कौशल्य, साहसी व प्रत्यक्ष अॅक्शनच्या वेळी पुढे राहून नेतृत्व करण्याची वृत्ती ह्या त्यांच्या गुणांची झलक महाराष्ट्राला ह्या पूर्वीच दिसली होती. ह्या पूर्वीच्या पोस्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तसेच मुंबईत संघटित गुन्हेगारीचा सामना त्यांनी ज्या आक्रमकतेने व धडाडीने केला, त्यामुळे तरुण वयातच त्यांची गणना महाराष्ट्राच्या उत्कृष्ट पोलीस अधिकाऱ्यात करण्यात येऊ लागली आहे. सहा महिन्यांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली ह्या जिल्ह्यांतील नक्षलवादविरोधी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. आल्या आल्या  त्यांनी नक्षलवाद्यांची पाळेमुळे पद्धतशीरपणे खणून काढायला सुरुवात केली. सर्वप्रथम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी नक्षल्यांच्या संवादप्रणालीवर कब्जा मिळविला. त्यांच्या संदेशांचे डिकोडिंग करण्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश आले. त्यामुळे नक्षल्यांच्या हल्ल्याच्या योजना हाणून पाडण्यात ते यशस्वी झाले. आपले बेत फुटल्यामुळे चिडलेल्या नक्षल्यांनी  ह्याचे उट्टे निरपराध आदिवासींवर हल्ले करून काढण्यात सुरुवात केली. काल रात्री अहेरीपासून तीस किलोमीटरवर असलेल्या अड्डापल्ली गावात नक्षल्यांनी केलेला हल्ला हा त्याचाच एक भाग होता. काल रात्री आठच्या सुमारास ह्या गावात नक्षली घुसले. तेथील आदिवासी किराणा दुकानदार हा पोलिसांचा खबऱ्या आहे असा त्यांना संशय होता. त्यांनी त्याला घरात घुसून फरफटतबाहेर काढले व सर्व गावासमोर हाल हाल करून त्याला ठार केले. ही घटना संपण्यापूर्वीच एसीपी देशमुख स्वतः आपल्या निवडक सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नक्षल्यांना शरण येण्याचे आवाहन केले. प्रत्त्युत्तर म्हणून नक्षल्यांच्या टोळीने पोलीस पथकावर हल्ला चढविला. पण एसीपी देशमुख ह्यांनी आपल्या साथीदारांसह त्यांचा मुकाबला केला. स्वतः देशमुख ह्यांनी केलेल्या अचूक लक्ष्यवेधामुळे नक्षली दलमचा कमांडर गजपती उर्फ सुनिल उर्फगणेशन मृत्युमुखी पडला. अर्धा तास चाललेल्या ह्या धुमश्चक्रीत गजपतीसह एकूण तीन नक्षलवादी ठार झाले व अनेक जखमी झाले. अंधाराचा फायदा घेऊन जखमी नक्षल्यांना घेऊन अन्य नक्षली जंगलात पळून गेले. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांचा प्रचंड दरारा होता व पोलीसही त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरत असत. एसीपी देशमुख ह्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे हे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडच्या काळात नक्षलवाद्याना बसलेला हा सर्वात मोठा हादरा आहे असे मानण्यात येते. एसीपी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांवर देशभरातून अभिनन्दनाचा वर्षाव होत आहे. पोलीस ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेजसिंगराव उर्फ टायगर देशमुख हे ‘शार्प शूटर’ म्हणून प्रसिद्ध होते. अर्जुनाला जसा लक्ष्यवेध करताना पक्ष्याचा फक्त डोळा दिसत असे, तसा टायगरसाहेबाना नेहमीसमोरचे टार्गेट किंवा प्रतिस्पर्ध्याचे मर्मस्थळ- बुल्स आय - दिसत असते अशी मार्मिक आठवणही ह्या निमित्ताने एसीपी साहेबांच्या एका सहकाऱ्याने ह्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली. हे ‘ऑपरेशन’संपवून रात्री दोन वाजता घरी परतण्यापूर्वी साहेबानी आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या जखमी सहकाऱ्यांची भेट घेतली. आपल्या ज्युनियर स्टाफवर त्यांचे इतके प्रेम असल्यामुळेच ते सर्व डिपार्टमेंटमध्ये लोकप्रिय आहेत असेही त्याने सांगितले.

***

‘हॅलो खुराना साब’

‘साब वाब छोड यार. अबकुछ ही  साल में तू हमारा बॉस बन के बैठने वाला है. बोलक्या न्यूज है ?’

‘न्यूज तो आप लोगों के पास होती है. बता मेरी फाईल कहाँ तक पहुंची? सुना है अपने कुछ यार दोस्त उस में बहोत जादा इंटरेस्ट ले रहे हैं’

‘सही सुना है. चार दिन पहले ‘हिंदू’ में रिपोर्ट आया था. क्या नाम था ? हाँ, Adivasis as hostages – The true story behind ‘brave’ encounters. तुने देखी तो होगी.’

‘हाँ, वो चुत्या रिपोर्टर लिखता है कि पुलिस डिपार्टमेंट नेइन्फ़ोर्मर का नाम जान बुझकर लीक किया, ताकि नक्षल्स उस पर अॅटॅक कर सके और जब ये अॅटॅक हुआ, तब हम ने उसे बचाने की कोशिश नहीं की. हमारा इंटरेस्ट सिर्फ २-३ नक्षलाईट्स को मार कर पब्लिसिटी कमाने का था... कैसे कैसे ब्रेन डेड लोग रिपोर्टर बन जाते है. उन को यह भी नहीं समझता कि यह कोई पिकनिक का मामला नहीं है; इट्स अवॉर...’

‘ऐसा तेरे को लगता है. लेकिन मामला इतना सादा नहीं है. उस रिपोर्टर का मानना है कि तूने नक्षलाइट्स को ट्रॅप करने के लिए आदिवासी को यूज किया. याने शेर की शिकार के लिए बकरे को यूज करते हैं, वैसे तूने एक इंसान को, वह भी आदिवासी को इस्तेमाल किया. फिर अपने सब ज़ख्मी स्टाफ को हॉस्पिटल में ले जाते वक़्त इस होस्टेज को वही पर तड़पते हुए मरने के लिए छोड़ दिया. दीज आर सीरिअस ह्यूमन राइट्स इश्यूज़. और मालूम है मिनिस्ट्री तक यह खबर किस ने पहुंचाई? तेरे डिवीज़नल कमिश्नर ने.’

‘फिर?’

‘फिर क्या? हम यहाँ पर किस लिए बैठे हैं? एक तो एंटी-नक्सलाइट टास्क फोर्स ने यह बात रफा-दफा कर दी, बोला, हम सीधा होम मिनिस्टर के ऑर्डर पर काम करते हैं. वॉर लाइक सिच्यूएशन में यह सब सोचने को टाइम नहीं होता. फिर तेरे को तेरे सी एम का बैकिंग जो है.’

‘हाँ, उन्होंने परसो यहाँ आकर उस दुकानदार को शहीद डिक्लेयर किया. उस के विडो को एक लाख रुपया देनेका वादा भी किया. यहाँ पर तो सब शांत है’

‘यहाँ पर भी हो जाएगा. तू फिकिर मत कर. हम जैसे यार दोस्त कब काम आएंगे? चल बाय’

‘बाय’

***      

‘हनी, यु आर सिम्पली अमेझिंग’

‘हूं’

‘हूं नाही, खरंच. तुला जवळ घेतलं आणि माझ्या सगळ्या काळज्या संपल्या, टेन्शन मिटले. आय अॅम टोटली रिलॅक्स्ड. काय जादू आहे तुझ्या स्पर्शात! कोण म्हणेल आपल्या लग्नाला पंधरा वर्ष झाली न् तू दोन पोरांची आई आहेस म्हणून...’

‘चल हट, मस्का नको लावूस. रिलॅक्स व्हायचं असेल तेव्हा मोहिनी आठवते, एरवी नाही.’

‘नाही ग, आनंदाच्या क्षणी पहिल्यांदा तूच आठवतेस आणि संकटाच्या वेळी तर तुझ्याशिवाय आणखी कोणीच नसतं जवळ. तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर जी नशा चढते, ती इतर कशानेही चढत नाही आणि तुझ्यावर मी जितकं प्रेम करतो तितकं आणखी कशावरही करत नाही.’

‘खोटं’

‘’खोटं? ह्यात काय खोटं आहे?’

‘मी सांगते. माझ्या डोळ्यात पाहून तुला जितकी नशा येते तितकीच तुझ्या लाडक्या ब्रँडची स्कॉच पिताना येते, आणि तुझे सर्वांत जास्त प्रेम आहे ते स्वतःवर, स्वतःच्या कर्तबगारीवर. तू अगदी नार्सिसस आहे असं नाही म्हणणार मी, पण तू स्वतःच्या आकंठ प्रेमात बुडालेला आहेस, हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू गोड बोलून मला गुंडाळू शकत नाहीस. आय अॅम टू स्मार्ट ..’

‘येस हनी, तुझ्याहून स्मार्ट, बुद्धिमान, सुंदर, सेक्सी बाई कोणीही नाही हे हजारदा मान्य आहे मला. म्हणूनच वयाच्या चौदाव्या वर्षी तुला पहिल्यांदा पाहिल्यावर मी हिला मिळवीनच असा निश्चय केला होता मी.’

‘यु मीन मी तुझ्या आयुष्यातली पहिली टार्गेट होते, युवर फर्स्ट बुल्स आय?’

बुल्स आय वगैरे माहीत नाही, पण मी आधी मोहिनीच्या डोळ्यांच्या प्रेमात पडलो हे तर खरंच.

इयत्ता आठवी, तुकडी अ. आबासाहेब देशमुख विद्यालय, म्हणजे आमच्या आजोबांच्या नावाची शाळा. खरं तर मला बाहेर एखाद्या हाय-क्लास बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावे अशी आमच्या मामासाहेबांची व मासाहेबांची खूप इच्छा होती. पणआमचे पिताजी पडले जुन्या वळणाचे. बारावीनंतर त्याला हवे तिथे जाऊ दे, दुनियाभर फिरू दे, पण तोवर तो आमच्या नजरेखाली राहायला हवा. देशमुखाचं पोर अति लाडाने वाया गेलं असे कोणी म्हणायला नको, असा त्यांचा आदेश, जो ओलांडण्याची हिम्मत अर्थातचकोणामध्ये नव्हती. मला काय, कोठेहीगेलो तरी मनसोक्त उंडारायला मिळत होते. त्या वयात अर्थातच फारसे काही कळत नव्हतं. पण आपले भरपूर लाड व्हायला हवेत एवढं मात्र नक्कीच कळत होतं.तसे ते होतच होते,पण कुठे कमी पडले तर ते कसे करवून घ्यायचे हेही मला चांगलेच माहित होतं. मी शेंडेफळ, त्यातून रंगरूपाने मासाहेबांवर गेलेलो. खेळण्यात, मस्तीत, विशेष म्हणजे अभ्यासातही आघाडीवर (आमचे थोरले बंधुराज व अक्कासाहेब ह्या बाबतीत खूपच मागे). मग आमचा भाव काय विचारता! आमच्या शाळेत आम्ही हिरो असणार हे तर आम्ही केव्हाच गृहीत धरले होते.

तर ‘आठवी अ’चा वर्ग. मेच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होऊन महिना उलटून गेलेला. प्रार्थनेनंतरचा पहिलाच तास. कडक शिस्तीच्या परीटसरांचा. गणिताचा. सरांनी गणित घातलं होतं. आम्ही ते सोडवत होतो. सर वर्गभर फेऱ्या मारीत आमच्यावर नजर ठेवून होते. सारा क्लास एकदम चिडीचूप. कारण गणित कोणालाच सुटत नव्हतं. तेव्हढ्यात ‘मेआय कम इन इन सर?’ असा खणखणीत आवाजात पण मंजुळ स्वरात विचारलेला प्रश्न आमच्या कानावर पडला. सरांसकट आख्ख्या क्लासची मान गर्रकन दरवाज्याकडे वळली. एक मिनिटाचाही उशीर सहन न करणाऱ्या सरांनी चिडून उत्तर द्यायला तोंड उघडलंच होतं. पण दरवाजाकडे पाहताच त्यांच्या कपाळावरच्या आठ्या गायब झाल्या. दरवाजात एक अतिशय सुंदर पोरगी, युनिफॉर्म घातलेली, उभी होती. शेजारी सावंतमामा- शाळेचा प्यून. ‘सर, मी येऊ का आत?’ त्या मुलीने गोड आवाजात विचारलं. सावंतमामा म्हणाले – ‘हेड सरांनी धाडलं. नवी पोरगी आहे.’ परीट सर म्हणाले- ‘ये बाळ  आत.’ 

‘बाळ?’ परीट सरांच्या तोंडी हा शब्द शोभत नाही ह्यावर आमच्या तमाम क्लासचे एकमत झालं असतं. पण तेवढ्यातती पोरगी दिमाखात पावलंटाकत वर्गात शिरली आणि मुलींच्या लाईनीत सरळ पहिल्या बेंचवर येऊन बसली. परीट सरांच्या पिरियडला तिथे कोणीच बसत नसे.

‘नाव काय बाळ तुझं ?’ – पुन्हा ‘बाळ’

‘मोहिनी, मोहिनी अनंत गोडबोले’ – उभे राहून तिने उत्तर दिले. तेव्हा सगळ्या क्लासने तिला नजर भरून पाहून घेतले.

गोरी, लख्खगोरी, म्हणजे इतकी की तिच्या शरीरातून ट्युबलाईटचा उजेड बाहेर पाझरतोय असं मला वाटलं. निळा स्कर्ट आणि पांढरा ब्लाऊज असा आमच्या शाळेचा रद्दड युनिफॉर्म घालून कुणी मुलगी एकदम पिच्चरची हिरॉईन दिसू शकेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, आणि इथे तर आम्ही ते प्रत्यक्षात घडताना पाहत होतो. बोलताना तिच्या कानातले लोंबते डूल हलत होते. मुलांच्या लाईनीत पहिल्या लाईनीत बसलेल्या माझी मान तिचा उत्तम व्ह्यू मिळावा म्हणून सारखी हलत होती. परीटसर वर्गात नसते तर आख्ख्या क्लासने ‘तेजाब’ पिच्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे – ‘मोहिनी, मोहिनी’चा घोष केला असता ...

उरलेल्या वेळात ते गणित कोणालाच सुटले नाही. सरांनीही मग मोहिनीची माहिती विचारण्यातच टाईम पास केला. मोहिनी ह्यापूर्वी मुंबईला शिकत होती. तिच्या वडिलांनी नुकतीच आमच्या साखर कारखान्यात अकौंटंटची नोकरी घेतल्यामुळे ती ह्या गावात व आमच्या शाळेत आली होती, एवढं आम्हाला कळलं.

पिरीयड संपला. सगळ्या पोरींनी मोहिनीला गराडा घातला. सारी पोरंही तिच्याकडेच पाहत होती. मलाखूप अस्वस्थ वाटलं. मी एकदम उभा राहिलो व सर्वांसमोर येऊन तिच्याकडे पाहत जरा जोरात म्हणालो-

‘ए मुली’

‘माझं नाव मोहिनी गोडबोले आहे, मुलगी नाही’, बसल्या बसल्या माझ्याकडे रोखून पाहत ती टेचात म्हणली.

‘माहित आहे मला’.

‘मग?’

मला पुढे काही बोलणं सुधरेना. एव्हाना सारा क्लास लक्ष देऊन आमचा सवाल-जवाब ऐकू लागला होता.

मग तिनेच मला विचारलं –

‘तू रे कोण? आणि मला कशाला प्रश्न विचारतो आहेस?’

‘अग, तो मॉनिटर आहे आपल्या क्लासचा – तेजसिंगराव देशमुख’, एक चिमणी चिवचिवली.

‘त्याला सांगता येत नाही वाटतं स्वतःचं नाव’, खुदकन हसत ती म्हणाली. इतका राग आला ना तिचा. पण खरा बॉम्ब अजून फुटायचाच होता.

‘एवढासा पोरगा आणि तेजसिंगराव? नुस्तं तेजसिंग किंवा तेजा म्हटलेलं चालत नाही वाटत?’

‘तेSजाSSS ? देशमुखांमध्ये असं म्हणण्याची पद्धत नाही,’ मीही तिला सुनावलंच.

‘ते तुझ्या घरी. शाळेत काय करायचं राव आन फाव?’ डोळे नाचवत ती म्हणाली.

खरं तर तिच्या ह्या अपराधाबद्दल तिचा टकमक कड्यावरून कडेलोट करावा किंवा तिला हत्तीच्या पायी द्यावं असं मला वाटायला हवं होतं. पण तिचे ते डोळे! भुरे (पण घारे नसलेले) तिचे पाणीदार डोळे व ते नाचवत समोरच्याला चिडवण्याची तिची लकब .. मी पार गारेगार. तेवढ्यात पुढच्या तासाचे सर आले म्हणून वाचलो.

पुढचे दोन तास मी धुसफुसत होतो. पण कमाल म्हणजे कोणाला त्याची पर्वा नव्हती. शेवटी मधली सुटी झाली आणि सर जाताच मी पुन्हा उभा राहिलो. माझ्या एका आवाजावर वर्गातला गलका थांबला. मी मोहिनीकडे पाहत म्हणालो-

‘ए गोडबोले की तिखटबोले, आमच्या वर्गाची अशी पद्धत आहे की वर्गात कोणी नवीन आलं की त्याने सगळ्या क्लासला आपली ओळख करून द्यायची.’

‘ती तर मी मघाशीच करून दिली.’

‘तशी नाही, गाणं म्हणायचं किंवा जोक सांगायची’

‘मला जोकबिक नाही येत. पण मी गाणं म्हणेन.’

‘म्हण’, मी फर्मावलं.

‘आता नाही, डबा खाल्ल्यावर’

सगळ्यांना तिचं म्हणण पटलं. मीही पटवून घेतलं.

डबा खाऊन झाल्यावर मात्र तिने आणखी भाव खाल्ला नाही.

‘कुठलं म्हणू?’, तिने विचारलं.

‘तेजाबमधलं एक, दो, तीन..’ मागच्या बेंचवरचा एकजण ओरडला

मोहिनीने मानेला झटका दिला. ‘हुं’ केलं आणि एकदम सूर लावला. क्लासमध्ये पिनड्रॉप सायलेन्स.

‘इतनी शक्ती हमें देना दाता..,’ तिने ‘अंकुश’मधली प्रार्थना सुरू केली. आम्हाला सगळ्यांना वाटलं आम्ही एखाद्या मंदिरात बसलोय आणि कुठून तरी लांबून स्वर येताहेत. गाणं संपल्यावर कोणाला टाळ्या  वाजवायचंही भान राहिलं नाही.

त्या दिवशी मला कळलं की वर्गावरचं आणि शाळेवरचं माझं राज्य संपू घातलं आहे आणि ते वाचवण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. माझ्यावरचं संकट किती बिकट होतं ह्याची कल्पना मला लौकरच आली. एक ऑगष्टला टिळक पुण्यतिथीला झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोहिनीने जोरदार भाषण करत पहिला नंबर पटकावला. भाषणात शेंगांची  गोष्ट  न सांगणारी ती एकटीच होती. अभ्यासात तर ती चमकत होतीच. परीट सरांचे तिला बाळ, बाळ करणं, क्लास टीचरने  तिला रोज बोर्डवर सुविचार लिहायला सांगणं ह्यापासून ते सकाळची प्रार्थना लीड करणं – लीडरकीतले  असे सारे टप्पे तिने भराभरा ओलांडले. तिचा मला खूप राग येत होता, आणि नव्हताही येत. तिचे मला ‘देशमुख’ म्हणून हाक मारणं तर मला खूप आवडत होतं. ती आल्यामुळे वर्गात आता मुलांची व मुलींची अशा दोन पार्ट्या निर्माण झाल्या होत्या. मुलांचा मॉनिटर मी व मुलींची ती होती. तिने मला हाक मारल्यावर मी कधीच ‘ओ’ देत नसे. तिने पुन्हा पुन्हा हाक माराव्या म्हणून मी त्या ऐकू आल्या नाही असंच दाखवत असे. पण थोड्या दिवसांनी असं झालं की, मी असं केल्यावर सगळ्या मुली आपसात हातवारे करत खिदळायला लागल्या. मी आयडियाने माहिती काढली तेव्हा कळलं की, तिच्या हाकेपाठोपाठ सगळ्या मुली खाणाखुणा करत ‘देशमुख बहिरा आहे’ असं आपसात सांगत असत. स्पोर्ट्स टुर्नामेंट सुरू झाल्या तेव्हा आमच्या, म्हणजे मुलांच्या क्रिकेट टीमला चीअर अप करायला सगळ्या मुलीनी ग्राउंडवर यावं असं मी तिला सांगायला गेलो, तेव्हा ‘मला नाही क्रिकेटफिकेटमध्ये इंटरेस्ट, पण मी इतर मुलींना सांगते ग्राउंडवर जायला’ असा गुगली टाकत तिने माझी विकेट घेतली. (नंतर ती ग्राउंडवर आली व मी फोर मारल्यावर तिने जोरात चीअर अपही केलं, ही गोष्ट वेगळी. त्याच्या पुढच्याच बॉलवर मी क्लीन बोल्ड झालो ही त्याहून वेगळी.) नववीतून दहावीत जाईपर्यंत अभ्यास, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटीज, लीडरकी ह्या सर्व बाबीत आम्ही दोघे एकमेकांचे जबरदस्त कॉम्पीटिटर बनलो होतो. आता तिने माझी ‘खेचणं’ कमी केलं होतं. एकमेकांशी बोलणं कमी झालं होतं. पण त्याच वेळी क्लासचेच नाही, तर आख्ख्या शाळेचे हिरो-हिरॉईन आम्ही दोघेच आहोत ह्याबद्दल मला व माझ्या दोस्त मंडळीना अजिबात शंका उरली नव्हती. शाळेबाहेर कुणाला ह्याचा थांगपत्ता नव्हता. कसा असणार? मोबाईल, इंटरनेटआधीच्या काळातली, एकाजिल्हा पातळीवरच्या गावातल्या शिस्तप्रिय शाळेतली गोष्ट आहे ही.

***

‘आपण एक खेळ खेळू यात का?’

‘खेळ आणि तू मला सांगणार ? मी सांगितलेले कितीतरी खेळ तू अजून खेळलीच नाहीयेस.’

‘मी बेडरूममधल्या खेळांबद्दल बोलत नाहीय.’

‘मग?’

‘सांगते. आपण दोघांनी असं समोरासमोर बसायचं हातात हात घेऊन. मध्ये एखादं टेबल असायलाही हरकत नाही. खोलीत मंद प्रकाश. एकमेकांचे चेहरे व्यवस्थित दिसतील इतपत.’

‘वाव्. क्वाईट सेक्सी’

‘दोघांनी आधी टोटली रीलॅक्स व्हायचं. श्वास अगदी नॉर्मल झाला की खेळ सुरू’

‘मग काय करायचं ?’

‘काहीच नाही. फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहायचं. स्टेअर करायचं नाही. पापण्यांची उघडझाप करणं अलाउड आहे. पण पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पहायचं.’

‘किती वेळ ?’

‘कितीही. आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तितका वेळ. पाच मिनिट, दहा मिनिट, कितीही’

‘मग?’

‘मग एकमेकांशी न बोलता आपण दुसऱ्याच्या डोळ्यात काय वाचलं हे प्रत्येकाने लिहून काढायचं आणि मग एकमेकांना वाचायला द्यायचं.’

‘त्याच्याने काय होईल?’

‘आपण दोघं एकमेकांना कितपत ओळखतो हे कळेल. आपलं कम्युनिकेशन सुधारेल. मुख्य म्हणजे गम्मत येईल. वातावरण निर्मिती सेक्सी आहे हे तर तू मानतोस.’

‘आपण नाही खेळणार हा खेळ. तुझे हात हातात घेतले की, मला दुसरं काही सुचणारच नाही.’

‘ठीक आहे. हा गेम काही नवरा-बायकोचा नाही. दोन कलिग्ज किंवा अनोळखी माणसंही तो खेळू शकतात. तर स्पर्श कटाप. आपण टेबलाच्या दोन बाजूना समोरासमोर बसायचं आणि नुसतं एकमेकांकडे पहायचं.’

‘तुझे डोळे डेंजरस आहेत. आपली नाही हिम्मत त्यात डोकवायची.’

‘का रे? तू तर भल्या भल्या क्रिमिनल्सच्या डोळ्यात पाहून त्यांना घाम फोडतोस अशी तुझी ख्याती आहे आणि तू माझ्या डोळ्यांच्या प्रेमात होतास, आहेस अशी आख्यायिकाही आहे.’

‘ते सगळं खरं. पण क्रिमिनल्स वेगळे आणि तू वेगळी. तू जादुगार बाई आहेस. माझ्या डोळ्यातलं सगळं काही काढून घेशील आणि आपल्या मनाचा थांगही लागू देणार नाहीस.’

‘खोटं. तू बनेल माणूस आहेस आणि तुझा बनेलपणा मला कळू नाही ह्याबद्दल तू खूप दक्ष असतोस.’

‘नाही ग. तुला माहीत आहे, तू सोडून इतर कोणाच्याही डोळ्यात पाहायला मी घाबरत नाही, इतर लोकच माझ्या नजरेला नजर द्यायला घाबरत्तात. तुला एक जोक सांगतो.’

‘मला माहीत आहे, तुला कसाही करून विषय बदलायचा आहे.’

‘नाही, नाही. तू ऐक, तुलाही आवडेल. एकदम नवा जोक आहे. तर काय होतं, फर्स्ट एमबीबीएसचा क्लास सुरू असतो. अॅनॅटॉमीचे सर येतात आणि एका मुलीला विचारतात – मानवी शरीराचा असला कुठला अवयव आहे, जो एक्साईट झाल्यावर दहा पटीने मोठ्ठा होतो. पोरगी लाजते, म्हणते– मी नाही जा. ते तिला तशीच उभी राहायला सांगतात आणि मग वर्गातल्या एका स्कॉलर मुलाला तोच प्रश्न विचारतात. तो उत्तर देतो- डोळ्यांची बाहुली – रेटिना ऑफ द आय. सर त्या मुलीला सांगतात- मला तुला तीन गोष्टी सांगायच्या आहेत. एक – तू अभ्यास नीट करत नाहीस, दोन – यू हॅव अ डर्टी माइंड आणि तीन – यू विल बी सॅडली डिस्अपॉइंटेड.’

‘हा, हा, हा.. झाला तुझा जोक? आता तूही तीन गोष्टी ऐक – एक, हा मेडिकल कॉलेजातला शिळा जोक आहे, दोन – मला तो माहीत होता आणि तीन- विषय बदलायचे तुझे प्रयत्न अयशस्वी ठरले.’

‘नाही, मी तुला डोळ्यांबद्दल सांगत होतो. तुला माहीत आहे मी अॅनॅटॉमीइतकाच सायकॉलॉजीचाही अभ्यास केला आहे आणि अजूनही करतो. भय ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. माझ्यासमोर जेव्हा एखादा क्रिमिनल येतो, तेव्हा मला त्याच्या डोळ्यात पाहून ही प्रेरणा जागवायची असते. कितीही हार्ड नट असला तरी एकदा तो तुमच्या नजरेच्या जरबीपुढे झुकला की मग त्याला ‘क्रॅक’ करणं कठीण नसतं.’

‘पण क्रिमिनल नसलेला माणूस तुझ्यासमोर आरोपी म्हणून येतो, तेव्हाही तू त्याच्याशी असेच गेम खेळतोस त्याला ‘क्रॅक’ करण्यासाठी?’

कुठल्या तरी महत्त्वाच्या फोनचा बहाणा करून मी तिथून निघून गेलो. मोहिनीच्या डोळ्यात डोकावून पहायची हिम्मत माझ्यात पूर्वीही नव्हती, आत्ताही नाही, बस्स. पूर्णविराम!

‘मोहिनी, महत्त्वाची न्यूज आहे. माझी ट्रान्स्फर झालीय. मला उद्याच निघायला हवं.’

‘कुठे?’

‘आपल्या गावाकडे, नाशिकला.’

‘अरे, पण तुला तर मुंबईला पोस्टिंग हवी होती ना? कोणी मध्ये आलं का?’

‘नाही, खुद्द सी एम साहेबांची इच्छा आहे. आता त्यांचाच फोन होता, म्हणाले – मला फक्त तुम्ही हवे आहात. कारण तुम्हीच तिथली सिच्युएशन सांभाळू शकाल.’

‘पण तू एकटाच जाणार? आणि आम्ही? ’

‘ही पोस्टिंग खूप दिवसांसाठी नसणार. हे काम आटपलं की सीएमनी मला मुंबईत हवी ती पोस्ट द्यायचं कबुल केलंय. आता वर्षाच्या मध्येच शाळा बदलायची म्हणजे मुलांचे हाल. शिवाय तुलाही तिथे बोअरच होणार.’

‘छे रे, इतक्या दिवसांनी गावी जायचं म्हटल्यावर मलाही मजाच वाटेल. शिवाय तुला एकटं टाकायची सवय नाहीये मला.’

‘माझी काळजी करू नकोस. तिथे सगळे आहेत माझी काळजी घ्यायला आणि थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे. इथे मुलांना तुझी जास्त गरज आहे.’

‘ठीक आहे बाबा, तुझी मर्जी नसेल तर नाही येत मी तुझ्यासोबत.’

मोहिनीची कशीबशी समजूत घालून मी स्वतःची सुटका करून घेतली. मला आता झपाट्याने कामाला लागायला हवं होतं. आव्हान मोठं होतं. पण टायगर देशमुखला मोठी आव्हानं स्वीकारायला आवडतं. माझे हात नेहमी नव्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी शिवशिवत असतात. इन फॅक्ट, असं काही नवं आव्हान नसलं की मला आयुष्य बोअरिंग, मचूळ वाटायला लागतं. आणि इथे तर असं लक्ष्य, जे दर वेळी माझ्या रेंजच्या बाहेर जात होतं, ते स्वतः हून माझ्यापुढे चालत आलं होतं..

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाचा भडका / प्रधानमंत्री राजमार्ग योजनेला तीव्र विरोध

(आमच्या विशेष प्रतिनिधीकडून) : माननीय पंतप्रधानांच्या ‘प्रधानमंत्री राजमार्ग योजना’ ह्या लाडक्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीलाच अपशकून झाला आहे. ह्या प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रश्नावरून उत्तर महाराष्ट्रात शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थकारणावर व राजकारणावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या ह्या घटनेबद्दल जनमत  जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने नुकताच आंदोलनग्रस्त भागाचा दौरा केला त्याचा हा सविस्तर वृत्तांत.

देशात चारही बाजूंनी सुपर एक्स्प्रेस हायवेचे जाळे विणण्याचा हा महाकाय प्रकल्प देशाच्या  विकासाला गती देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. ह्या प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्रातून करण्यात येईल, त्याचा प्रारंभिक टप्पा येत्या दोन वर्षात, म्हणजे मार्च २०१९पर्यन्त पूर्ण करण्यात येईल व त्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टाकीत आहोत अशी घोषणा पंतप्रधानांनी मागच्या महिन्यात मुंबईत झालेल्या एका जाहीर समारंभात केली होती. ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातून, विशेषतः विकासाच्या दृष्टीने अद्याप दुर्लक्षित राहिलेल्या उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा ह्या विभागातून होते आहे ही बाब ह्या विभागांच्या, महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, ह्या भावनेतून ह्या प्रकल्पाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागतही करण्यात आले होते. पण योजनेच्या प्रत्यक्ष कार्यान्वयनाच्या टप्प्यावर मात्र अनेक अडचणी उभ्या आहेत असे चित्र आता समोर दिसत आहे.

ह्या प्रकल्पाचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. उत्तरेला इंदोरमार्गे थेट दिल्ली, पूर्वेला अहमदाबाद, पश्चिमेला नागपूरमार्गे थेट भुवनेश्वर तर दक्षिणेला मंगलोर-बंगलोर असा हा अत्यंत महत्त्वाचा ‘नोड’ आहे. ह्या महाप्रकल्पासाठी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील सुमारे १० लाख हेक्टर जमीन संपादित करावी लागेल, त्यापैकी सुमारे ६० टक्के जमीन आज पिकाखाली आहे. ह्या जमिनी ताब्यात घेताना कोणतीही जबरदस्ती केली  जाणार नाही, उलटशेतीचे सध्याचे अर्थकारण पाहता शेतकरी स्वतःहून आपली जमीन ह्या महत्वाच्या राष्ट्रीय कार्यासाठी सरकारला देऊ करतील व त्या बदल्यात त्यांचे उचित पुनर्वसन करून पर्यायी उद्योग व रोजगार निर्मितीसाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी गेल्याच महिन्यात केली होती. ह्या सुपरफास्ट प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता तो सुपरफास्ट वेगाने पूर्ण करण्यात येईल अशी अपेक्षाही सर्व संबंधितांकडून तेव्हा व्यक्त करण्यात आली होती. गुजरात व कर्नाटक राज्यात नजीकच्या भविष्यकाळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनेही ह्या प्रकल्पाचे वेळापत्रक सांभाळणे आवश्यक आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी त्यांच्या खास मर्जीतल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टाकली आहे. एका प्रकारे ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेची  कसोटी आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

खरे तर एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेणे, सर्व खात्यांची मंजुरी मिळवणे, लोकांचे पुनर्वसन ह्या साऱ्या गोष्टींच्या मानाने हाताशी असणारा वेळ खूपच कमी आहेअशी शंका काही अनुभवी प्रशासकांनी ह्या पूर्वीच व्यक्त केली होती. पणपंतप्रधान व मुख्यमंत्री दोघेही धडाकेबाज निर्णय घेऊन ते त्वरेने अंमलात आणण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे डेडलाईन गाठण्यासाठी शासकीय यंत्रणेतले कच्चे दुवे हेरून त्यांच्यात धोरणात्मक व व्यवहारात्मक बदल केला जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. परंतु नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सोमवारी झालेल्या घटनेवरून ही आशा फोल ठरल्याचे दिसून आले आहे. ह्या तालुक्यातील आठ गावात जेव्हा सरकारी अधिकारी भूमी संपादन अधिनियमांतर्गत नोटीसा बजावण्यासाठी  गेले, तेव्हा तेथील शेतकऱ्यांनी त्यांना निकराचा विरोध केला. पोलिसांच्या समक्ष अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली व त्यांनी पुन्हा गावात पाय ठेवू नये अशा धमक्याही त्यांना देण्यात आल्या. ह्या आठ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘महामार्ग प्रतिकार समिती’च्या स्थापनेची घोषणा केली असून महामार्ग प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जात आहेत त्या सर्वांनी धर्म, जात, पक्ष भेद विसरून ह्या समितीत सहभागी होऊन आपले आंदोलन अधिक तीव्र करावे असे आवाहनही समितीच्या नेत्यांनी केले आहे.

गेली तीन वर्षे देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात असंतोष धुमसत आहे. कधी दुष्काळ, कधी चांगली पिके येऊनही पडलेले बाजारभाव, तर कधी बियाणात  झालेली फसगत अशा विविध कारणांनी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. राज्य व केंद्र सरकारे ही कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी काम करत असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजली आहे. ह्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने भूमी अधिग्रहणासाठी आवश्यक कायदेशीर  प्रक्रिया पार न पाडताव शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्नकेला आणि ह्या राजकीयदृष्ट्या शांत असलेल्या भागात आंदोलनाचा डोंब उसळला. आताहे लोण जर राजकीयदृष्ट्या सजग लासलगावसारख्या भागात पसरले तर त्याला आवर घालणे कठीण होऊन बसेल. अशा वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वपक्षातील विरोधक ह्या आंदोलनाला रसद पुरविण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

चाणाक्ष मुख्यमंत्री ह्या पेचप्रसंगातून कसा मार्ग काढतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

प्रधानमंत्री महामार्ग प्रकल्पाविरूद्धच्या आंदोलनात पाच जखमी, आंदोलन अधिक भडकणार

काल ‘महामार्ग प्रतिकार समिती’च्या वतीने बागलाण येथील तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्याची पोलिसांशी खडाजंगी उडाली व त्यात पाच आंदोलनकारी जखमी झाले. त्यांपैकीएका वृद्ध महिलेसह दोघांची स्थिती चिंताजनक आहे.

भूमीसंपादन अधिनियमानुसार शासनाने जमिनी संपादित करण्याविषयीच्या नोटिशी बजावल्यावर संबंधित प्रकल्पबाधितांना त्याविषयक आक्षेप नोंदविण्यासाठी पुरेसा अवधी देणे बंधनकारक आहे. परंतु प्रधानमंत्री महामार्ग प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना नोटिशी बजावतानाच सरकारी अधिकाऱ्यांनी संबंधित गावातील संपादनासाठी प्रस्तावित भूखंड सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत असे घोषित केले. शासनाच्या ह्या बेकायदेशीर कृत्याचा जाब मागण्यासाठी ‘महामार्ग प्रतिकार समिती’च्या वतीने काल दुपारी बागलाण तालुका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी तो मोर्चा अडविला व आंदोलनाच्या प्रतिनिधीना तहसीलदारांना भेटून निवेदन देण्यास मनाई केली. त्यावेळी पोलीस व आंदोलक ह्यांच्यात चकमक उडाली असता आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात बऱ्याच आंदोलकांना दुखापत झाली. त्यांपैकी ५ जण जबर जखमी झाले असून त्यांना नजिकच्या सरकारी इस्पितळात भरती करण्यात आले आहे. त्यांतील एका वृद्ध महिलेसह दोघा जखमींची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते.

ह्या घटनेनंतर आंदोलनाचे नेते श्री. सुनीलफुटाणे हे बेमुदत उपोषणाला बसले असून त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर निर्घृण लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने भूमी संपादन अधिनियमाखाली शेतकऱ्यांना नोटिशी  देण्याचे त्वरित थांबवावे; नाहीतर ह्या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व तालुका कचेऱ्यांवर येत्या बुधवारी मोर्चे नेण्यात येतील असा इशारा त्यांनी या प्रसंगी दिला.

 

महामार्ग विरोधीआंदोलन चिरडण्याचे सरकारचे प्रयत्न विफल, विरोधक एकवटले

(नाशिक येथील विशेष प्रतिनिधीकडून) : खूप गाजावाजा झालेल्या ‘प्रधानमंत्री महामार्ग प्रकल्पा’च्या विरोधातील आंदोलन दिवसेंदिवस अधिक बळकट होत असून जनमत झपाट्याने सरकारविरोधी होत आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या वेगवान घडामोडीनंतर आंदोलन चिरडण्याचे सरकारचे प्रयत्न कुचकामी ठरल्याचे व त्यामुळे सरकारची प्रतिमा खालावल्याचेही दिसून येते.

बागलाण तालुका कचेरीवर गेलेल्या मोर्च्यावर लाठीमार केल्याने परिसरातील जनमतमोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी झाले होते. परंतु, त्यातून धडा न घेता सरकारने प्रकल्प क्षेत्रात मोडणाऱ्या चारही तालुक्यांमध्ये लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प पुढे रेटण्याची भूमिका घेतल्याने आंदोलनाचे लोण  आता सर्वदूर पसरले आहे. गेल्या पंधरा दिवसात ह्या चार तालुक्यातल्या पंचवीस गावात सरकारी अधिकारी भूमी संपादनाच्या नोटिशी बजावायला गेले असताना सर्वच ठिकाणी त्यांना निकराचा विरोध करण्यात आला. अठरा ठिकाणी तर त्यांना गावात प्रवेशदेखील करू दिला गेला नाही. स्थानिक प्रशासनाने शेजारील जिल्ह्यांतून पोलिसांची जादा कुमक मागवली असली तरी आंदोलनाच्या रेट्यापुढे ती कुचकामी ठरेल अशी चिन्हे दिसत आहेत. ह्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, सत्तारूढ पक्षाचे आमदार व पक्षाचे राज्य सचिव ह्यांनी परस्परविरोधी निवेदने काढल्यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ह्याउलट प्रकल्पाच्या विरोधकांची आघाडी दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असल्याचे दिसते. राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे. सुनील फुटाणेंच्या रूपाने आंदोलनाला एक अभ्यासू तसेच लढाऊ नेतृत्व लाभले आहे. व्यवसायाने इंजिनिअर असणारे फुटाणे हे प्रकल्पबाधित असल्याने आपली उच्च पदावरील नोकरी सोडून पूर्णपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेलेचार महिने गावोगाव फिरून त्यांनी गावपातळीवर भक्कम संघटन बांधले आहे. ‘ह्या काळ्या आईच्या भरवशावर माझ्यासारख्या सामान्य परिस्थितीतल्या मुलाला उच्च शिक्षण घेणे शक्य झाले. तुमच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळी आई विकण्याचे पाप तुम्ही करू नका’ हे त्यांचे आवाहन सर्वसामान्यांच्या मनाला भिडले आहे. भूमी संपादन कायदा शेतकऱ्यांना समजावून सांगणे, संघर्षाला अभ्यासाची जोड देणे, आंदोलन शांतिपूर्ण राहील ह्याची काळजी घेणे , तसेच कोणत्याही प्रकारे आंदोलनात फूट पडणार नाही ह्याची काळजी घेणे ह्या त्यांच्या कार्यशैलीमुळे व सरकारच्या दडपशाहीमुळे परिस्थिती झपाट्याने सरकारविरोधी होते आहे.

ताज्या बातमीनुसार नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर ह्यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा घोषित केला असून पर्यावरण व पर्यायी विकास ह्या मुद्द्यांवर काम करणारे अनेक अभ्यासक व कार्यकर्ते आपली शक्ती महामार्गविरोधी आंदोलनाच्या मागे उभी करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सातपुड्याचे पर्यावरण व डांग जिल्ह्यातील आदिवासींचे अधिकार ह्या मुद्द्यांवरून काही अभ्यासक ह्या प्रकल्पाविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

ह्या प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय पावले उचलतात ह्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

ravindrarp@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......