बुल्स आय... एक दीर्घकथा (उत्तरार्ध)
पडघम - साहित्यिक
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 31 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

समकालीन राजकारणाचे संदर्भ, गाभुळलेल्या चिंचेप्रमाणे पिकत गेलेले प्रेम आणि मानवी अस्तित्वासामोरील सनातन नैतिक पेच ह्यांची गुंफण घालणारी दीर्घकथा...

.............................................................................................................................................

गेल्या महिनाभरातल्या वृत्तपत्रांच्या फाईल्स मी नजरेखालून घातल्या. माझ्या विश्वासातील स्थानिक पत्रकार, राजकीय कार्यकर्ते व मित्र ह्यांच्या भेटी घेतल्या. नंतर कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर, डीएसपी, चारही तालुक्यांचे तहसीलदार ह्या सर्वांकडून फीडबॅक घेतला. घरच्यांशीही बोललो. अखेरीस हा आमच्या बाबासाहेबांचा मतदारसंघ. ह्या आख्ख्या परिसरात देशमुख घराण्याइतकी राजकीय पुण्याई इतर कोणाचीच नाही. आधी बाबासाहेब व नंतर आमचे मोठे बंधू ह्या भागात आमदार होते. माझे आख्खे बालपण इथेच गेले. त्यामुळे हा परिसर, इथली माणसं, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये ह्यांची जाण माझ्याहून अधिक कोणाला असणार? ह्याच विचाराने सीएम साहेबांनी ह्या कामाची जबाबदारी माझ्यावर टाकली हे उघड आहे. इथला चार्ज घेण्यापूर्वी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते म्हणाले होते- ‘एस पी देशमुख, मी तुमच्यावर कोणती जबाबदारी सोपवतो आहेव ती का सोपवतो आहे, हे तुम्हाला मी सांगायला नको. तुमचं नक्षलाईट एरियातलं काम माझ्या डोळ्यासमोर आहेच. तेव्हाही मी तुमच्या पाठीशी उभा होतो. आता मला तुमची गरज आहे.एवढेच सांगतो की आय वॉंट रिझल्ट्स. हे आंदोलन ताबडतोब संपलंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे काही कराल त्यात मी तुमच्या पाठीशी आहे. तुमची धाडसी वृत्ती, बुद्धिमत्ता व राजकीय समज ह्या सर्वांचा वापर करा. घाई करू नका, पण एकदा  अॅटॅक करायच ठरवलं की मग मागेपुढे पाहू नका. हे मिशन संपलं की तुम्हाला हवी ती पोस्टींग तुमची. आय अॅम विथ यु. ऑल द बेस्ट!’

माझं होमवर्क करून झालं आणि माझ्या डोळ्यांसमोर जे टार्गेट आधीच ठरलं होतं, ते अधिकच पक्कं आणि स्पष्ट झालं. ह्या कॉम्प्लेक्स प्रश्नाचं एक साधं सरळ उत्तर होतं – सुनील फुटाणे उर्फ सनीला संपवणे - राजकीयदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या किंवा कसाही... बट ही शुड बी रिमुव्ह्ड फ्रॉम द सीन. तो गेला की बाकीची सर्कस लगेच कोसळणार, ह्यात शंका नाही. कोलमडलेल्या सर्कसचं पुढे काय करायचं हा प्रश्न सीएमचा, माझा नाही. सनी तू तेल लावून आखाड्यात उतरणारा पैलवान असलास, तरी ह्या वेळी माझ्या पायाच्या कैचीतून तुझी मान तुला सोडवता येणार नाही. आपणसोबत आबासाहेब देशमुख विद्यालय व त्यानंतर श्रीमती सगुणाबाई भोंसले ज्युनियर कॉलेज सोडलं त्याला आता सव्वीस वर्षे झाली. तेवढ्या वर्षांत मीही बरंच काही शिकलोय...

***

सनीची पहिली भेट माझ्या अजून लक्षात आहे. मोहिनी माझ्या वर्गात आली आणि तिच्या स्पर्धेत उतरायच्या विचाराने मी इरेला पेटलो. नाही तर आमच्या त्या गावंढळ शहरात माझ्याशी स्पर्धा करायला होतं तरी कोण? पण मोहिनी आली आणि मग अभ्यासात, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीजमध्ये, लीडरकी करण्यात आमच्यात चुरस लागली. त्यातील लीडरकीची आमची क्षेत्रं वेगवेगळी होती, खेळात तिला फारसा रस नव्हता आणि मला साहित्य, लिखाण अशा भानगडीतलं काही कळत नव्हतं. नववीत मोहिनी पहिली होती, मी दुसरा. पण सायन्स सब्जेक्टमध्ये मी तिच्या पुढे होतो. शिवाय अखेर (आपलीच) मोहिनी पहिली आली आहे ह्या विचाराने असेल, पण आयुष्यात पहिल्यांदाच दुसरा नंबर मिळाल्याचे दुःख मला फारसं टोचलं नव्हतं. पण सनी...

दहावीत आपल्या शाळेच्या पोरांना दणकून मार्क्स मिळावे, म्हणून आमचे सरलोक दर वेळी नवनवीन आयडिया लढवीत. आमची नववीची सुट्टी तर त्यांनी खाल्लीच. शिवाय दहावीला आल्यावर दर दोन महिन्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या धर्तीवर सर्व विषयांची परीक्षा घ्यायची आयडिया त्यांनी काढली. पहिल्या परीक्षेसाठी मीही सपाटून अभ्यास केला. एक आठवडा झाल्यावर आमचे क्लास टीचर वर्गात पेपर घेऊन आले. मोहिनी की मी ? – सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. बहुतेक विषयात आम्ही दोघेच पहिले-दुसरे होतो. टोटल बहुदा माझीच जास्त असावी. पण आमचे मार्क्स सांगून झाल्यावर ते थांबले आणि म्हणाले – ऐका, तुमच्यासारखाच आणि तुमच्या बरोबरचा मुलगा कसा पेपर लिहितो पहा, आणि शिका जरा त्याच्याकडून. असा म्हणत त्यांनी दोन पेपर्स बाहेर काढले – एक होता गणिताचा. पहिल्या पानापासून शेवटपर्यंत एकसारखा. वळणदार अक्षर, कोठेही खाडाखोड नाही फॉर्म्युले व्यवस्थित लिहिलेले आणि एकही स्टेप चुकलेली नाही. मार्क्स अर्थातच १००/१००. पंचाण्णव मार्क्सवाली मोहिनीही डोळे विस्फारून त्या पेपरकडे पाहत होती. दुसरा पेपर मराठीचा – तोही तसाच. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहावा असा. सरांनी त्यातला निबंध वाचून दाखवला. त्यात कल्पनांचे फुलोरे नव्हते,शब्दांची उधळपट्टी नव्हती. स्पष्ट, स्वच्छ, आगळेवेगळे विचार व त्यांना साजेशी भाषा. सर पुढे म्हणाले- हा मुलगा दोन्ही तुकड्या मिळून सातपैकी सहा विषयात हाय्येस्ट आलेला आहे. त्याचं नाव आहे – सुनील आनंदा फुटाणे. आमच्यापैकी कोणीच हे नाव ऐकले नव्हते. ‘ब’ तुकडीतल्या त्या अनोळखी मुलाला सरांनी बोलावणे धाडले.

सावंतमामा त्याला घेऊन क्लासमध्ये आले. मला अजूनही आठवतं – त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री नव्हती, पण तो अजिबात गबाळा दिसत नव्हता. होता सावळाच, बॉडीही नव्हती खास, उंच शिडशिडीत होता. पण मजबूत असावा. सरांनी का बोलावलं आहे हे माहीत नसल्याने काहीसा बावरला होता व नंतर सरांनी केलेलं कौतुक ऐकताना संकोचला होता. दूर कुठे नागपूरकडे शिकायला असलेला हा मुलगा यंदाच आमच्या गावात व शाळेत आला होता. घरी कोण कोण आहे? ह्या प्रश्नावर ‘आई’ एवढं उत्तर देऊन गप्प बसला. ‘सर, मी जाऊ माझ्या वर्गात?’ असे म्हणून तो गेलादेखील.

तास संपला. चिमण्या चिवचिवायला लागल्या – ‘अय्या, काय पेपर लिहिला त्याने’, ‘हो ना, अक्षर तर अगदी बघत बसावं इतकं सुंदर..’ पोरं तरी कुठे गप्प बसतात – ‘आयला SSS, गणितात फुल्ल मार्क म्हंजे तर ग्रे SSS ट’.... माझं डोकं फिरायची वेळ आली. कारण मुलींच्या पहिल्या बेंचवरून आवाज आला- ‘आणि किती साधा आहे तो, मुळीच गर्व नाही त्याला.’ मी माझा ठेवणीतला आवाज काढला –

‘ए SSS गपा की जरा. त्याच्या तोंडावरची माशी हलत नाही न् लावलं तुम्ही त्याचं पुराण. असले कैक पाहिले आहेत आम्ही...’ क्लास गप्प झाला. थोड्या वेळाने एक चिमणी दबक्या आवाजात कुजबुजली – ‘काय ग, काय झालं? कसला वास आला?’ उत्तर आलं – ‘काहीतरी जळतंय जोरात.’

मी ताडकन उभा राहिलो. दरडावून म्हणालो- ‘कोण बोललं ?’

पापण्या उंचावून माझ्या नजरेला नजर देत मोहिनी उत्तरली – ‘मी’

मी तेव्हाच आपल्या मनाला सांगितलं – लई डेंजरस डोळे आहेत हे. त्यांच्यात डोकावून पहायचं नाही.

ह्या सनीने मला आतापर्यंत खूप त्रास दिला आहे. मी सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आडवा आला तर त्याला अजिबात सोडत नाही. देशमुखांचं रक्त आहे हे, सनीसारखं कडू बेणं नाही गप्प राहायला. ज्या दिवशी मला सनीच्या बापाबद्दल माहिती कळली, तेव्हा मी खूप खुश झालो. आमच्या मासाहेब आपला दरबार थाटून बसल्या होत्या. एरवी देशमुखांच्या घरातल्या पुरुषांना आतल्या घरात डोकवायची सवय नसते. पण मी पडलो मासाहेबांचा लाडका. शिवाय त्यांनी मला त्या दिवशी खास बोलावून घेतलं. ‘टायगर, ते फुटाण्याचं बेणं तुमच्या वर्गात आहे का हो?’ मला तर आधी त्यांच्या वाक्याचा अर्थच लागला नाही. मग ध्यानात आलं की त्या ‘त्या’ पोराबद्दलच बोलत होत्या. तास दीड तासाच्या मसालेदार चर्चेनंतर माझ्या लक्षात आलं की, त्या चण्या-फुटाण्याच्या बुडाखाली फोडायला भरपूर दारूगोळा आपल्या हाती लागला आहे. ह्या फुटाण्याची आई – सुलोचना ऊर्फ सुलू ही देशमुखांच्या जवळच्या नात्यातली. दिसायला सुंदर, अगदी शहाण्णव कुळी खानदानी म्हणावं असं सौंदर्य. कोणाही आमदार-खासदार, साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरात शोभली असती. पण तिची बुद्धी फिरली. बापाने हौसेने पुण्याला कॉलेजला पाठवली, तर तिथेच कुणा फुटाण्याशी लफडं केलं आणि आई-बापाच्या मर्जीविरुद्ध लग्नही केलं त्याच्याशी. आईबापाने, साऱ्या खानदानाने तिचं नावच टाकलं होतं. दूर कुठे नागपूरकडे राहते, नवरा ऑफिसर आहे एवढंच माहीत होतं. मुलगाही झाला म्हणे. त्या गोष्टीलाही झाले सतरा अठरा वर्षं. आता त्या अक्करमाशाला लक्षात कोण ठेवणार? पण अचानक अपघातात नवरा गेला. सुलू आता पांढरं कपाळ आणि पोराला घेऊन गावात परत आली आहे आणि गणगोतापासून दूर एकटीच गावाबाहेर घर करून राहते ह्या बातमीच्या भोवती मासाहेबांचा दरबार भरला होता... मला त्या गोंधळात सुनीलचं मासाहेबानी नव्याने केलेलं बारसं खूप आवडलं – ‘अक्करमाशा’.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी फुटाण्याच्या मागे उभा असलेला पोरगा ओरडला- ‘ए अक्करमाशा’, आणि आजूबाजूची चार-पाच पोरं जोरजोरात खिंकाळली. फुटाण्या गप्प राहिला. त्याच्या पुढच्या दिवशी दहा-बारा पोरांनी एका सुरात आवाज दिला- ‘ए अक्करमाशा’. ते ऐकून आमच्या तुकडीतली काही मुलं जोराने हसली. आठवडाभर हा उद्योग चालला. वर्गात, प्रार्थना हॉलमध्ये, मैदानात फुटाण्याला पाहून पोरांचं चेकाळणं आणि इतरांचं हसणं सुरू झालं. मग त्याचा जोर ओसरला व मग ते बंदच झालं. मी ‘ब’ तुकडीतल्या एकाला जरा बाजूला घेऊन विचारलं, पोरांना आणखी आठवडाभर मिसळपाव चारायचं आश्वासन दिलं. पण माझा भिडू काही ऐकायला तयार नव्हता. ‘अरे, ते डरपोक बेणं आहे. काही करणार नाही. त्याला आणखी घाबरवून पहा’, असं म्हटल्यावर त्याने तोंड उघडलं – “त्या दिवशी आम्ही ग्राउंडवर त्याच्या मागेच लागलो  होतो. त्याने काही वेळ आम्हाला बडबड करू दिली. मग आमच्यातल्या एकाला म्हणाला– जरा तिकडच्या ३-४ विटा आणून दे.’ तो म्हणाला – कशाला?’ तर सनी म्हणाला... ‘कोण सनी?’, मी विचारलं. ‘तोच फुटाण्याचा पोरगा. त्याला आता आख्खा क्लास सनी म्हणतो.’

‘ते घाल खड्ड्यात. विटांचं काय झालं ?

‘तेच सांगतोय ना. त्या सनीने जो दम भरला, तो आम्ही ४-५ विटा आणून त्यासमोर ठेवल्या. त्याने काय केलं माहीत आहे? दोन दोन विटा मांडून एक त्यावर आडवी ठेवली आणि आमच्याकडे एक नजर टाकून जो चॉप हाणला ना, एका विटेचे बरोब्बर दोन तुकडे. तुला माहीत नाही देशमुSSSख, सनी साला ज्युडो चॅम्पियन आहे.’

मी अर्थातच त्या पाप्याच्या पितरावर विश्वास ठेवला नाही. ते कशालाही भितं. पण त्या प्रसंगानंतर फुटाण्याला चिडवणं बंद झालं. मी स्वतःचा हा इन्सल्ट विसरणं शक्य नव्हतं. सहामाही परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शाळेतून घरी जाणाऱ्या सनी फुटाणेला एका बुलेटने जोरदार धक्का दिला. सनीचा तोल गेला. पण तशाही अवस्थेत त्याने बुलेटवाल्याला सोडलं नाही. दुसऱ्या दिवशी फुटाण्या परीक्षेला हजर होता, हाताकोपरावर किरकोळ जखमा घेऊन. बुलेटवाला मात्र तीन महिने एक हात व एक पाय प्लास्टरमध्ये ठेवून होता. कोणी विचारलं तर सांगे –‘गाडी जोरात होती, स्लिप झाली’

च्या मायला त्या फुटाण्याच्या..

***

सनी फुटाणे हा अंगाला तेल चोपडलेला पैलवान आहे, हे मला कळायला तसा वेळच लागला. तो कधीच माझ्यासमोर येत नसे. आला तरी आदबीने बोले. पण मला झोंबतील अशा काड्या करणे त्याने सोडले नाही. दहावीच्या परीक्षेत तो शाळेतच नव्हे तर जिल्ह्यात पहिला आला. अकरावीत असताना मोहिनीसोबत दोनदा वादविवादस्पर्धेसाठी कॉलेजतर्फे बाहेरगावी जाऊन आला. बारावीच्या परीक्षेच्या चार दिवस आधी त्याच्या बाईकचा अॅक्सिडेंट झाला. ती सुरू केल्यावर मागचं चाक हलतंय असं त्याच्या लक्षात आलं. त्याने स्पीड कमी करेपर्यंत ते निखळलं आणि तो खाली पडून गाडीसोबत फरफटत गेला. वर्गातले आम्ही सारे त्याला भेटायला गेलो होतो. हाताला प्लास्टर, डोक्याला बँडेज, पण गडी मस्त हसत होता. मोहिनी असल्यामुळे तो जरा जास्तच शूरपणा दाखवतोय असं मला वाटलं. ‘रायटर घेऊन बसेन ना परीक्षेला..,’ तो हसत म्हणाला. परतताना सगळे त्याच्याबद्दलच बोलत होते. ‘पण त्याला असा अॅक्सिडेंट कसा झाला? त्याने गाडी नको का नीट  चालवायला, परीक्षा तोंडावर आली असताना कोणी इतका बेजबाबदारपणा कसा करू शकतो ?’ मी म्हणालो.

‘सनी रफ ड्रायव्हिंग करत नाही. गाडीसुद्धा व्यवस्थित मेन्टेन करतो. त्याच्याकडून अशी चूक होणे शक्यच नाही’, मोहिनी म्हणाली.

‘तुला काय म्हणायचंय कोणीतरी मुद्दाम त्याची गाडी बिघडवून ठेवली?’ मी रागात विचारलं.

‘नाही रे, त्याच्या बाबतीत कोणीही असं करणं शक्य नाही. तू त्याचे डोळे पाहिलेस? इतके तेजस्वी पण प्रेमळ डोळे मी आयुष्यात पाहिले नाहीत. ज्याने आयुष्यात कोणाचं वाईट व्हावे असा विचारही केला नाही, त्याच्या बाबतीत दुष्ट माणूसही असा विचार करणं शक्य नाही. घाईघाईत गॅरेजवाल्याकडून नट घट्ट करायचा राहून गेला असेल.’

त्यापेक्षा मोहिनीने माझ्यावर सरळ आरोप केला असता तर चाललं असतं मला...

बारावीला जिल्ह्यात पहिला येऊन, पीसीबी ग्रुपमध्ये भरघोस मार्क्स मिळवूनही पीसीएमच्या बेसिसवर सनीने पुण्याला सीओईपीत प्रवेश मिळवला व आमच्या आयुष्यातून तो गायब झाला. पण गायब झाला असं तरी कसं म्हणू? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला त्याची आठवण येत राहिली. तो इंजिनियरिंगला गेल्यावर मेडिकलला जाण्यातलं थ्रिल माझ्यापुरतं तरी संपून गेलं. मी बी एस्सी करून आयपीएसच्या तयारीला लागलो. ती तयारी करताना, तिथे सिलेक्ट झाल्यावर, नंतर करियरमध्ये यशाचे नवे नवे तुरे डोक्यात खोवताना आपल्या स्पर्धेमध्ये सनी नाही म्हणून हे यश आपल्याला मिळालं, हा भुंगा मनाला कुरतडत राही. एव्हढंच काय, मोहिनीला प्रपोज करताना, घरच्यांचा विरोध पत्करून तिच्याशी लग्न करतानादेखील... मी ह्याबद्दल तिच्याशी कधीच बोललो नाही, तिला विचारलं नाही. ती कमालीची प्रांजळ बाई आहे. अशी माणसे प्रचंड डेंजरस असतात. मोहिनीचे डोळे तर...

हायवेविरुद्ध आंदोलनात नक्षल्यांचा सहभाग?

(नाशिक विशेष वृत्तांत) : गेले काही महिने नाशिक जिल्ह्याच्याचार तालुक्यांमध्ये धुमसत असलेल्या हायवेविरोधी आंदोलनाने आज वेगळा टप्पा गाठला. सरकारने आपली दडपशाही थांबवली नाही, तर आम्ही नाशिक शहराची नाकेबंदी करू असा इशारा महामार्ग प्रतिकार समितीचे  नेते श्री. सनी फुटाणे ह्यांनी आज एका पत्रकारपरिषदेत दिला. इतके महिने लोटल्यावरदेखील सरकार आंदोलकांशी बोलणी करायला तयार नाही. उलट आंदोलनात सक्रीय गावे वगळून इतर प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर करून ते लोकांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.

आंदोलनातर्फे असा आरोप करण्यात आल्यावर सरकारतर्फे एसपी तेजसिंगराव देशमुख ह्यांनी तत्काळ पत्रकार परिषद बोलावली. त्यात त्यांनी दावा केला की नाकेबंदीची भाषा करणाऱ्या आंदोलकांचे पितळ आता उघडे पडले आहे. सरकारी गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या माहितीवरून हे लक्षात येते की हायवे विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून ह्या भागात प्रथमच नक्षलवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. शांतीमय सत्याग्रहाच्या बाता मारणारे आंदोलक आता पूर्ण शहराची नाकेबंदी करण्याच्या गोष्टी करत आहेत. कारण निमित्त हायवेविरोधाचे असले तरी त्यांचे लक्ष्य येथील राज्यव्यवस्था खिळखिळी करण्याचे आहे. म्हणूनच देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्ती ह्या आंदोलनाला रसद पुरवीत आहेत. तेलंगाणा, महाराष्ट्र, छत्तीसगढ व ओरिसा राज्यांना जोडणाऱ्या दंडकारण्य प्रदेशातील नक्षलवादी आंदोलनाला सरकारच्या आक्रमकतेमुळे उतरती कळा लागली आहे. त्यामुळे नवीन ठावठिकाणा शोधण्याच्या प्रयत्नात असणारे नक्षलवादी गट आता महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील डांगच्या जंगलात तळ ठोकण्याच्या विचारात आहेत. प्रस्तावित हायवे प्रकल्पाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका उडवून त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्याचा नक्षल्यांचा हा डाव सरकार कदापीही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केला.

हायवेविरोधी आंदोलनाचे नेते श्री सनी फुटाणे ह्यांनी सरकारच्या ह्या आरोपाचा इन्कार केला असला तरी त्यामुळे आंदोलनात विलक्षण खळबळ उडाली आहे. ह्या आंदोलनाचे बोलावते धनी नक्षलवादी असतील, तर त्याला पाठींबा देण्याच्या निर्णयाचा आम्हाला फेरविचार करावा लागेल, असे मत आंदोलनसमर्थक एका बड्या नेत्याने व्यक्त केले आहे.

ह्या पार्श्वभूमीवर आंदोलनाने परवा नाशिक येथील कलेक्टर कचेरीसमोर उग्र पण शांतीमय निदर्शने करण्याची घोषणा केल्यामुळे येथील  राजकीय  तापमान वेगाने वर उसळले आहे.

नाशकात वातावरण तंग, पण परिस्थिती आटोक्यात ?

(आमच्या नाशिक येथील विशेष प्रतिनिधीकडून) : महामार्ग प्रतिकार  समितीने  उद्या नाशिक येथे कलेक्टर कचेरीसमोर ‘उग्र  पण शांतीमय’ निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी नाशकात येऊन धडकणार आहेत. दुसरीकडे सरकारने हे आंदोलन निःष्प्रभ करण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिक शहराला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. शहरातील वातावरण तंग असले तरी परिस्थिती पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा जिल्हाधिकारी व एस पी ह्यांनी संयुक्तपणे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

जथ्याजथ्यानी नाशकात येणाऱ्या शेतकऱ्यांना नाशिक शहरात शिरण्यापूर्वी अटक करण्यासाठी सरकारने नाशिक शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलीस चौक्या बसवल्या आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही वाहनाची तपासणी केल्याशिवाय त्याला शहरात सोडू नये असे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. कथित नक्षलवादी गट आंदोलन समितीत शिरल्याची माहिती मिळाल्यामुळे आम्ही कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही असे एका ज्येष्ठ सरकारी सूत्राने सांगितले. ह्यावर प्रतिक्रिया देताना आंदोलनाचे नेते सनी फुटाणे ह्यांनी ‘सरकारला कसेही करून हे आंदोलन चिरडायचे आहे. म्हणून ते जाणीवपूर्वक आंदोलनाविषयी खोटा प्रचार करीत आहे. आमच्यापैकी कोणीही नक्षलवादी नाही. म. गांधींच्या देशात शांतीमय मार्गाने आपले म्हणणे मांडणे हा गुन्हा असेल तर तो आम्ही करीत आहोत. मग सरकारने त्याला हवे ते नाव द्यावे’, असे मत व्यक्त केले. त्यासोबतच‘सरकारच्या आतापर्यंतच्या कारवाया पाहता सरकार हे आंदोलन चिरडण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत शांततेचा मार्ग सोडू नये’ असे आवाहनही त्यांनी ह्या प्रसंगी केले. उद्या नाशकात काय घडते – नक्षलवादी आंदोलनाचा खात्मा की नव्या शेतकरी आंदोलनाची पहाट - ह्याकडे अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे डोळे लागले आहेत.

हायवेविरोधी आंदोलनाला हिंसक वळण,

पोलीस गोळीबारात चार ठार, पन्नास जखमी, दहा पोलीसही जायबंदी

अखेर नाशकात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्च्याला अखेर हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. त्यात चार आंदोलक ठार व पन्नास जखमी झाले, त्यातील सहा जणांची परिस्थिती गंभीर आहे. त्यासर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेते सनी फुटाणे ह्यांच्यासह सुमारे ३५० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पोलिसांवर सशस्त्र हल्ल्यास चिथावणी देणे ह्यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष दंडाधिकारी ह्यांनी सर्व आरोपींना सात दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोर्च्यात नेमके काय घडले ह्यांविषयी सरकार व आंदोलक ह्यांच्याकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत.

सरकारी सूत्रांनुसार विविध दिशांनी शहरात प्रवेश करू पाहणाऱ्या शेकडो आंदोलकांना पोलिसांनी नाशिक शहराच्या वेशीबाहेर अडविले होते. पण तरीही हजारोंच्या संख्येने आंदोलनकारी शहरात जमा झाले व जथ्याजथ्यांनी रविवार कारंजा येथे जमा होऊन कलेक्टर कचेरीच्या दिशेने हा मोर्चा निघाला. मोर्च्याच्या अग्रभागी  असणाऱ्या नेत्यांनी शांतीमयतेचे ढोंग वठविण्यासाठी आपले हात पाठीमागे बांधले असले तरी त्यांच्याभोवती स्त्रियांनी कडे केले होते व मोर्च्यातून ‘ये आजादी झुठी है, देशकी  जनता भूखी है’, ‘दिल्ली-मुंबईला खोटे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ अशा शासनयंत्रणेला नाकारणाऱ्या अतिशय प्रक्षोभक घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा सीबीएस चौकात आला असता तो तेथेच थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी अचानक मोर्चा हिंसक बनला. आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक सुरु केली. त्यात दहा पोलिसांची डोकी फुटली. ह्या हिंसेचे लोण शहरात पसरू नये, कलेक्टर कचेरी व अन्य सरकारी मालमत्तेची, तसेच सीबीएस वरील जनसामान्यांच्या जीविताची हानी होऊ नये म्हणून पोलिसांनी लाठीमार करून जमावाला काबूत आणण्याचे प्रयत्न केले. पण ते  असफल ठरल्यावर नाईलाज म्हणून पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामुळे मोर्च्याची पांगापांग झाली व हिंसेला अटकाव बसला. हिंसेला चिथावणी देणारे नक्षलवादी तत्त्व ह्या आंदोलनात सक्रीय असल्याचा आमचा दावा ह्या घटनाक्रमावरून सिद्ध झाला आहे. कालमोर्च्यात सहभागी होण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली व दिल्ली येथून आलेल्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे नक्षलवादी साहित्य सापडले. ‘शेतकऱ्यांशी चर्चा होऊ शकते, नक्षलवाद्यांशी नाही,’ ही सरकारची भूमिका असल्याने आंदोलनाच्या नेत्यांना कडक शिक्षा व्हावी ह्यासाठी आपण जातीने प्रयत्न करणार असल्याचे एस पी तेजसिंगराव देशमुख ह्यांनी सांगितले. हायवेविरोधाच्या नावाखालील राष्ट्रविरोधी आंदोलनाचा आपण यशस्वीरीत्या खात्मा केल्याचा दावाही त्यांनी ह्या प्रसंगी केला.

आंदोलनाच्या सर्व नेत्यांना अटक झाल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र आंदोलनाचे  कार्यालय सांभाळणाऱ्या प्रवक्त्यांनी सरकारचे सर्व दावे फेटाळून लावले. सरकारची नियत चांगली नाही ह्याची आम्हाला कल्पना होती. आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाड्याच्या माणसाना हाताशी धरून सरकार  हिंसाचार घडवून आणेल ह्याचीही आम्हाला कल्पना होती. म्हणूनच आमचे सर्व नेते आपले हात पाठीमागे बांधून मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यातील कोणाही व्यक्तीच्या हाती शस्त्र सोडाच, साधी काठीही नव्हती. मोर्च्यातहिंसेला चिथावणी देणाऱ्या कोणत्याही बाबीलास्थान नव्हते व तो पूर्णपणे शांततेत निघाला होता, ह्याकडे आंदोलनाच्या प्रवक्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. सीबीएस चौकात मोर्चा आल्यावर मोर्च्यातून एकही दगड भिरकावला गेला नाही. दगडफेक शरणपूर रोडच्या बाजूने करण्यात आली, जिथे मोर्चा नव्हता. ती करणारे लोक बाहेरचे होते व त्यांचा उपयोग सरकारने आंदोलकांवर हल्ला चढविण्यासाठी निमित्त मिळावे म्हणून केला असा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारचे लक्ष्य आंदोलनाचे नेते सनी फुटाणे हे होते. त्यामुळे पोलिसांनी कोणतेही कारण नसताना त्यांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु त्यांच्याभोवती महिलांनी कडे केले असल्यामुळे त्या गोळीबारात दोन महिला ठार झाल्या व दोन जखमी झाल्या. कालच्या घटनेत एकूण चार आंदोलक मृत्युमुखी पडले आहेत व अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार करण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात अधिक रस दाखवला आहे ही संतापजनक बाब आहे. सरकारने सांडलेल्या रक्ताची किंमत त्याला चुकवावी लागेल व ह्या दडपशाहीनंतरही आंदोलन संपणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मोर्च्यात झालेल्या हिंसाचाराविषयी मतभेद असले तरी शहरात व प्रकल्पग्रस्त गावात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. सनी फुटाणे ह्यांच्यासह सर्व प्रमुख नेते अटकेत असल्याने आंदोलन नेतृत्वविहीन, सैरभैर झाल्याचे दिसते. त्यामुळे कोणत्याही उपायांनी का होईना, सरकारने ही फेरी जिंकली आहे, असेच राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

***

सीएमनी त्यांचं वचन पाळलं. मला मुंबईला हवं ते पोस्टिंग मिळालं. मग मी मागे वळून पाहिलंच नाही. सी एम कोणीही असो, त्यांच्या खास मर्जीतला माणूस हे माझं रेप्युटेशन मी कायम ठेवलं. सर्वांत कमी वयात डीसीपी, मग सीपी, हे मेडल, तो सन्मान... माझी हॅट सन्मानाच्या तुऱ्यांनी व कपाट सन्मानचिन्हांनी भरून गेलं. पण मनात खोलवर कोठेतरी असमाधान ठुसठुसत राहिलं. बढती, कौतुक, सन्मान... कशानेही आतली उणीव भरून निघत नव्हती. कदाचित माझ्या मनातल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं फक्त मोहिनीजवळ असावीत. पण तिच्याशी बोलण्याची मला हिम्मत होत नव्हती. सनी, सनी... माझ्या अस्वस्थतेचं माझ्यासाठी असणारं नाव. त्याला माझी आठवण कितपत आहे माहीत नाही. पण इथे जागेपणी व झोपेत त्याच्या नावाचा अखंड जप माझं अंतर्मन करत होतं. ‘तू कोर्टशिपच्या दिवसातही माझी इतकी आठवण काढली नसेल...’ मोहिनी म्हणाली असती.

***

तर मिस्टर सनी फुटाणे, हा उंदरा-मांजराचा खेळ आपण आता संपवू या. मला कंटाळा आलाय ह्या  खेळाचा. तो काही केल्या संपत नाही. नाशिकच्या केसमध्ये मी तुझ्यावर राजद्रोहापासून एवढी सारी कलमं लावली. वरच्या कोर्टात ती टिकणार नाहीत हे माहीत होतं मला. पण माणूस थकतो, कंटाळतो, खचून जातो- जेलमध्ये राहावं लागणं, सहज जामीन न मिळणं, कोर्टाच्या चकरा मारण्यात आयुष्यातली उमेदीची वर्षं सरणं ह्या साऱ्या गोष्टी माणसाचं खच्चीकरण करायला पुरेशा असतात आणि बैलाचं एकदा ठेचलं की, तो निमूट औताला जुंपून घेतो. मला तरी आणखी काय हवं? तुला पुरा खलास करायला मला आवडलं असतं. आताही असा चान्स मिळाला तर मी तो घेणार नाही असं अजिबात नाही. तुझं ते वेगळेपण दाखवणं, संतपणाचा आव आणणं, मी दिलेल चॅलेंज न स्वीकारता ‘जा बच्चे, तुझे छोड दिया’ अशा आविर्भावात वावरणं... साऱ्या साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यात जातात. म्हणून मी नोकरीसाठी जिथे कुठे गेलो, तिथून मी तुझा ट्रॅक ठेवला. नाशिकच्या केसमधून ३-४ वर्षांनी तू निर्दोष सुटलास आणि थेट अदृश्य झालास. तुझ्या आईने गाव सोडलं. नंतर ती वारली. तू घर आणि शेत विकलंस. तुझं बँकेचं अकौंट मी मॉनिटर करत होतोच. इतक्या वर्षांनंतर अलीकडे त्यात मोठं ट्रान्झॅक्शन झाल्याचं मला समजलं. एकेक कडी जोडत जोडत मी आता तुझ्या अगदी जवळ येऊन पोहोचलोय. माझे सोर्सेस व माझी गट फीलिंग मला कधी धोका देत नाहीत. त्यांना फॉलो करत गेलो तर उद्या आपली भेट ठरलेली. उद्या रात्री ह्याच जागी बसून मी व्हिस्कीसोबत सेलिब्रेशन करत असणार, हे नक्की!

सो, थ्री चीअर्स टायगर देशमुख. तुम्ही छान मूडमध्ये दिसताय. कधी नव्हे तर आज दोन दोन ग्लास सजवून बसलात प्यायला. आज मोहिनी नाही म्हणून मला बोलवलंय वाटतं कंपनी द्यायला.

मोहिनी सहसा मी व व्हिस्की ह्यांच्या मध्ये येत नाही. कधी मीच आग्रह केला तर समोर बसते, पण व्हिस्कीला शिवत नाही. तू माझाच एक भाग आहेस. तुझ्याशी सतत बोलत असतो मी अखंड, दिवसरात्र.

माझी सुखदुःखं, संताप-त्रागे, अपमान-पीळ सारे सारे तुला माहीत आहेत. मला भीती वाटते की, ते तुझ्याइतकेच मोहिनीलाही माहीत असावेत. पण ती लई डेंजर बाई आहे. तिच्यासमोर जायला मी घाबरतो. यू आर माय बडी. तुझ्यापासून काय लपून राहिलंय? म्हणून आज तुला, बेटर हाफ नाही तर इनर हाफला सोबत घेतलंय पिताना.

ओके टायगरसाहेब. आज फार सेंटी मामला दिसतोय. सांगा तर काय झालं?

माझ्या सोर्सेसनी दिलेली माहिती खरी होती. इथे बंगलोर-चेन्नई रस्त्यावर हायवेपासून १५ किलोमीटर आतल्या बाजूला डोंगराळ भाग आहे. बंगलोरहून सुमारे ७० किलोमीटरवर गाव, वस्ती, शेतं संपतात आणि जंगल सुरू होतं तिथे एक जुना गांधीवाद्यांचा आश्रम आहे. पन्नास एकर जमीन आहे त्यांच्याजवळ. आठ दहा कार्यकर्ते तिथे राहतात. शेती, सौरऊर्जा, खादी, ग्रामोद्योग असं काहीबाही करतात. जवळपासच्या आदिवासी गावातल्या बायकांना, युवकांना प्रशिक्षण देतात. अधूनमधून कसली आध्यात्मिक शिबिरं घेतात. त्यात शहरातली मंडळी जात असतात. त्या जागेला लागून एक छोटा प्लॉट आहे. तो संपला की थोडी मोकळी जागा, त्यापलीकडेओढाव त्यानंतर लगेच अभयारण्य सुरु होतं. तिथली जनावरं पाणी प्यायला त्या ओढ्यावर येतात. असा प्लॉट कोण घेणार? तो इतकी वर्षं पडून होता. आता वर्षभरापूर्वी सनीने तो दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर विकत घेतला. आठ-दहा महिन्यांपूर्वी तो तिथे राहायला आला. त्याला वाटलं होतं इतकी वर्षं झाली. आता जग त्याला विसरलं असणार आणि महाराष्ट्रापासून इतक्या दूर जंगलात गेल्यावर कोणाला त्याचा पत्ता लागणार? पण जग विसरलं, तरी टायगर नाही विसरू शकत त्याला. शेवटी, मी म्हणजे...

ते सारं खरंय टायगर. मी ओळखतो ना तुम्हाला नी SS ट. मग काय झालं आज? भेटला तुम्हाला तो?

मी व्यवस्थित प्लॅन करून गेलो होतो. आश्रमाचे प्रमुख हरीभाई, त्यांच्याशी मी ह्यापूर्वी दोन-तीनदा फोनवर बोललो होतो. त्यांच्या कामाबद्दल मी खूप ऐकलं आहे. त्यामुळे इतक्या जवळ बंगलोरला आल्यावर त्यांना भेटायची इच्छा आहे असंही त्यांना सांगितलं होतं. रिटायरमेन्टनंतर पर्यावरण संरक्षण व आध्यात्मिक साधना ह्यांना वाहून घेण्याचा माझा विचारही मी त्यांना बोलून दाखवला होता. त्याप्रमाणे आज दुपारी गाडी स्वतः ड्राईव करत मी आश्रमात गेलो. खादीच्या कुर्त्या-पायजम्यातलं माझं रूप मलाच ओळखू येत नव्हतं. अर्थात माझी ओळख मी लपवणार नव्हतोच. हरीभाई हे भलतंच भारी प्रकरण निघालं. त्यांचं वय ८५ वर्षं आहे हे त्यांनी सांगितल्यावरही खरं वाटत नव्हतं. माणूस तेजस्वी. कांती लखलख. अंगकाठी एकदम ताठ. हा अंगमेहनत करणारा, मनाला व शरीराला हवं तसं वाकवू शकणारा माणूस आहे, असं माझं मत झालं. अशा माणसांशी कसं डील  करायचं हे मला कळत नाही. मी फक्त विनयाने ते म्हणतील ते ऐकत होतो. त्यांच्यासोबत जमिनीवर बसून मी साधं शाकाहारी जेवण घेतलं. नंतर त्यांची विश्रांतीची वेळ होती. मीही अतिथिगृहात जाऊन आराम करतो असं त्यांना सांगितलं. थोडा वेळ तिथेच थांबून जीपीएसच्या साह्याने आसपासची टोपोग्राफी समजून घेतली. नंतर बाहेर पडून सर्व परिसर पायाखाली घातला, समजून घेतला. नंतर अतिथिगृहात जाऊन मनातल्या प्लॅनची उजळणी केली. चार वाजता हरीभाई मला बोलवायला आले. त्यांच्यासोबत काढा घेऊन आम्ही आश्रम पाह्यला निघालो, ट्रेनिंग सेंटर, वर्कशॉप, शेती, गोबर गॅस प्लँट– सगळं पाहिलं. त्यांची काही उत्पादने विकत घेतली.दोन-तीन सूचना केल्या. त्यांची उत्पादने बंगलोर शहरात विकण्यात मदत करायची तयारी दाखवली.

‘एव्हढ्या जंगलात तुम्ही एकटे राहता? तुम्हाला भीती नाही वाटत?’, मी विचारलं.

‘भीती कोणाची? माणसं लांब राहतात ह्या वस्तीपासून आणि मी त्यांना भीत नाही.”

‘पण जंगली जनावरं? इथून अभयारण्य जवळ आहे म्हणतात.’

‘त्यांना कशाला भ्यायचं? हे त्यांचं घर आहे हे लक्षात ठेवायचं. त्यांच्या घरात आपण राहतोय. पाहुणे ते नाहीत, आपण आहोत हे लक्षात ठेवलं म्हणजे झालं. त्यांच्याजगण्याआड आपण आलो नाही तर ते आपल्याला मजेत जगू देतात.’

मी हो, हो म्हणत होतो. पण माझ्या डोक्यात गोंधळ होत होता.

‘पण इतकी वर्ष तुम्ही एकटेच, म्हणजे तुमचा ग्रुप तेवढा राहतो इथे. नवी माणसं कोणी येत नाहीत इथे?’

‘येतातना, तुमच्यासारखी बरीच माणसं येतात इथे शांती शोधायला. हा परिसर पाहून इम्प्रेस होतात. इथे राहायला येण्याबद्दल बोलतात. आम्ही त्यांना तीन दिवस शिबिरात येऊन राहा असं सांगतो. तीन दिवस इथल्या असीम शांततेत राहणं त्यांना शक्य होत नाही. कारणसोबत येताना ते शहरातला सारा कोलाहल डोक्यात घेऊन येतात. डोक्यातला कल्लोळ व सभोवतालची नीरव शांतता ह्यांचा त्यांना मेळ घालता येत नाही. मगते कसेबसे तीन दिवस घालवतात आणि मग गेले की पुन्हा परतत नाहीत. आम्हाला सवय झालीय ह्या गोष्टींची. तरीही प्रत्येक वेळी तुमच्यासारखा नवा माणूस आला की आम्ही म्हणतो निदान ह्याला तरी कळू दे ह्या शांततेचा अर्थ. जंगली जनावरं, इतर माणसं ह्यांच्या सोबत जगणं सोपं असतं. स्वतःसोबत जगणं सर्वांत कठीण.’

हा बाबाजी सर्वात कठीण, मी मनात म्हणालो.

‘पण इतक्या वर्षांत इथे कोणीच राहायला आलं नाही?’

माझ्या प्रश्नावर चमकून त्यांनी माझ्याकडे पाहिलं.

‘तुम्ही हे माहीत करून घ्यायला आला आहात इथे?’

मी सटपटलो. ‘नाही. मी सहज विचारलं.’

‘हरकत नाही. मलाही काहीच लपवायंच नाही तुमच्यापासून आणि तुम्ही जेनुईनली हे विचारताहात असं मी गृहीत धरतो. गेली ३-४ दशकं ह्या परिसरात आम्ही कार्यकर्ते व इथले आदिवासी ह्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. शहर ह्या दिशेने आक्रमण करून आलं, पण ते हायवेने पुढे निघून गेलं, आम्हाला बायपास करून. नशीब आमचं. पण आता इतक्या वर्षांनी आम्हाला एक शेजारी भेटला आहे. आदित्य नावाचा कोणी इंजिनियर आहे. कुठून आलाय माहीत नाही. आम्हीही कोणाला विचारत नाही. खरे तर आपण सारे किती लांबचा प्रवास करून इथे येत असतो. आतला प्रवास. प्रत्येकाचा वेगळाच असणार. बाकी कोण कोणत्या गावाहून आला ह्याला तसा काहीच अर्थ नाही. खरंय ना?’

‘हो, खरंय तुमचं म्हणणं. इतकी वर्षं पोलिसात काढून मला इकडे यावंसं वाटत ह्याचा अर्थ तरी काय लावणार? बरं, तुमचा हा आदित्य करतो तरी काय? तुमची गोष्ट वेगळी. तुमचं काम आहे इथे.’

‘काम कशाला म्हणतात हे त्याच्याकडे पाहिल्यावर कळेल तुम्हाला. काही वर्षांनी हा परिसर आश्रमाच्या नावाने नाही तर आदित्यच्या नावाने ओळखला जाईल, अशी खात्री आहे माझी.’

‘अरे वा, काय काम केलं त्याने?’

‘खूप काही. मुख्य म्हणजे तो इथेच, ह्या निसर्गाचा भाग बनून राहतो. जंगली जनावरं त्याच्या घरावरून जातात. तो त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो. घरावर सर्वत्र त्याने सोलर पॅनेल बसवले आहेत. त्यामुळे त्याला हवी तेवढी वीज तो स्वतःच निर्माण करता येते. त्याच्याकडे फ्रीज आहे, लॅपटॉप आणि मोबाईलही आहेत. शिवाय कसली कसली इन्स्ट्रुमेन्ट्स तो बनवत असतो. ह्या सगळ्यांसाठी लागणारी ऊर्जा तो स्वतः निर्माण करतो. बाजूने वाहत जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचं त्याने छान हार्वेस्टिंग केल आहे. खरंच पाहण्यासारखं आहे त्याचं काम. तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा नक्की जाऊ आपण त्याच्याकडे.’

‘पुढच्या वेळी कशाला? मला तर त्याला आताच भेटायची इच्छा आहे.’

‘पण मला आता आश्रमात परतायला हवं. साडेपाच वाजता प्रार्थना होते. आताच सव्वापाच वाजले आहेत. पुढच्या वेळी मी नक्की तुमची ओळख करून देईन.’

‘तुम्हाला प्रार्थनेसाठी निघायला हवंय हे मला कळतंय. पण अजून सूर्यास्ताला बराच वेळ आहे. तुम्ही फक्त इथून रस्ता सांगा. मी भेटूनच घेतो तुमच्या त्या आदित्यला. तुमचं नाव सांगून मीच ओळख करून घेतो. अनोळखी माणसाला बाहेरच्या बाहेर हाकलणार तर नाही न तो?’

‘छे, असं कसं होईल? ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. आदित्यकडून निघायला उशीर मात्र करू नका. जंगलातली वाट आहे आणि तुम्हाला सवय नाही. परत आश्रमात येणार की परस्पर बंगलोरला जाणार?’

‘उशीर झाला तर सरळ निघून जाईन. उद्या फोन करेनच तुम्हाला. थँक्स फॉर एव्हरीथिंग.’

मला रस्ता समजावून हरीभाई निघून गेले.

मी झपाट्याने चालू लागलो. मला भयंकर एक्सायटिंग वाटत होत. पण अशा मिशनपूर्वी जाणवत असे तशी अॅड्रिनॅलीनचा तप्त प्रवाह मेंदूकडे सुसाट वेगाने निघालाय अशी फीलिंग मात्र येत नव्हती. स्साला,  मी म्हातारा झालोय की काय? आश्रम परिसरातली दाट झाडी आता विरळ होऊ लागली होती. डाव्या हाताला असणाऱ्या अभयारण्याचा गारवा जाणवू लागला होता. आता उजवीकडचे वळण घेऊन वर चढायचं. ती चढण उतरून खाली डोकावलं की, आलीच आदित्य उर्फ सनी ऋषींची मठी.

मी पँटच्या खिशातलं रिव्हॉल्व्हर हाताने चाचपून पाहिलं. माझ्या माहितीप्रमाणे सनीकडे कोणतेही हत्यार असण्याची शक्यता नव्हती. त्याच्यासोबत आणखी कुणी राहत असण्याचा उल्लेख हरीभाईनी केला नव्हता. पण मला गाफील राहून चालणार नव्हतं. शिवाय एन्काउन्टरपूर्वी माझ्यावर हल्ला झाला हे सिद्ध करायला घटनास्थळी झटापटीचा पुरावा सोडण्याची दक्षता घ्यावी लागणार होती. खाली उतरण्यापूर्वी त्या सगळ्या स्पॉटला बाहेरून वळसा घालून त्याचा अंदाज घ्यावा असे मी ठरवलं.

दाट झाडीतून रस्ता काढत मी वर चढत आलो. खाली उतारच उतार होता व त्या घळीत एक स्वतंत्र दुनिया उभी होती. मी उभा होतो त्या कातळावरून तीन दिशांनी पाण्याचे ओहाळ वाहत खालच्या ओढ्याला जाऊन मिळत होते. त्यालाखालच्या अंगाला छोटासा बंधारा घातला होता. बंधाऱ्याच्या वरच्या अंगाला शेत लावलं होता. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला एक छोटं टुमदार घर होत. गोल आकाराचं. त्याला पूर्व पश्चिम दोन दरवाजे असावेत. घराच्या बाजूला छोटी बाग. बाकी सर्व भाग दाट झाडीने व्यापला होता. आता सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. सर्वत्र झळाळणारा पिवळा-सोनेरी प्रकाश पसरला होता. त्यातून सारा परिसर लख्ख दिसत होता. आणखी फक्त पंधरा मिनिटं. मग झपाट्याने अंधार पडायला सुरुवात होईल. अंधारात अनोळख्या ठिकाणी घुसून असं मिशन अॅकॉम्प्लीश करणं, तेही एकट्याने... अशक्य नाही पण रिस्की ठरू शकतं. हरी अप, टायगर, मी स्वतःला बजावलं.

पण माझे पाय जागेवरून हलत नव्हते. डोळ्यांवर जणू जादूची झापड आली होती. सर्व दिशांनी दाटून येत असणारा गारवा, झळाळतं आकाश, चमचमतं पाणी. त्याच्या मध्यभागी स्वप्नातलं वाटावं असं घर . त्याच्या छतावर सर्वत्र सोलर पॅनेल लागलेले, त्याखाली छताच्या खालच्या अंगाला कितीतरी आकाशदिवे की झुंबरं लटकत  होती... मी स्वतःला सावरलं. पूर्ण परिसराची टेहळणी करायला आता वेळ नव्हता व त्याची गरजही नव्हती. सूर्यप्रकाशात सारं काही स्वच्छ जाणवत होतं. मी रिव्हॉल्व्हरचा सेफ्टी व्हॉल्व्ह ओढला व वेगाने घराच्या पिछाडीला उतरू लागलो.

‘मग? मग काय झालं?’

‘खाली उतरताना मला दिसलं घराला सर्व बाजूनी झरोके होते. त्यातून आतलं घर नीट दिसत होतं. एकाच गोलाकार घराचे तीन भाग केले होते. एका बाजूला छोटं स्वयंपाकघर होतं, दुसरीकडे वर्कशॉप-कम-हॉल आणि तिसरीकडे बेड-कम-स्टडी. माणसाला जगायला एवढं कमी लागतं? पाठीमागच्या खिडकीतून मी त्याला पाहिलं. पाठमोरा असला तरी तोच असावा. कुठल्या तरी सोलर पॅनेलवर तो काम करत होता. त्याच्या हाताच्या चपळ हालचाली इतक्या लांबूनही जाणवत होत्या. त्या रूममधून आफ्रिकन ड्रम्सचंअगम्य पण मन मोहून टाकणारे संगीत ओसंडत होतं. अचानक आपलं काम थांबवून तो ताडकन उठला. त्याला कसली चाहूल लागली होती का? मीही सावध झालो. स्वतःला झाडीत कॅमोफ्लेज करत पूर्वेच्या दरवाजाच्या दिशेने सरकू लागलो. हातात एक वाडगा घेऊन तो बाहेर आला. दरवाजातून तो बाहेर पडताच मी पोझिशन घेतली. त्याची माझ्याकडे पाठ होती. त्यामुळे तो काय करतोय कळत नव्हतं. पण छताला लोंबकळत असलेल्या त्या झुंबरातून कितीतरी पक्षी कलकलाट करत त्याच्याभोवती जमा झाले व त्यांनी त्या वाडग्यात असलेल्या दाण्यांवर झेप घेतली. ते त्याच्या अंगाखांद्यावर खेळत होते. तोहीजणू त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलत होता.तेवढ्यात माझ्या पायाखालचा एक दगड सटकला व धडधड आवाज करत त्याच्या पावलापाशी  जाऊन थांबला. तो सावध झाला असावा.

‘कौन? कौन है वहाँ?”, त्याने आवाज दिला.

मी जागच्या जागी जमिनीला चिकटून उभा राहिलो. शेजारच्या झाडासारखा.

त्याचं समाधान झालं असावं. पश्चिमेच्या खिडकीतून येणाऱ्या मावळत्या सूर्याच्या किरणात मला त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. पण त्याला मी दिसत नव्हतो. आमच्या मध्ये फक्त दहा फुटांचं अंतर होतं.

’मग? मग काय झालं? तू केलंस ना त्याला शूट?’

‘हाऊ कुड आय? त्याच्या हातातला वाडगा हलून त्याच्यावर पडणारा कवडसा थेट माझ्या रिव्हॉल्व्हरवर पडला. तो वेगाने हलला. हाताला वाडगा हलवून त्याने आता कवडसा पाडला तो थेट माझ्या चेहऱ्यावर. मला पहिल्यांदाच त्याचे डोळे दिसले. ते डोळे सनीचे थोडेच होते? ते तर संताचे डोळे होते. त्यांच्यात भयाचा लवलेश नव्हता. फक्त करुणा होती आणि अथांग प्रेम. त्याच्या अंगावर झेपावणाऱ्या पाखरांसाठी, पाण्यावर येणाऱ्या जनावरांसाठी, त्यांतल्या त्याच्यावर हल्ला करू शकणाऱ्या जनावरासाठीही. आय कॅन ओन्ली हिट अ बुल्स आय, नॉट अ सेन्ट्स. तो सनी नव्हताच मुळी...

चिअर्स टायगर, अ हंड्रेड चिअर्स फॉर फायनली हिटिंग द बुल्स आय 

चिअर्स!!

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

ravindrarp@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......