झारखंडमधील छत्तीसगड सीमेलगतच्या लातेहार या अतिसंवेदनशील अशा दुर्गम, नक्षलग्रस्त भागातल्या १७व्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचा अनुभव...
.............................................................................................................................................
नक्षलग्रस्त अशा दुर्गम आदिवासी भागात भयमुक्त व नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सुरक्षा बलांवर असते. जीव धोक्यात घालून, जोखीम पत्करून सुरक्षा बल ही जबाबदारी पेलतात आणि क्लिष्ट निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या, कडेकोट बंदोबस्तात पार पाडतात.
१७वी लोकसभा निवडणूक ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान एकूण सात टप्प्यांत घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये मी झारखंड या राज्यात अतिसंवेदनशील अशा नक्षलग्रस्त भागात कार्यरत होतो. लोकशाही खऱ्या अर्थाने कशी राबवली जाते? निवडणूक प्रक्रिया नक्षलग्रस्त भागात कशी पार पडते? शासन आणि सुरक्षा बल हे आव्हानात्मक काम कसे करतात? हे माझ्या अनुभव कथनाद्वारे इथे शब्दांत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणजे एक अवघड असे मोठे चाक आहे, जे अनेक लहान चाकांनी जोडलेले आहे. ज्याच्यावर लोकशाहीचा रथ मोठ्या दिमाखात चालत आहे. जशी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली, तसे सगळे राजकीय पक्ष सक्रिय झाले. प्रचाराला सुरुवात झाली. ताबडतोब सरकारी यंत्रणा कामाला लागली. विविध शासकीय विभाग, केंद्रीय सुरक्षा बल, पोलीस दल, इतर अशासकीय संस्था अशा अनेकांच्या संयुक्त विद्यमानाने ही प्रक्रिया पार पाडण्याची जय्यत तयारी सुरू झाली.
बटालियन हेडक्वार्टर इन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लगेच निवडणुकीसंदर्भात आदेश मिळाले. त्यांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवण्यात आली. निवडणूक आयोगाचे निर्देश आमच्या विभागाअंतर्गत प्राप्त झाले. मी लातेहार जिल्ह्यात गारु या ठिकाणी तैनात होतो. छत्तीसगड सीमेला अगदी लागून असल्याकारणाने हा भाग नक्षलवादी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची खबरदारी आणि सुरक्षेचे सगळे निकष तपासून घ्यायचे होते. माझ्या अधिपत्याखाली येणाऱ्या मतदान केंद्रांची माहिती एकत्र करून योजना तयार करायची होती. ऑफिसर इन कमांडिंग म्हणून जवळपास दीडशे जवानांच्या पथकाचा मी कमांडर होतो. त्यांच्या साथीने मला आमच्या भागातील निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पाडायची होती. प्रत्येक मतदान केंद्रावर किती जवान तैनात असतील, त्यांच्याकडे कोणकोणती शस्त्रे असतील, स्पेशल इक्विपमेंट कोणती असतील ही सगळी तयारी केली. हेडक्वार्टरला प्रशासनिक अधिकारी आणि आमचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. सुरक्षेशी संबंधित सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे नियोजनानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडणे हेच एक आव्हान डोळ्यासमोर उभे होते.
२०१८च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी बेंगलोर नजीकच्या तुमकूर जिल्ह्यात तैनात होतो. तेथील अनुभव पाठीशी होताच. तसेच जम्मू-काश्मीरला कुपवाडासारख्या दहशतवादग्रस्त भागात तैनात असताना पंचायत निवडणुकीचा अनुभव गाठीशी होता. मला आठवते की, तिथे पंचायत निवडणुकांची घोषणा झाली. तब्बल आठ वर्षांनी तिथे पंचायत निवडणुका होणार होत्या. तिथली परिस्थिती तशी बिकट होत चालली होती. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपने मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला आणि तिथले सरकार क्षणार्धात कोसळून पडले. ताबडतोब तिथे राज्यपाल राजवट लावण्यात आली. दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. पंचायत निवडणुकीसाठी माझी अनंतनागहून थेट सीमेलगच्या कुपवाडा या जिल्ह्यात रवानगी झाली. तसा तो जिल्हा आतंकवादी कारवायांसाठी सदैव प्रसिद्ध होता. नुकतेच तिथले दोन आतंकवादी मारले गेले होते. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. अशा परिस्थितीत तिथे निवडणूक म्हणजे एक आव्हानच होते. निवडणुकीसाठी सगळीकडे चोख बंदोबस्त होता. चौकाचौकात फौज तैनात होती. मी आयुष्यात पहिल्यांदाच असे बघितले की, मतदानाचा दिवस आणि मतदानावर बहिष्कार म्हणून बंद पुकारला गेला. मार्केट बंद पाडले गेले. बाहेर रस्त्यावर लोक फिरताहेत, पण निवडणूक केंद्रावर मतदान करण्यासाठी मात्र कुणी येत नव्हते. तिथे अगदी बोटावर मोजण्याइतकेच मतदान झाले. निवडणुकीबाबतची इतकी उदासीनता मनाला चटका लावून गेली. त्यालाही बरीच कारणे होती. पण एवढे समाधान होते की, चोख बंदोबस्तात निवडणूक शांततेत पार पडली होती.
पण इथे झारखंडमध्ये परिस्थिती वेगळी होती. लातेहार हा भारतातील सगळ्यात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक. अतिसंवेदनशील असा नक्षलग्रस्त भाग. दुर्गम भागात आदिवासी वस्ती. घनदाट जंगल, डोंगराळ प्रदेश, मोजक्याच घरांची छोटी-छोटी खेडी, पक्के रस्ते तर क्वचितच होते. तिथल्या स्थानिक लोकांचा हा एक वेगळाच संघर्ष. शाळा आहेत, पण त्यात शिक्षकांची कमतरता. दवाखाने आहेत, पण डॉक्टर्स नाहीत. विजेचे खांब आहेत, पण आठ-आठ दिवस वीज राहत नाही. दळणवळणासाठी नियमित बसेस नाहीत आणि महत्त्वाचे म्हणजे नेटवर्क नाही. अगदीच नो टॉवर, नो पॉवर एरिया. नैसर्गिकदृष्ट्या श्रीमंत आणि खनिज संपत्तीने समृद्ध, पण आदिवासी भाग. त्यामुळे नकळतच बाहेरच्या जगापासून, मुख्य प्रवाहापासून तुटलेपणाची भावना इथे बळावते. तसेच इथे नक्षलवादाव्यतिरिक्तही इतर बऱ्याच समस्या आहेत, ज्या थेट इथल्या व्यवस्थेशी जुळलेल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि उद्योग या बाबतीत अजूनही हा भूभाग बऱ्याच पिछाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालो. माझ्या भागातील सर्व मतदान केंद्रांची नीट पाहणी करून घेतली. २९ एप्रिलला चतरा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या लातेहार जिल्ह्यातील गारु या भागात माझ्या जवानांसह मी तैनात होतो. जवळपास एक महिन्यापूर्वीच माझी टीम इलेक्शन ड्युटीत सामील झाली होती. त्यामुळे आमचे पूर्ण लक्ष निवडणूक कशी शांततेत आणि सुरळीत पार पाडता येतील याकडे होते. आमच्या मानक कार्यपद्धतीप्रमाणे कारवाई सुरू होती. अजूनही ते दिवस डोळ्यांसमोर उभे राहतात. त्या दिवसांत नक्षलविरोधी मोहिमा राबवताना, लढताना पक्ष्यांच्या किलबिलाटात उजाडणारी पहाट, रातकिड्यांच्या किर्रर्र नादात जागणारी रात्र, घनदाट जंगलातील मैलोगनती पायपीट, उंचच उंच डोंगरावरची चढाई, कडे-कपाऱ्यांतून, नदी-नाल्यांतून, झाडा-झुडपांतून, दऱ्या-खोऱ्यांतून निधड्या छातीने हाती रायफल घेऊन अद्ययावत शस्त्रांनी सज्ज अशा माझ्या जांबाज लढाऊ जवानांसोबत गस्त घालताना, सगळे जंगल पिंजून काढताना ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ होता. कारण नक्षल्यांच्या बंदुकीची गोळी कधी आमचा वेध घेईल, हे काही सांगता येत नव्हते. तसेच छुपे भूसुरूंग पेरलेल्या बॉम्बस्फोटांचा धोका होता.
आम्हाला गोपनीय खात्याकडून अशी पक्की खबर मिळाली की, नक्षलवाद्यांचा काहीतरी घातपात करण्याचा बेत आहे. नक्षलवाद्यांनी काही गावांत पोस्टर, पत्रके लावली होती. त्याद्वारे स्थानिक लोकांना मतदांनावर बहिष्कार घालण्याची ताकीद दिली होती. केवळ बंदुकीच्या बळावर तिथल्या आदिवासी लोकांमध्ये भय निर्माण करणे, सरकारविरोधी कारवाया करणे, त्यांची पिळवणूक करणे, बळजबरीने शोषण करणे हेच त्यांचे धोरण होते. त्यामुळेच भीतीपोटी आदिवासी मतदानाला धजावत नाहीत. नुकताच छत्तीसगडमध्ये पोलीस पथकांवर भ्याड हल्ला झाला होता. त्यामुळे सगळीकडे ‘हाय अलर्ट’ देण्यात आला होता. नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गावकऱ्यांना संरक्षण देणे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे यात आमचे कसब पणाला लागणार होते. प्रशासनासोबत काम करत स्थानिक लोकांना विश्वास देणे आणि मतदान हा त्यांचा हक्क आहे, याची जाणीव त्यांना करून देणे, हे आमचे कर्तव्य होते. त्यासाठी आम्ही विशेष मोहिमा राबवल्या. रात्री-बेरात्री गावांमध्ये गस्त घालून परिसर भयमुक्त आणि शांत ठेवला.
आदिवासींना स्वातंत्र्याची आस आहे. त्यांचे देशावर खूप प्रेम आहे. त्यांना मतदानाचा अधिकार निर्भयतेने बजावता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. गारु या ठिकाणी एका महाविद्यालयात निवडणूक केंद्र क्लस्टर पॉइंट ठरवण्यात आले. मतदानाच्या दोन दिवस आधीच निवडणूक अधिकारी, प्रिसायडिंग ऑफिसर, झोनल ऑफिसर आणि इतर अधिकारी, तसेच मतदान कर्मचारी, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक साहित्य-सामग्री असा सगळा ताफा येणार होता. रांचीहून लातेहारमार्गे गारुला सगळे येणार होते. त्यासाठी माझ्या भागातील रस्त्यांची पूर्णपणे तपासणी करण्यात आली. आम्ही ‘ऑल ओके’ रिपोर्ट दिल्यानंतरच त्यांना या रस्त्यावरून येण्याची परवानगी मिळाली. सगळा ताफा क्लस्टर पॉइंटवर पोहोचला.
मतदान केंद्रांची संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशी विभागणी करण्यात आली होती. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार होता. प्रत्येक मतदान केंद्रावर एका केंद्राध्यक्षासह चार-पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तिथे नेटवर्क नसल्यामुळे वेबकास्टिंगद्वारे नजर ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे वायरलेस यंत्रणेद्वारे सिग्नल सेंटरहून मतदानाची टक्केवारी कळवण्याचे आदेश मिळाले होते. प्रत्येक केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा यांची व्यवस्था करण्यात आली होती. वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांकरता व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ईव्हीएम तसेच इतर निवडणूक साहित्य-सामग्री एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. काही ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आले होते. जवानांची पथके तैनात झाली होती. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी आणि तिथे तैनात होणाऱ्या जवानांची ओळख करून देण्यात आली. मी सगळ्यांना आदेश दिले. प्रत्येक तुकडीच्या प्रमुखाला सुरक्षेसंबंधी घ्यावयाची सगळी माहिती दिली. मतदान कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यासह मतदान केंद्रावर सुरक्षित घेऊन जाण्याची जबाबदारी त्या त्या पथकावर सोपवण्यात आली. ठरल्याप्रमाणे आतापर्यंत सगळी कामे सुरळीत पार पडली होती. मतदानाच्या दिवशी उपयोगात येणाऱ्या सगळ्या यंत्रणा तपासून घेण्यात आल्या होत्या.
२९ एप्रिलच्या आदल्या रात्री आम्ही मतदान कर्मचारी आणि निवडणूक साहित्य-सामग्री घेऊन मतदान केंद्रावर निघालो. रात्री अंधारातच आम्हाला जायचे होते. जाताना सगळ्यात मोठा धोका होता, तो म्हणजे भूसुरूंग स्फोटाचा. पोलीस पथके ज्या रस्त्याने वाहतूक करतात, त्याच रस्त्यांवर विशेषत: पुलांवर किंवा नागमोडी वळणांवर नक्षलवादी भूसुरुंग पेरून ठेवतात. आणि जेव्हा पोलीस पथकांची वाहने तिथून जातात, तेव्हा ते स्फोट घडवतात. अशा स्फोटांमध्ये आमचे अनेक सैनिक शहीद झाले होते. त्यामुळे आम्ही रस्त्यांचा उपयोग न करता जंगलातूनच जाण्याचे ठरवले. डांबरी रस्ता, कच्चा रस्ता किंवा पायवाट यांचा वापर म्हणजे धोक्याची घंटा! त्यामुळे आम्ही जंगलातून निघालो. भयाण अंधार आणि शांतता… त्यामुळे आमचे जवान खूप सतर्क राहून एक-एक पाऊल पुढे टाकत होते. मतदान कर्मचाऱ्यांना जंगलातून चालण्याचा सराव नव्हता. त्यामुळे वाटेत आम्हाला वारंवार थांबावे लागत होते. कारण इतके सगळे निवडणूक साहित्य घेऊन अंधाऱ्या रात्री चालणे कठीण होते.
मतदान कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत आम्ही मतदान केंद्र ज्या गावात होते, तिथे पहाटे सुमारे चारच्या सुमारास पोहोचलो. नक्षलवादी गावामध्ये लपून बसलेले असू शकतात अशी सूचना मिळाल्यामुळे आम्ही गावाच्या हद्दीवरच काही वेळ थांबलो. थोड्याच वेळात पहाट उजाडली. मी माझ्या तुकडीसह गावात शिरलो. शाळेच्या जवळ पोहोचताच संपूर्ण परिसराची टेहळणी केली. स्पेशल इक्विपमेंटद्वारे भूसुरुंग किंवा इतर धोक्यांची तपासणी करण्यात आली. सर्व सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच मतदान केंद्रात मतदान कर्मचाऱ्यांना संपूर्ण साहित्यासह प्रवेश देण्यात आला. मतदान केंद्राच्या सभोवतालच्या परिसरात आमचे जवान तैनात झाले. मतदान सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम ‘मॉक पोल’ घेण्यात आला. सकाळी ठीक सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. हळूहळू गावातील लोक मतदान केंद्राजवळ जमू लागले. तेथील तैनात जवान सर्वांना एका रांगेमध्ये उभे करत होते. दर दोन तासांनी मला हेड क्वार्टरला, कंट्रोल रूमला सिग्नल सेंटरद्वारे मतदानाची टक्केवारी सांगायची होती.
दुर्गम, आदिवासी भाग असल्याकारणाने निरक्षरतेचे प्रमाण जास्त होते. स्थानिक लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय, लोकसंख्या पण कमी. त्यामुळे खूप वर्दळ नव्हती. आसपासच्या गावांतून मोठ्या उत्साहात ट्रॅक्टरने लोक मतदानासाठी येताना दिसत होते. तसेच बाहेरगावी उपजीविकेसाठी राहणारेसुद्धा आवर्जून मतदान करण्यासाठी गावात आले होते. दुपारी दोनपर्यंत जवळपास ६० टक्के मतदान झाले. तीन वाजेपर्यंतच मतदान घ्यायचे होते. त्यामुळेच अडीच वाजल्यापासून आवराआवरीची तयारी सुरू झाली होती. अडीचनंतर क्वचितच लोक मतदान करायला आले. ठीक तीन वाजता मतदान करण्यासाठी अजून कोणी येत तर नाही ना, याची शहानिशा करून मग मतदान थांबवण्यात आले.
आता एकच गोष्ट आमच्या पुढ्यात होती की, लवकरात लवकर सगळे आवरून, सगळी औपचारिकता पूर्ण करून आम्ही क्लस्टर पॉइंट गाठणे. त्यानुसार आम्ही तयारीला लागलो. मतदान संपताच सगळ्या साहित्याची आवराआवर करण्यात आली. मतदान कर्मचारी औपचारिकता पूर्ण करत होते. सुमारे अर्ध्या तासातच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. ज्या मार्गाने आम्ही आलो होतो, त्या मार्गाने परत जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्ही दुसरा मार्ग पत्करला. सूर्य पश्चिमेकडे झुकलेला. अंधार व्हायच्या आत जवळपास पंधरा किमी अंतर कापणे कठीण होते, पण तरीही आम्ही पुढे चालत होता. समोर पर्वतांची रांग होती. त्यामुळे थेट चढाई करावी लागली.
परतीचा प्रवास आणखी कठीण झाला होता. घनदाट जंगल, सगळीकडे सामसूम. त्यामुळे चालण्याचा वेग थोडा कमी झाला होता, पण तरीही आम्ही हार मानली नाही. मतदान कर्मचाऱ्यांना धीर देत आम्ही त्यांना पुढे नेत होतो. हळूहळू अंधार पडायला लागला होता. वाटेत एक नदी लागली. गुडघ्यापर्यंत पाणी. त्यामुळे नदी ओलांडताना बराच वेळ खर्ची पडला. आम्ही मजल-दरमजल करत बरेच अंतर कापले होते. गाव जवळ आले होते. आम्ही जवळपास साडेसातच्या सुमारास क्लस्टर पॉइंट गाठले. निवडणूक केंद्रांवरून इतर पथकेही सुरक्षितरीत्या पोहोचली होती. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. कारण आतापर्यंतचा इतिहास असा होता की, नक्षलवादी परत येतानाच हल्ला करतात. पण आम्ही सुरक्षित पोहोचलो होतो. लगेच मतपेट्या, ईव्हीएम आणि इतर निवडणूक साहित्य-सामग्री हेलिकॉप्टरने रांचीला पाठवण्याचे आदेश मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टर उतरणार होते. त्यासाठी आम्ही माझ्या जवानांसोबत हेलिपॅडचा परिसर नीट तपासून घेतला. ‘ऑल ओके’ रिपोर्ट दिल्यानंतर हेलिकॉप्टर ठीक नऊ वाजता उतरले. पक्के हेलिपॅड नसल्यामुळे सगळीकडे नुसती धूळ उडाली. दुरूनच हाताने इशारा मिळाला आणि सज्ज असलेले माझे जवान पटापट निवडणूक साहित्य-सामग्री घेऊन हेलिकॉप्टरकडे धावत निघाले. एकेक करत सगळे साहित्य हेलिकॉप्टरमध्ये चढवले. ‘ऑल ओके’ होताच हेलिकॉप्टर रांचीकडे रवाना झाले. मी सुटकेचा नि:श्वास टाकला.
एक खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती. माझ्या जवानांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. कारण अतिशय संवेदनशील अशा नक्षलग्रस्त भागात आम्ही कडेकोट बंदोबस्तात निवडणूक पार पाडली होती. मी हेडक्वार्टरला सगळे यशस्वीरीत्या पार पडले म्हणून कळवले. कमाडंट सरांनी ‘वेल डन’ म्हणून शाबासकी दिली आणि सगळ्या जवानांचे अभिनंदन केले. अशा प्रकारे निवडणूक पार पडली.
‘न्यूटन’ हा चित्रपट मागे येऊन गेला. नक्षलग्रस्त भागातील निवडणुकीवर तो आधारित होता. या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी मला पटल्या नाहीत. कारण त्यात एकच बाजू दाखवली आहे. पण वास्तविकता फार वेगळी आहे. सुरक्षा दलाचे काम अजून प्रभावीपणे त्यात दाखवता आले असते. गेल्या चार वर्षांपासून मी नक्षलग्रस्त अशा दुर्गम भागात कार्यरत आहे. परिस्थिती खूप जवळून बघितली आहे. नक्षल्यांचा प्रभाव क्षेत्रात सुरक्षा बल जोखीम पत्करून जिकिरीने निवडणूक कडेकोट बंदोबस्तात पार पाडतात. अतिशय आव्हानात्मक काम असते. कधी काय होईल हे सांगता येत नाही. पण देशसेवेसाठी ते सदैव तयार असतात.
१९६७च्या आसपास बंगालमध्ये सिलिगुडी जिल्ह्यातील नक्षलबारी या छोट्या गावात या नक्षल चळवळीचा उदय झाला. चारु मुजुमदार व कनू सन्याल यांनी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत लोकांना एकत्रित करून मार्क्सवादावर आधारित समाजरचना उभारण्यासाठी प्रेरित केले. मार्क्सवादाचे अतिजहाल तत्त्वज्ञान मानणाऱ्या या गटाने ‘व्यवस्थेविरुद्ध सशस्त्र संघर्ष’ हाच गरिबीविरुद्धचा उपाय आहे असे म्हणत या तत्त्वज्ञानाची रचना केली. जमीनदारी, सामाजिक असमानता, क्षेत्रिय असमतोल या जिवंत व गरीब, दीनदुबळ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आघात केला. नक्षलबारीच्या उठावातून उभ्या राहिलेल्या या चळवळीने इतकी मजल मारली की, आज तिने एक हिंसक, क्रूर आणि घातक रूप धारण केलेय. अतिजहाल माओवादाच्या नावाखाली ही चळवळ नेपाळमधील पशुपतीपासून आंध्र प्रदेशमधील तिरुपतीपर्यंत पसरली. दुर्गम आदिवासी भागात नक्षलवाद फोफावत गेला. पण ‘रेड कॉरिडॉर’मधून आपल्या देशाला पोखरून टाकण्याचा माओवाद्यांचा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही. कारण शासन आणि सुरक्षा दल रात्रंदिवस परिस्थितीशी लढत आहेत. संघर्ष करत आहेत.
एक सांगावेसे वाटते – आज आपल्या देशासमोर आतंकवाद, नक्षलवाद, उग्रवाद, प्रांतवाद, अस्मितावाद, टोकाची धर्मांधता आणि जातीयवाद अशी बरीच धगधगती आव्हाने असताना केवळ ‘मी आणि माझे बरे’ असे म्हणत आपण संकुचित झालोय का? विशेषत: आजची तरुण पिढी ज्यांच्यासाठी ‘मंडे टू सॅटरडे’ फक्त नोकरी आणि विकेंडला नुसती करमणूक एवढेच जीवनाचे समीकरण झालेय. त्यापलीकडे त्यांना विचार करण्याची इच्छाच होत नाही. मला आश्चर्य वाटते की, थेट प्रश्नाला कुणीच का हात घालत नाही? आपले समाजभान कुठे आहे? वास्तविकता काय आहे? असे विविध प्रश्न पडतात. खरेच आपल्यातली संवेदनशीलता कमी होत चालली आहे? देशाची आंतरिक सुरक्षा, आतंकवाद, नक्षलवाद आणि इतर ज्वलंत आव्हाने जाणून घेणे एक सजग आणि जागरूक नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.
देशाच्या आंतरिक सुरक्षेसाठी काम करताना बरीच बंधने येतात. एक जबाबदार अधिकारी म्हणून खूप सावध राहावे लागते. अतिदुर्गम भागात सदैव तत्पर राहावे लागते. पदोपदी तीव्र जोखीम, खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असल्याने प्रचंड तणाव असतो. एक न संपणारा संघर्ष चालू असतो. हे सगळे पेलत स्वत:ला कलावंत जिवंत ठेवण्याची तगमग, धडपड चालू असते. आतापर्यंतच्या प्रवास प्रत्येक वळणाने मला एक नवे आयुष्य दिले, नवी वाट दाखवली. खूप काही करण्याच्या उमेदीने आयुष्य श्रीमंत झाल्यासारखं वाटते!
.............................................................................................................................................
यशवंत मनोहर यांच्या ‘भारताचे क्रांतिसंविधान’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5154/Bharatache-Krantisanwidhan
.............................................................................................................................................
लेखक चेतन शेलोटकर सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडण्ट आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 02 November 2019
चेतन शेलोटकर,
तुमच्या धैर्य, जिद्द व कणखरपणास विनम्र अभिवादन. तुम्ही जागरूकपणे तुमचं कर्तव्य चोख बजावीत आहात म्हणून आज सामान्य नागरिक सुखाची झोप घेऊ शकतो. लढायला अभिमान वाटेल असा देश उभारायची जबाबदारी आज भारतीय नागरिकावर आहे. ती आम्ही पार पाडण्याची शिकस्त करू.
आपला नम्र,
-गामा पैलवान