खोटेपणा, अपप्रचार आणि उसने अवसान या ‘सत्याच्या प्रयोगां’त विद्यमान सत्ताधारी तरबेज आहेत!
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 30 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 महात्मा फुले महात्मा गांधी सत्याचे प्रयोग प्रसारमाध्यमे वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या टीव्ही

सत्य समाजकारणात व राजकारणात आणणारे दोघेच महात्मे भारत जाणतो. पहिले महात्मा जोतीराव फुले, दुसरे अर्थातच गांधीजी. एकाने सत्यशोधक समाज स्थापन केला, तर दुसऱ्याने सत्याग्रहाची सर्वदूर दीक्षा दिली. फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म आणू पाहिला, तर गांधींजी ईश्वराच्या जागी सत्य उभे करू पाहात होते. दोघांच्याही हयातीत सत्याचा आग्रह फार थोड्यांना झेपला. स्पष्टपणा, पारदर्शकता, निर्भीडता यांशिवाय कोणालाही हा आग्रह पेलता येत नाही. अनेक लोकांशी आणि सरकारशी संबंध येत असूनही ना फुल्यांनी कधी लपवाछपवी केली, ना गांधीजींनी फसवाफसवी. म्हणजे भारत सार्वजनिक जीवनात व समाजाच्या अनेक प्रश्नांशी झगडताना सत्य कसे जाणावे आणि त्याचे स्थान अभंग कसे ठेवावे याचा अनुभवी आहे. तरीही भारताची पत्रकारिता या दोन्ही महात्म्यांच्या प्रभावापासून लांबच राहिली. फुल्यांना संपादक म्हणून ‘सत्सार’ या अनियतकालिकाचे दोनच अंक काढता आले, गांधीजी मात्र कित्येक वर्षे संपादन करत राहिले. दक्षिण आफ्रिका व भारत हे दोन देश आणि हिंदी, इंग्रजी, गुजराती या तीन भाषा त्यांनी पत्रकारितेसाठी आधार म्हणून घेतल्या. अनुयायी या महात्म्यांनी खूप मिळवले. मात्र सत्य अनुयायांवाचून तडफडत राहिले.

आजही सत्याचा भारतातील वावर रखडत अन ठेचकाळत होतो. सरकारचे सत्य, माध्यमांचे सत्य अन बुद्धिवंतांचे सत्य असा सत्याचा त्रिफळा उडालेला दिसतो. उरली सामान्य जनता. तिला सत्य नावाचा पदार्थ या तीन ठिकाणांकडून मिळतो. आणि प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार सत्याचे रूप ठरवत जातो. जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश, शिक्षण, वर्ग अशा कित्येक गोष्टींनीही प्रत्येकाचे सत्य मर्यादित झालेले असते. त्यामुळे वैश्विक सत्याचेच अवतार दिसले तर भारतात दिसतील! फुटकळ सत्ये लोकसंख्येएवढीच अपंरपार!!

समजा आपण काश्मिरी मुसलमान आहोत. त्यांना ५ ऑगस्टपासून ना सरकार, ना माध्यमे, ना बुद्धिवंत काही सांगत आहेत, ना अन्य कोणी. त्यांना बंदुकीचे भय हेच सध्याचे सत्यस्वरूप! म्हणजे काश्मिरी माणूस आज अक्षरक्ष: सत्यवंचित होऊन बसलाय. कलम ३७० का काढले, राज्याचा दर्जा घटवून त्याचे दोन तुकडे का केले आणि संपूर्ण लोकसंख्या लष्कराच्या हवाली का केली? याचा त्याला धड पत्ता कसा लागेल कोण जाणे! प्रधानसेवक वेशभूषा करून पहाड चढून गेले आणि गुहेत ध्यानस्थ बसून सत्याचा शोध घेत राहिले, तसा एकान्त सध्या प्रत्येक काश्मिरी मुसलमान अनुभवतोय. पण त्यातून सत्य कसे व काय जाणील तो? अंतर्मुख होऊन सत्यशोध घ्यायला आजुबाजूचा परिसर बंदिस्त अन कडेकोट करून चालत नाही. ऋषीमुनी एकांतवासात जाऊन सत्यशोध घेण्यापूर्वी जंगले, वने, शिखरे निवडायचे. किल्ल्यात अथवा मनोऱ्यावर सत्य कसे सापडेल? अरे हो, मोदींचा सत्याचा शोध सरकार-माध्यमे-बुद्धिवंत यांनी सुसज्ज झालेला होता. शिवाय त्यांना काय उमजले ते एक गूढच!

फक्त आपल्यालाच सत्य समजलेय असा भ्रम झालेल्यांचे सरकार आज भारतात आहे. त्यामुळे सरकार ज्या संविधानाला बांधील असते, ते बाजूला ठेवून राज्यकर्ते त्यांच्या हिताच्या गोष्टीच सत्य म्हणून पुढे आणतात. प्रचार प्रत्येक सरकारचा अधिकार असतो. परंतु प्रचारकच जर सरकार म्हणून अवतरले तर काय हैदोस घातला जाईल, ते आज भारत पाहतोय. मंदी नाकारायची, बेकारी नाही म्हणायचे, गरिबी ओसरतीय म्हणायचे आणि अल्पसंख्याक, दलित व स्त्रिया सुरक्षित असल्याचा हवाला देत राहायचे. याला काय म्हणतात? दहशदवाद हा जगभरचा घातकी प्रश्न आहे हे मान्य. तरीही अफगाण नागरिक घरबश्यात राहतो का? तो आपले जीवन सुरळीत करत जातोच ना? पण सरकार मुद्दाम दहशतवाद हाच महत्त्वाचा धोका भारताला असल्याचा कांगावा करते. पर्यायाने ते पाकिस्तान, इस्लाम, मुसलमान यांवर नेम धरते. पाकिस्तानशी वाकडे असल्याचे रोज कशाला सांगायला पाहिजे?

सारखा शत्रूचा विचार डोक्यात घोळत ठेवल्यावर माणसाची मती गुंग होते आणि हळूहळू तोही शत्रूची एक प्रतिकृती होऊन जातो. पाकिस्तानात अर्धवट लोकशाही रुजलीय. धर्मराष्ट्र म्हणून त्याची वाटचाल चालूय. सामान्य स्वातंत्र्ये व अधिकार तेथील नागरिकांना नसल्यात जमा आहेत. लष्कर, गुप्तहेर आणि धर्मगुरू तेथील खरे सरकार आहेत. भारत त्याचा भाऊ होताच, पण दोघांत जुळेपणा काय कामाचा? पाकिस्तानातील सत्य लष्करी गणवेशात वावरते. भारतात त्याचा गणवेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झालेलाय?

याच गणवेशाची सद्दी भारतीय माध्यमांत सुरू झालीय. मोजके अपवाद सोडता, सत्याकडे पाठ करून शाखा चालवल्यासारखी वृत्तपत्रे, वाहिन्या, आकाशवाणी यांची राबवणूक चालूय. अराजकीय, नैसर्गिक, गुन्हेगारी, अपघात यांच्या बातम्या मुद्दाम वाढवल्या जातायत. राजकीय बातम्यांत हटकून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची कुचेष्टा होईल असा कल दिला जातोय. सरकारचा भ्रष्टाचार, सत्ताधाऱ्यांचे गैरप्रकार तर जणू अकल्पनीयच!

प्रत्येक वृत्तपत्र व वाहिनी दोन-तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे सोपवली असून काय लिहायचे, कोणाला बोलवायचे, टीका कोण करतेय याचा रोजचा तपशील जमवला जातोय. संपादकांवर वेसण म्हणून मालकांचा वापर केला जातोय. माध्यम संस्थांवर आयकर व अन्य खात्यांच्या निगराणी चालू आहेत. सरकारी जाहिराती टाइम्स, एबीपी, हिंदू या समूहांना नाकारल्या जात आहेत. टीका करणाऱ्या पत्रकारांच्या बदल्या करण्यासाठी वा त्यांना काढून टाकण्यासाठी दबाव आणला जातोय. संघ विचारांच्या पत्रकारांची बेशरम निवड केली जातेय. एकीकडे असा संकोच अन दडपण तर दुसरीकडे फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅप यांचा यथेच्छ उपयोग अपप्रचार व अफवा पसरवण्यासाठी सुरू आहे.

अशा हवेत कोणता बुद्धिजीवी अन बुद्धिवंत आपले ज्ञान वाढवून सत्याचा शोध घेऊ शकेल? संघपरिवार जन्मापासून बुद्धीने लुब्ध आहे. सारे सरसंघचालक उच्चशिक्षित आणि देवरस सोडता विज्ञानाचे पदवीधर असतानाही बौद्धिकता केवढी पांगळी! का? कारण हुकूमशाही स्थापन करायला शंका, समस्या, प्रतिप्रश्न, वाद, खंडणमंडण, चर्चा यांचा मोठाच अडसर असतो. एक समृद्ध अडगळ म्हणा ना! म्हणून संघ कधीही शंकराचार्य, माधवाचार्य या घोर वादपटू धर्मसंस्थापकांचा उल्लेखही करत नाही. हिंदूंपैकी अशा विद्वतेचा जिथे उपहास, तिथे निधर्मी, पुरोगामी विचारवंतांचा काय पाड? मात्र धारदार व नेमके निर्भीड विचार माणसे हलवू शकतात, याची संघाला खात्री असल्याने तो माध्यमे-विद्यापीठे-महाविद्यालये-साहित्य-व्याख्यानमाला-ग्रंथालये यांवर प्रचंड दहशत उत्पन्न करण्यात जुंपलाय. काही ठिकाणी त्याला यश मिळालेय, परंतु ज्या साधनांचा वापर करून संघविचार फोफावला, तीच आता सत्याचा पाठलाग आणि सत्याची स्थापना करण्यात या बुद्धिवंतांनी हाती धरलीयत. त्यांना प्रतिसादही भरभरून मिळतोय.

एक बाब या प्रसंगी लक्षात येतेय. ती अशी की, सत्य या मूल्यावर ज्यांची मुळीच निष्ठा वा श्रद्धा नसते, ती माणसे लोकशाहीचा आधार घेऊन राज्यकर्ती बनतात आणि अखेर लोकांनी आम्हाला निवडलेय असे सांगत आपल्या बेगुमान व दुष्ट हेतूंची राजवट आणतात. कायद्याचे राज्य म्हणजे लोकशाही असे सांगत समाजाचे राज्य म्हणजेच लोकशाही असे ठरवून समाजाच्या आदिम प्रेरणांचे राज्य आपण चालवतोय असे ती भासवत राहतात.

बहुमत नव्हे बहुसंख्य हेच सत्य असा या नव राज्यकर्त्यांचा दावा असतो. धर्म व सत्य अभिन्न असतात, असाही या लोकांचा आग्रह असतो. धर्मापुढे लोकशाही, समता, स्वातंत्र्य, या गोष्टी फजूल असतात हे तेच ठरवून टाकतात. धर्मवर्तन हेच सत्यवर्तन हा त्यांचा नियम. येता-जाता ईश्वरी हवाले देत ते हे बिंबवू पाहतात की, हे जग ईश्वरांच्या ईच्छेने चालते आणि आणि त्या इच्छांचे प्रतिबिंब म्हणजे धर्म. सबब धर्म हाच मानवी जीवनाचा चालक असावा.

गांधीजी ईश्वर मानत. रोज प्रार्थना करत. पण ईश्वर व सत्य एक मानून गांधीजी इहवादी, भौतिक, मानवी सत्तेचा विचार मांडत. काही घडले की, ते आकाशाकडे बोट करत नसत. ईश्वर आणि सत्य यांची एकी करून गांधीजींनी समस्त बुवा व महाराज यांची अडचण करून ठेवलीय. कारण सर्वाधिक शोषण, फसवणूक आणि गुन्हेगारी धर्माच्या आधारेच होत असते.

आजचा सर्वांत मोठा बुवा प्रधानसेवक वाटतो. सत्याची व त्याची मैत्री नाही. प्रचारकालात सत्यावर काहीही उभारता येत नाही. खरे म्हणजे मार्केट इकॉनॉमीच्या युगात सत्य नावाची चीज सरकार, माध्यमे, बुद्धिवंत यांच्या ठायी शिल्लक कशी असेल, असाच प्रश्न पडतो.

जाहिराती आणि जनसपंर्क (पब्लिक रिलेशन्स) यांनी सत्य-असत्य यांत काही भेदच ठेवलेला नाही. सरकार व माध्यमे तर याच दोन प्रकारच्या प्राणवायूंवर तरतात. बाजार आणि सत्ता यांनी एकमेकांना काय बहाल केले असेल तर जाहिरात व जनसंपर्क यांच्या कला आणि कौशल्ये! चहा विकणारी व्यक्ती आपली यशोगाथा याच तर दोन आधारांवर लिहून जाते. अतिशयोक्ती, अतिरंजन, आधारहीन दावे म्हणजेच जाहिराती. खोटेपणा, अपप्रचार आणि उसने अवसान म्हणजे जनसंपर्क. विद्यमान सत्ताधारी तरबेज कशात आहेत तर यांत.

म्हणून सत्य विखंडित असते असे गृहितक आजच्या वर्तमानकाळ सिद्ध करतो. ज्याचा जनसंपर्क जास्त अन ज्याची जाहिरात खरी वाटेल असे वर्णन करणारी, ते सत्य. किंबहुना ज्याचा जनसंपर्क दांडगा अन ज्याच्या जाहिराती खऱ्याखुऱ्या तोच आजचा महात्मा!

.............................................................................................................................................

यशवंत मनोहर यांच्या ‘भारताचे क्रांतिसंविधान’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5154/Bharatache-Krantisanwidhan

.............................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Sachin Shinde

Thu , 31 October 2019

agadi yogya lihile aahe aajchi satya paristithi aahe hi...


Gamma Pailvan

Thu , 31 October 2019

जयदेव डोळे यांना काश्मिरी मुसलमानाची तडफड दिसते. पण याहून भीषण परिस्थिती काश्मिरी हिंदूंची आहे ती मात्र दिसंत नाही. काश्मिरी मुस्लिमांचे जीवितवित्त व अब्रू शाबूत आहे. काश्मिरी हिंदूंची मात्र तशी नाही. जयदेव डोळे यांचे डोळे फुटले आहेत. आणि निघालेत मारे सत्य शोधायला.

-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......