विज्ञाननिष्ठेची महत्ता आणि उपकारकता ‘भारतीय संविधाना’ने सांगितलेली आहे!
ग्रंथनामा - झलक
यशवंत मनोहर
  • भारतीय राज्यघटनेचं एक मुखपृष्ठ
  • Wed , 30 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यशवंत मनोहर

प्रसिद्ध कवी व लेखक डॉ. यशवंत मनोहर यांचे ‘भारताचे क्रांतिसंविधान’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

भारतीय संविधानाने महान जीवनमूल्यांचा आदर्श भारतातील सर्वच नागरिकांपुढे ठेवलेला आहे. ही मूल्ये सर्वांच्या हिताची आहेत. केवळ भारतातीलच नव्हे, तर एकूणच जगातील कोणाचेही अहित संविधानातील या महामूल्यांच्या प्रकृतीत बसत नाही. याच कारणासाठी दुनिया या मूल्यांना महान मूल्ये मानते. ही काळाला पुरून उरणारी, काळाला सतत नवनवे करणारी आणि मानवोपकारक जीवनाची निर्मिती करणारी मूल्ये आहेत.

ही मूल्ये संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार (अनुच्छेद १२ ते ३५), मार्गदर्शक तत्त्वे (अनुच्छेद ३६ ते ५१) आणि मूलभूत कर्तव्ये (५१ क) या भागात अंतर्भूत झालेली आहेत. ही सर्व मूल्ये वैश्विक आहेत. ती वैश्विक प्रज्ञांनी जगाला दिलेली नक्षत्रमूल्ये आहेत. संपूर्णच मानवी जीवनाच्या हिताचा विचार आपण करायला लागलो की, या महान मूल्यांपाशीच आपल्याला पोचावे लागते. या मूल्यांमध्ये जीवनातील कोणाच्याही अहिताला जागा नाही. कोणत्याही काळातील, कोणत्याही प्रदेशातील आणि कोणत्याही गटातील स्त्री-पुरुषांच्या अहितचिंतनाला या मूल्यांच्या वास्तूमध्ये प्रवेश नाही. ही पूर्णतः उजेडाची रचना आहे. या रचनेतून फक्त सर्वव्यापी हिताचा सुगंध ऐकायला येतो.

ही मूल्ये म्हणजे संपूर्ण विधायकता. संपूर्ण असीमता. संपूर्ण प्रज्ञान. संपूर्ण सम्यकता. संपूर्ण साकल्याची उज्ज्वलता. माणसांच्या मनांची पुनर्बांधणी ही या मूल्यांची उत्कट इच्छा आहे. ही कुणा व्यक्तीच्या, काही व्यक्तींच्या वा कुणा वर्गाच्या, कुणा देशाच्या हितसंबंधांची रचना नव्हे. सर्वच मानवजातीच्या हितसंबंधांचे संविधान असे या मूल्यांचे स्वरूप आहे. ही मूल्ये जातमूल्ये नव्हेत. ही मूल्ये धर्ममूल्ये नव्हेत. ही मूल्ये वर्गमूल्ये नव्हेत. या महान मूल्यांना अशा कोणत्याच सीमा नाहीत. ती मूल्ये जात्यतीत जीवनाचा आदर्श साकार करू इच्छिणारी मूल्ये आहेत. ही मूल्ये धर्मातीत जीवनाचा आदर्श प्रस्थापित करू इच्छिणारी मूल्ये आहेत. ती कोणत्याही वर्गाच्या हिताची मूल्ये नव्हेत, तर ती वर्गातीत मानवी जीवनाचे निर्माण करू इच्छिणारी मूल्ये आहेत. ही मूल्ये संपूर्णच मानवी जीवनाचे नवे व्यवस्थापन करू शकणारी मूल्ये आहेत. जीवनातील प्रत्येकच व्यक्तीच्या समान, स्वतंत्र आणि सतत प्रगमनशील हितसंबंधांची व्यवस्था या मूल्यांना हवी आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जात, धर्म, वर्ग अशी कुठलीही भिंत नसलेला मी माणूस आहे. माझ्यासाठी पृथ्वी ही एकसंध आहे. तिचे तुकडे झालेले नाहीत. माझ्यासाठी माणूसही एकसंधच आहे. त्याचे जाती, धर्म, वर्ग असे तुकडे झालेले नाहीत. एकसंध पृथ्वी, एकसंध माणूस म्हणजे ‘एलिनेशनमुक्त’ माणूसच या मूल्यांच्या नजरेत आहे. ही मूल्ये वैश्विक आहेत त्याचे हे कारण आहे. मी आदीही आणि अंतीही माणूस आहे. मी कुंपणातीत माणूस आहे. मी अखंड माणूस आहे, असे वाटणारा माणूस या मूल्यांच्या नजरेत आहे. ही मूल्ये महान मूल्ये आहेत, त्याचे हे कारण आहे. जगातल्या सर्वच देशांशी सहकार्य म्हणजे तेथील माणसांशीच सहकार्य करणे होय. या सहकार्यामागील अधिष्ठानभूत तत्त्व बंधुता आणि भगिनीता हेच आहे. माणूस बंधमुक्त व्हावा, त्याला मर्यादित करणाऱ्या सर्व चौकटी वितळून जाव्यात आणि माणूस अंतरिक्षासारखा सीमातीत व्हावा. माणसाच्या माणुसकीला कोणतेही किनारे नसावेत. कुठूनही बघा मी वैश्विकच आहे, असे प्रत्येकच माणसाला सांगता आले पाहिजे.

भारतीय संविधानाच्या इच्छेचाच हा आशय आहे. या महान वैश्विक मूल्यांच्या मुखाने हे संविधान बोलत आहे. म्हणून बाबासाहेबांच्या शब्दात असे म्हणावेसे वाटते की, “In our Constitution we have put forward the ideal of secular, socialistic Universality.” येथे ‘डेमॉक्रसी’ऐवजी मी ‘Universality’ हा शब्द वापरला. तो माझ्या विषयाची सर्वव्यापी इच्छा व्यक्त करण्यासाठीच केवळ वापरला आहे.

मूलभूत कर्तव्यांची नोंद बाबासाहेब आंबेडकरांनी एकावन्नाव्या अनुच्छेदामध्ये केलेली आहे. त्यातील एचमध्ये “to develop the scientific tempor, humanism and the spirit of inquiry and reform.” मला वाटते संविधानाला अभिप्रेत असलेल्या समाजवास्तूचा तात्त्विक पाया या अवतरणात आलेला आहे. बेस आणि सुपरस्ट्रक्चर या परिभाषेत बोलायचे झाले तर वरील अवतरणात पायाभूत किंवा बेसिक मूल्ये आहेत, असे म्हणता येईल. त्यात विज्ञाननिष्ठा आहे, चिकित्सा आहे आणि पुनर्रचनाही आहे. कारण चिकित्सेशिवाय विज्ञानदृष्टी संभवत नाही आणि जीवनाची पुनर्रचना चिकित्सेशिवाय शक्य नाही. हा तात्त्वज्ञानिक पाया इहवादाचा वा बुद्धिवादाचा आहे, आणि या सर्व पायाभूत मूल्यांचे नियंत्रकतत्त्व चिकित्सा हेच आहे.

अध्यात्माला चिकित्सा मान्य नसते. देवदैववादाला चिकित्सा मान्य नसते. म्हणून त्यानुसार जन्माला येणाऱ्या समाजरचनेला पुनर्रचना मान्य नसते. अध्यात्माला अभिप्रेत समाजरचनेचा प्रस्ताव स्थैर्य वा ‘जैसे थे’ हाच असतो. म्हणून विज्ञाननिष्ठेला, इहवादाला आणि बुद्धिवादाला वा चिकित्सेला अध्यात्माचा विरोध असतो. त्यामुळेच भारतीय संविधानाने या सामाजिक शाश्वततेला नकार दिलेला आहे. असा नकार देऊन विज्ञाननिष्ठेची महत्ता आणि उपकारकता संविधानाने सांगितलेली आहे.

विज्ञाननिष्ठा म्हणजे सतत प्रयोगशीलता. सतत पुनर्रचनाशीलता. सतत चिकित्साशीलता. या पायाभूत तत्त्वांवरच संविधानाने मानवी जीवनासाठी मानवतावादाची संरचना केलेली आहे. मानवतावाद हे माणसांमधील, माणसांच्या गटांमधील संबंधांची निश्चिती करणारे तत्त्व आहे. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये या मानवतावादाचा संक्षिप्त तपशील आहे. हाच तपशील बाराव्या अनुच्छेदापासून मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये या मार्गाने एकावन्नाव्या अनुच्छेदापर्यंत मांडला गेलेला आहे. म्हणजे विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद, चिकित्सा, पुनर्रचना हा पाया आणि त्यावरील मानवतावादी समाज हा इमला. हा मानवतावादही मग ‘रॅशनल’ होतो. मानवतावाद म्हणजे मानवी स्वातंत्र्याची, मानवाच्या सन्मानाची आणि मानवांमध्ये भगिनीत्वाची-बंधुत्वाची निर्मिती!

याचा अर्थ भारतीय संविधानाच्या नजरेत विज्ञाननिष्ठ लोकांचा, प्रज्ञावंत लोकांचा आणि परस्परांना मानवी सन्मान देणाऱ्या लोकांचा समाज आहे.

विज्ञान हे एक पद्धतिशास्त्र आहे. ते कायम पुनर्रचनावादी पद्धतिशास्त्र आहे. शास्त्रज्ञाची नवनिर्माणशील प्रतिभा एखादा अभ्युपगम मांडते. अभ्युपगमला आपण इंग्रजीत ‘Hypothesis’ म्हणतो. अभ्युपगम म्हणजे एखाद्या सिद्धान्ताची कल्पना! अभ्युपगमाची सत्यता सिद्ध करण्यासाठी अनेक निरीक्षणे नोंदवली जातात. निरीक्षणे सत्य असली तर अभ्युपगम सत्य ठरतो.

जे आहे त्याच्या पलीकडे जाणारे विज्ञान हे प्रकृतितः बंडखोरच असते. विज्ञान बंडखोर असते याचा अर्थ वैज्ञानिकाचे किंवा माणसाचे मनच बंडखोर असते. त्यामुळे माणूस या शब्दाचा अर्थ डबके असा कधीच होत नाही. माणूस या शब्दाचा अर्थ प्रवाहित्व असाच आहे. थांबत नाही, सतत वाहत राहतो आणि सतत पुढे पुढेच जात राहतो, असेच माणसाचे वर्णन करायला हवे. माणसाच्या जगण्यानेच माणसाला तर्कशील केले. जगताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करता करता माणूस तार्किक झाला. अडचणींनी आणि उणिवांनी त्याला बंडखोर केले. पुढे जाण्याच्या प्रवृत्तीनेच माणसाला शास्त्रज्ञ केले. कवी आणि वैज्ञानिक केले. अराजकात समाधानी असणारा माणूस कवी होत नसतो, वैज्ञानिकही होत नसतो. अधिक चांगल्या व्यवस्थेचा हव्यास, अधिक उपकारक रचनेचा हव्यासच माणसाला कवी करतो किंवा शास्त्रज्ञ करतो. तो गृहीतकाला वा अभ्युपगमाला अनेक निरीक्षणांच्या कसोट्या लावून तपासतो. सिद्धान्ताची पुनःपुन्हा तपासणी करतो. आपल्या चुका तो मान्य करतो. नवी निरीक्षणे उभी करतो. नवे पुरावे उभे करतो. वैज्ञानिकाला कोणतेही शब्दप्रामाण्य मान्य नसते. तो प्रयोगप्रामाण्यवादी असतो.

श्रद्धा म्हणजे पुरावा नसलेली समजूत. जिची पडताळणी करता येत नाही ती श्रद्धा आंधळी असणे अपरिहार्यच असते. हाती आलेल्या सिद्धान्ताला अंतिम मानणेही शास्त्रज्ञाच्या प्रकृतीत बसत नाही. एक अभ्युपगम शक्य झाला की, त्यातूनच नवे अभ्युपगम उगवत असतात आणि शास्त्रज्ञाला खुणावत असतात. सिद्ध झालेला कोणताही अभ्युपगम त्यामुळे त्याच्यासाठी शेवटचा कधीच नसतो. त्याचा हा अभ्युपगम वा शोध नेहमीच शेवटच्या शोधाच्या आधीचा असतो, कारण तो मुक्ततत्त्ववादी असतो. तो कधीही मूलतत्त्ववादी होत नाही. त्याचे विधान कधीही अंतिम विधान नसते, पण त्या त्या वेळचे त्याचे विधान सर्वात अन्वर्थक विधानच असते.

विज्ञानाचे हे पद्धतिशास्त्र आहे. हे पद्धतिशास्त्र अध्यात्माप्रमाणे वा देववादाप्रमाणे निश्चितार्थी नाही. म्हणजे confermist नाही. अनंत संभाव्यता त्याने गृहीतच धरल्या आहेत. विज्ञानाला ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, परलोक या गोष्टी अमान्यच आहेत. being and becoming’ असे विज्ञानतत्त्व आहे. being हणजे मानवप्राणी! हा मानव सतत घडण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया म्हणजे माणसाची नवनव्याने फुलण्याच्या शक्यतांचीच प्रक्रिया आहे. अपरिवर्तनीय काहीही नाही. सर्वच सतत बदलत आहे. याचा अर्थ माणूस म्हणजे सतत घडणशीलता. माणूस ही निर्मिती आहे आणि खुद्द माणूसही निर्मितीची एक अखंड प्रक्रियाच आहे.

इथे विज्ञान आणि इहवाद, विज्ञान आणि बुद्धिवाद इहवाद आणि पुनर्रचनाशीलता, विज्ञान आणि समता या गोष्टी एकत्र येतात. निदान भारतीय संदर्भात तरी धर्म, जाती आणि गरिबी-श्रीमंती या सर्वच गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत, पण विज्ञानाला ईश्वरही मान्य नाही आणि विषमताही मान्य नाही. विज्ञान अधिक पूर्णतेचा सतत शोध घेत चाललेले आहे. म्हणजे माणसाच्या परिपूर्णतेचा शोध हे विज्ञानाचे नीतिशास्त्र आहे, असे म्हणता येते.

मानवी जीवनातील खरी समस्या नैतिकतेचीच आहे. धर्म, ईश्वर, परलोक या मार्गाने निर्माण केली गेलेली नीती माणसाला दुय्यमत्व देते. त्याला परप्रकाशित आणि परावलंबी करते. माणसांमध्ये धर्मांचे समूह निर्माण करते. एकूणच माणसे जी धर्मांच्या गटांमध्ये विभागली नव्हती, ती माणसे धर्म वेगवेगळ्या गटात वाटतात. विभाजनाची ही प्रक्रिया परकेपणाच्या भिंती निर्माण करणारीच प्रक्रिया असते. हे करणारी सत्तासक्त माणसेच असतात आणि ते या विभाजनात त्यांच्या त्यांच्या ईश्वरांना सामावून घेतात आणि त्यांना आपल्या वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण करणाऱ्या मॅनेजरची भूमिका देत असतात.

तसेच वर्णांचे आणि जातींचेही आहे. वर्ण, जाती, उपजाती यांचे नियोजन हे वर्चस्व प्रस्थापनेसाठीच आकाराला आलेले नियोजन असते. हे नियोजन विज्ञानाच्या एकूण प्रकृतीत वा त्याच्या एकूणच पद्धतिशास्त्रात बसत नाही.

विज्ञान हे मानते की, मूल्यांचे आणि नीतीचे महत्त्व जाणण्याची तरतूद माणसात आहे आणि तशी क्षमता त्याच्यात आहे. विज्ञान मानवी जीवनाची निर्मिती, विश्वाची निर्मिती कशी झाली हे तर सांगतेच, पण विश्वामध्येही आणि माणसामध्येही सारखी स्थित्यंतरे कशी होत आहेत तेही सांगते. व्यक्तीच्या स्वायत्त व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून विचार करणे आणि या विचारामध्ये विकास घडवून आणणे ही विज्ञानाचीच प्रक्रिया आहे. विज्ञानाची म्हणजे विज्ञाननिष्ठ माणसाचीच ती केंद्रीय वृत्ती आहे. हा माणूस सारखा बदलत आणि विकसत आलेला आहे. निसर्गाने जे दिले ते त्याने केवळ टिकवून ठेवले असे नाही तर त्याने निसर्गाच्या मदतीने एक नवे, एक अनुकूल, अधिकाधिक चांगले जगता येईल असे विश्व निर्माण केले. समाजरचना त्याला निसर्गाने दिली नाही. ती त्याने निर्माण केली. निसर्गातल्याच असंख्य गोष्टी या माणसाने विज्ञानमनाने वेचल्या आणि त्यातून असंख्य नव्या गोष्टींची रचना तो करत आला. निसर्गाला अनुकूल करून घेत त्याने मानवी जीवनाचे सौंदर्यविश्व निर्माण केले. नीतीचे महत्त्व जाणणारा माणूसही या धडपडीतून साकार झाला. आपले जगणे विधायक, जगण्यायोग्य, सर्जनशील, शांततामय आणि सुरक्षित व्हावे यासंबंधीच्या त्याच्या इच्छाही प्रकट होत गेल्या. नीतीचा उगम या त्याच्या जीवन अधिक चांगल्या पद्धतीने जगण्याच्या गरजेत आहे. विज्ञानाने हे सांगितले की एकूणच मानवजातीचे, जौविक मूळ एकच आहे. निसर्गामधील इतर वस्तुंप्रमाणेच मानवप्राणीही अणूंमधूनच निर्माण झालेले आहेत आणि माणसाला केवळ बुद्धी आहे असे नाही तर त्याच्यात निसर्गतःच एक विवेकबुद्धी आहे. पृथ्वीच्या पाठीवरील सर्वच स्त्रिया आणि पुरुष हे भाऊभगिनी आहेत, हे तत्त्व विज्ञानाच्या या सूत्रांमधूनच आपल्याला मिळते आणि ते महत्तम नैतिकतेचे आधारभूत तत्त्व आहे.

समता, भगिनीता आणि बंधुता, स्वातंत्र्य, विवेकबुद्धी, पुनर्रचनाशीलता, धर्मातीतता, जात्यतीतता अशी ही विज्ञानाच्या पद्धतिशास्त्रातून संभवणारी नीती पूर्णतः इहवादी आहे. या नीतीत कुठेही ईश्वर नाही. आत्मा नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म आणि परलोक नाही. ती पूर्ण बुद्धिवादी आणि इहवादी नीती आहे.

ही नीती माणसाला सतत वाहत राहायला सांगते. ती माणसाला कुठेही गोठू देत नाही. त्याचे डबके होऊ देत नाही. ही नीती माणसाला कुठेही थांबू देत नाही. त्याला मूलतत्त्ववादी होऊ देत नाही. ही विज्ञाननीती निरंतर घडणशील नीती आहे. ती प्रयोगशील म्हणजे सतत पुनर्रचनाशील नीती आहे.

ही विज्ञाननीती अध्यात्माच्या वा धर्मांच्या नीतीपेक्षा माणसाला महान करणारी नीती आहे. त्याचे माणूसपण जपणारी आणि सतत नवनव्या पूर्णांकाकडे त्याला नेणारी ही नीती आहे. ही विज्ञाननीती मानवी बुद्धीच्या पूर्ण स्वातंत्र्याची नीती आहे. ही माणसाच्या साकल्याची नीती आहे आणि ती माणसालाच जीवनाचा एकमेव महानायक मानते. विचाराचे, जीवनाच्या प्रगतीचे हेच एकमेव द्वितीय केंद्र आहे, असे ती मानते. ही नीती कोणत्याही अर्थाने आणि कोणत्याही संदर्भात माणसाला परावलंबी, परप्रकाशित होऊ देत नाही. ही माणसाच्या स्वयंप्रकाशनाची आणि त्याच्या पूर्णत्वाचीही नीती आहे. ही नीतीच माणसाच्या बुद्धीचा आणि मानवाचा समान सन्मान करणारी नीती आहे.

माणसाला स्वयंप्रकाशित करणारी हीच नीती जगाच्या पाठीवर प्रथम बुद्धाने सांगितली आणि हीच नीती विश्वसौंदर्याची एक संपूर्ण नवी रचना जगाला देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितली. ही नीती पूर्णतः विज्ञाननिष्ठच आहे आणि भारतीय संविधानातही याच नीतीचा अजिंक्य आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडून ठेवला आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये वाढीला लावावा अशी संविधानाची इच्छा आहे आणि वैज्ञानिक दृष्टी लाभलेला माणूसच सामाजिक चौकटींच्या बाहेर प्रकृतितःच पडू शकतो आणि चौकटींच्या बाहेर पडलेला माणूसच खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक ठरू शकतो. परंपरेने त्याला दिलेल्या वा त्याच्यावर लादलेल्या चौकटी फेकणारा माणूसच मी पूर्णतः भारतीय आहे, असे म्हणू शकतो. म्हणजे माणूस म्हणून आपल्या स्वायत्ततेची प्रस्थापना करणारा माणूसच वा आपल्या बंधमुक्ततेची प्रस्थापना करणारा माणूसच आदीअंती सर्वार्थाने भारतीय ठरू शकतो. भारतीय नागरिक ठरू शकतो. एकावन्नावा अनुच्छेद म्हणतो त्याप्रमाणे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि वर्गीय भेदांच्या पलीकडे गेलेला माणूस भारतीय वा भारतीय नागरिक ठरू शकतो. हा भारतीय नागरिक परंपरेने दिलेल्या चौकटींच्या पल्याड गेलेला नागरिकच असतो. म्हणजे चौकटी तोडणे ही त्याची कृती संविधानाला अभिप्रेत कृतीच असते. ही त्याची क्रांतिकारी कृतीच असते. ही कृती घडल्याशिवाय तो बंधुभावाचे संविधानवर्तन करूच शकणार नाही. भारतीय संविधान बंधुभाव वाढीला लागावा असे म्हणते- त्याचे कारण, संविधानपूर्व काळात बंधुभावाची आणि एकोप्याची म्हणजे मानवी सौहार्दाची फार वाताहत झाली, असेही म्हणता येते. त्यामुळे बंधुभावाची आणि भगिनीभावाची प्रस्थापना व्हावी, अशी संविधानाची इच्छा आहे.

एकावन्नाव्या अनुच्छेदातच भारतीय संविधान पुनर्रचनाशील आणि वैज्ञानिक स्वभाव यांच्या निर्मितीची गरज प्रतिपादन करते. म्हणजे माणसे विचारांनी सतत वाहती राहावी. माणसांच्या मनांची डबकी होऊ नयेत. डबक्यांना कुठे जायचेच नसते. त्यांना एकाच ठिकाणी थांबायचे असते. त्यामुळेच त्यांना आटून जाण्याची शिक्षा मिळते. प्रवाह पुढे सरकत राहतो. प्रवाह पुढे सरकत राहतात आणि सागराला मिळतात. प्रवाह वाहते असतात, त्यामुळेच ते आपले रूपांतर सागरात करू शकतात. माणसे जेव्हा धर्म, भाषा, प्रदेश वा वर्गभेद यांच्या पल्याड जातात, तेव्हा ती भारतीय नागरिक होतात. भारतीयत्वाच्या महासागरात हे विसर्जन असते. आपल्या विघटनशीलतेचाच तो त्याग असतो. नद्यांनी आपल्या जुन्या ओळखींचे विसर्जन करून सागरमय होणे आणि भारतातील माणसांनी आपल्या जुन्या ओळखीचे विसर्जन करून भारतीय होणे, भारतमय होणे, या दोन्ही ठिकाणी प्रक्रिया एकच आहे. एकसंध होण्याची, खंडत्व टाकण्याची आणि अखंडत्व होण्याचीच ती प्रक्रिया आहे.

सर्वच मानवी प्राण्यांची निर्मिती अणूंपासून झाली आहे वा सर्व मानवप्राण्यांचे मूळ एकच आहे, हे विज्ञानाचे सांगणे हे एकत्वाचे सूत्रच आहे. ते समतेचे आणि जैव ऐक्याचेच सूत्र आहे. ते एकसंधतेचेच सूत्र आहे. विज्ञानाचे हे एकसंधतेचे सूत्रच संविधान भारताच्या एकसंधतेचे सूत्र म्हणून पुरस्कारते असे म्हणता येईल. संविधानातील, त्याच्या उद्देशपत्रिकेतील, मूलभूत अधिकारातील, मार्गदर्शक तत्त्वांमधील आणि मूलभूत कर्तव्यांमधील नीती ही विज्ञाननीतीचाच आविष्कार आहे आणि Reform म्हणजे सतत पुनर्रचनाशीलता ही जीवनाला महान करणारी, जीवनाला सतत प्रवाही ठेवणारी नीती ही विज्ञाननीतीचाच अनुवाद आहे, असे आपल्याला म्हणता येईल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नीतीचाच आविष्कार राष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री यांनी घ्यावयाच्या शपथेच्या प्रारूपातून म्हणजे बाबासाहेबांच्या भूमिकेतून साकार झाला आहे. संविधान सभेत, कामथ, महावीर त्यागी, तिरुमलराव, मुन्शी, ताजुमल हुसेन यांनी ईश्‍वराच्या नावाने शपथ घ्यावी, अशी चर्चा केली. सर्वांची इच्छा ईश्वराच्या नावाने शपथ घ्यावी अशी होती. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेत २७ डिसेंबर १९४८ रोजी पुढील भूमिका मांडली. ती भूमिका अशी -

“मसुदा समितीने परमेश्वराचा उल्लेख केला नाही याचे कारण असे आहे की, परमेश्वराबद्दल निरनिराळ्या धर्मांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. ख्रिश्चन व मुसलमान यांच्या मते परमेश्वर ही कल्पनाच नसून प्रत्यक्ष नियामक शक्ती आहे. परंतु हिंदु तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता ‘ईश्वर’ व ‘परमेश्वर’ या एका अमूर्त कल्पनेचा उल्लेख आहे. कदाचित माझे म्हणणे बरोबर नसेल. परमेश्वर याचा अर्थ हिंदू तत्त्वज्ञान शक्ती असा करीत नाही. ती शक्ती ब्रह्मा, विष्णू, महेश व इतर नावाने ओळखली जाते. तेव्हा परमेश्वराचा उल्लेख करण्याच्या बाबतीत नेमकी कोणती गोष्ट उल्लेखावी हा प्रश्‍न पडल्यामुळे ती टाळली. माझे स्वतःचे मत असे की, राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ नैतिक भावनेने घ्यावी...”

म्हणजे विज्ञाननिष्ठ आणि प्रयोगशील तत्त्वज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ईश्वराच्या नावाने शपथ घ्यायला संमती नव्हती. शपथ नैतिक भावनेने घ्यावी, ही त्यांची भूमिका संविधानातील सेक्युलॅरिझमचा सन्मान करणारी होती.

पंचविसाव्या अनुच्छेदात धर्माचे आचरण करण्याचे आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य अनिर्बंध म्हणजे मोकाट स्वातंत्र्य नव्हे. याचा अर्थ मनात येईल तसे आपल्या धर्माचे आचरण आणि मनात येईल, तसा धर्माचा प्रसार कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. या स्वातंत्र्याचे स्वरूप आणि त्याच्या मर्यादा याच अनुच्छेदात सांगितल्या आहेत. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येईल, असे धार्मिक आचरण कोणालाही करता येणार नाही. समाजातील नीतिमत्तेला कोणत्याही प्रकारची इजा होईल, असे अनिर्बंध धार्मिक आचरण कोणालाही करता येणार नाही आणि आरोग्याला धोका निर्माण होईल असे धार्मिक आचरण कोणालाही करता येणार नाही. याचा अर्थ सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य धोक्यात येईल असा धर्मप्रसारही कोणाला करता येणार नाही. संविधान ज्या सामाजिक सुव्यवस्थेचा, नीतीचा आणि स्वास्थाचा विचार मांडते त्या सर्वच गोष्टींचा आशय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतून मूलभूत अधिकारातून, मार्गदर्शक तत्त्वांमधून आणि मूलभूत कर्तव्यांतून स्वच्छपणे आलेला आहे. शिवाय हा सर्व आशय सदसद्विवेकावर आधारलेला आहे. याच सदसद्विवेक बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेतलेली शाश्वत मूल्ये भारतीय संविधानात आहेत.

या मूल्यांच्या सन्मानासाठी म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी, नीतीसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी शासनाला कोणताही कायदा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ऐहिक जीवनाच्या सुव्यवस्थेसाठी आणि नीतीसाठी संविधानाने कायद्याला सर्वोच्च मानले आहे. धर्माला सार्वजनिक जीवनातून काढून व्यक्तिगत वा कौटुंबिक चौकटीत बंदिस्त केले आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 31 October 2019

आयशप्पत काहीही मनमानी लिवलंय. म्हणे अध्यात्मास चिकित्सा मान्य नसते. Who told you all that crap ? अध्यात्मात पदोपदी चिकित्सा करावी लागते. इतकी की पुढे हीच चिकित्सक वृत्ती अंगवळणी पडते. तिलाच धर्म म्हणतात. विज्ञान आणि धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अथ तो ब्रह्मजिज्ञासा हे सुप्रसिद्ध ब्रह्मसूत्र लेखकास ठाऊक नाही असं दिसतंय.

बाकी, घटनेतल्या विज्ञानाविषयी जे लिहिलंय तो निव्वळ कल्पनाविलास आहे. लेखात जी मूल्ये म्हणून सांगितली आहेत ती अशी : पूर्वपीठिका ( = उद्देशिका), मूलभूत अधिकार (अनुच्छेद १२ ते ३५), मार्गदर्शक तत्त्वे (अनुच्छेद ३६ ते ५१) आणि मूलभूत कर्तव्ये (५१ क). यापैकी पूर्वपीठीका अतिशय छोटी आहे. तिचं काम घटनेचं बोधशोधन (= interpretation) करणे हे आहे. तिचा मानवी मूल्यांशी थेट संबंध नाही. नंतर येतात ते मूलभूत अधिकार. हे सरकारवरील निर्बंध आहेत. त्यांच्यातून सामान्य माणसाला काहीच मार्गदर्शन होत नाही. तीच गोष्ट मार्गदर्शक तत्त्वांची. ही तत्वं शासनास मार्गदर्शक आहेत, जनतेस नव्हे. जनतेला मार्गदर्शक असलेला घटक म्हणजे ५१ मधली मूलभूत कर्तव्यं. पण हा अतिशय त्रोटक भाग आहे. यांत जनतेच्या कर्तव्यांकडे मोघम निर्देश आहे. यांतलं विज्ञानाशी संबंधित कर्तव्य म्हणजे to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform . इतकाच घटनेचा आणि विज्ञानाचा संबंध आहे. बाकी सर्व लेखकाचा कल्पनाविलास आहे.

असो.

शब्दप्रामाण्याविषयी लेखकाचा बराच गैरसमज झालेला दिसतोय. लेखकाच्या मते निरंतर नवनवे अभ्युपगम शोधणे व त्यांची खातरजमा करणे हे वैज्ञानिकाचं लक्षण आहे. तर अभ्युपगम ही संकल्पना हा एक प्रकारचा शब्दंच आहे. विज्ञान हे जे पद्धतिशास्त्र आहे ते पद्धतिशास्त्र हादेखील एक प्रकारचा शब्दच आहे. ही पद्धती स्पष्ट शब्दांत मांडवी लागते. त्यामुळे शब्दप्रामाण्य मागील दाराने आतमध्ये घुसतंच. निरंतर नवनवे अभ्युपगम निर्मिले तरी वैज्ञानिक प्रक्रिया ( = scientific process) तीच असते. जो स्थिर भाग आहे तो शब्द!

असो.

इतकी तिक झाल्यावर शेवटी हे सांगायला हरकत नाही की लेखकाने वापरलेली अभ्युपगम ही hypothesis ला प्रतिशब्द म्हणून योजलेली संज्ञा आवडली.

-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......