दोन चाकांवरून दोन टोकांपर्यंतची माणसं वाचणारी माणूसवेडी मुलगी!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सुनील इंदुवामन ठाकरे
  • स्नेहल वानखेडे
  • Tue , 03 January 2017
  • पडघम स्नेहल वानखेडे Snehal Wankhede पॉझिटिव्ह जिनी Positive Genie माणूस वाचणारी People Reader

“बेटी तुम पढ़ी लिखी हो. इसलिए यहा तक नागपूर से मोपेड से पहुँची. यहा पर सिर्फ आठवी कक्षा तक ही पढ़ाई होती है. इन्शाल्लाह तुम्हारा सफर कामयाब रहे, तुम आगे बढो.” कारगील जवळील हुन्नरमान गावातील ८० वर्षांच्या आजोबाचं मनोगत ऐकून स्नेहल अंतर्मुख झाली. काहीतरी वेगळ्याच चवीचा खारटसा चहा, पोळ्या असं थोडंसं वेगळं, पण निर्लेप आदरातिथ्य स्वीकारताना स्नेहल आजोबांना वाचत होती. आजूबाजूच्या लोकांना आपल्या बोलक्या डोळ्यांनी टिपत होती. त्यांची मन व मेंदूच्या शूभ्र कागदांवर पक्की नोंद घेत होती.

गणवीर व सरोज वानखेडे दाम्पत्याची २८ वर्षीय कन्या, स्नेहल नागपूरवरून मोपेडने पटनी स्टॉप-सोनमार्ग-झोझिल्ला करत कारगील सीमेपर्यंत पोहचली होती. निसर्गप्रेमी रानात पक्षी, प्राणी वगैरे वाचत भटकतात, तशीच स्नेहल २०१५ पासून माणसं वाचत फिरत आहे. तेही मोपेडवरून. नागपूरमध्ये बँक ऑफ इंडियात मार्केटिंग मॅनेजर असलेल्या स्नेहल वानखेडेचा 'दोन चाकांवरून दोन टोकांवरचा' हा सफरनामा कौतुकास्पद आहे!

फुलेच वेचायची असं ठरवून परडी घेऊन निघालेल्या व्यक्तीला काटे व खडक लागतच नाही, असं नाही. मात्र डोळ्यांमध्ये फुलांनी भारलेली ओढ असताना, नजरेत फक्त फुलंच फुलं असताना काटे, खडक तितकेच सहज ‘नजरअंदाज’ होतात. फुलांचाच गंध इतका प्रभावी ठरतो की, बाकी इतर सर्व दर्प नाहीसे होतात. स्नेहल घराबाहेर पडते फक्त माणसं वाचायला. मानवी प्रवृत्तींमधील अभिजात निरागस सौंदर्य टिपायला. बस, कार, रेल्वे, विमान वगैरे साधनं असली की, माणसांना फक्त खिडकीतून पाहता येतं. मात्र मोपेड घेऊन लांब भटकंतीवर निघालं की, मानवतेच्या सताड उघड्या प्रवेशदारातून थेट माणुसकीच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येतं, हा स्नेहलचा अनुभव आहे. मानवी मनाच्या गावात भटकताना औपचारिकतेच्या स्पीडब्रेकर्सना ती लीलया टाळते. एखाद्या झोपडीवजा टपरीवर निवांत चहा पिते. त्याच्या गोडव्यासह तिथल्या संस्कृतीचा, राहणीमानाचा, स्थानिक आंतरसंबंधांचा, प्रादेशिक आदरातिथ्य आस्वाद घेते. एखाद्या गायकाच्या जबरदस्त ‘हरकती’वर ‘वाह’ अशी अगदी आतून रसिक दाद द्यावी, तशी आपल्या प्रवासातील कुठल्याही पात्राच्या रसिक हरकतीवर दाद देते. एखाद्या ‘अम्मी’, ‘मौसी’ किंवा ‘चाचू’कडून किस्से, कहाण्या ऐकताना ती भराभर त्या कहाण्यांच्या पाकळ्यांनी आपली मनाची ओंजळ भरून घेते. त्या मातीचा, संस्कृतीचा गंध प्राशन करते व स्वतः सुगंधीत होते, इतरांना करते!

स्नेहल खूप सकारात्मक आहे. पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे काळ्याकुट्ट काळोखातील हातामध्ये दिवा घेऊन उभ्या असलेल्याला ती ताकदीने शोधून काढतेच. आपल्या मोपेडला ‘कीक’ मारून निघते ती थेट एका अनोख्या विश्वाच्या प्रवासाला. एखाद्या ध्यानस्थ साधकासारखी तिची ‘मेडिटेशन’ प्रक्रिया सुरू होते. वेगवेगळ्या मनोसंस्कृतीच्या खोलात जाता जाता तिचं मनोविश्व आणि ती जिथे भटकायला निघाली ते विश्व हे दोन नद्यांच्या संगमाप्रमाणे एकत्र येतात. या धो धो प्रवासात तीच एक प्रवास होते. प्रवाह होते. तिरांवरच्या दोन्ही संस्कृतींचं सुख घेत, सुखावत ती पुढे पुढे वाहते. चांगुलपणाचा चष्मा लावून निघालेली स्नेहल सर्व उत्तमोत्तम टिपत पुढे जाते. जग चांगल्या लोकांचंच आहे. वाईट असतीलही काही; पण चांगल्या लोकांची संख्या नक्कीच जास्त आहे, असा तिचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. अल्लादिनच्या जादूच्या दिव्यातील ‘जिनी’सारखा तिच्या मनाचा व मेंदूचा एक कोपरा तिने जपून ठेवला आहे. ती आपल्या त्या आतील ‘पॉझिटिव्ह जिनी’ला नेहमी सकारात्मक आदेश देते. तोदेखील आपल्या ‘आका’च्या आदेशांचे तेवढ्याच सकारात्मकतेनं पालन करतो.

जबलपूर-भैसाघाट येथील ‘निदान’ वॉटरफॉलपर्यंत तिला जायचं होतं. परंतु तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला तिथंच थांबवलं. खाली फक्त मुलंच आहेत, त्यात ही एकटी मुलगी असल्याने स्नेहलला मनाई करण्यात आली. ‘‘व्हीव पॉइंट’वरून बघ’ असा तांत्रिक सल्ला तिला मिळाला. पण तिच्या हुकुमात असणाऱ्या तिच्या मनातील ‘पॉझिटिव्ह जिनी’ने पुन्हा तिच्या आदेशाचं पालन केलं. काही महिला सोबतीला मिळाल्या आणि तिची इच्छा पूर्ण झाली. तिथल्या सुरक्षारक्षकांना तिचं फारच कौतुक वाटलं. पुढे ‘नजारा’ वॉटरफॉलपर्यंतचा प्रवास धबधब्यासारखाच ‘धो धो’ होता. या प्रवासात अनेक चित्तथरारक अनुभवांनाही तिने आपल्या ‘स्टाईल’ने सांभाळलं. हाताळलं. अचानक आलेल्या पावसात कुठेतरी आडोसा घ्यावा, पाऊस अनुभवावा, पुढे जावं असं कितीतरी वेळा झालं. मनाली व चंदीगडच्या प्रवासात ती तीन अपघातांतून वाचली. पण चौथ्यांदा मात्र मनाली ते चंदीगड मार्गावरील अपघात तिला टाळता आला नाही. पायात रॉड टाकावा लागला. तीन महिने पूर्ण विश्रांतीनंतर थोडीशी लंगडत राहिली ती, पण हा अपघात तिच्या शरीराला झाला; तिच्या मनाला नव्हे. तिच्यातला ‘पॉझिटिव्ह जिनी’ आजही पुढच्या प्रवासाच्या आज्ञेच्या प्रतीक्षेत आहे.

झोझिल्ला पास हा अत्यंत धोकादायक  समजला जातो. तिथला अनुभव सांगताना स्नेहल पूर्ण शहारली होती. पम्मन ब्रिजवरून गाडी चालवताना जो आनंद, जी गार वाऱ्याची झुळूक तिने अनुभवली होती, तिचा ‘फील’ तिला अजूनही आहे. स्थानिक लोकांना या ‘छोकरी’चं फार कौतुक वाटतं. ते तिला प्रेरणा देतात. सदिच्छा देतात. सद्भावना व्यक्त करतात. स्नेहललादेखील या सर्व लोकांना पुन्हा एकदा भेटावंसं वाटतं. भारत-पाकिस्तानच्या सीमा प्रदेशापर्यंत ती जाऊन आली. पाहून आली. व्हॉटस्अॅप, फेसबुक व इतर आभासी विश्वांपेक्षा प्रत्यक्ष जगणं फारच मोठं आणि आशादायी असल्याचा तिचा व्यक्तिगत अनुभव आहे.

भारताचं दुसरं, दक्षिण टोक कन्याकुमारी येथील ‘रोड एण्डस् हियर’ या फलकापर्यंत तिची मोपेड जेव्हा विसावली, तेव्हा ती पूर्ण सुखावली. रोमांचित झाली. जगजेत्याची चमक तिच्या डोळ्यांत तरळली होती. बाईकर्सचं स्वप्नतीर्थ म्हणजे खरदुंगला. जगातील ‘हायेस्ट मोटरेबल रोड’पर्यंत तिने स्वत:ला पोहचवलं. कन्याकुमारी, हैद्राबाद, बेंगरूळू, चित्रदुर्ग, गोवा, पुणे अशा अनेक स्थळांना आपल्या मोपेडने ती भेटून आली.

ती हिमालयादी अत्यंत डोंगराळ, दुर्गम प्रदेशात मोपेडने जाते. स्थानिकांना तिचं फार कौतुक वाटतं. ती माणसं टिपत जाते. संस्कृती टिपत जाते. जगणं टिपत जाते. जगण्यातील सहजता टिपत जाते. प्रत्येक थांब्यावरून ती तिथल्या संस्कृतीचा गंध वेचते. मनाच्या कुपीत जपून ठेवते. लोकांच्या छोट्या छोट्या हालचाली, क्रिया, प्रतिक्रिया व बरंच काही मधमाशीने मध गोळा करावं तसं सारखं गोळा करते. एकेका कहाणीला प्रवासाच्या धाग्यात ती बांधत जाते. ‘स्पष्ट बोला नि मोकळे व्हा’ हे तिचे तत्त्व. ती कधीच आपल्या कार्यालयात खोटं बोलून भटकंतीला निघाली नाही. सत्यावर तिचा प्रचंड विश्वास आहे. या प्रवासात तिने भौगोलिक व मानसिक खाचखळगे जवळून अनुभवलेत. ती खूप रोमांचित होते तिच्या प्रवासात तिने वेचलेल्या कहाण्या शब्दांच्या परडीत ओतताना. तिचा आत्मविश्वास तिच्या वाणीतून, देहबोलीतून झळाळतो. पण हीच स्नेहल तिने लावलेले झाडं कुणीतरी तोडले म्हणून खूप भावनिक होते. तिचे डोळे पाणावतात त्या रोपट्यासाठी. ५ जून २०१६ पासून ती दर रविवारी नागपूरला तिच्या परिसरात एक झाड लावत आहे. वृक्षारोपणाचा उपक्रम ती नियमित राबवण्याचा प्रयत्न करत आहे.

ती म्हणते की, तिने लोकांना ‘जज’ करणं सोडलं; किंबहुना या भटकंतीमुळेच ते आपोआप बंद झालं. प्रवास करणं, भटकणं सदैव उत्तम. प्रवाशाला कुणी जात विचारत नाही. कुणी धर्म विचारत नाही. ती म्हणाली एवढंच नव्हे तर कुणी नावदेखील विचारत नाही. कुणी विचारलंच तर ‘कुठे जायचंय?’ किंवा ‘कहाँ जाना है?’ एवढंच. त्यातही विचारणारी पुढील व्यक्ती ध्येयाकडे अंगुलीनिर्देश करून वाट दाखवतो. एक गोड स्मित देऊन कृतज्ञता व्यक्त होते. ‘पोरीबाळीची जात आहे, एकटी जाऊ नकोस...’ असले स्पीडब्रेकर्स तिच्या निश्चयाच्या हायवेवर तिच्या कुटुंबियांनीदेखील कधीच लावले नाहीत. हुन्नरमान गावातील  त्या आजोबांनी खूप मोठी गोष्ट सांगितली होती- ‘पोरी शिकलीस म्हणून तू यशाच्या प्रवासाला निघालीस. एकटीच उंच आकाशात भरारी घेऊ शकते!’

s.induwaman@gmail.com

Post Comment

Nivedita Deo

Tue , 03 January 2017

khoop chan


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......