जोर का धक्का धीरे से लगे...
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • भाजप, शिवसेना, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
  • Wed , 30 October 2019
  • पडघम राज्यकारण भाजप BJP शिवसेना Shiv Sena देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरद पवार Sharad Pawar

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका जाहिरातीचा आधार घेत सांगायचं झाला, तर राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ महायुतीला आणि त्यातही विशेषत: भाजपला ‘जोर का धक्का धीरे से लगे...’ असा आहे. जनतेनं पुन्हा सत्ता स्थापनेचा कौल तर दिलाय, पण भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांचं विधानसभेतील संख्याबळ लक्षणीय कमी करत धक्का आणि काही इशारेही दिलेले आहेत.

आमचा विजयाचा ‘स्ट्राईक रेट’ खूपच चांगला आहे, असा दावा मावळते आणि भावी (!) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. याचा अर्थ अजून तरी त्यांची या निकालानं दिलेला इशारा समजून घेण्याची किमान (जाहीर तरी) इच्छा नाही असाच होतो. कारण टक्केवारी नेहमीच वास्तवाचं निदर्शक नसते किंवा ते समजून घेणं जरा क्लिष्ट असतं. म्हणजे एक लाखाच्या पाच टक्के पाच हजार तर दहा लाखाच्या पाच टक्के पन्नास हजार होतात. भाजपच्या विजयाचा स्ट्राईक रेट जरी वाढून सत्तर टक्के झाला असला तरी एकूण १७ जागा कमी झालेल्या आहेत, याचा विसर फडणवीस यांना पडलेला आहे किंवा ते पुन्हा सत्ता काबीज करण्यात यश मिळाल्यानं आत्ममश्गुल तरी झालेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे.

राज्याच्या सर्व भागात आम्हाला (म्हणजे भाजप आणि शिवसेनेला) जागा मिळाल्या आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. मात्र या दाव्याची दुसरी बाजू, राज्याच्या सर्वच भागात कोकण वगळता भाजप आणि सेनेच्या जागा कमी झालेल्या आहेत अशी आहे, हे विसरता येणार नाही. या प्रतिपादनाच्या आधारासाठी आकडेवारी देतो. कंसातील आकडे २०१४च्या विधानसभेतील संख्याबळाचे आहेत.  

मुंबई : भाजप- २४ (२४), शिवसेना- २० (२१)

कोकण : भाजप- ३  (१), सेना- ९ (७)

पश्चिम महाराष्ट्र : भाजप- १२ (१७), सेना- ० (४)

विदर्भ : भाजप-  २९ (४४) , सेना- ४ (४)

मराठवाडा : भाजप - १६ (१५), सेना- १२ (११)

उत्तर महाराष्ट्र : १३ (१४), सेना- ६ (७)

दक्षिण महाराष्ट्र : भाजप- ८ (८), सेना- ५ (९)   

या निवडणुकीने दिलेले इशारे दोन पातळीवरचे आहेत. पहिला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, तर दुसरा भाजपला आहे. एक बाब आधीच स्पष्ट करतो, देवेंद्र यांच्या रूपाने महाराष्ट्राला एका चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, पण त्या चांगल्या निर्णयाचे लाभ लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचलेले नाहीत. लाभ लोकांपर्यंत पोहोचल्याचे नोकरशाहीने तयार केलेले कागद दावे म्हणून देवेंद्र फडणवीस सादर करतात, पण ते दावे  वास्तव नाहीत. जनतेला लाभ मिळाल्याचे कोणतेही अवाजवी दावे करणं देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे टाळलं पाहिजे. समृद्धी मार्ग भ्रष्टाचाराचा पथ झालेला आहे, कर्जमाफीचे चुकारे, न वाढलेला रोजगार अशी अनेक या अपयशाचं ठसठशीत उदाहरणं आहेत.

विरोधकांना नामोहरम करण्याचे देवेंद्र फडणवीस  (आणि भाजपचे) कारनामेही लोकशाहीला पूरक नाहीत. नेहमी विरोधकांच्या कुंडल्या मांडून डाव उलटवण्याचे सांकेतिक समाधान देणारे टाळ्याखाऊ उद्योगही देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे बंद करायलाच पाहिजेत. आधी आणि निवडणुकीत विरोधकांना तुच्छ लेखण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्नही सुसंस्कृतपणात बसणारे नव्हते. दुसऱ्याची रेष खोडून आपली रेष मोठी होत नसते, तर आपलीच रेष वाढवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. भाजप आणि सेनेने विरोधी पक्षांतून फोडलेल्यांपैकी २८ जणांना उमेदवाऱ्या दिल्या. त्यापैकी तब्बल १७ जण निवडणुकीत पराभूत झाले. हा स्ट्राईक रेट ६०च्या किंचित वर आहे. शिवाय केवळ सत्तेसाठी येणाऱ्याना संघ आणि भाजपमधील निष्ठावंत पाठिंबा देतील, हे गृहीत धरलं गेलं. त्यामुळे ‘केडर’मधले लोक नाराज झाले. अशा नाराजांनी या वेळी भाजपला मतदान करणं टाळलं. भाजपला मतदान न करणाऱ्या फडणवीस यांच्या नागपुरातलीच अशी किमान पन्नास नावं मी सांगू शकतो.  

आणखी एक मुद्दा म्हणजे या राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री कार्यालयाला समांतर अशी यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांनी उभी केली आहे किंवा त्यांच्या मूक संमतीनं ती कार्यरत आहे आणि त्यामुळे नोकरशाहीत अस्वस्थता आहे. ही समांतर यंत्रणा आणि मुख्यमंत्री यांच्याच हातात सर्व सत्ता एकवटली आहे. या समांतरमधले काही जण ‘प्रति’मुख्यमंत्री झालेले आहेत. लोकशाहीत सत्तेचं विकेंद्रीकरण अपेक्षित असतं. सत्ता प्रभावीपणे राबवण्यासाठी मंत्री तसेच नोकरशाही असते, याचा विसर ही समांतर यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांना कसा पडलेला आहे, याच्या अनेक (किस्से नव्हे!) कथा चांद्यापासून बांद्यापर्यंत ऐकायला मिळतात. संबधित मंत्र्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले जातात असंही समोर आलेलं आहे. म्हणजे मंत्री, नोकरशाही आणि जनता या तिघांनाही गृहीत धरलं जात आहे. कामाची ही शैली देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समांतर यंत्रणेनं बदलायला हवी. या अशा समांतर यंत्रणेनेच आजवर अब्दुल रहेमान अंतुले ते अशोक चव्हाण अशा अनेक अनेकांचे बळी घेतलेले आहेत, याचा विसर देवेंद्र फडणवीस यांनी पडू देऊ नये (च).  

या निवडणुकीत सेनेनं भाजपचे आणि भाजपनं सेनेचे उमेदवार पडण्यासाठी बंडखोरांना रसद पुरवल्याच्या घटना किमान १८-२० तरी मतदारसंघात घडल्या आहेत. स्वबळावर सत्ता मिळवण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या पायी या उठाठेवी करण्यात भाजप जास्त म्हणजे किमान १२ मतदारसंघात आघाडीवर होता. जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांचा झालेला पराभव याचंच निदर्शक आहे. मी ज्या कॉलनीत राहतो, तिथेही भाजप आणि संघाचे स्थानिक लोक भाजपच्या बंडखोराचा म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्यासाठी आलेले होते! बीडलाही असंच घडलं. ठिकठिकाणी युती धर्म वेशीला टांगला गेल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी होण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी विसरू नये.

राजकारणात अस्मितेचे प्रश्न उन्मादी झाले की, नेहमीच स्थानिक प्रश्न आणि जनहित दुय्यम ठरतं. मूलभूत अर्थकारणाकडेही त्यामुळे दुर्लक्ष होतं, मंदीच्या झळा जाणवू लागतात, तसंच भाववाढ होते, बेरोजगारी वाढते. भाजप सत्तेत आल्यापासून देशाच्या आणि राज्याच्याही राजकारणात अस्मिता टोकदार आणि कळीदार झालेल्या आहेत. त्याच्या झळा आता सामान्य माणसालाही चटके देऊ लागल्या आहेत. राममंदिर, घाईघाईत आणला गेलेला सेवा आणि वस्तू कर, नोटाबंदी, कलम ३७०, हे त्यातले काही अस्मितेचे मुद्दे आहेत. कलम ३७० रद्द करणे यातील देशाच्या एकात्मतेची भावना बाजूला सारत उन्मादी अस्मिता भडकवण्यात आलेली आहे.

शिवाय लोकशाहीत विरोधी पक्ष असायलाच हवा याचा विसर पडत चाललेला आहे. विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते कसे संपवता येतील यासाठी जाणीवपूर्वक सुडाचे प्रयोग (यात मी पी. चिदंबरम यांचा अपवाद करेन) भाजपकडून केले जात आहेत. खऱ्या-खोट्या चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी निवडणुकीचा मुहूर्त साधला जात आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही विधानसभा निवडणुकात जनतेने याविरोधात मतप्रदर्शन केलं आहे. फरक इतकाच की महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी ‘जोर का धक्का धीरे से’ देत दिली आहे.  

‘चॅम्पियन’ शरद पवार! 

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेत भारतीय संघानं फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व कौशल्य अशा सर्वच आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेला नमवलं. भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीनं केलेलं असलं तरी मालिकावीर मात्र रोहित शर्मा ठरला. तसंच या विधानसभा निवडणुकीचं झालंय. सत्ता स्थापनेचा कौल जरी भाजप-सेनेला मिळाला असला, तरी ‘चॅम्पियन’ मात्र ठरले आहेत ते शरद पवार! 

अशात शरद पवार यांच्याबद्दल ‘शेर कभी बुढा नही होता’ आणि ‘वनराज सिंह कधी म्हातारा होत नाही. सॅल्यूट टू शरद पवार!’ अशा दोन कमेंट समाजमाध्यमांवर केल्यावर भाजप समर्थकांनी मला खूपच ट्रोल केलं. हे ट्रोल्स शिकागो ते चंद्रपूर अशा पट्ट्यात विखुरलेले आहेत. एकारलेल्या गडद रंगाचे चष्मे घालून लिहिणं माझ्याकडून होतं नाही. मी आक्रमक असलो तरी आक्रस्ताळेपणा आणि आततायीपणा यातल्या सीमारेषा मला ठाऊक आहेत. एक लक्षात घ्या मी विवेकवादी आहे. कुणाचाही भाट नाही. ज्याचं जे चांगलं त्याचं कौतुक आणि चांगलं नाही, त्यावर टीकास्त्र मी सोडतो. देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावर मी असंख्य वेळा टीकास्त्र सोडलेलं आहे, तरी ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्र विधासभा निवडणुकीचं एकहाती नेतृत्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि या वयात तेही असं प्रकृती अस्वास्थ्य असताना केलं, त्याला तोड नाहीच. कुणा एकाचा एक सॅल्यूट कमी पडावा, असं शरद पवार यांचं हे स्तिमित करणारं कर्तृत्व आहे!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेला होता. त्यात शरद पवार यांचा तर नातू पार्थ पवार याचाही पराभव झाल्याची नामुष्की पदरी पडलेली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतराची लाट आलेली होती. पवार कुटुंबीयांचे आप्तजनही त्यात होते. राष्ट्रवादीत पवार कुटुंबीय आणि दोन चार पाटील एवढेच लोक उरतात का, अशी स्थिती होती. अनेक पाहण्या आणि माध्यमांच्या पिसाटलेपणाच्या बळावर भाजपला स्वबळावर सत्तेची स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागलेली होती. विरोधी पक्षांसाठी वातावरण पूर्णपणे हतोत्साहित करणारं होतं. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार असं निराशेचं मळभ दाटून आलेलं होतं... त्या परिस्थितीत शरद पवार केवळ एकटेच लढलेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही लढण्याची प्रेरणा दिली आणि त्यामुळेच या दोन्ही पक्षांना नवसंजीवनी मिळाली याबद्दल कोणतीच शंका नाही!

त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा तिरस्कार, समर्थक व्हा किंवा विरोधक, भक्त व्हा की टीकाकार; महाराष्ट्राचं राजकारण ज्या प्रत्येकी तीन अक्षरी दोन शब्दांशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही, ते शरद पवार हे एक कुणालाच न सुटलेलं कोडं आहे. भल्याभल्यांशी त्यांनी पंगा घेतला आणि स्वत:ची अनेक  मिथकं रूढ केली. त्यांच्यातल्या बेभरवशी राजकारण्याबद्दल खूप काही लिहिता येईल, पण त्यासाठी आजची वेळ योग्य नाही. कारण या विधानसभा निवडणुकीत या योद्ध्यानं अशी काही अतुलनीय कामगिरी बजावली आहे की, ‘शेर कभी बुढा नही होता’ आणि ‘सॅल्यूट टू शरद पवार!’ या दोन्ही कमेंट त्या कामगिरीला कवेत घेण्यास थिट्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाची (इडी) नोटीस आली आणि शरद पवार यांच्यातला मुत्सद्दी, संधीच्या शोधात असलेला चतुर राजकारणी फिनिक्स पक्षी झाला. त्यानंतर कोणतीही कृती त्यांच्याकडून अनवधानानं (inadvertently) घडली नाही. पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणं असो की संपावरील एचएएलच्या कामगारांची भेट असो की अविश्रांत प्रचार दौरे असोत की नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांचा (क्वचित पातळी सोडून, पण जशास तसा जबाब देत) केलेला मुकाबला असो; शरद पवार नावाचा राजकारणातला मल्ल अंगाला तेल लावून खेळला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात साताऱ्याच्या सभेत पावसात भिजण्याचं जे टायमिंग शरद पवार यांनी साधलं त्याला तोड नाही! जे एका मुत्सद्दी राजकारण्यानं करायलाच हवं ते छत्री बाजूला सारत पवार यांनी केलं. वयाच्या ऐंशीच्या घरातला हा योद्ध पावसाच्या सरी झेलत प्रचार करता झाला. या सिहांच्या बाजूला काहीही न बोलता श्रीनिवास पाटील नावाचा वाघ येऊन उभा राहिला आणि  भिजला. त्या टप्प्यावर केवळ सातारा लोकसभा मतदारसंघापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक शंभर टक्के फिरली. एकट्या शरद पवार यांनी ती नियोजनबद्धरीत्या सहज फिरवली. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सक्षम विरोधी पक्ष निर्माण करणारी ती मास्टर पीस कृती ठरली... भाजपच्या उन्मादाला ‘जोर का धक्का धीरे से’ देणारी ठरली!

अनेकांचा पोटशूळ उठला तरी हरकत नाही, मी पुन्हा एकदा शरद पवार यांना सॅल्यूट करतो. कारण २०१९ची विधानसभा निवडणूक म्हणजे शरद पवार, असं समीकरण आता सुवर्णाक्षरी आणि अमीट आहे!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......