१.
“क्रिकेट हा जगातला सर्वोत्तम मैदानी खेळ तर आहेच, पण क्रिकेट ही निरोगी, नि:स्वार्थी, सढळ हाताचे आणि उदार मनाचे युवक घडवण्याची नर्सरीदेखील आहे.” – रेव्ह. हेन्री हचिन्सन मॉटगोमेरी
‘‘बाळू पालवणकरपासून भारताने क्रिकेटला दिलेल्या महान स्पिन बोलर्सची मालिका सुरू होती. पण तो ‘अस्पृष्ट’ असल्यामुळे सुरुवातीच्या काळात (क्रिकेट खेळणाऱ्या) हिंदूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जरी तो त्यांच्या मैदानाची देखभाल करण्याचा कामावर होता. मात्र सदा चाणाक्ष पारशांनी त्याची क्षमता जाणली आणि हिंदू (संघा)वरती सरशी करण्यासाठी आपल्याकडून खेळण्यासाठी त्याचं मन वळवलं. पारशांच्या या चिवटपणामुळे हिंदूंनी त्याला लगेच आपल्या क्लबांचा सभासद करून घेतला खरा, पण जातीची बंधनं (इतकी कडक) असल्यामुळे त्याला पॅव्हिलियनच्या बाहेरचं खाणं-पिणं करणं भाग होतं. भारतातली १९व्या शतकातली जातीयता म्हणजे त्याच काळातल्या (व्हिक्टोरिया राणीच्या) इंग्लंडमधल्या सामाजिक तीव्र उच्च-निम्न विभागणीचं प्रतिबिंबच! परंतु बाळूच्या बोलिंग-कौशल्यामुळे ही बंधनं सैल\खुली झाली. आणि मुंबईच्या हिंदू जिमखान्यानं उमदेपणा दाखवून बाळूला त्याच्या उच्चजातीय सहखेळाडूंबरोबर खाण्या-पिण्याची मुभा दिली.
ससेक्सचा मेजर एसीजी ल्यूथर हा पहिल्या महायुद्धामध्ये गोळी लागून जखमी झाला आणि जर्मन सैनिकांची चाहूल लागताच नि:स्तब्ध (मेल्यासारखा) पडून राहिला. कारण जखमी शत्रूसैनिकांना जर्मन गोळ्या घालून ठार करत असत. (जर्मन सैनिकानं) त्याचं घड्याळ आणि पाकिट काढून घेतलं आणि नंतर स्वच्छ इंग्लिशमघ्ये म्हणाला, ‘तू नशीबवान आहेस! तू MCCचा मेंबर आहेस असं दिसतं आपल्या छावणीमध्ये परत जा.’ तो जर्मन सैनिक डर्बीशायरमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा एजंट होता आणि क्रिकेट खेळलेला होता. मेजर ल्यूथर पुढे ८० वर्षांपर्यंत जगला!” - जॉन मेजर
‘‘फ्रेंच अमीर-उमराव-सरदार जर त्यांच्या रयतेशी क्रिकेट खेळले असते, तर त्यांचे किल्ले\गढ\वाडे कधीच (फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये) जळून खाक झाले नसते.’’ – जी. एम. ट्रेव्हेलियन
‘‘वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट हा धर्म आहे, भारतामध्ये क्रिकेट हा उत्कट ध्यास (passion) आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बिग-टाइम टीव्ही आहे, इंग्लंडमध्ये क्रिकेट हा उद्योग आहे, (सर्वच देशातल्या) खेळाडूंसाठी क्रिकेट ही उपजीविका आहे.’’ – मुदार पाथेर्या
क्रिकेटबद्दल जेवढं लिहिलं गेलं तेवढं दुसऱ्या कुठल्याच खेळावर लिहिलं गेलं नाही. मुळात इंग्लंडमध्ये सुरू झालेला हा खेळ इंग्रजांनी त्यांच्या जगभर पसरलेल्या साम्राज्यात नेला खरा, पण कॉमनवेल्थमधले सगळे देश काही क्रिकेटसाठी प्रसिद्ध नाहीत. जेमतेम १०-१५ देशांचे संघ जागतिक क्रिकेटमध्ये दिसतात. नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड कपमध्ये १० टीम्स होत्या. त्यातही अफगाणिस्तान तिथं कशासाठी होतं, ते काही कळलं नाही. तरीही वर्ल्ड कपचा इव्हेंट महिना-दीड महिना चालला. असा इव्हेंट फुटबॉल वर्ल्ड कपचाही असतो, पण त्यात खेळणाऱ्या देशांची संख्या तिपटीच्यावर असते! आणि त्या मॅचेस तीन-चार तासाच्या वर चालत नाहीत. साखळी सामने तर दोन-अडीच तासच! क्रिकेटची अगदी T-20 मॅच पाहिली तरी चार तास किमान जातातच, वन-डे असेल तर निदान आठ तास आणि पाच दिवसांची टेस्ट असेल तर ते पाच दिवस – पण खरं तर तो सगळा आठवडा!
असं या खेळात काय आहे की, इंग्रजांच्या एकेकाळच्या गुलाम देशांना तो आवडला, खेळावासा वाटला आणि नंतर त्यांनी इंग्रजांच्या खेळात इंग्रजांनाच मागे टाकलं! १९७५ पासून दर चार वर्षांनी क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवण्यात येतो, मात्र तो इंग्लंडला यंदा ४४ वर्षांनी, १२व्या इव्हेंटमध्ये – मिळाला; तेही यश निर्भेळ नव्हतं. चषक इंग्लंडला मिळाला तो एका किरकोळ तांत्रिक नियमामुळे! कप मिळूनही इंग्लंडचं कौतुक झालं नाहीच. कौतुक न्यूझीलंडच्या वाट्याला आलं, कारण त्यांनी हा कडू घोट गिळताना खरं ‘क्रिकेटिंग स्पिरिट’ दाखवलं होतं, एकदा खेळाचे नियम स्वीकारले की, जे बरं-वाईट वाट्याला येईल ते हसतमुखानं स्वीकारण्याचं!
सुरुवातीला जे चार-पाच उतारे दिले त्यातला कोणीही व्यावसायिक क्रिकेटर नाही. पहिला आहे आपण ज्याला ‘रोमेल निर्दालक’ म्हणून ओळखतो त्या फील्ड मार्शल मॉटेगोमरीचा बाप. गमतीचा भाग असा की, एकेकाळी चर्च ही संस्था क्रिकेटशत्रू होती. मुद्दाम एकत्र येऊन उनाडपणा करणं म्हणजे क्रिकेट अशी निर्भर्त्सना दुसऱ्या पाद्रयाने केल्याचीही नोंद आहे. एकूणच कर्मठ कॅथलिक चर्चच्या पगडा जर इंग्लंडवर कायम राहिला असता तर आपल्याला क्रिकेट आणि शेक्सपिअर यांना मुकावंच लागलं असतं! मात्र तसं झालं नाही – चर्चमधली मंडळीही क्रिकेट खेळली – त्यातले काही तर इंग्लंडच्या टीममध्येही होते. मात्र मॉटगोमेरी रेव्हरंड असूनही उद्याच्या युवकांना घडवण्याची नर्सरी म्हणून क्रिकेटकडे पाहतो आहे, म्हणजे चर्चचं काम क्रिकेटकडूनच चांगलं होईल असा त्याचा निर्वाळा आहे.
दुसरे दोन उतारे जॉन मेजर यांच्या ‘More than a Game : The story of Cricket’s Early Years’ या पुस्तकामधले आहेत. जॉन मेजर इंग्लंडचे माजी पंतप्रधान. आयर्न लेडी मार्गारेट थॅचर यांचा वारसा त्यांना मिळाला. थॅचरबाईंची बरी-वाईट धोरणं निस्तरून हुजूर पक्षाला एक निवडणूक जिंकून दिली. पंतप्रधानपद सोडल्यावर त्यांनी या आयुष्यभरच्या प्रिय विषयाला न्याय दिला. असं काही ट्रम्प\मोदी\पुतीन करू शकतील? आणि ‘More than a Game’ हे नुसतं माहिती देणारं, रुक्ष घटना नोंदवणारं संकलन नाही. मेजर यांची खास ब्रिटिश वळणाची खवचट विनोदबुद्धी पानोपानी जाणवते. याच पुस्तकात त्यांनी फील्ड मार्शल मॉटगोमेरीला Self-doughtची बाधा कधीच झाली नाही, असा शालजोडीतला टोमणा मारला आहे! जर्मन सैनिकाचा किस्सा हृद्य असला तरी एकमेव नाही. काही अपवादाच्या प्रसंगी (उदा. ख्रिसमस) परस्पर शत्रुत्व विसरत याची उदाहरणं सापडतात. पण बाळू पालवणकरची कथा त्यांनी ज्या जाणतेपणानं सांगितली तशी आपल्याकडे कुणी लिहिली नव्हती! बाळू पालवणकरऐवजी पी. बालू करण्यामध्ये एक सांस्कृतिक रणनीती होती. जशी पुढे काही दलितांनी ब्राह्मण आडनावं स्वीकारली आणि पारशी जिमखाना जर नसता तर बाळू पालवणकर कॅप्टन झाला असता तरी हिंदू जिमखान्याच्या डायनिंग हॉलमध्ये पाऊल टाकू शकला नसता, ही शक्यता जॉन मेजरनी अगदी अलगदपणे सुचवली आहे. आणि त्यात भारतीय समाजाची निर्भर्त्सना न करता, तसेच कठोर सामाजिक भेदाभेद १९व्या शतकातल्या इंग्लंमध्येही होते. Players and gentleman हे क्रिकेटमधले महत्त्वाचे प्रतिस्पर्धी संघ होतेच, याची प्रांजळ कबुली दिली आहे.
जी. एम. ट्रेव्हेलीन हे गेल्या शतकातले जानेमाने सांस्कृतिक-सामाजिक इतिहासकार. इंग्रजी साहित्य आणि संस्कृतीवरचे त्यांचे ग्रंथ आम्हाला टॉनिकसारखे होते. त्यांच्या मार्मिक प्रतिक्रियेकडे अनन्वय अलंकार म्हणूनच पाहिले पाहिजे. तरीही त्यातल्या एका सूक्ष्म निर्देशाकडे गेल्याशिवाय राहवत नाही. एडमंड बर्कने फ्रेंच राज्यक्रांतीकडे सुसंस्कृत, संघटित उमरावशाही (arstocracy)वरचं गडांतर म्हणून पाहिलं होतं. आणि इंग्लिश एकाधिकारशाही (monarchy)ला सावधगिरीचा सल्ला दिला होता. फ्रेंच क्रांतीकडे तो अनुचित अंदाधुंदी म्हणूनच पाहत होता. ट्रॅव्हेलीन मात्र फ्रेंच उमरावांनी क्रिकेट खेळायला हवं होतं असं म्हणताहेत. म्हणजे भ्रष्ट इंग्लिश arstocracyला क्रिकेटनं वाचवलं असं त्यांना वाटतं?
शेवटचा उतारा ‘Wills Book of Excellence Cricket’ या वाचनीय आणि पाहणीय पुस्तकातला आहे. त्यात क्रिकेटच्या पाचही आयामांची नोंद केली आहे. आधुनिक, २१व्या शतकामधल्या क्रिकेटचं स्वरूप कसं असेल याचे काही संकेत मुदार पाथेर्यानं अधोरेखित करून क्रिकेटच्या लोकप्रियतेची खरी कारणं शोधणाऱ्यांसाठी रोड मॅप करून ठेवला आहे. आता धर्म\ध्यास हे क्रिकेटचं किंवा क्रिकेटधंद्याचं जग मागे पडून क्रिकेट ही इंडस्ट्री-इकॉनॉमी बनते आहे, big-time TV ही आजच्या जगामधली प्रस्थापित यंत्रणा आहे आणि खेळाडूंची वृत्ती क्रिकेटकडे फक्त उपजीविका म्हणून पाहण्याची नसते. समाजही त्यांच्याकडे फक्त क्रिकेटर म्हणून पाहत नाही, हे बदल आपल्या डोळ्यांसमोरच घडताहेत.
कारण एकीकडे आणि परिणाम दुसरीकडे अशी संस्कृत काव्यशास्त्रात ‘असंगती’ अलंकाराची व्याख्या सापडते. क्रिकेट हे त्याचं जितंजागतं उदाहरण! कालच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडवर अन्याय झाला आणि इंग्लंडच्या टीमनं त्यांनाही बरोबर घेऊन जल्लोष करायला हवा होता, असं भारतात केवळ मलाच वाटलं असेल असं नाही – जगभरात अनेकांची तीच प्रतिक्रिया असणार! थोडं फार क्रिकेट कळणारे तर टीव्हीवर मॅच पाहता पाहता फील्डिंग कॅप्टनला सतत सल्ले देत असतात. मी लहान असताना भारत हरणार हेच सवयीचं होतं, मात्र ऑस्ट्रेलिया हरली तर मला रडू यायचं आणि माझ्या आसपासचे सगळे दाक्षिणात्य मामा इंग्लंडचे फॅन असायचे! इम्रान खान पाकिस्तानी क्रिकेट सोडल्यावर झाला माझ्यासाठी आणि ग्रेग चॅपेल जवळजवळ नातेवाईक असल्यासारखा होता. तो भारताचा कोच झाल्यावर माझ्या मनातून उतरला! ब्रायन लाराची बॅटिंग कधीही प्रत्यक्ष पाहिली नसूनही त्याच्या प्रत्येक इनिंगकडे लक्ष असायचं. डेव्हिड गॉअर हा तसाच आवडता, शैलीदार आणि इंग्लंडचा खडूसपणा हा स्थायीभाव मुळीच नसणारा, मायकेल होल्डिंग जेव्हा टीव्हीवर बोलत असतो, तेव्हा फार जुना मित्र आपल्याशी फोनवर बोलल्यासारखं वाटतं. कुमार संगाकाराबद्दलही तसंच. त्याच्याइतका सभ्य खेळणारा, दिसणारा, बोलणारा, वागणारा विरळाच! भारत-पाकिस्तान मॅच पाकिस्ताननं चांगलं खेळून जिंकली\भारतानं अवसानघातकी खेळ करून गमावली (हल्ली हा मान भारत इतर देशांनाही अधूनमधून देतो – वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची निवड केली होती!), तर मला झालेला आनंद ‘क्रिकेट कल्चर’मधला असतो. एक फूटबॉलचा रग्बी अपवाद वगळता इतर (व्हॉली\बास्केट बॉल, लॉन\टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स) खेळांकडे आपलं लक्ष असतं, पण थोडीफार नोंद ठेवली जाते एवढंच. क्रिकेटमध्ये भावना गुंततात. एक घडना घडते तेव्हा तशाच जुन्या एकेक घटना आठवतात. परवाच बेन स्टोक्सनं इंग्लंडला एकहाती विजय मिळवून देताना शेवटच्या विकेटसाठी ७६ रन्सची नाबाद भागीदारी नोंदवली – त्यात दुसरा बॅटसमन ली याचा फक्त १ रन होता! ते पाहताना मला क्रिकेटचा शेक्सपिअर (जॉन मेजरचा अभिप्राय) डॉन ब्रॅडमॅनच्या ‘Farewell to Cricket’ या प्रांजळ आत्मचरित्रातला उल्लेख आठवला. स्टॅन मॅकेब (ब्रॅडमनच्या खालोखाल ‘बॉडीलाईन’ समोर टिकाव धरणारा!) फ्लीट वुड-स्मिथ यांच्यामधल्या अगदी तशाच शेवटच्या विकेटच्या भागीदारीचं ब्रॅडमनचं वर्णन – विशेषत: त्यातल्या मॅकेबच्या बॅटिंगचं वर्णन – परवाच्या स्टोक्सच्या बॅटिंगला जसंच्या तसं, तंतोतंत लागू पडतं! त्याबराबेरच दुसरीही अशीच टेस्ट आठवली. मायकेल वॉन कॅप्टन होता आणि शेन वॉर्ननं शेवटच्या विकेटसाठी इंग्लंडला तंगवून, ९८ रन्स काढून इंग्लंडला फक्त दोन रन्सनं जिंकू दिलं होतं. त्याचा एक फटका नीच बसला असता तर निकाल उलटा लागला असता; जसं ब्रॅडमनची रन्सची सरासरी १०० झाली नाही, कारण इतके चौकार\षटकार मारणाऱ्या ब्रॅडमननं एक चौकार अजून मारायला हवा होता, त्याच्या रन्स ६९९६ ऐवजी ७००० व्हायला हव्या होत्या! असं कितीतरी…
२.
कोणत्याही विषयाचा-समाजाचा-चालीरीतींचा इतिहास लिहिण्याचं इंग्रजांचं व्यसन हाताबाहेर गेलेलं असतानाही क्रिकेटचा सुरुवातीच्या काळाचा फारसा इतिहास त्यांनाही लिहिता आला नाही. क्रिकेटचा पहिला उल्लेख १२व्या शतकातला आहे – a ball game असा. पण त्यातही बॅट, बॉल आणि बॅटसमन, बोलर स्पष्टपणे दिसतात. १४व्या शतकाच्या आरंभी कुणाला तरी ‘Creg’ खेळण्याबद्दल काही रक्कम दिल्याचा उल्लेख सापडतो. फ्रान्समधल्या जुन्या कागदपत्रांत Creckett अशा खेळाची नोंद १५व्या शतकातली आढळते. म्हणजे हा खेळ बराच जुना आहे. एक तर्क असा की, फ्रान्स-इंग्लंड या गवताळ कुरणांच्या प्रदेशामधल्या शेतकरी-मेंढपाळांनी हा करमणुकीचा प्रकार शोधून काढला होता. तेव्हाचे राजे-अमीर-उमराव लढाया कत्तलीमध्ये गुंतलेले असताना सत्तेच्या राजकारणाकडे अधूनमधून उदभवणारी कटकट किंवा नाईलाजानं सोसावे लागणारे उत्पात म्हणून पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेनेच क्रिकेटची पायाभरणी केली.
या वास्तवात बदल झाला तो इंग्लंडमध्ये १७व्या शतकात. एलिझाबेथ-१ हिची ४२ वर्षांची कारकीर्द संपली आणि इंग्लंड एकीकडे आंतरराष्ट्रीय आणि दुसरीकडे देशांतर्गत यादवी अशा विचित्र कात्रीमध्ये अडकलं. विशेषत: लंडनमध्ये कोणाच्याच सुरक्षिततेची (राजासकट) खात्री उरली नाही, तेव्हा बरेचसे सरदार-उमराव (लॉर्डस) आपापल्या वतनाच्या जहागिरींमध्ये जाऊन राजधानीतली राजकीय अंदाधुंदी संपण्याची वाट पाहत बसले. तिथं त्यांनी रयतेला हा खेळ खेळताना पाहिलं. Classes आणि masses यांनी एकत्र येण्याची त्या काळात सैन्यभरती\लढाई एवढी एकच पद्धत होती. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटसाठी एकत्र येणं हे दोन्ही पक्षांना (एकमेकांतलं आर्थिक अंतर कायम ठेवूनही) नक्की आवडलं. राजघराणं, नाटक आणि क्रिकेट हे इंग्लंडचे तीन मानबिंदू निश्चित झाले!
आजचं क्रिकेट हे ज्या किचकट कायदे-कानूंच्या तावडीत सापडलं आहे, तसं हे सुरुवातीचं क्रिकेट नव्हतं. ते खरोखरच मनोरंजनासाठी खेळलं जात होतं. गावाबाहेरच्या सपाट गवताळ मैदानामध्ये ‘इंग्लिश समर’मध्ये (जून ते सप्टेंबर) गावातले प्रतिष्ठित (Gentry) मुख्यत: प्रेक्षक म्हणून सहकुटुंब जमायचे. क्वचित स्त्रियांनीही खेळात भाग घेतल्याच्या नोंदी आहेत. ४० notches (रन्स) काढणाऱ्या एका रूपसुंदर ‘मिस विकेट’चं चित्रही सापडलं आहे. पिचची लांबी सोयीप्रमाणे ठरत असावी. स्टंपही दोनच होते. त्यामधलं अंतरही सोयीप्रमाणेच? त्या दोन स्टंपवर एक आडवी काठी ठेवली जायची! मधला स्टंप अठराव्या शतकाच्या शेवटी आला असावा. उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये माणसाच्या हाताला अंगटा फुटला, तशीच क्रांती क्रिकेटमध्ये या मधल्या स्टंपमुळे झाली! बॉल लोकर आणि चामड्यानं बनवलेले असत. हा कच्चा माल वापरून उपजीविका करणारे alderman गावागावात होतेच. शेक्सपिअरचा बाप जॉन त्यापैकीच एक! त्यामुळे बॉलमुळे दुखापत होण्याची शक्यताच नव्हती. बॅटी सुरुवातीला दांडक्यासारख्या होत्या, पुढे त्या आजच्या हॉकीस्टिकसारख्या झाल्या. फक्त टोकाचा हुक लांबट पसरट असे. हँडल बसवलेली आयताकृती बॅट एकोणिसाव्या शतकात स्थिरावली. बोलिंग अंडर आर्म (सरपट्टी) होती, त्यामुळे वेगही बेताचाच होता. पुढे राउंड आर्म (खांद्याला काटकोनात आडव्या हातानं) बोलिंग आणि नंतर ओव्हर आर्म असा प्रवास झाला. मात्र आजही लसिथ मलिंगासारखा एखादा राउंड आर्म बोलर सापडतोच! बॅटची उंची किती असावी याचा निर्णय बॅटसमनच्या उंचीप्रमाणे असावा. रूंदी मात्र निश्चित करावीच लागली कारण स्टंपमधल्या अंतरीपेक्षा रूंद बॅटी आल्या तर खेळ बंदच पडला असता! अठराव्या शतकाच्या शेवटी साडेचार इंच ही बॅटची कमाल रुंदी ठरवण्यात आली, जी आजपर्यंत मानली जाते. एका टीममध्ये किती खेळाडू असावेत वगैरे गोष्टी खेळाच्या वाटचालीमध्ये ठरत गेल्या. पिचमध्ये दोन्ही बाजूंना स्टंप ही कल्पना नेमकी केव्हा आली असावी? कारण आज सापडलेल्या सर्व चित्रांमध्ये स्टंप असतात. अंपायरचा धाक-दबदबा नेमका केव्हा सुरू झाला – जो DRS येईपर्यंत अबाधित होता?
मात्र ‘The Laws of the Noble game of Cricket’ असा एक अतिशय देखणा दस्तवेज (१७८५) सापडला आहे. त्यात बोलर बॅटसमन (प्रत्येकी १), दोन अंपायर्स व इतर ११ खेळाडू स्पष्टपणे दिसतात. मैदान फार मोठं नाही, पण हिरवंगार आहे. दोन प्रेक्षकही आहेत. पार्श्वभूमीला हिरवी वनश्री, निळं आकाश, पांढरे ढग चितारले आहेत. बॉल, बॅट, स्टंपस, बोलिंग\पॉपिंग क्रीझ, खेळणारे संघ, विकेट कीपर, बॅटसमनला आऊट ठरवण्याचे नियम (ही यादी सर्वांत मोठी आहे), अंपायर्सच्या अधिकारांची चर्चा आहे आणि क्रिकेटवर बेटस लावण्याचे नियमही आहेत. म्हणजे आजच्या क्रिकेटचा मूळ ढाचा १८व्या शतकाच्या शेवटी स्थिरावला होता.
१९व्या शतकात इंग्लंड ही साम्राज्यवादी, भांडवलशाही मानणारी औद्योगिक लोकशाही बनली. यंत्रयुगाचा पाया घातला गेल्यावर ब्रिटिश शासन आणि खाजगी उद्योजक व्यापाराच्या संधी आणि त्यांचं चीज करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल शोधत जगभर पसरले. काही ठिकाणी त्यांनी सत्ताही स्थापन केली. हे सर्व करताना एक आक्रमक अहंकार त्यांच्यावर स्वार झाला होता. आपण जगातला सर्वश्रेष्ठ समाज आहोत; आपली अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, साहित्य, नाटक, खेळ हेदेखील सर्वश्रेष्ठ आहे. इंग्लंड श्रीमंत होणं आणि त्यांनी उरलेल्या जगाला (भिकेला लावून?) सुसंस्कृत करणं, ही ईश्वराचीच योजना आहे वगैरे. या अहंकाराला खतपाणी घालणारे – भारतीय शेतकऱ्यांना अफूचं पीक घेण्याची सक्ती करून ती अफू चीनमधल्या गरिबांच्या वेदना कमी करण्यासाठी अफूचा व्यापार करणं हीसुद्धा ईश्वरी योजना ठरवणारे भाडोत्री मिशनरी जगभर फिरत होते. ख्रिस्तदेखील वसाहतवादी भांडवलशाहीच्या कचाट्यात सापडला होता!
मात्र या काळ्या ढगाला एक रूपेरी किनारही होती. ईश्वरी संकेत काही असो; शेक्सपिअर आणि क्रिकेटही इंग्रजांनी जगभर नेलं! वेस्ट इंडिजमध्ये गोरे जमीनदार आणि काळे श्रमिक यांना एकत्र यावं लागलं. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये युरोपातली खानदानी घराणी आणि तडीफार गुन्हेगार यांची मोट बांधली गेली. भारतामध्ये प्रचंड अस्ताव्यस्त जात-धर्म-भाषा-प्रांत यात विभागलेला, स्वातंत्र्य नसलं तरी चालेल, पण जातमालाची सुरक्षा मागणारा, अंदाधुंदीला विटलेला मोठा जनसमूह आणि ‘साहेब लोक’ यांचा सांधा जुळला. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे विस्तीर्ण भूमी असलेले देश होते. मैदानांची कमतरता नव्हती. भारतात गर्दी गोळा करायला धडपड करावी लागत नव्हती (आजही करावी लागत नाही!) आणि संस्थानं खालसा केल्यानंतर संस्थानिकांकडे भरपूर पैसा व रिकामा वेळही होता. वेस्ट इंडिजमधली कृष्णवर्णीय जनताही दारू पिऊन नाचगाण्याला कंटाळली असावी. शेक्सपिअर फक्त भारतात रुजला – क्रिकेट या सर्व देशांत!
क्रिकेटचा महिमा असा की, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि भारत या देशांनी क्रिकेटची ‘इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ’ ही ओळख मोडीत काढली!
इतकी लोकप्रियता असूनही प्रत्यक्ष क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या कमी राहिली. यालाही वसाहतवादच कारण होता. फ्रेंचांनीही वसाहती केल्या, पण त्यांना क्रिकेटमध्ये रस नव्हता. आक्रमक जर्मनी अजूनही भविष्यकाळात होता. हॉलंट, बेल्जिअम हे देश लहान होते. स्पेनला खेळांपेक्षा धर्मप्रसार आणि संपत्तीची हाव अधिक होती. त्याच्या कुशीतल्या पोर्तुगालचंही तेच. शिवाय एक गोव्याचा अपवाद सोडला तर स्पेन, पोर्तुगाल दक्षिण अमेरिकेत जास्त गुंतले होते. अमेरिकेमध्ये युरोपातल्या सर्वच देशांतून साहसी, बुद्धिमान, खटपटे लोक गेले आणि त्यांचं स्वातंत्र्ययुद्ध ब्रिटिशांशीच झालं. तेव्हा वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांचे मानबिंदू नाकारणं भागच होतं. अजूनही क्रिकेट अमेरिकत रुजलेलं नाही. त्यात अमेरिकन जनता पैसे ओतेल असा विश्वास वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिश आणि डच हे दोन्ही समाज होते. तिथं क्रिकेट चांगलंच रुजलं, पण कॅनडात ब्रिटिश-फ्रेंच यांचं मिश्रण असल्यामुळे अजूनही क्रिकेटबद्दल फारसा उत्साह दिसत नाही.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेटमधली खुन्नसही - अॅशेस मालिका आणि तो छोटा राख ठेवलेला करंडक - वसाहतवादी धोरणांमधून निर्माण झाली. गुन्हेगारांचं पुनर्वसन करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये युरोपियन वस्ती झाली, तेव्हाच समाज विभागला गेला. सर्वसामान्य ऑस्ट्रेलियन नागरिकांची (!) गुन्हेगारी पार्श्वभूमी विसरायला प्रशासनाच्या खानदानी युरोपियनांना फार वेळ लागला. काही पिढ्या जाव्या लागल्या. त्यातून सर्वच क्षेत्रांत ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन (मूळचे विस्थापित युरोपियन) यांच्यामध्ये Love-hate नातं निर्माण झालं. या नव्या ‘ऑस्ट्रेलियन’ समाजाकडे काहीच नव्हतं! ८० टक्के वाळवंट असलेला प्रचंड देश, गवताळ कुरणांमध्ये गाई आणि मेंढ्या पाळून चीज आणि लोकर एवढीच त्यांची संसाधनं होती – व्यापार उद्योगात, साहित्य-संगीतात ब्रिटिश खूपच पुढे गेलेले होते. हे ऑस्ट्रेलियन शरीरानं धडधाकट आणि मेंदूनं तल्लख (गुन्हेगार नेहमीच पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतात!) होते. खेळ या एकाच क्षेत्रात ते ब्रिटिशांना आव्हान देऊ शकत होते. लॉन टेनिस आणि क्रिकेटमधला पराक्रम या नव्या ईर्ष्येमधून घडला!
३.
“चांगल्या बोलिंगचा चिवट प्रतिकार करून बोलर्सना थकवणं आणि धीर धरून (Patiently) रनची वाट पाहणं हे उतावळ्या आशियनां(भारतीय-पारशी)पेक्षा अतिचिवट अंग्लोसॅक्सन (ब्रिटिश) जास्त सहजपणे करू शकतात.” – लॉर्ड हॅरिस
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारतामधून पारशी क्रिकेटर्सची एक टीम इंग्लंडचा दौरा दोनदा करून आली. पहिल्या १८८६च्या दौऱ्यात २८ सामन्यांपैकी फक्त एक मॅच त्यांनी जिंकली होती, मात्र नंतरच्या १८९०मधल्या दौऱ्यात आठ मॅचेस जिंकल्या, ११ हरल्या आणि १२ ड्रॉ झाल्या. तेव्हाचं लॉर्ड हॅरिसचं हे निरीक्षण भारत क्रिकेट\क्रिकेटर्सना अजूनही लागू पडतं. Snatching defeat from the jaws of victory हे खास कौशल्य भारतानं जपून ठेवलं आहे?
वसाहतवादामुळेच भारताला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली हे तर खरंच. एकूण भारतीय संस्कृतीत ‘क्रीडा’ या शब्दाला अनेक उपपदं जोडलेली आढळतात – जल, काम, रास, शब्द वगैरे. शुद्ध क्रीडेचे उल्लेख शोधून काढावे लागतात. महाकाव्यांमधूनसुद्धा धनुर्विद्या, मल्लविद्या, अश्वविद्या, व्यूहरचना भरपूर आढळतात. बैठ्या खेळांचेही उल्लेख आहेत – द्यूत तर क्षत्रिय असण्याचं प्रमाण लक्षणच होतं. स्पर्धात्मकताही या विद्यांना धरून येते. केवळ मनोरंजनासाठी क्रीडा फारशी सापडत नाही. चेंडू (कंडुक) होता, परंतु त्या चेंडूभावेती युरोपने रचलेले मैदानी खेळ भारतात नसावेत. मराठीमध्ये एक अपवाद आहे. एकनाथांच्या ‘बया दार उघड’मध्ये ‘खेळसी शिरांची चेंडूफळी’ असा स्पष्ट उल्लेख आहे. पण तेवढाच. ‘वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी, डाव मांडला’ असं कवनही आहे. तो डाव कोणता होता?’
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६००च्या शेवटी स्वत: एलिझाबेथ-? राणीच्या पुढाकारानं झाली होती. त्यामुळे व्यापारासाठी ब्रिटिशांना भारत आणि चीनकडे येणं भागच होतं. सतराव्या शतकात पश्चिम किनाऱ्यावर स्वतंत्र मराठी राज्य स्थापन करण्याची धामधूम सुरू होती आणि शिवाजीची समुद्राकडे बारीक नजरही होती. सुरत बंदरामध्ये मोगल सत्तेनं त्यांना आश्रय दिला तरीही मराठ्यांनी ते शहर दोन वेळा लुटलं होतं. तेव्हा व्यापारासाठी दक्षिण भारताला वळसा घालून कलकत्ता गाठणंच शहाणपणाचं होतं. कलकत्ता बंदरातून नदीमार्गे उत्तर भारतात माल वाहतूक करता येत होती आणि मुंबई ताब्यात येऊनही तिचा एक सुसज्ज व्यापारी बंदर म्हणून विकास व्हायला निदान १५० वर्षं लागणार होती. त्यामुळे भारतात क्रिकेट प्रथम कलकत्त्यामध्ये आलं, नंतर मुंबई ही क्रिकेटची राजधानी झाली!
हे सुरुवातीचं क्रिकेट अर्थातच इंग्रजांचं, इंग्रजांनी आणि इंग्रजांसाठी खेळलेलं होतं. १७२१पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या रिपोर्टसमध्ये क्रिकेटचे उल्लेख सापडतात, पण तो उल्लेख मुंबईच्या उत्तरेकडे असलेल्या खंबातच्या आखातामधला आहे. १७४२मध्ये ‘कलकत्ता क्रिकेट क्लब’ स्थापन झाला. मेरिलिबोन क्रिकेट क्लब (MCC…) नंतर काही वर्षांतच! आजचं इडन गार्डन्सचं मैदान या क्लबमुळेच नावारूपाला आलं. जॉन मेजर यांच्या पुस्तकात असा क्लब १७८०मध्येही होता, अशी नोंद सापडल्याचं म्हटलं आहे. तसं असलं तर क्रिकेटचा पहिला क्लब भारतात स्थापन झाला असं ठरेल- मग तो फक्त इंग्रजांचा का असेना! क्रिकेटच्या पहिल्या मॅचच्या स्कोअरची नोंद १८०४मधली आहे. ही मॅच Old Etonians आणि Rest of Calcutta यांच्यात झाली होती – म्हणजे भारतातही Players (सर्वसामान्य खेळाडू) आणि Gentlemen (प्रतिष्ठित घराण्यातले खेळाडू) हा भेदभाव कायम होता – खास ब्रिटिश खऊटपणा!
क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय पारशी होते. हा केवळ योगायोग नव्हता. नव्या राज्यकर्त्यांच्या भांडवलशाही व्यापारी-आर्थिक संरचनेशी सर्वांत पटकन त्यांनी जुळवून घेतलं होतं. आधीही ते व्यापार करत होतेच. अफूच्या व्यापारातही पारशी मागे नव्हते (वाचा अमिताव घोष यांची ‘Opium Trilogy’!) शिवाय ते १०० टक्के भारतीय नसल्यामुळे इथल्या किचकट मुख्यत: निर्बंधांवरती रचलेल्या संस्कृतीच्या जाळ्यात अडकले नव्हते. समाज छोटा असल्यामुळे संघटित होणं सोपं होतं! इंग्रजांची भाषा, त्यांची व्यापारनीती, खाण्यापिण्याच्या सवयी झपाट्यानं आपल्याशा करणाऱ्या पारशांनी त्यांची मनोरंजनाची शैलीही तितक्या सहज स्वीकारली! (भारतातल्या बहुसंख्य हिंदू समाजावर वरचष्मा गाजवण्यासाठी पारशांनी झपाट्यानं आपल्या समाजाचं इंग्लिशीकरण (anglicisation) केलं, हा जॉन मेजरचा निष्कर्ष अनैतिहासिक वाटतो. पारशांनी हिंदूच काय पण इतर कोणत्याही भारतीय समाजाशी संघर्ष कधीच केला नाही, व्यापारात मिळवलेला पैसा त्यांनी मानवतावादी कार्यासाठी सर्वच समाजात मोकळेपणानं वाटला. जॉन मेजरच्या पुस्तकातला हा एकमेव दोष!) १८४८मध्ये पारशांनी मुंबईच्या एस्क्पलेनेड मैदानावर स्वत:चा ओरिएंटल क्रिकेट क्लब (नंतर Parsee Gykhana?) स्थापन केला – युरोपियन क्लबपासून एका हाकेच्या अंतरावर! आणि १८७०मध्ये त्यांनी युरोपियन क्लबला धूळही चारली! मेहेलशाह पावरी नावाचा वेगवान बोलर या पराक्रमाचा मुख्य शिल्पकार होता, पुढे तो इंग्लंडमध्येच स्थायिक झाला!
आता क्रिकेटनं कलकत्त्याहून आपला मुक्काम हलवला आणि क्रिकेट मुंबईकर झालं! पारशी-युरोपियन्स यांच्यात अधूनमधून मॅचेस होतच होत्या. हिंदूंनी मात्र जरा उशीर केला. क्रिकेटच्या चेंडूमध्ये चामड्याचा वापर होता. त्यामुळे सवर्ण हिंदू बिचकणार होतेच आणि इतर वर्णांचा जीवन झगडा वसाहतवादाच्या क्रूर वरवंट्याखाली तीव्र झाल्यामुळे त्यांना मनोरंजन\क्रीडा नावाचं काही असतं याची जाणीवही नसावी. १९०७मध्ये एकदाचे हिंदू क्रिकेटच्या मैदानात उतरले. The Union Hindu Cricket Clubची स्थापना अनेक वर्षं आधी होऊन सामाजिक अभिसरणामधल्या अडचणींमुळे तो क्लबही मोकळेपणानं परधर्मीयांशी खेळायला तयार नव्हता! १८९५मध्येसुद्धा एका हिंदू खेळाडूनं आपली जात जाईल म्हणून क्रिकेट सोडल्याचा उल्लेख सापडतो. मानधन वाढीचं आश्वासनही त्याच्या निश्चयापुढे फिकं पडलं!
आता भारतीय क्रिकेट दुरंगी (युरोपियन-पारशी) न राहता तिरंगी झालं. १९१२मध्ये त्यात मुसलमान सामील झाल्यावर चौरंगी! हिंदू-पारशी-मुस्लीम-युरोपियन अशा चार टीम होऊनही (नवा चातुर्वर्ण्य) अनेक पंचमवर्गीय (चातुर्वर्ण्याप्रमाणेच) शिल्लक राहिले. त्यांची टीम १८३७मध्ये आली- पंचरंगी क्रिकेटचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटचा पाया घालण्यात आधी संस्थानिकच पुढे होते. कारण तेवढा पैसा\वेळ त्यांच्याकडेच होता. राजेरजवाडे आणि धनिक-वणिक बाळांभोवती नेहमीच हुजरे\चमचे जमा होतात. ती मंडळी बहुधा मुख्यत: फील्डिंगसाठी उपयोगी पडत होती. त्यातले जरा बरे बोलिंग करत असतील – राजेसाहेब किंवा मालक त्यांच्या मर्जीनं आऊट होत असतील – कदाचित त्यामुळेच भारतीय क्रिकेटमध्ये बोलर्सची कामगिरी उजवी राहिली? आपली मैदानं टणक, हवा मुंबई-कलकत्ता-मद्रास सोडता सगळीकडे कोरडी, म्हणून वेगवान बोलिंगपेक्षा स्पिन बोलिंग जास्त बहरलं? जगातल्या अनेक फास्ट बोलर्सना भारतीय बॅटसमनमुळेच यशस्वी पर्दापण करता आलं? नव्या फास्ट बोलरला भारतीय बॅटसमनची उदार सवय झाली? तरीही भारतात रणजी, दुलीप, सी. के. नायडू, दि. ब. देवधर, लाला अमरनाथ असे वीरही निपजले. पहिले दोघे तर इंग्लंडच्या टेस्ट टीममध्येही रुबाब ठेवून खेळले!
सुरुवातीच्या क्रिकेटचं दृश्यरूपही मनोरंजक असलं पाहिजे. चकाचक दाढ्या केलेले, पांढऱ्याशुभ्र फ्लॅनेल आणि बुटामधले इंग्रज आणि उंच गोंडदार टोप्या, लांबलचक अंगरखे, पायघोळ तुमानीतले पारशी यांना एकत्र खेळताना पाहणं ही व्यंगचित्रकारांसाठी मेजवानीच असणार! पुढे या जमावात धोतरावर पॅड बांधणारे आणि कदाचित धोतर खोचून किंवा क्लिपा लावून बोलिंग\फील्डिंग करणारे हिंदूही आले. मग जवळपास पारशांसारखेच दिसणारे, पोशाख करणारे मुसलमान क्रिकेट खेळायला लागल्यावर दृश्य मनोरंजकता अजूनच वाढली असणार! १९३०नंतर भारतात रेडिओचं जाळं तयार होऊ लागलं – निदान इंग्लिशमध्ये कॉमेंटरी ऐकायला मिळू लागली आणि फक्त रन्स, विकेटस, हार-जीत या चार आयामांची एक नवी करमणूक सर्वांसाठी उपलब्ध झाली. अगदी १९६०पर्यंत चाळीत, वाड्यात एक-दोन घरच्या रेडिओभोवती क्रिकेट शौकिनांची गर्दी हे नेहमीचं दृश्य होतं. भारतात क्रिकेट रुजवण्यात ऑल इंडिया रेडिओचा वाटा फार मोठा आहे!
क्रिकेट भारतात फोफावण्याचं अजूनही एक कारण आहे. जातीपातींमध्ये विभागलेल्या भारतीयांना (मुसलमानांतही भारतात जातीभेद आहेत) धार्मिक सण-उत्सवांमध्येच एकत्र यायची संधी आणि सवय होती! संकटात\युद्धात\उत्सवात शिवाशिव झाली तरी घरी येऊन आंघोळ केल्यावर ‘जात’ जात नव्हती! क्रिकेटमुळे एक नवीन, आकर्षक Spece निर्माण झाली. पुन्हा एका वेळेस १३ जण मैदानावर असल्यामुळे हा खेळ विस्तीर्ण मैदानावरच खेळला जात होता – प्रेक्षकांना गोलाकर बसण्यासाठी भरपूर जागा होती. त्यातच प्रत्येक खेळाडूची ओळख – बॅटसमन, बोलर, फील्डर, विकेटकीपर, ऑलराउंडर अशी आधीच जाहीर असल्यामुळे त्याची वैयक्तिक कामगिरी बरी-वाईट ठरवण्याचे निकष अगदी साधे होते. ‘किती’ हा परवलीचा शब्द सर्वांच्याच आवाक्यातला होता – एकूण किती रन्स झाल्या, किती विकेट पडल्या, कोणी किती रन्स केल्या, विकेटस\कॅच घेतले, हे तर निरक्षरांनाही कळण्याजोगं होतं!
भारतीयांचे सर्व सांस्कृतिक उपक्रम –बारशापासून दहाव्या-बाराव्यापर्यंत – किमान तीन दिवसांचे असतात. अगदी कडक उपासानंतरसुद्धा पारव्याचा दुसरा दिवस असतोच. घरगुती समारंभही तसेच! पहिला तयारीचा दिवस, दुसरा प्रत्यक्ष सण साजरा करण्याचा – तिसरा आवराआवर, नोस्टॅल्जिया आणि मानापानाचा. होळी तीन दिवस, दिवाळी पाच-सहा दिवस, नवरात्र दहा दिवस, गणपती एक-दीड दिवसांपासून १०-१२ दिवस, लग्न-समारंभ ऐपतीप्रमाणे कितीही दिवस! क्रिकेटची साधी मॅच दिवसभर नक्कीच चालत होती – प्रथम वर्गाचा सामना निदान तीन दिवस – कसोटी सामना पाच दिवस – त्यातच एक दिवस विश्रांतीचा म्हणजे जवळपास सगळा आठवडा सगळ्यांना एकच व्यवधान असायचं! त्यात जातपात, शिवाशिव वगैरे भानगडच नव्हती आणि क्रिकेटप्रेमींचं मुख्य काम ऐकण्याचं, काही थोड्यांचं दुसऱ्या दिवशी पेपर वाचण्याचं, मात्र क्रिकेटच्या आधी, मॅच चालू असताना आणि नंतर ती संपल्यावर व्युत्पन्न चर्चा, विश्लेषण करण्याचं किंवा नुसत्या गप्पा मारण्याचं काम सर्वांचं…
भारतीयांना हा खेळ आवडला नसता तरच नवल!
४.
सुरुवातीला पारशी-युरोपियन असं दुरंगी, नंतर तिरंगी, चौरंगी, पंचरंगी हा भारतीय क्रिकेटचा पहिला टप्पा. त्या काळाबद्दल इथं लिहिण्याचं कारण नाही. मराठीचं अहोभाग्य असं की, प्रा. ना. सी. फडके यांनी या काळातलं क्रिकेट आणि क्रिकेटर्स यांच्यावर उत्कटपणे आणि जाणकारीनं लिहिलं आहे. ‘अशा झुंजा, असे झुंजार’ हे त्यांचं पुस्तक आजही खाली ठेववत नाही. फडके स्वत: क्रिकेट खेळत होते. बॅटिंग\बोलिंग\अंपायरिंग या सर्व अंगांची त्यांना सखोल माहिती होती, लिहिण्याची प्रचंड ऊर्मी होती. कोल्हापूरहून मुंबईला जाऊन मॅचेस पाहून लगेच स्वत:च्या वाचनीय शैलीत लेख लिहिण्याइतका स्टॅमिनाही होता. ‘मराठीत मी क्रीडा-लेखनाचं नवं दालन उघडून ते सजवीन’ अशी ‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतुके’ ज्ञानेश्वरांच्या जवळ जाणारी मनोवृत्तीही त्यांच्याकडे होती. त्या काळातलं कॉलेज आणि क्लबमधलं क्रिकेट, त्यांतले स्थानिक हिरो, पंचरंगी सामने गाजवणारे बॅटसमन-बोलर-कॅप्टन (देवधर, दुलीप, सी. के. नायडू आणि अजून कितीतरी), त्यावेळचे प्रेक्षक, खिळाडू वृत्ती दिसलेल्या मॅचेस आणि न दिसलेल्याही या सर्वांचा रसभरीत रिपोर्टाज फडक्यांच्या लिखाणात सापडतो. ‘क्रिकेट कल्चर’ फडक्यांना पूर्णपणे कळलं होतंच. शिवाय ते इंग्रजीही क्रिकेटवर लिहीत. क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर एक लघुकथा लिहून त्यांनी ती ‘फेबर अँड फेबर’ या जगप्रसिद्ध ब्रिटिश प्रकाशनाकडे धाडली. त्यांनी ती छापलीही! इतर भारतीय भाषांत फडक्यांसारखा खेळांवर (त्यांनी हॉकी, टेनिस, कुस्ती यांवरही लिहिलं!) लिहिणारा लेखक सापडत नाही. १९१० ते १९६० असा अर्धशतकाच्या क्रिकेटचा आलेख फडक्यांनी नोंदवला.
क्रिकेटचं पंचरंगी स्वरूप फार काळ टिकणारं नव्हतंच. १९३७मध्ये ते सुरू झालं आणि बहुधा दुसऱ्या महायुद्धाचं जागतिक स्वरूप ४१-४२ सालांत स्पष्ट झाल्यावर सगळीकडल्या क्रिकेटप्रमाणे तेही मंदावलं. चौरंगी स्वरूपाला धक्के बसू लागले. स्वातंत्र्य चळवळीनं जोर पकडून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी पुढे आल्यावर – कारण भारतात स्वातंत्र्याचे तीन प्रमुख दावेदार होते – उच्चवर्णीय हिंदू-मुस्लीम आणि दलित यांच्या स्वातंत्र्याचं गणित बसवणं ही किचकट बाब होती. चौरंगी क्रिकेटमध्ये हिंदू-मुसलमान सामन्यानंतर दंगली वगैरे झाल्या नाहीत, पण मुस्लीम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्यानंतर हिंदू-मुस्लीम क्रिकेट मॅच ही स्फोटक ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली. क्रिकेट हा आता कोंडलेली वाफ सोडून देण्याचा सेफ्टी व्हॉल्व उरला नव्हता. बॉम्बची स्फोटकता त्या खेळात आली होती. पारशी बिचारे खरेच अल्पसंख्य आणि ‘जिकडे सरशी तिकडे पारशी!’ हा सर्वांचा अनुभव होताच! ते निमूटपणे घरी बसले! इंग्लिश खेळाडूंना आपले दिवस भरत आल्याचं भान आलं, अन्य मंडळींची टीम ही मुळातच आवळ्या-भोपळ्याची मोट, ती आपोआप सुटली. असंही म्हणता येईल की, भारतात क्रिकेट आणलं इंग्रजांनी, ते भारतीय केलं पारशांनी आणि भारतीय संघाच्या शक्यता निर्माण केल्या पंचरंगी क्रिकेटनं!
दुसरं महायुद्ध संपल्यानंतर स्वातंत्र्याची चाहूल काँग्रेस आणि लीग दोन्ही पक्षांना लागली. १९४६ पासून देशात हिंदू-मुस्लीम तेढ वाढत गेली. लक्षावधी निरपराध फाळणीत बळी गेले. लगेच काश्मीर प्रश्न उभा राहिला. त्या समस्येला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची चूक झाली. आता हिंदू-मुस्लीम यांचे वेगळे संघ आणि त्यांचे सामने म्हणजे जातीय दंगलींना आमंत्रण देण्यासारखंच होतं. भारतानं सेक्युलर विचार पत्करला होता – आता ‘भारता’च्या टीममध्ये हिंदू-मुस्लीम आणि इतर खेळाडूही खेळलेही. पॉली उम्रीकर, नरी काँट्रॅक्टर, फारुख इंजिनीअर इ. पण नंतर पारशी मंडळी क्रिकेटमधून गायबच झाली.
रणजी करंडक सामन्यांपासून ‘भारतीय’ क्रिकेटमधलं दुसरं प्रकरण सुरू होतं – देशांतर्गत क्रिकेटची ती माध्यमिक शाळा आहे. कसोटीपटू त्यातूनच समोर येतात. कसोटी टीममधून वगळल्यावर पुन्हा रणजी सामने खेळतात. भारताची पहिली ऑल इंडिया टीम इंग्लंडला १९११मध्ये गेली होती. पटियालाचे महाराज कप्तान होते – वय फक्त १९! या दौऱ्यात फारसा दम नव्हता, कप्तानच इतर मौजमजांमध्ये दंग होता. या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून १९२६-२७मध्ये MCCने भारत दौरा आखला. याही वेळी पटियालाचे महाराजच कप्तान होते. त्यांचा विशेष दर्जा होता – तीन सामने इंग्लंडच्या टीममधून आणि तीन भारताच्या टीममधून खेळण्याचा. या दौऱ्याचं मुख्य फलित म्हणजे सी. के. नायडूंनी ११५ मिनिटं, १८७ चेंडूत १५३ रन्स ठोकल्या! त्यात १३ चौकार आणि ११ षटकार होते. दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी पेपरमध्ये ‘राजाबाई टॉवरच्या लीजवर काही प्रेक्षक एकमेकांना घट्ट धरून जीव मुठीत घेऊन बसले आहेत – सी. के. आम्हाला मारू नको. आम्ही खेळत नाही!’ असा मजकूर असलेलं व्यंगचित्र आलं होतं. आता कसोटी दर्जासाठी भारताचा विचार गंभीरपणे करणं भागच होतं. तरीही सहा वर्षांनी पुन्हा भारताची टीम इंग्लंडला गेली, तेव्हा सीकेंना कप्तानपद दिलं नाही – कारण अजूनही भारतीय संघाचं नेतृत्व संस्थानिकांकडेच होतं. या टीममध्ये ७ हिंदू, ४ मुस्लीम, ४ पारशी आणि ३ शीख अशी सर्वसमावेशक बेरीज होती. तरीही विजयानगरच्या महाराजानं आपल्याला उप-कप्तान केलं म्हणून टीममधून अंग काढून घेतलं! आणि लॉर्डसवरच्या पहिल्या कसोटीआधी पोरबंदरचा राजर टीममधून बाहेर पडला – आपल्याला ‘राजा’ म्हणून निवडलं आहे, ‘क्रिकेटर’ म्हणून नव्हे, हे त्यानं ओळखलं! शेवटी बरीच भवती न भवती होऊन सीके भारताचे कॅप्टन झाले! त्यांनी या दौऱ्यात ००.०५च्या सरासरीनं १६१८ रन्स केल्या आणि २५.६३च्या सरासरीनं ६५ विकेटस घेतल्या. मुख्य म्हणजे ३६ षटकार ठोकले! उरलेल्या भारतीय बॅटिंगमध्ये फारसा दम नव्हता, पण भारताचं बोलिंग-फील्डिंग इंग्लंडपेक्षा चांगलं होतं, असा निर्वाळा एका इंग्लिश पत्रकारानं दिला होता. नायडू उत्तम खेळाडू होतेच, पण भारतीय क्रिकेटचं नेतृत्व संस्थानिकांकडून हौशी\व्यावसायिक क्रिकेटर्सकडे आणणं, हे त्यांचं योगदानही मोठं होतं.
हौशी-व्यावसायिक खेळाडूंची संख्या वाढत चालली तरी राजे\महाराजे पैशाच्या जोरावर क्रिकेटमध्ये ठाण मांडून होते. त्यांच्यात उत्तर-दक्षिण, हिंदू-मुस्लीम, लहान-मोठं संस्थान अशा अनेक कुरबुरी होत्या. दरबारी राजकारणाची सवय हाडीमासी खिळली होती. एका कप्तान महाराजानं तरुण मुश्ताक अलींना ‘विजय मर्चंट’ला मुद्दाम रन आऊट कर’ असं सांगितलं होतं. तरी मर्चंटनी लँकेशायर विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत ओपनिंगला जाऊन शेवटपर्यंत नॉट आऊट राहण्याचा (carrying the bat) पराक्रम केलाच होता! लाला अमरनाथसारखा गुणी बॅटसमन अपमान सहन न झाल्यामुळे भारतीय टीमच्या बाहेर गेला, तो १० वर्षांनी परतला. या दोन्ही पापांचे धनी विजयनगरचे महाराज(!)च होते. अमरनाथनेही १९४६मध्ये पहिल्याच टेस्टमध्ये ५० रन्स केल्या आणि ५-११८ विकेटस घेतल्या!
हे आनंदाचे क्षण असले तरी सच्चा खेळाडूंचा भारतीय संघ तयार झाला, तो विजय मर्चंट-विनू मंकड यांच्यासारखे निर्विवाद गुणवत्तेचे क्रिकेटर उपलब्ध झाल्यावरच. मर्चंट यांचं गुणगान इंग्लिश पत्रकारही करत होते. १९५२मधला लॉर्डसचा कसोटी सामना ‘मंकडची टेस्ट’ म्हणूनच ओळखला जातो. विनू मंकड १९४७-४८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही गेला होता. नवोदित खेळाडू होता. पहिल्या २ टेस्टमध्ये ३ वेळा लिंडवॉल या तेव्हाच्या जगातल्या पहिल्या नंबरच्या फास्ट बोलरनं त्याची दांडी उडवली होती. प्रत्येक टेस्टच्या आदल्या दिवशी दोन्ही टीम्सची अनौपचारिक पार्टी असे. तिसऱ्या मॅचच्या आधीच्या पार्टीत वातावरण जास्तच फ्री झाल्यावर मंकडनं लिंडवॉलला विचारलं, ‘मला असा बोल्ड तू कसा करू शकतोस, ते काही लक्षात येत नाही.’ लिंडवॉल जास्तच फ्री झाला होता. ‘तुझ्या बॅटचा बॅकलिफ्ट जास्त आहे. त्यामुळे माझा बॉल झपकन आत जातो,’ त्यानं सांगितलं. दुसऱ्या दिवशी मंकडनं शकत ठोकलं.
त्यामुळे आज ज्या भारतीय क्रिकेटवर आणि खेळाडूंवर कोट्यवधी भारतीय जिवापाड प्रेम करतात, त्या क्रिकेटची सुरुवात सी. के. नायडू, लाला अमरनाथ, विजय मर्चंट, विनू मंकड यांच्यापासून झाली असं म्हटलं पाहिजे. नंतरही काही संस्थानिक भारतीय टीममधून खेळले, खेळतात; मात्र खेळाडू म्हणत!
५.
खऱ्या भारतीय क्रिकेट टीम्सची सुरुवात २०व्या शतकाच्या मध्यावर झाली. पण खेळणाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न होताच. इथं क्रिकेटवेड्या भारतीय जनतेची आणि खाजगी उद्योजकांची गुणग्राहकता उपयोगी पडली. आजही भारतात क्रिकेट मॅचसाठी प्रेक्षक गोळा होण्यात अडचण येत नाही. टीव्हीचा सुळसुळाट झाल्यानंतर फक्त प्रौढ मंडळी घरी बसून क्रिकेट पाहतात, पण स्टेडियमवर तरुणाईची गर्दी आणि जल्लोष चालूच असतो. भारत-पाकिस्तान मॅचला तर इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशातही गर्दी होतेच. भारतीयांसाठी क्रिकेट मॅच हा सामूहिक-सामाजिक इव्हेंट असण्याची पद्धत १९५०नंतर सुरू झाली. पहिली १० वर्षं चाचपडण्यात गेली. काही गुणी खेळाडूंनी अभिमान वाटावा असा खेळ केला, पण न्यूझीलंडसारखी लिंबूटिंबू टीम सोडली तर भारतानं मॅच ड्रॉ केली म्हणजेच जिंकली असं म्हणणं भाग होतं, आपण जगज्जेत्यांनाही धूळ चारू शकतो, ही भावनाच नव्हती!
१९५९मध्ये भारतानं रिची बेनॉच्या टीमला कानपूरला नमवलं आणि भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आत्मविश्वासाचं वातावरण तयार झालं. सगळ्या देशालाच स्वत:ची नवी ओळख पटल्यासारखं झालं! खरं म्हणजे आज मागे वळून पाहताना तो विजय निर्भेळ वाटत नाही. कारण कानपूरचं पिच मॅटिंगचं होतंच आणि जसू पटेल (त्या मॅचचा हिरो. १२४-१४ अशी बोलिंग केलेला)च्या मनगटावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याचे चेंडू वेगळेच पडतात (पुढे चंद्रशेखरच्या बाबतीतही अशी चर्चा झाली), ते ऑस्ट्रेलियनांना कळलेच नाहीत वगैरेही गावगप्पांना ऊत आला होता. तरीही बेनॉ, हार्वे, ओनील, लिडवॉल, मॅके असे जबरदस्त (खरं तर ओनील सोडता सगळे उताराला लागलेले होते) खेळाडू असणाऱ्या टीमला नमवण्याचं श्रेय फक्त जसू पटेलंच नव्हतं (तो शहाणाही होता. पुढच्याच २६ जानेवारीला त्याला पद्मश्री मिळाल्यावर निवृत्त झाला. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठरली!) त्या मॅचचं स्कोअर कार्ड बघितलं तर सर्व ११ खेळाडूंचा त्यातला वाटा लक्षात येतो. त्यामुळे रामचंदसारखा सामान्य कॅप्टन असूनही ती टेस्ट आपण जिंकली होती. या पाच टेस्टच्या मालिकेनंतर भारतीय क्रिकेटनं बऱ्यापैकी कात टाकली. नरी काँट्रॅक्टर, अब्बास अली बेग, बापू नाडकर्णी, बुधी कुंदरन, एम. एम. जयसिंहा (गावस्करचं रोल मॉडेल) असे अनेक नवे खेळाडू आधी नाव झालेल्या पॉली उम्रीगर, चंदू बोर्डे यांच्याबरोबर आपली गुणवत्ता वाढवू लागले.
१९५९ ते १९८५ हा भारतीय क्रिकेटचा तिसरा टप्पा मानता येईल. कारण १९८३मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप आणि १९८५मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये बेन्सन-हेजिस कप असे दोन जागतिक करंडक भारतानं मिळवले. पहिल्या वेळी कपिल देव कॅप्टन होता, दुसऱ्या वेळी सुनील गावस्कर (या खांदेपालटामध्येही काही धूर्त राजकारण होतंच, पण त्याची बाधा संघभावनेला झाली नव्हती!)
या पंचवीस वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या. काँट्रॅक्टर चेंडू लागून क्रिकेटबाहेर गेला, पतौडीसारखा डॅशिंग नवा कॅप्टन झाला, इंग्लंड आणि पाकिस्तानबरोबर भारतात अगदी कंटाळवाण्या मालिका झाल्या. उम्रीगर-बोर्डे-नाडकर्णी यांची पिढी जाऊन गावस्कर, विश्वनाथ-चंद्रशेखर, प्रसन्ना पुढे आले. कपिल-घावरी येईपर्यंत फास्ट बोलर्सची उणीव असूनही भारतानं अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज, इंग्लंडमध्ये (निसटत्या फरकानं का असेना) मालिका जिकंल्या. गावस्करचं कौतुक ‘ब्राऊन ब्रॅडमन’ या शब्दांत झालं. त्याच्यावर वेस्ट इंडिजमध्ये ‘They could not out गावस्कर अॅट ऑल’ असं कॅलिप्सो गीत रचलं गेलं. गावस्कर-विश्वनाथच्या जोडीला वेंगसरकर, अमरनाथ संदीप पाटील आले. बेदी वेंकटराघवन हे स्पिनर्स आले…
पण खरी कमाई वेगळी होती. ऑस्ट्रेलियाच्या केरी पॅकरच्या सर्कशीत कोणी सामील झालं नाही. (कदाचित कुणाला आमंत्रणही नसेल!) १९७५ आणि १९७९ या दोन्ही वर्ल्ड कपमधली शर्मनाक कामगिरी खोडून काढत भारतानं कप जिंकला, म्हणजेच कसोटी क्रिकेटमधल्या क्षमतेचा बळी न देता भारतानं वन डे क्रिकेटचा आत्माही ओळखला होता. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत या दोन्ही प्रकारात भारतीय टीम सन्मानानं टिकून राहिली. नंतर २०११मध्ये पुन्हा वर्ल्डकपही जिंकला. २००३मध्ये उपविजेतेपद मिळवलं!
१०-१२ देश क्रिकेट खेळतात, पण या संख्येनं छोट्या, पण प्रभाव\लोकप्रियतेनं मोठ्या क्षेत्रात आता भारतीय टीम पहिल्या चार-पाच नंबरात असतेच. चढउतार होत राहतात, काही वेळा लाजीरवाणे धक्केही बसतात, उद्वेग येतो, पण आता भारत आणि क्रिकेट (दारू आणि दारुड्याप्रमाणे) ‘एकमेकाला’ अंतर देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. शिवाय जगातल्या क्रिकेट प्रेक्षकांपैकी निम्मे प्रेक्षक भारतीय असतात – देशात आणि परदेशातसुद्धा!
६.
क्रिकेट आणि फूटबॉल या दोन खेळांत महत्त्वाचं साम्य आहे. मोठ्या गर्दीसाठी हे खेळ आहेतच. दोन्ही टीम गेम्सही आहेत. दोन्ही खेळात एक सुंदर अनिश्चितता (glorious uncertainty) असते! केव्हा विकेट पडेल, केव्हा जबरदस्त चौकार\षटकार बसेल, अफलातून कॅच घेतला जाईल, कोणत्या चपळ पासवर कोणता चलाख स्ट्राइकर गोल करेल, अशक्यप्राय पद्धतीनं तो गोल कीपरकडून अडवला जाईल, अशी अनिश्चितता क्षणाक्षणाला असते. फुटबॉलचा वेग प्रचंड असल्यामुळे अशा घटनांची चटकन नोंद होत नाही किंवा ती क्षणिक असते. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलसाठी अर्धं ते एक मिनिट इतका वेळ असतो. बाकी वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी दोन्ही खेळात होत असते.
काही संघांची वैशिष्ट्यं या सव्वाशे वर्षांत ठरून गेली. तो त्यांच्या राष्ट्रीय स्वभावाचाही भाग होता. इंग्लंड कायम सावध, हिशेबी; ऑस्ट्रेलिया आक्रमक, धडाकेबाज काही वेळा उमर्टटही; वेस्ट इंडिजला जय-पराजयाचे हिशेब करण्यापेक्षा आपल्याच धुंदीत खेळायची सवय; दक्षिण आफ्रिका वंशद्वेष असेपर्यंत शिष्ट, उर्मट अहंकारी आणि नंतर अवसानघातकी; भारत आणि पाकिस्तान अनाकलनीय, महान खेळाडूंचा भरणा असूनही टीम स्पिरिटमध्ये कमी पडणारे (अलीकडे हा दोष बराच दूर झाला आहे); श्रीलंका अजूनही (एक विश्वकंप जिंकूनही) चेहरा नसलेली टीम; तेच बांiलादेशच्याही बाबतीत. न्यूझीलंड अत्यंत सभ्य, सुसंस्कृत पद्धतीचं उत्तम उदाहरण, स्पर्धात्मक आक्रमकतेपेक्षा स्वत:चं क्रिकेट संयमी, शालीन शैलीतच खेळणारं, विरुद्ध टीमनं गाय मारली म्हणून न्यूझीलंड वासरू मारणार नाही. इथं हेही मान्य केलं पाहिजे की, प्रत्येक देशानं स्वत:च्या या ओळखीला क्वचित अपवादही केले होते!
क्रिकेटची स्वतंत्र भाषा ही मुख्यत: इंग्लंडमध्ये घडणं साहजिकचं होतं, पण ती भाषा जगभर पसरली. मराठीत ‘दांडी उडाली’, ‘गुगली टाकला’, ‘बॉल डोक्यावरून गेला’, ‘बंपर पडला’, ‘अंपायर चिकी खाऊ आहे’, ‘नुसता प्लेड प्लेड करता आहे’, ‘पुन्हा एकदा अपील करून बघतो’ (यात कोर्टाचाही वाटा आहे), ‘होमपिचवर बरा खेळतो’, असे अनेक वाक्प्रचार क्रिकेटमुळेच आले. इतर देशातही असंच झालं असणार! मात्र क्रिकेटनं इंग्रजीला दिलेली सर्वांत मोठी फ्रेझ म्हणजे ‘इट इझ नॉट क्रिकेट!’ कोणतीही अश्लाघ्य घटना घडली की, इंग्रजीतही हा वाक्प्रचार वापरला जातो. कारण क्रिकेट कितीही स्पर्धात्मक, आक्रमक झालं तरी ‘फेअर प्ले’ हा क्रिकेटचा मुख्य आधार आहे. त्यातूनच बॉडीलाईनला इंग्लिशमधूनच कडवा विरोध झाला. ऑस्ट्रेलियनांची बॅटसमनला सतावणारी बडबड (स्लेजिंग) कोणालाही आवडली नाही, सतत बंपर टाकणाऱ्या वेस्ट इंडियन बोलर्सना चाप लावणारे नियम आले, बॅटसमनसाठी संरक्षणाची साधनं – पॅडस, ग्लोव्हज शिवाय हेल्मेट निरनिराळे पॅडस इ. मान्य झाली. अंपायर्सही माणसंच असतात म्हणून आता DRSची व्यवस्था करण्यात आली आहे, पण प्रत्येक संघाला, प्रत्येक डावात दोनदाच वापरता येईल अशी सावधानी बाळगूनच! नाहीतर अंपायर्सच्या जागी रोबो येतील. खेळाचं आकर्षण कायम राहिलं पाहिजे, गर्दी जमलीच पाहिजे, गल्ला तर वाढलाच पाहिजे, तरीही ‘फेअर प्ले’चं भान सुटता कामा नये, अशी तारेवरची कसरत करतच क्रिकेट टिकून राहिलं आहे. बॉल टँपरिंग, मॅच फिक्सिंगवर इतकी कठोर कारवाई त्यामुळेच केली जाते. कॅरी पॅकरमुळे झालं तसे केवळ पैशासाठी चांगले खेळाडू टीमच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांचं (मान)धन वाढवलं आहे. मैदानं अधिक सुरक्षित, सुसज्ज केली जात आहेत… हाच ‘फेअर प्ले’!
क्रिकेटवरच्या पुस्तकांवर चरित्र, आत्मचरित्र, मालिकांचं समालोचन, वृत्तपत्रीय स्तंभलेखन, क्रिकेटचा इतिहास, भरपूर फोटोग्राफ्स असलेली दृक-वाच्य पुस्तकं – स्वतंत्रच लिहावं लागेल इतकं हे दालन समृद्ध आहे. पण अशा पुस्तकांमधून होऊन गेलेल्या महान खेळाडूंचे रोचक किस्से वाचायला मिळतात. W. G. Greece हा आधुनिक क्रिकेटचा जनक मानला जातो. तो ६६ वर्षांचा असताना शेवटची मॅच खेळून ६७व्या वर्षी वारला. क्रिकेटप्रमाणेच तो इतर खेळातही (अॅथलेटिक्स, मोटर ड्रायव्हिंग) प्रवीण होता. त्याने भरपूर पैसाही कमावला. तो मैदानाकडे चालत यायला लागला की, साक्षात प्रतिष्ठा चालत आल्यासारखं वाचायचं. बॅटिंग व बोलिंग दोन्हीमध्ये त्याचा दबदबा होता. विरोधी संघातला नवखा बॅटसमन खेळायला येत असताना हा त्याच्या दुप्पट वयाचा (म्हातारा?) ग्रेस ‘मी तुझी वाट लावणार आहे’ अशा शब्दांत स्वागत करायचा! त्याप्रमाणे त्या बॅटसमनची वाट लावायचाही. मात्र तो बावरलेला नवखा खेळाडू परत जाताना ग्रेस म्हणायचा, ‘उद्या सकाळी माझ्याबरोबर नेट प्रॅक्टिसला ये!’
ग्रेसइतकाच दुसरा अजोड खेळाडू डॉन ब्रॅडमन – ज्याची बॅटिंगमधली रेकॉर्डस कधीही मोडली जाणार नाहीत – एक माणूस म्हणून अतिशय प्रांजळ होता! ‘तुम्ही बॅटिंग करता तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार असतो’ या (तशा बावळट) प्रश्नाला ‘एक रन घेऊन (पिचच्या) दुसऱ्या टोकाला जाण्याचा’ असं साधं उत्तर त्यानं दिलं होतं. ब्रॅडमनची लोकप्रियता अशी की, त्याच्या एका भारतीय फॅननं ‘Don Dradman, Plyaing somewhere in England’ असा पत्ता लिहून पाठवलेलं पत्र इंग्लंडमध्ये त्याच्यापर्यंत पोचलं होतं. त्याच्या आत्मचरित्रात त्या पाकिटाचा फोटो आहे. तो कॅप्टन म्हणूनही विचक्षण होता. ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडकडे येताना जहाजावर नेट प्रॅक्टिसची व्यवस्था होतीच, पण फावल्या वेळात ब्रॅडमन सर्व खेळाडूंना स्वाक्षऱ्यांचा सराव करायला लावत असे. कारण इंग्लंड दौऱ्यात स्वाक्षऱ्या मागणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत होती. त्या करताना खेळाडूंच्या बोटात क्रॅम्प्स येऊ नयेत म्हणून ही खबरदारी!
ब्रॅडमन कॅप्टन म्हणून किती परिपक्व होता? लिंडवॉलच्या ‘Flying Stumps’ या आत्मचरित्रातली घटना आहे. एका टेस्टच्या सुरुवातीच्या दिवशी लिंडवॉलचा पाय लचकला होता म्हणून ब्रॅडमन यांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र लिंडवॉलनं ‘आता माझा पाय ठीक आहे, मी खेळतो’ असं (खोटं) सांगितल्यावर त्याला खेळू दिलं. लिंडवॉल ओपनिंग बोलर होता. पहिलाच चेंडू टाकताना त्याच्या पायातून जबरदस्त कळ आली, ती येणारच होती. पण तो बोलिंग टाकत राहिला. त्या दिवशी दुखरा पाय घेऊन त्यानं चार विकेटही घेतल्या. संपूर्ण मॅच खेळला. लिंडवॉल पुढे सांगतो, “‘दोन वर्षांनंतर पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यात त्याच मैदानावर टेस्ट मॅच होती. माझ्या हातात बॉल देताना डॉन म्हणाला- ‘आज पाय लचकला तर माझ्यापासून लपवू नको!’ लिंडवॉलनं अवाक होऊन म्हटलं, ‘म्हणजे तुझ्या लक्षात आलं होतं! मग तू मला काहीच का म्हणाला नाहीस?’ स्मित हास्य करत ब्रॅडमननं उत्तर दिलं, ‘त्याचा काय उपयोग झाला असता? पण तुला खेळायचं होतं, मी खेळू दिलं!’ लिंडवॉलचा जिद्दी स्वभाव ब्रॅडमनने टीमसाठी वापरला!”
रिची बेनॉ आणि फ्रँक वॉरेल यांनी आपापल्या देशातलं क्रिकेट बदलताना जागतिक क्रिकेटही बदललं. १९६१मध्ये वॉरेलची टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली – ब्रिस्बेनची पहिली टेस्ट बरोबरीत सुटली आणि क्रिकेटचं नवं पर्व सुरू झालं असं मानतात ते उगीच नाही! त्या मालिकेत प्रत्येक टेस्टच थरारक झाली होती. मालिका ऑस्ट्रेलियानं जिंकली, पण वॉरेलच्या टीमला निरोप देण्यासाठी हजारो ऑस्ट्रेलियनांनी गर्दी केली होती. त्याच वर्षीच्या उन्हाळ्यात बेनॉ ऑस्ट्रेलियाची टीम घेऊन आला होता. मँचेस्टरला चौथी टेस्ट होती. पाचव्या दिवशी इंग्लंडला २५५ रन्स करायच्या होत्या. लंचला इंग्लंडचा स्कोअर १५१ वर एक विकेट असा होता. रामन सुब्बाराव आणि टेड डेक्स्टर नाबाद होते. लंच घेताना बेनॉ आपल्या खेळाडूंना म्हणाला, ‘ही मॅच आपण हरणार हे उघड आहे. पण आता ती जिंकायचा प्रयत्न करू या! कुणाच्या काही सूचना?’ विकेट किपर वॅली ग्राउट म्हणाला, ‘तू दुसऱ्या इंड (पिचचं टोक)कडून बोलिंग कर! इकडल्या इंडला पिच बरंच खराब झालं आहे. त्याचा फायदा मिळेल!’ बेनॉनं त्याची सूचना मान्य केली आणि इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. मॅच संपायला जेमतेम अर्धा तास उरला असताना ऑस्ट्रेलियानं ५४ रन्सनी मॅच जिंकली. बेनॉनं सहा विकेट घेतल्या. त्यातले बरेच कॅच वॅली ग्राऊटनं घेतले होते! This is Cricket!
भारतीय खेळाडूंबद्दलही असे अभिमानास्पद किस्से सापडतात. एक विश्वनाथ या भारतीय प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या बॅटसमनचा आहे. १९८०मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामधली ५०वी टेस्ट खेळण्यासाठी इंग्लंडची टीम भारतात आली. बोथॅमच्या सर्वांगसुंदर चौफेर खेळामुळे इंग्लंडनं मॅच एकतर्फीच जिंकली, पण त्यात विश्वनाथचाही वाटा होता. इंग्लंडच्या बॉब टेलरनं खरं तर विकेट किपरकडे कॅच दिला नव्हता, पण अंपायरनं त्याला आऊट ठरवलं. त्या दिवसात DRS वगैरे नव्हतेच. तात्काळ रि-प्लेही नव्हते, पण विश्वनाथनं पॅव्हिलियनकडे निघालेल्या टेलरला परत बोलवा, अशी अंपायरला विनंती केली. त्याच्या बॅटला बॉल लागलाच नव्हता असं सांगितलं. अंपायरनं टेलरला परता बोलावलं. त्यानं ४३ रन्सच केल्या, पण बोथॅमबरोबर १७१ रन्सची भागीदारी केली आणि भारताची हार ही काळ्या दगडावरची रेघ झाली! This is also Cricket!
अशा अनेक हकीकती क्रिकेट-वाङ्मयात जागोजागी सापडतात आणि जॉन मेजरनी स्वत:च्या पुस्तकाचं नाव ‘More than a Game’ असं का ठेवलं, ते कळतं! ‘Cricket Culture’ साकार होतं ते अशा खेळाडूंच्या अशा आठवणींमधून! रन्स, विकेट, शतके, कॅचेस, हार-जीत यांची आकडेवारी महत्त्वाची आहेच, पण सामन्यांच्या निकालाइतकंच महत्त्व तो सामना कोणत्या भावनेनं खेळला गेला याचंही मोल असतं. मॅच जिंकली – विशेषत: पाकिस्तानबरोबरची – म्हणून बेभान होणं आणि हरण्याची शक्यता दिसल्यावर ती बंद पाडणं (इडन गार्डन – भारत विरुद्ध श्रीलंका, १९९५चा वर्ल्ड कप), असं बेभान प्रेम आणि वैफल्य यांच्या अदलाबदलीत भारतीय क्रिकेट सापडलं आहे. जिंकून परत येणाऱ्या टीमच्या स्वागताचा अतिरेकी उन्माद आणि हरणाऱ्या टीमला पोलीस बंदोबस्तात बाहेर पडावं लागणं हेही त्याचेच पुरावे!
क्रिकेटचे निम्मे प्रेक्षक जर भारतीय असतील तर भावी क्रिकेटचं स्वरूप ठरवण्यात भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आवडीनावडीलाही महत्त्व येणारच! आता क्रिकेट समजावून घेऊन त्यात नवे संकेत, नव्या जाणीवा आणण्याची आपली पाळी आहे. आपली क्रिकेटची समज जितकी प्रौढ, उदार आणि ‘फेअर प्ले’वर आधारलेली असेल तितकी भर आपण या खेळामध्ये घालू शकू. कारण आपण उत्कटतेनं तो खेळ स्वीकारला आणि आत्मसात केला, त्यात उंच जागी पोचलो!
केशवसुतांच्या शब्दांत – ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयांत खोदा!’
.............................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment