‘फिल्महाऊस’ म्हणजे बर्लिनमधला एक कॉम्प्लेक्स आहे. अर्थातच सिनेमाशी संबंधित. इथल्याच एका मजल्यावर जर्मन सिनेमाचा इतिहास सांगणारं एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. पण जगातल्या कुठल्याही प्रदर्शनापेक्षा किंवा म्युझियमपेक्षा ते वेगळं आहे.
.............................................................................................................................................
१.
माझ्या उजवीकडे आरसे होते. डावीकडे होते. वर मान केली तर तिथल्या आरशात स्वत:लाच मान वर करून पाहताना दिसत होते. खाली बघितलं तरी तेच. असं आपणच आपल्याला खाली वाकून पाहताना मजा वाटत होती. सभोवताली असंख्य मी. कुठली खरी आणि कुठली खोटी? सोबतीला आजुबाजूला टांगलेली पोर्ट्रेट्स. आणि अर्थातच, त्यांच्याही तशाच, मोजता येणार नाहीत इतक्या प्रतिमा. वरती, खाली, उजवीकडे, डावीकडे. ही अशी स्वत:ची आणि इतरांची अगणित प्रतिबिंब म्हणजे वास्तव आणि कल्पना यांचं एक अजब मिश्रण वाटत होतं. एका दुसऱ्याच दुनियेत आपण शिरतोय असं वाटत होतं.
सिनेमा पाहताना वाटतं तसंच.
बर्लिनच्या ‘फिल्महाऊस’ या भव्य कॉम्प्लेक्समधल्या जर्मन सिनेमाचा आणि टेलिव्हिजनचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर येणारा हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. सिनेमाच्या काल्पनिक विश्वात तुम्हाला अशा प्रकारे नेण्याचा विचारच मला थोर वाटला होता. विज्ञान आणि कला यातून सिनेमाची निर्मिती होते, त्याचा प्रत्यय सिनेमाविषयीच्या प्रदर्शनामध्येही मिळायला हवा, या कल्पकतेला दाद द्यावी वाटली होती. पहिल्यांदा तिथे गेले, तेव्हा अवाक् झाले होते. दुसऱ्यांदा नव्यानं भारावून गेले.
जवळपास सव्वाशे वर्षांचा जर्मन सिनेमाचा इतिहास इथं जतन करून ठेवलाय. एकूण १३ हॉल्समध्ये हे प्रदर्शन विभागलं गेलंय. हजाराहून जास्त एक्झिबिट्स इथं आहेत. यात जुने कॅमेरे आहेत, सेटची डिझाईन्स आहेत, वेगवेगळ्या लोकप्रिय नायिकांनी आणि नायकांनी वापरलेले कॉस्च्युम्स आहेत, प्रॉपर्टी आहे, पोस्टर्स, स्क्रिप्ट्स असं खूप काही आहे. सिनेमाच्या इतिहासाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या जर्मन सिनेमा कसा विकसित होत गेला, त्याचा प्रवासही आपल्याला दिसतो. अगदी मूकपटांपासून ते आजच्या डिजिटल आणि स्पेशल इफेक्ट्सच्या युगापर्यंतचा.
जादुई नगरीतला प्रवेश जणू
२.
सुरुवातीला आहे १८९५ ते १९१८पर्यंतचा विभाग. मॅक्स स्क्लॅडोनोवस्की, ऑस्कर मेस्सटर, मॅक्स ग्लुवे, ग्युडो सीबर हे जर्मन सिनेमाचे प्रणेते. १ नोव्हेंबर १८९५ या दिवशी मॅक्स स्क्लॅडोनोवस्कीनं आपल्या भावाबरोबर, एमिलबरोबर त्यांनी स्वत: बनवलेला फिल्म प्रोजेक्टर बर्लिनच्या विंटरगार्टन म्युझिक हॉलमध्ये लोकांसमोर सादर केला होता. एकूण पंधरा मिनिटांचे आठ लघुपट या बायोस्कोपमधून दाखवण्यात आले. त्यासाठी लोक पैसे देऊन आलेले होते. अशा प्रकारे झालेला युरोपमधला हा पहिला शो. त्यानंतर त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेला लुमिए बंधूंनी पॅरिसमध्ये पहिल्यांदा त्यांच्या प्रोजेक्टरमधून तिकीट घेऊन आलेल्या प्रेक्षकांसमोर आपला सिनेमा दाखवला. स्क्लॅडोनोवस्की त्या शोला गेला होता. आणि आपल्या बायोस्कोपपेक्षा लुमिए बंधूंचा सिनेमॅटोग्राफ हा प्रोजेक्टर अधिक सकस आहे, हे त्यानं मान्य केलं.
जादुई नगरीतला प्रवेश जणू
त्यानंतरचं दालन आहे १९१९ ते १९३३ या काळाचं. वायमर रिपब्लिकचा काळ म्हणतात तो हाच. (जर्मन राज्याचं या काळातलं हे अनधिकृत नाव मानलं जायचं. अधिकृत नाव अर्थातच डॉईश्चे राईश हेच होतं. पहिली संविधानिक संसद वायमर नावाच्या शहरात सुरू झाल्यामुळे हे नाव पडलं.) जर्मन चित्रपटसृष्टीचा हा सुवर्णकाळ मानला जातो. वर्षाला जवळपास अडीचशे सिनेमे बनत होते, दोनशेहून जास्त फिल्म कंपन्या केवळ बर्लिनमध्ये कार्यरत होत्या. युरोपभरातून निर्माते आणि दिग्दर्शक जर्मनीत येऊन सिनेमे बनवत होते. सिनेमा अजूनही बोलू लागलेला नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येण्याचा मुद्दाच नव्हता. पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८) जर्मनीने परदेशी सिनेमांवर बंदी घातल्यामुळे त्यांच्या सिनेमांना मोकळं मैदान मिळालेलं होतं. मात्र युद्ध संपल्यानंतर इतर देशांनीही जर्मनीच्या बाबतीत तेच केलं.
१९११मध्ये बर्लिनपासून दीडेक तासाच्या अंतरावर बेबल्सबर्ग हा पहिला फिल्म स्टुडिओ स्थापन करण्यात आला. (आज इथे आपल्या सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी जगभरातून निर्माते येतात. बेबल्सबर्ग स्टुडिओ स्वत:ही सिनेनिर्मितीमध्ये आहे. हॉलिवुडइतका मोठा नसावा, पण इथेही मोठेमोठे सेट्स उभारता येतात, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुसज्ज असा हा स्टुडिओ आहे. मी तिथे गेले तेव्हा मला आकर्षित केले ते वॉचमनच्या केबिनला असलेल्या काचेच्या दरवाजाने. अनेक भाषांमध्ये लोकांचं स्वागत करताना त्यावर, ‘स्वागतम’ आणि ‘फिर मिलेंगे’ असं हिंदी भाषेतही कोरलेलं होतं!)
वायमर काळात जर्मन एक्सप्रेशनिझमचाही जन्म झाला. कलेच्या क्षेत्राप्रमाणेच सिनेमांमध्येही त्याचं प्रतिबिंब पडलं. ढळढळीत वास्तव दाखवण्याऐवजी प्रतीकं, वर्णशैली यातून दिग्दर्शक आपली गोष्ट सांगू लागले. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलेलं असल्यामुळे या गोष्टींमध्ये गुन्हेगारीपटांची आणि हॉररपटांची संख्या जास्त होती. आणि त्यातला सर्वांत लोकप्रिय सिनेमा मानला जातो रॉबर्ट वेनचा ‘द कॅबिनेट ऑफ डॉ. कॅलिगरी.’
आरशांच्या गुहेत आजुबाजूला दिसतात सिनेमांची पोस्टर्स
१९२० साली आलेल्या या सिनेमाविषयी खूप सारी माहिती या प्रदर्शनात पहायला मिळते. सिनेमाचा सेट पूर्णपणे अवास्तववादी होता. जमिनीवर भूमितीमधल्या आकारांची चित्रं. भिंतींवर उजेड आणि सावल्यांचा खेळ. अभिनय लाऊड आणि कॉस्च्युम्स विचित्र. एक हिप्नॉटिस्ट झोपेत चालणाऱ्या माणसाकडून कसे अनेक खून करून घेतो, याची गोष्ट सिनेमात सांगितलेली होती.
आरशांच्या गुहेत आजुबाजूला दिसतात सिनेमांची पोस्टर्स
मात्र, या प्रदर्शनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलंय ते फ्रिट्झ लँगने दिग्दर्शित केलेल्या १९२७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मेट्रोपॉलिस’ या सिनेमाला. अख्खा चौथा मजला केवळ या सिनेमाला वाहिलेला आहे. आणि ते का आहे हे आपल्याला तिथे प्रवेश करताक्षणी लक्षात येतं. ‘मेट्रोपॉलिस’मधली काही दृष्यं समोरच्या पडद्यावर सतत एका लूपमध्ये दाखवली जात असतात. २००८मध्ये लँगच्या १५६ मिनिटांच्या मूळ सिनेमाची प्रिंट स्वच्छ करण्यात आली आणि २०१०मध्ये बर्लिनाले या बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘मेट्रोपॉलिस’चा खास शो दाखवला गेला होता. भविष्याचा वेध घेणारा हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या आजही जुना वाटणार नाही असा आहे. मोठमोठे सेट्स, स्पेशल इफेक्ट्स आणि कॅमेरामनचं कसब या सगळ्याचा संगम ‘मेट्रोपॉलिस’मध्ये दिसतो. सिनेमातला भांडवलदारांचं प्रतिनिधित्व करणारा बाप आपल्या नोकराशी व्हिडिओ फोनवरून बोलतो अशी कल्पना त्या काळात लेखकानं आणि दिग्दर्शकानं केलेली होती. सिनेमासाठी २६ हजार एक्स्ट्राज वापरण्यात आले होते. इथं तेव्हाचा कॅमेरा ठेवलाय, ट्रिक फोटोग्राफी कशी करण्यात आली याचं वर्णन केलंय. हे सगळं पाहून आणि वाचून आपण अक्षरश: अवाक् होऊन जातो. (‘मेट्रोपॉलिस’चं ट्रेलर युट्युबवर उपलब्ध आहे. त्याची लिंक अशी- https://www.youtube.com/watch?v=-7SRfCxRcOo.
याचा अर्थ, या काळात जर्मनीमध्ये फक्त एक्सप्रेशनिस्ट सिनेमाच बनत होता असं नाही. किंबहुना, ऐतिहासिक, रोमँटिक कॉमेडी, सामाजिक आणि राजकीय विषयांवरचे सिनेमे, मेलोड्रामा असे सगळे प्रकार पडद्यावर दिसत होते. आणि ते लोकप्रियही होते. मॅक्स रेनहार्ड्टचा ‘चेंबर ड्रामा’ही याच काळातला. रंगभूमीवरच्या या दिग्दर्शकानं तिथलीच स्टाईल आपल्या सिनेमात वापरली होती.
१९३०नंतर जर्मनीतले अनेक महत्त्वाचे कलाकार आपलं नशीब आजमावण्यासाठी हॉलिवुडला निघून गेले. त्यामागे हिटलरच्या जर्मनीतून निघून जाणं हाही एक हेतू होताच. नाझींच्या काळात जर्मनीतून बाहेर पडलेल्या चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांची संख्या दीडेक हजार आहे. त्यातले बहुतेक जण अमेरिकेतच स्थायिक झाले. अर्नस्ट लुबिश्च, मायकेल कर्टिझ, एमिल यानिंग्स यांच्यापासून ते अगदी बिली वाईल्डर आणि मेर्लिन डिट्रिचपर्यंत.
जुन्या जमान्यातला ठेवा
३.
जर्मनांच्या हृदयाची धडकन असलेल्या या अभिनेत्रीसाठीसुद्धा एक स्वतंत्र विभाग आहे. तिचे अनेक फोटो, तिच्या दिग्दर्शकांनी तिला पाठवलेली प्रेमपत्रं, तिचे सिनेमातले कॉस्च्युम्स, तिच्या सिनेमातल्या दृश्यांचे तुकडे आणि हॉलिवुडला जाताना तिने नेलेल्या काही ट्रंकाही इकडे बघायला मिळतात. मेर्लिन डिट्रिचचा जन्म १९०१ सालचा. वयाच्या ९१व्या वर्षी तिचं निधन झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरचा प्रसिद्धी प्रमुख जोसेफ गोबेल्सनं तिला जर्मनीत परत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तोवर ती अमेरिकेत स्थिरावलेली होती. पण तिने हे आमंत्रण स्पष्टपणे नाकारलं. (‘असं म्हणतात की, गोबेल्सला ‘मेट्रोपॉलिस’ इतका आवडला होता की, त्यानं आपल्या प्रचारकी सिनेमांच्या युनिटचं प्रमुखपद स्वीकारावं म्हणून फ्रिट्झ लँगला बोलावणं पाठवलं. तेव्हा लँग थेट देश सोडून अमेरिकेला पळून गेला. अमेरिकेतली त्याची कारकीर्दही पुढे यशस्वी ठरली.)
प्रदर्शनातला पुढचा टप्पा अर्थातच १९३३ ते १९४५चा आहे. हिटलरच्या नॅशनल सोशलिझमचा जन्म झालेला होता. सिनेमे बनवण्यावर बंधनं आलेली होती. बारा वर्षांचा हा काळ म्हणजे जर्मन चित्रपटसृष्टीसाठीही काळाकुट्टच म्हणायला हवा. गोबेल्सनं अनेक दिग्दर्शकांना आपल्यासाठी प्रचारकी सिनेमे करायला भाग पाडलं. काही ज्यू कलाकारांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्येही पाठवलं गेलं.
मात्र, महत्त्वाची गोष्ट ही की, बर्लिनच्या या प्रदर्शनामध्ये हा सगळा इतिहासही अत्यंत तटस्थपणे मांडला गेलाय. आपल्या सोयीचा नाही म्हणून खोटी माहिती द्यावी किंवा आपल्यासाठी तो मान खाली घालायला लावणारा आहे, म्हणून तो पुसून टाकावा असा कोणताही प्रयत्न इथं झालेला दिसत नाही. जे घडलं ते मांडलं ही भूमिका या विभागातून फिरताना स्पष्टपणे जाणवते. काही वेळा त्या वेळच्या घटना वाचताना अंगावर काटा येतो, अस्वस्थ व्हायला होतं. आपल्यासारख्यांना जर असा त्रास होत असेल तर जर्मन नागरिकांना किती होत असेल असा विचार मग मनात येतो. आणि तरीही त्यांनी या इतिहासाला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलंय म्हणून कौतुकही वाटतं.
याच काळातला एक व्हिडिओ इथं बघायला मिळतो. अगदी काही सेकंदांचाच. चार्ली चॅप्लीननं या सुमारास बर्लिनला भेट दिलेली होती. पण तो ज्यू असल्यानं नाझी जर्मनीनं त्याच्या विरोधात वातावरण तयार केलं होतं. चॅप्लीनच्या त्या दौऱ्याचं चित्रिकरण केलं गेलं, पण ती फिल्म नंतर नष्ट करण्यात आली. त्यातल्या वाचलेल्या फिल्ममध्ये गर्दीला हात हलवून अभिवादन करणारा चॅप्लीन आपल्याला बघायला मिळतो.
४.
या काळातली जर्मन चित्रपटसृष्टी पूर्णपणे ‘प्रखर देशभक्ती’नं ‘झाकोळली’ गेली होती. ‘राईश चेंबर ऑफ फिल्म्स’ नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सिनेमाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला या संस्थेचं सभासद असणं आवश्यक होतं आणि ही संस्था गोबेल्सच्या प्रोपोगंडा मंत्रालयाच्या अखत्यारित होती. बिगर आर्यन व्यावसायिकांना, तसंच नाझींना न आवडणारं राजकारण करणाऱ्या किंवा नाझींना न पटणारं वैयक्तिक आयुष्य जगणाऱ्यांना या चित्रपटसृष्टीत काम देण्यावर बंदी घातली गेली. ज्यूंच्या विरोधात प्रचार करणारे सिनेमे बनत होते. त्यातले बहुतेक फ्लॉप होत होते. परदेशी सिनेमांवर बंदी होती आणि तरीही मनोरंजनाचं माध्यम म्हणून सिनेमाची लोकप्रियता वाढतच होती. कारण जर्मनीच्या शत्रूंनी केलेले बॉम्बहल्ले, महायुद्धाच्या नंतरच्या काळात जर्मनीचा होत असलेला पराभव, यामुळे आपल्या नागरिकांनी खचून जाऊ नये, याकरता नाझी अधिकारी सिनेमाचा उपयोग करत होते. तांत्रिकदृष्ट्याही या काळात जर्मन सिनेमानं खूप प्रगती केली.
सिनेमाच्या दुनियेतली सफर अधिकाधिक आकर्षक करण्यामध्ये डिझायनिंगचाही भाग असतोच
दुसरं महायुद्ध संपलं आणि १९४६मध्ये जर्मनीचे दोन तुकडे झाले. त्याचेही परिणाम स्वाभाविकपणे त्यांच्या सिनेमावर जाणवू लागले. तेव्हापासून ते १९८०पर्यंतचा काळ एका विभागात सामावलेला आहे. जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिकमधला (जीडीआर- पूर्व जर्मनी) सिनेमा पूर्णपणे शासनाच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तिथल्या दिग्दर्शकांना सतत आपल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारशी संघर्ष करावा लागत होता. छळछावण्यांमध्ये मिळालेल्या डॉक्युमेंटऱ्यांमधून नाझींच्या अत्याचाराच्या कहाण्या जगासमोर येऊ लागल्या आणि त्याचं प्रतिबिंब सिनेमातही पडू लागलं. वुल्फगँग स्टॉड्टच्या ‘द मर्डरर्स अमन्ग अस्’ हा १९४६मध्ये प्रदर्शित झालेला पहिला असा सिनेमा. ६०च्या दशकाच्या मध्यापर्यंत ताज्या प्रश्नांचा वेध घेणारे बहुतेक सिनेमे बॅन करण्यात आले होते. नंतर मात्र तिथे विविध विषयांवरचे सिनेमे बनू लागले. म्हणजे कम्युनिस्ट राजवटीमध्ये जेवढ्या मोकळेपणाने बनू शकतात, तेवढ्या मोकळेपणाने सिनेमांमध्ये वैविध्य येऊ लागलं. १९७५मध्ये दिग्दर्शक फ्रँक बेयरने बनवलेल्या ‘जेकब द लायर’ या सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशनही आहे. ७०च्या दशकात अनेक दिग्दर्शकांनी मित्रपक्षांच्या ताब्यात असलेल्या फेडरल रिपब्लिकमध्ये (एफआरए- पश्चिम जर्मनी) स्थलांतर केलं. हळूहळू इथले जर्मन नागरिक थिएटरकडे पुन्हा वळू लागले. परदेशी सिनेमेही आता पश्चिम जर्मनीमध्ये प्रदर्शित होऊ लागले होते. अमेरिकेतल्या मेलोड्रामाला तर विशेष मागणी होती. सिनेमाकडे केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहणाऱ्यांच्या विरोधात एक चळवळ उभी राहत होती. न्यू जर्मन सिनेमा म्हणून ती पुढे जगभर माहीत झाली.
शेवटचा टप्पा आहे १९८०पासून ते आजवरचा. पूर्व जर्मनीमध्ये बदलाचे वारे वाहू लागले होते. आणि १९८९मध्ये दोन्ही जर्मनींना वेगळं करणारी बर्लिनची भिंत कोसळली. त्यानंतर खऱ्या अर्थाने जर्मन सिनेमात विषयांमध्ये प्रयोग व्हायला लागले. नाझींनी केलेल्या अत्याचारांवर सिनेमे आले, कम्युनिस्टांच्या अन्यायाचे विषय हाताळले जाऊ लागले. आणि केवळ जर्मनीतच नव्हे, तर जगभरात या सिनेमांना प्रतिसाद मिळू लागला.
हळूहळू आपण इतिहासामधून वर्तमानात येतो. आधुनिक युगातल्या जर्मन दिग्दर्शकांच्या कामाविषयी जाणून घेऊ लागतो. युद्ध, अन्याय, अत्याचार याच्या बरोबरीने मानवी नातेसंबंध, सादरीकरणात केलेले प्रयोग याविषयीची माहिती वाचू, पाहू, बघू लागतो.
सिनेमाच्या दुनियेतली सफर अधिकाधिक आकर्षक करण्यामध्ये डिझायनिंगचाही भाग असतोच
पण फक्त सिनेमाचाच नाही, जर्मन टेलिव्हिजनचा इतिहासही इथे अनुभवायला मिळतो. एका मजल्यावर सहा टेलिव्हिजन आयलंड्स, म्हणजे छोटे छोटे विभाग बनवण्यात आले आहेत. इथे सुरुवातीच्या काळापासूनचे टीव्हीवरचे काही ठराविक कार्यक्रम पाहता येतात. जर्मन टेलिव्हिजनमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांची माहिती मिळते. पुरस्कारप्राप्त कलावंतांची क्लिपिंग्स बघायला मिळतात.
६.
‘फिल्महाऊस’च्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर जर्मन सिनेमाचा आणि टीव्हीचा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. पण ‘फिल्महाऊस’ म्हणजे फक्त हे प्रदर्शन नाही. इथं दुसऱ्या मजल्यावर आहे, ‘द फ्रेंड्स ऑफ जर्मन फिल्म अर्काइव्ह’. किनो आर्सेनल नावाची संस्था ते चालवतात. त्या अंतर्गत दुसऱ्या मजल्यावरच्या बेसमेंटमध्ये त्यांनी दोन अत्याधुनिक थिएटर्स बांधलेली आहेत. इथं जर्मन सिनेमाच्या इतिहासातले क्लासिक समजले जाणारे सिनेमे दाखवले जातात, मोठ्या दिग्दर्शकांचे रेट्रोस्पेक्टिव्ह होतात. काही वेळा एक देश निवडून त्या देशातले किंवा त्या देशाशी संबंधित सिनेमांची मालिका सादर केली जाते. बर्लिनाले या बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक स्वतंत्र भाग म्हणून आर्सेनलतर्फे ‘इंटरनॅशनल फोरम ऑफ न्यू सिनेमा’चं आयोजन केलं जातं. त्यांच्या चित्रपट वितरण विभागाकडे ८०० सिनेमे आहेत तर त्यांच्या अर्काईव्हमध्ये ७०००.
१९२७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेट्रोपॉलिस'ची भव्यता अचंबित करणारी आहे
पाचव्या मजल्यावर आहे लायब्ररी. इथं सिनेमा, टेलिव्हिजन आणि एकूणच मीडियावरची पुस्तकं, नियतकालिकं, डीव्हीडीज आहेत. सुमारे ८० हजार आयटम्स या लायब्ररीच्या संग्रही आहेत.
आठव्या आणि नवव्या मजल्यावर सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्राचं व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवले जातात.
‘फिल्महाऊस’ची ही इमारत आहे बर्लिनमधल्या पोट्सडॅमर स्ट्रास या भागात. फिल्महाऊसपासून दोनचार मिनिटांच्या अंतरावरच मर्लिन डिट्रिच प्लाट्झ आहे. इथेच बर्लिनाले हा बर्लिनचा आंतरराष्ट्रीय महोत्सव भरतो. फिल्महाऊस आहे त्या सोनीच्या कॉम्प्लेक्समध्येही काही थिएटर्स आहेत आणि बर्लिनालेमधले काही सिनेमे इथेही दाखवले जातात. शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्टॉरन्ट्स, कॅफे, फूड कोर्ट्स... अत्यंत गजबजलेला असा हा शहरातला भाग आहे. आणि नव्याने बांधलेलाही.
७.
दुसऱ्या महायुद्धात हा भाग उदध्वस्त झालेला होता. जर्मनीचे दोन भाग झाल्यानंतर रशिया आणि अमेरिका-ब्रिटन यांच्या सीमाही इथूनच जात. त्यानंतर बांधली गेली बर्लिनची भिंत. वैराण अशा या भागाकडे मग कोणीच लक्ष देईनासं झालं. भिंत पडली, दोन्ही जर्मनी एक झाले आणि बर्लिन शहराच्या मध्यमध्यभागी असलेल्या या भागाचं पूर्णत: नुतनीकरण करावं असं प्रशासनानं ठरवलं. १९९१मध्ये पोट्सडॅम प्लाट्झचं डिझाईन करण्याची स्पर्धा घेतली गेली आणि हाईन्झ हिलमर आणि ख्रिस्टॉफ सॅटलर या आर्किटेक्ट्सनी ती जिंकली. १९९३मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. इतरही आर्किटेक्ट्सच्या डिझाईन्सचा समावेश करण्यात आला आणि एका वैराण जागेवर उभं राहिलं एक अत्याधुनिक सेंटर. आजच्या बर्लिनचं प्रतिनिधित्व करणारं.
१९२७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेट्रोपॉलिस'ची भव्यता अचंबित करणारी आहे
गंमत म्हणजे, म्युझियमच्या तिसऱ्या मजल्यावर आपण जर्मन सिनेमाच्या अंतरंगात प्रवेश करतो, तेव्हा या बाहेरच्या जगाशी काही काळ जणू आपला संपर्क तुटलेला असतो. इतिहासात सैर करताना आपण तिथले झालेलो असतो. आणि दोन-तीन तासांनी पुन्हा वर्तमानात आल्यावर वाटतं, जुनं जपून नव्याशी सांगड घालणारं हे जग खरंच किती मोहक आहे!
.............................................................................................................................................
लेखिका मीना कर्णिक पत्रकार व चित्रपट समीक्षक आहेत.
meenakarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment