कळसुत्री बाहुला अर्थात ‘द माँचुरियन कँडिडेट’
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘माँचुरियन कँडिडेट’चं एक पोस्टर
  • Tue , 03 January 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक माँचुरियन कँडिडेट The Manchurian Candidate शीतयुद्ध Frank Sinatra फ्रँक सिनात्रा Laurence Harvery लॉरेन्स हार्वी

‘माँचुरियन कँडिडेट’ ही संकल्पना शीतयुद्धाच्या कालखंडात विशेषतः साठोत्तर काळात अमेरिकेत चांगलीच लोकप्रिय झाली होती. ‘माँचुरियन कँडिडेट’ म्हणजे एक प्रकारचा प्रोग्रॅम्ड रोबोट. अर्थाच हाडामांसाचा जिवंत माणूसच, पण त्याचं ब्रेनवॉश करून, त्याला हिप्नोटाइज करून अशा पद्धतीने त्याच्या मनावर ताबा मिळवायचा की, एखाद्या विशिष्ट खुणेसरशी तो माणूस त्याच्या सूत्रधारांसाठी हवं ते काम बिनबोभाट करेल आणि नंतर त्याला त्या कृत्याविषयी काडीमात्रही आठवणार नाही. आणि आठवतच नसल्यामुळे त्याच्या मनाला टोचणी लागण्याचीही सुतराम शक्यता नाही.

शीतयुद्धाने अनेक गुप्तहेरांना जन्म दिला, तसाच गुप्तहेर कथांना आणि कॉन्स्पिरसी थिअरीजनाही. अनेक पाश्चात्य लेखकांना या गुप्तहेरकथांनी जगवलं. जेम्स बाँड हा या सगळ्या गुप्तहेरांचा मेरूमणी. संपूर्णतः कल्पित अशा या गुप्तहेराला अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा वास्तववादी आधार होता. बाँडचा गुप्तहेर वेगळ्या धाटणीचा होता. मुळात त्याला गुप्तहेर म्हणायचं का हा देखील प्रश्नच आहे. कारण बाँडचं कुठलंच काम गुप्त नसतं. तो स्वतःची ओळख वगैरे लपवण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही. त्याचं सगळं काम खुलेआम असतं. बाँडपेक्षा वेगळ्या प्रकारचे गुप्तहेर म्हणजे आपली ओळख लपवून गुपचूप शत्रूच्या गोटात जाऊन, त्यांच्यातलाच एक भाग बनून काम करत राहणारे, माहिती मिळवण्यासाठी धडपडत राहणारे आणि मिळालेली माहिती आपल्या माणसांपर्यंत पोहोचवणारे. ‘माँचुरियन कँडिडेट’ हा त्याच्याही पलिकडचा प्रकार. इथे ‘पेरलेला माणूस’ वगैरे प्रकार नाही; कारण पेरलेल्या माणसाच्या संवेदना जागृत असतात. आपण कुठलं काम करतोय, कोणासाठी करतोय, का करतोय, हे त्याला कळत असतं आणि तो स्वेच्छेने ते करत असतो. ‘माँचुरियन कँडिडेट’चा मात्र स्वतःवर ताबा नसतो, तो एखाद्या कळसुत्री बाहुल्यासारखा असतो. एरवी तो नॉर्मल असतो, आपले सर्व व्यवहार सामान्यरीत्या करत असतो, पण  खुणेच्या दोरीचा हिसका बसताच तो हिप्नोटाइज झाल्यासारखा संवेदना गमावून बसतो आणि मग त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. आधी पढवल्याप्रमाणे तो कृती करून मोकळा होतो.

रिचर्ड काँडन या लेखकाची ‘द माँचुरियन कँडिडेट’ ही कादंबरी १९५९ साली प्रकाशित झाली. ती चांगलीच गाजली. याच कादंबरीवर आधारित पटकथा जॉर्ज अॅग्झलरॉड या ऑस्करविजेत्या पटकथालेखकाने लिहिली आणि जॉन फ्रँकिनहायमर या दिग्दर्शकाने या पटकथेवर त्याच नावाचा चित्रपट बनवला. १९५२ सालच्या कोरिअन युद्धापासून चित्रपटाला सुरुवात होते. अमेरिकन सैनिकांची एक तुकडी डबलक्रॉसमुळे चिनी सैनिकांच्या हाती लागते. काही महिन्यांनी त्यांची सुटका होते आणि ते अमेरिकेत परत येतात. चिनी सैनिकांच्या तडाख्यातून सुखरूप वाचवण्याची अजोड कामगिरी केल्याबद्दल या तुकडीचा प्रमुख मेजर बेनेट मार्को (फ्रँक सिनात्रा) याच्या शिफारशीवरून सार्जंट रॉबर्ट शॉ (लॉरेन्स हार्वी) याला काँग्रेसच्या मेडल ऑफ ऑनरने गौरवण्यात येतं. या तुकडीतला प्रत्येक जण शॉविषयी चांगलं बोलतो. अमेरिकेत परतताक्षणीच शॉ त्याची आई आणि सिनेटर सावत्र बापाशी पटत नसल्यामुळे न्यूयॉर्क येथे एका प्रथितयश संपादकाचा सहायक या पदावर काम करण्यासाठी निघून जातो. मात्र, कोरियात चिनी सैनिकांच्या ताब्यात असतानाच्या काळातील छळवणुकीची स्वप्न मेजर मार्को आणि तुकडीतल्या अन्य काहीजणांचा पिच्छा सोडत नाहीत. चिनी, रशियन आणि कोरियन लष्करी अधिकाऱ्यांसमोर मेजर मार्को आणि त्याच्या तुकडीतले अन्य सैनिक बसले आहेत. कोणाच्याच संवेदना जाग्यावर नाहीत. सगळेच हिप्नोटाइज केल्यासारखे आहेत. एका अधिकाऱ्याच्या आदेशावरून रॉबर्ट शॉ आपल्याच तुकडीतल्या दोघा सैनिकांचा तिथेच थंड डोक्याने खून करतो. वारंवार पडणाऱ्या या स्वप्नाने मेजर मार्कोची झोप उडते. तो आपल्या वरिष्ठांच्या कानावर ही बाब घालतो. चौकशीअंती आणि मार्कोच्याच वैद्यकीय तपासणीनंतर त्याला विश्रांतीची गरज असल्याचं सांगून त्याची नियुक्ती लष्कराच्या जनसंपर्क खात्यात करतात. पण ते कामही त्याला न झेपल्यामुळे त्याची नियुक्ती पुन्हा त्याच्या मूळ विभागात होते. दरम्यान मार्कोप्रमाणेच त्याच्या तुकडीतला आणखी एक जण तशाच प्रकारचं स्वप्न वारंवार पडत असल्याचं आपल्या वरिष्ठांना सांगतो. जो रॉबर्ट शॉ कोणालाही आवडत नाही, त्याच्याविषयी कोरिआहून परतलेले त्याच्या तुकडीतले लोक अचानक चांगलं कसं बोलू लागले, बरं प्रत्येकाच्या तोंडी एकच, ठरलेलं वाक्य. काहीतरी गडबड आहे, मार्को आपल्या वरिष्ठांना पुन्हा पुन्हा सांगतो. अखेरीस एफबीआय, सीआयए आणि आर्मी इंटलिजन्स यांचं संयुक्त पथक स्थापन करून या प्रकरणाचा मागोवा घेण्याचा निर्णय घेतला जातो आणि या तपासासाठी मार्कोचीच नियुक्ती केली जाते.

‘द माँचुरियन कँडिडेट’ ही कादंबरी लिहिली गेली आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला तो काळ शीतयुद्धाने भारलेला होता. त्यामुळे कादंबरी आणि चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद न मिळता तरच नवल होतं. ‘माँचुरियन कँडिडेट’ या संकल्पनेविषयी, म्हणजे अशा प्रकारे जिवंत माणसाचा बुद्धिभेद करून, त्याला संमोहनाच्या प्रभावाखाली प्रशिक्षण देऊन, विशिष्ट वेळी त्याच्यावरचा हा संमोहनाचा प्रभाव जागृत करून त्याच्या करवी हवं ते कृत्य करवून घेणं शक्य आहे का, याविषयीच्या वैज्ञानिक शक्याशक्यतेविषयी आजही लोकांचं एकमत नाही. विज्ञानाच्या आधारे माणसासारखाच दुसरा माणूस कृत्रिमरित्या जन्माला घालण्यापर्यंत आपण पोहोचलो असलो तरी एखाद्याच्या मनाचा ताबा घेऊन त्याच्याकरवी काहीही करून घ्यावं आणि त्याचा त्याला थांगही लागू नये, असं काही करणं शक्य आहे, याला आजवर वैज्ञानिक आधार मिळालेला नाही. परंतु, शीतयुद्ध शिगेला पोहोचलेलं असण्याच्या त्या काळात ही कल्पना बहुदा लोकांना कमालीची भावली असावी. अमेरिका आणि रशिया एकमेकांना हरवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतील, अशी त्यावेळी लोकांना खात्री होती. रशियाच्या पोलादी पडद्याआड नेमकं काय चाललंय, हे लोकांना कळत नव्हतं. दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रस्पर्धाही जोरात होती. १९६२ साली क्युबन मिसाइल क्रायसिसच्या रूपाने या दोन्ही देशांनी जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंच होतं. नेमक्या त्याच वेळेला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दिग्दर्शक जॉन फ्रँकिनहायमर याने ब्लॅक अँड व्हाइटमध्ये न्वारच्या शैलीत ‘द माँचुरियन कँडिडेट’ चित्रित केला. फ्रँकिनहायमर हा एकेकाळचा सिडनी ल्यूमेटचा सहायक. त्यामुळे ल्यूमेटच्या शैलीची छाप फ्रँकनहायमरवर दिसून येते. ल्यूमेटप्रमाणेच राजकीय जाणीवांचं भान त्याच्याही चित्रपटांमध्ये दिसून येतं, त्याचवेळी मानसिक द्वंद्वाचा खेळ मांडायलाही त्याला आवडायचं. ‘द माँचुरियन कँडिडेट’मध्ये हे दोन्ही घटक पुरेपूर आहेत.

प्रामुख्याने म्युझिकल्ससाठी ओळखला जाणारा फ्रँक सिनात्रा, ६०च्या दशकात यशाच्या पायऱ्या झपाझप चढलेला ब्रिटिश अभिनेता लॉरेन्स हार्वी आणि हार्वीपेक्षा वयाने फक्त तीन वर्षांनी मोठी असलेली, पण तरीही पडद्यावर त्याची आई साकारणारी अँजेला लॅन्सबरी हे ‘द माँचुरियन कँडिडेट’चे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फ्रँकिनहायमरच्या आग्रहाखातर सिनात्राच्या फारसं मनात नसूनही शॉच्या आईच्या भूमिकेत लॅन्सबरीची निवड केली आणि या अभिनेत्रीने या भूमिकेत कमाल केली. चित्रपटाला जी अवघी दोन ऑस्कर नामांकनं मिळाली, त्यातलं एक लॅन्सबरीला सहायक अभिनेत्रीच्या विभागात मिळालं.  

चित्रपट प्रदर्शित झाला, तो बऱ्यापैकी चालला आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या झाली. त्या पार्श्वभूमीवर सिनात्राने हा चित्रपट वितरणातून काढून घेतला, अशी वदंता पसरली. अनेक वर्षं या वदंतेवर लोकांचा विश्वास होता. पण १९८७ मध्ये न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुन्हा या चित्रपटाच्या हक्कांची देवाणघेवाण झाली आणि त्यावेळी सिनात्राने असं काही केलं नव्हतं, असं स्पष्ट करण्यात आलं. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत तो पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागत असे. टप्प्याटप्प्याने तो देशभरात प्रदर्शित होई. केनेडी यांची हत्या झाली त्यावेळेपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा हा फेरा पूर्ण झाला होता. त्यामुळेच तो नंतर अमेरिकेतल्या कुठल्याही सिनेमागृहात लागला नाही, असं अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलं. पण योगायोगाची गोष्ट म्हणजे केनेडींचा तथाकथित मारेकरी ली हार्वी ओस्वाल्ड हा देखील ‘माँचुरियन कँडिडेट’ असल्याचा समज आजही काही घटकांमध्ये आहे. याला कारण त्याची पार्श्वभूमी. अमेरिकन नौदलात असलेला ओस्वाल्ड नौदलातून बाहेर पडून अनेक लटपटी करून रशियात गेला होता आणि आपण कम्युनिस्ट असल्याचं सांगून तिथे स्थायिक होण्याची इच्छा त्याने रशियन अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. ऑक्टोबर १९५९ ते मे १९६२ अशी अडीच वर्षं तो रशियात होता. त्यामुळेच रशियाने त्याला ‘माँचुरियन कँडिडेट’ बनवून अमेरिकेत परत पाठवला, अशी थिअरी काहींनी मांडली आणि शीतयुद्ध शिगेला पोहोचलेलं असतानाच केनेडी यांची हत्या झाल्यामुळे या थिअरीला लोकप्रियताही मिळाली.

या कादंबरी आणि चित्रपटानंतर अमेरिका या संकल्पनेच्या प्रेमातच पडली. विशेषतः राजकीय पटलावर एखाद्या नव्या ताऱ्याचा अनपेक्षितपणे उगम झाला की, त्याच्याकडे संशयाने बघितलं जाऊ लागलं. याच धारेतला सध्याचा ‘माँचुरिअन कँडिडेट’ आहे डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे निर्माण झालेली खळबळ अद्याप शमायचं नाव घेत नाही. ट्रम्प रोजच्या रोज वादग्रस्त ट्विट्स करून ही खळबळ शमू न देण्याची खबरदारी घेत आहेत. निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली हे सर्वश्रुत आहे. पण प्रत्यक्षात ट्रम्प हे सर्व हिलरींना मदत व्हावी, यासाठीच करत आहेत, असा दावा त्यावेळी कोण्या ऐऱ्यागैऱ्याने नाही तर साक्षात सलमान रश्दी यांनी केला होता. ट्रम्प हे अध्यक्षपदासाठी उभे राहात असले तरी ते प्रत्यक्षात ‘मांचुरियन कँडिडेट’ आहेत, असा रश्दींचा दावा होता. आता बोला!

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......