इस्लाममध्ये ‘आयसिस’ तयार झाली; ती का, कधी, कशी, कुठे आणि केव्हा?
पडघम - विदेशनामा
रवि आमले
  • अबु बकर अल बगदादी
  • Mon , 28 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 अबु बकर अल बगदादी Abu Bakr al-Baghdadi आयसिस Islamic State

‘आयसिस’ हे ‘इस्लामिक स्टेट इन सीरिया अँड इराक’चं लघुरूप. या संघटनेनं तीनदा आपलं नाव बदललं आहे. पहिल्यांदा ते ‘आयसिल’ होतं. म्हणजे ‘इस्लामिक स्टेट इन इराक अँड लेवान्त’. हे लेवान्त म्हणजे सीरिया, लेबनॉन, सायप्रस, जॉर्डन हा सगळा भूभाग. त्याच्यात पॅलेस्टीनसुद्धा येतं. हे नाव पुढं बदललं आणि त्याचं ‘आयसिस’ झालं. नंतर तेही बदललं आणि ‘आयएस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट’ एवढंच नाव झालं.

म्हणजे ही नामांतराची खोड आपल्याकडंच असते असं नाही. ती तिकडंही आहे. पण ते काही मनात आलं म्हणून केलं असं नाही. त्यामागे एक पद्धतशीर विचार आहे. आपल्याला वाटतं नामांतर केलं म्हणून काय झालं?

ते नावात काय आहे वगैरे आपल्याला माहीतच असतं, परंतु खरं तर ते तसं नाही. आयसिलचं आयसिस आणि आयसिसचं आयएस हा जो प्रवास आहे, त्याला धार्मिक विचारांची एक किनार आहे. आयसिस म्हणजे केवळ सीरिया आणि इराकमधलं राष्ट्र झालं. पण आयसिसला तेवढंच अपेक्षित होतं का? त्यांना जगभरात इस्लामी खिलाफत म्हणजे इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे. सीरिया आणि इराकचा मोठा भूभाग ताब्यात आल्यानंतर आणि तिथं त्यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी लगेच खिलाफतीची घोषणा करून टाकली. जगभरातील सुन्नी मुस्लिमांसाठी तो संदेश होता की, आता इस्लामचं राज्य स्थापन झालेलं आहे, म्हणून हे नामांतर. या संघटनेला आयएस म्हणून संबोधणं याचा अर्थ त्या खिलाफतीला मान्यता देणं असा आहे. म्हणून अनेक लोक आजही तिला ‘आयसिस’च म्हणतात. ओबामांसारखी मंडळी ‘आयसिल’ म्हणतात. ब्रिटनचे पंतप्रधान होते डेव्हिड कॅमेरॉन. ते आयसिसऐवजी ‘दाएश’ म्हणायचे. ते आयसिसच्या अरबी नावाचं लघुरूप. पण त्याला अरबी संस्कृतीत काहीतरी वेगळाच अर्थ आहे. आयसिससाठी ती शिवीच आहे. म्हणून कॅमेरॉन मुद्दाम ‘दाएश’च म्हणत असत.  

तर हे आयसिस नावाचं प्रकरण आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. जगापुढं तो एक मोठा धोका आहे आणि त्याचं अनेक मुस्लीम तरुणांना आकर्षण वाटत आहे ते का, हे समजून घ्यायचं आहे. बरं हे आकर्षण मुस्लीम तरुणांनाच वाटत आहे असं नाही. ते इतरांनाही वाटत आहे. ते पाहा कसे कडवे असतात, मग आपण का होऊ शकत नाही तसे, असे संदेश आपल्याही मोबाईलवर कधी ना कधी आलेच असतील. ते आकर्षण आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल.

‘आयसिल’चा लोगो

हा इतिहास सुरू होतो सातव्या शतकापासून. म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली तेव्हापासून. हा काळ म्हणजे - आपल्याकडं महाराष्ट्रात तेव्हा चालुक्यांचं राज्य होतं आणि पुलकेशी हा मराठा राजा इथं महाराष्ट्र, कर्नाटकात राज्य करत होता. सातव्या शतकात मोहम्मद पैगंबर यांचा मृत्यू झाल्यानंतर इस्लाम धर्मियांत यादवी माजली. त्यातून दोन पंथ तयार झाले. एक सुन्नी आणि दुसरा शिया.

त्यांच्यातला भेद काही धार्मिक कारणांवरून नव्हता. म्हणजे आत्मा आहे की नाही किंवा ईश्वराची पूजा उजवीकडून करायची की, डावीकडून असा काही तो आध्यात्मिक वाद नव्हता. खरं तर सगळे धार्मिक वाद पाहा. त्यांच्या मुळाशी काय असतो तर सत्तेचा संघर्ष. ही आपल्यासमोर मेंढरं बसलेली आहेत. त्यांच्यावर सत्ता कोण गाजवणार असा तो वाद असतो. शिया आणि सुन्नींमध्ये काय वाद होता? तर शियांच्या म्हणण्यानुसार मुहम्मद पैगंबरांनी सन ६३२ मध्ये त्यांचे अली नावाचे जावई होते, त्यांना खलिफा म्हणून जाहीर केले होते. सुन्नी म्हणत की तसं काही झालेलं नाही. पैगबरांनी अली यांचा गौरव केला हे खरं, पण हजरत अली यांना काही वारसदार म्हणून घोषित केलेलं नाही. पुढं पैगंबर गेल्यानंतर काही लोकांनी अबु बक्र यांना मुस्लीम खिलाफतीचे खलिफा म्हणून गादीवर बसवलं. यातून पुढे मग त्यांच्यात लढाया झाल्या. त्या आजही सुरू आहेत. जगभरात सगळीकडे शिया विरुद्ध सुन्नी हा संघर्ष आहे. पाकिस्तानात सुन्नी अतिरेकी संघटना आणि शिया अतिरेकी संघटना एकमेकांच्या प्रार्थनास्थळांत बॉम्बस्फोट करत आहेत. इराकमध्येही तेच झालेलं आहे. तर आयसिसच्या उदयाला हा शिया आणि सुन्नी यांच्यातला संघर्ष कारणीभूत आहे. आयसिस ही सुन्नी मुस्लिमांची संघटना आहे. हे झालं पहिलं कारण.

दुसरं कारण आहे, ते इस्लामी संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यांच्यातला सत्तासंघर्ष. कोणाची जीवनपद्धती श्रेष्ठ, कोणाचा धर्म श्रेष्ठ यावरून झालेला तो संघर्ष आहे. मध्ययुगीन इतिहासाची पानेच्या पाने त्या क्रुसेड आणि जिहादनं भरलेली आहेत. आजही हाच संघर्ष सुरू आहे. म्हणजे साधी गोष्ट पाहा – इस्लाममध्ये स्त्रियांनी बुरखा पद्धत पाळणं हे सक्तीचं आहे. पाश्चात्य देशांचा त्याला विरोध आहे. फ्रान्समध्ये मध्यंतरी बुर्किनीवरून वाद झाला. बुर्किनी म्हणजे बिकिनी आणि बुरखा यांचं मिश्रण. पाश्चात्य संस्कृतीला ही अशी वस्त्रांमध्ये नैतिकता वगैरे असते हे मान्य नाही. पण इतरांना महिलांच्या कपड्यांमध्ये चारित्र्य आणि नैतिकता दिसते. तर अशी एखादी स्कर्ट वगैरे घातलेली महिला आज आयसिसच्या इस्लामी राज्यात दिसली तर पहिल्यांदा तिचं शीर उडवतील. आणि अशा घटना घडलेल्या आहेत. शरीराचा एखादा भाग उघडा राहिला, म्हणून आयसिसनं महिलांना भरचौकात फटक्यांची शिक्षा दिलेली आहे. पुरुषांवरही अशी दाढी वगैरे वाढवण्याची बंधनं आहेत. पण महिलांवरील बंधनं अधिक कडक आहेत. आणि ती सर्वच धर्मांत तशी असतात.

तर हा संस्कृती संघर्ष हे आयसिसच्या जन्माचं एक कारण झालं.

तिसरं कारण म्हणजे शीतयुद्धातून जन्माला आलेला सत्तासंघर्ष. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता जन्माला आल्या. एक कट्टर भांडवलशाही राष्ट्र. आणि दुसरं कट्टर साम्यवादी. जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर दोघांचाही डोळा. या शीतयुद्धात १९७९ साल फार महत्त्वाचं आहे. त्या वर्षी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे इराणमध्ये क्रांती झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानवरील रशियानं आक्रमण केलं.

हा खेळ पाहा. इराण हा शियांचा देश. तिथं पहेलवी घराण्याचा मोहम्मद रझा शाह पहेलवी राज्य करत होता. हा गडी प्रगतीवादी होता. सुशिक्षित होता. अमेरिकेशी त्याचे चांगले संबंध होते. देशाचं बरं चाललं होतं, पण त्याचा सेक्युलर सुधारणावाद शिया धर्मगुरूंना पसंत नव्हता. बरं त्याचे अमेरिकेशी संबंध असल्यानं तेथील डाव्यांनाही तो चालत नव्हता. या सगळ्यांनी मिळून १९७९मध्ये क्रांती केली आणि पुढच्या वर्षी तिथं अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी हा धर्मगुरू सत्तेवर आला. यात एक गंमतीची बाब अशी की, त्या काळात तिथल्या एका मोठ्या वर्तमानपत्रात खोमेनींविरोधात आणि सरकारच्या बाजूनं लेख छापून आला होता. अतिशय गाजला तो. तो टोपणनावानं लिहिलेला होता. त्यात या खोमेनींना ‘ब्रिटिश एजंट’ असं म्हटलं होतं. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे तो ‘वेडा भारतीय कवी’ आहे असं त्यात लिहिलं होतं. काही काळ ते भारतात शिकायला होते त्यातून हा अर्थ काढण्यात आला होता. तर या इस्लामिक क्रांतीमुळे अमेरिकेच्या हातून इराण गेलं. तिथलं तेल गेलं आणि तिथं कट्टरपंथी शियांची सत्ता आली. त्याच वर्षी इराणच्या शेजारच्या देशात, म्हणजे अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियानं आपलं सैन्य घुसवलं. आता इराण हातून गेलेलं आहे. अफगाणिस्तान रशियानं घशात घातलेलं आहे. बाजूला भारतासारखा महाकाय देश अलिप्ततावादी आहे. पण त्याचबरोबर इंदिरा गांधी यांनी घटनेत बदल करून त्यात ‘समाजवादी’ असा शब्द घातलेला आहे. हे काही अमेरिकेला सहन होण्यासारखं नव्हतं. कारण त्याच्यामुळे या भागातला सत्तासमतोल ढासळत होता. तेव्हा अमेरिकेनं काय केलं, तर सोव्हिएत रशियाविरोधात लढणाऱ्या अफगाण बंडखोरांना मदत करायचं ठरवलं. हे बंडखोर म्हणजे मुजाहिदीन. त्या लढ्यात पुढं रशियाचा मानहानीकारक पराभव झाला. १९८९ला रशियाचा अखेरचा सैनिक तिथून बाहेर पडला. या दहा वर्षांच्या युद्धानं अफगाणिस्तानची अगदी राखरांगोळी केली. पण त्या राखेतून जन्माला आले तालिबानी आणि अल् कायदा.

‘आयसिल’चा ध्वज

हे जे युद्ध होतं ते मुस्लिमांच्या दृष्टीनं निधर्मी काफिरांविरोधातलं धर्मयुद्ध होतं. तो जिहाद होता. हे मुजाहिदीन म्हणजे धर्मयोद्धे होते. अमेरिकेने रशियाविरोधात धार्मिक भावनांचा असा वापर करून घेतला होता. या मुजाहिदीनांना अमेरिका पैसे आणि शस्त्रास्त्रे पुरवत असे. त्यात मध्यस्थ होता पाकिस्तान. तिथं तेव्हा जनरल झिया उल हक हा हुकूमशहा राज्य करत होता. दिल्ली विद्यापीठात शिकलेला हा गृहस्थ. त्यानं धर्माचं महत्त्व बरोबर ओळखलं होतं. त्यानं पाकिस्तानला धर्मराज्य बनवण्याचा चंग बांधला होता. अमेरिकेनं त्याचं साह्य घेतलं आणि आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून मुजाहिदीनांना शस्त्रास्त्र पुरवायला सुरुवात केली. त्या युद्धात अनेक अफगाणी स्थलांतरित पाकिस्तानात आले होते. त्यांच्यासाठी तिथं छावण्या उभारण्यात आल्या. त्यांच्या मुलांसाठी मदरसे उघडण्यात आले. तालिब म्हणजे विद्यार्थी. या मदरश्यांतून बाहेर पडणारे विद्यार्थी म्हणजे तालिबानी. ते अफगाणिस्तानात लढत होते.

इथं प्रवेश होतो तो ओसामा बिन लादेनचा.

बिन लादेन मूळचा सौदी अरेबियातला. हा देश कट्टर सुन्नी. त्यांच्यात एक पंथ आहे बहाबी. सलाफी म्हणूनही तो ओळखला जातो. अठराव्या शतकात त्याची स्थापना झाली. संस्थापक होता मुहम्मद इब्न अब्द अल वहाब. इस्लाम शुद्ध स्वरूपातच पाळला गेला पाहिजे यावर यांचा कटाक्ष. म्हणजे इस्लामला ‘बुतपरस्ती’ - मूर्तीपूजा - अमान्य. त्यामुळे पीर, दर्गे यांची पूजा करायलाही बहाबी पंथात बंदी आहे. हा सौदी अरेबियाचा राजधर्म आहे. अशा राष्ट्रामध्ये बिन लादेनची मूळं आहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

बिन लादेनचं कुटुंब अब्जाधीश. वडील सौदीतले मोठे बांधकाम व्यावसायिक. ‘सौदी बिनलादीन’ ग्रुप म्हणून त्यांची कंपनी प्रसिद्ध आहे. हा काही साधासुधा माणूस नव्हता. त्यांनी बायका केल्या २२ आणि त्यांच्यापासून त्यांना मुलं झाली एकूण ५६. हा ५६ पोरांचा बाप आहे!

सौदी अरेबियाचे राजे फैजल यांना त्यांनी मदत केली होती. त्या बदल्यात त्यांना सौदीमधील सर्व बांधकाम कंत्राटं देण्यात यावीत अशी राजाज्ञा राजे फैजल यांनी काढली होती. यातून त्यांनी प्रचंड पैसा कमावला. हा पैसा पुढं त्यांनी तेलाच्या व्यवहारात गुंतवला.

हे तेलाचं राजकारण फार गुंतागुंतीचं असतं. म्हणजे बघा, ओसामा बिन लादेननं ‘9\11’ घडवून आणलं. त्या वेळी अमेरिकी सरकारनं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, तर देशातील सगळी प्रवासी विमानं जमिनीवर उतरवली. एकाही विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. एक विमान तर हृदय घेऊन चाललं होतं प्रत्यारोपणासाठी, पण तेही थांबवण्यात आलं. पण त्या पहिल्या काही तासांत अमेरिकेनx फक्त दोनच विमानांना उड्डाणास परवानगी दिली होती. ती दोन्ही विमानं अमेरिकेतून सौदी अरेबियाला गेली. त्यात होते बिन लादेनचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी. हे तेलाच्या संबंधातून घडलेलं आहे.

अफगाणिस्तानात रशियाविरोधात युद्ध सुरू असताना ओसामा बिन लादेन तिथं गेला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर त्यानं एक छावणी उभारली. तिथून तो युद्धासाठी जगभरातील अरबी, मुस्लीम बंडखोरांची भरती करत होता. त्यांना प्रशिक्षण देत होता. अफगाणी मुजाहिदीनांना शस्त्रं पुरवत होता. हे सगळं सीआयएच्या मदतीनं चाललेलं होतं. ओसामाची ती छावणी, तो तळ म्हणजे अल् कायदाची सुरुवात होती. अल् कायदाचा अर्थ मुळात आहे तळ, बेस. १९८८ मध्ये त्याने अल् कायदाची स्थापना केली. ते युद्ध संपलं. मधल्या काळात त्याचं आणि सौदी राजघराण्याचं फाटलं. सौदी अरेबियानं त्याची हकालपट्टी केली. तेव्हा तो सुदानला गेला. आता त्यानं अमेरिकेविरोधात जिहाद पुकारला होता. ११ सप्टेंबर २००१ मधला न्यू यॉर्कमधला हल्ला हा त्याचा परमोच्च बिंदू होता.

या काळात अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा कब्जा होता. कारभार, लोकांवरील अत्याचार, धार्मिक कट्टरता यांबाबत हे तालिबानी म्हणजे आयसिसचे पूर्वसुरीच. अफगाणिस्तानात ते सत्तेवर होते, तेव्हा त्यांनी तिथं शरियतचे कायदे लागू केले होते. महिलांनी घराबाहेर पडायचं नाही, नोकरी करायची नाही, शाळेत जायचं नाही... मलालावर पाकिस्तानी तालिबान्यांनी गोळ्या झाडल्या त्या या कायद्यानुसारच... तर महिलांनी पूर्णतः बुरख्यातच राहायचं. एखाद्या महिलेनं कुणाशी विवाहबाह्य संबंध ठेवले तर तिला दगडांनी ठेचून मारलं जात होतं. समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना भिंतीत चिणून मारलं जात होतं. चोरांचे हात कलम केले जात होते. कोणी खून केला तर त्याला भरचौकात मारलं जात होतं. असं सगळं चाललेलं होतं. आयसिसनं ते बरंच पुढं नेलं. 

या तालिबान्यांचा प्रमुख म्हणजे आमीर होता मुल्ला ओमर. ओसामा त्याच्या आश्रयाला होता.

तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते जॉर्ज डब्ल्यू बुश. ‘बिन लादेनला अमेरिकेच्या हवाली करा’ अशी मागणी त्यांनी मुल्ला ओमरकडे केली. त्यानं त्याला नकार दिला आणि अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

सीआयएच्या सक्रीय साहाय्यानं उदयाला आलेल्या तालिबानशी अमेरिका आता लढत होती. ती कशासाठी? तर सीआयएच्या मदतीनं उदयाला आलेल्या अल् कायदाच्या नेत्याला – ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी. या युद्धात अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेशी लढण्यासाठी एक बंडखोर नेता उतरला होता. तेव्हा तो फारसा कोणालाही माहीत नव्हता. नंतर सारं जग त्याला ओळखू लागलं. त्याचं नाव अबु मुसाब अल झरकावी. आयसिसचा खऱ्या अर्थानं जनक कोण असेल तर तो.

हा झरकावी मूळचा जॉर्डनमधला. तिथं बदायुनी टोळ्या असतात. त्यातला. तरुणपणी तो तबलिगी जमात या संघटनेचा सदस्य झाला. ही संघटना म्हणजे मुस्लीम तरुणांना सच्चा मुसलमान बनवणारी चळवळ. १९८९ मध्ये तो रशियाविरोधात लढायला अफगाणिस्तानात गेला होता. पण तोवर रशियानं माघार घेतली होती. तिथं त्याला काम काय देण्यात आलं, वृत्तपत्रकं काढण्याचं. नंतर रशियानं माघार घेतल्यावर अफगाणी टोळ्या आणि तालिबानी यांच्यात युद्ध पेटलं. हा त्यात सहभागी झाला होता. तिथंच त्यानं जिहादी सलाफी पंथाचा स्वीकार केला.

त्या वेळी बिन लादेन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात तळ ठोकून होता. तिथं तो बिन लादेनला जाऊन भेटला. पण हा रांगडा, अशिक्षित गडी. लादेनच्या भोवती जी माणसं होती, ती होती दहशतवादी, पण शिकलेली, जरा तमीज असलेली. याचं लादेनशी पटणं शक्यच नव्हतं.

याची एक कथा सांगतात की, हा एकदा लादेनला भेटला आणि हट्टच धरून बसला. म्हणाला, आपण सगळे शिया मुस्लीम मारायला हवेत. शेवटी लादेननं काय घ्यायचा तो धडा घेतला आणि त्याला वेगळा जिहादी कॅम्प चालवायला दिला. यातून पुढं त्याला भरपूर अनुयायी मिळाले. 

हा झरकावी वेडा होता काय? सगळे शिया मारायला हवेत असं तो म्हणतो. शेवटी शिया हेही मुस्लीमच आहेत. लादेनचा मुस्लिमांवर अत्याचार करायला विरोध होता, पण झरकावीच्या दृष्टीनं त्यात काहीही गैर नव्हतं. उलट ते धार्मिक कामच होतं. कारण मुस्लिमांनाही मारायचं कशासाठी, तर अखेर धर्माचं राज्य स्थापन व्हावं म्हणूनच ना? मग असे काही मुस्लीमही त्यात मेले तर काय बिघडलं? उलट ते स्वर्गातच जातील. तिथं त्यांची सेवा करायला छान छान अप्सरा मिळतील. हे जे मानवी बॉम्ब असतात, त्यांच्यासाठी हे मोठं प्रलोभन असतं. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आणि तिथल्या अप्सरा!

अबु मुसाब अल झरकावी - आयसिसचा जनक

इकडं लादेनची अल् कायदा ज्या वेळी पाश्चिमात्य देशांत हल्ले चढवत होती, तेव्हा झरकावीनं जॉर्डन वगैरे देशांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. 9\11 नंतर तो अफगाणिस्तानात अमेरिकाविरोधी लढ्यात उतरला. एका लढाईत तो जबर जखमी झाला. त्यानंतर २००२मध्ये तो इराणला पळाला आणि तेथून गेला इराकी कुर्दीस्तानात. तिथं तो कुर्दिश जिहादींच्या अन्सार अल-इस्लाम या संघटनेत सामील झाला.

आयसिसच्या गोष्टीचा दुसरा महत्त्वाचा अध्याय सुरू होतो, तो येथून. त्याची सुरुवात झाली २००३मध्ये. अमेरिका अफगाणिस्तानात लढत होती. ओसामा बिन लादेन हातातून सुटला होता. आणि अशात बुश यांनी त्यांचा मोहरा फिरवला सद्दाम हुसेन यांच्याकडं.

हे राजकारण नीट समजून घेतलं पाहिजे. इराणमध्ये क्रांती झाल्यानंतर तो देश अमेरिकेसाठी कट्टर शत्रू बनला. इराण हा शियापंथीय देश. त्याच्या शेजारी इराक. तो शियाबहुल देश असला, तरी सद्दाम हा सुन्नी होता. तसा तो तुलनेनं सेक्युलर. सुन्नींची सत्ता होती, तरी कारभार मात्र धर्मावर आधारित नव्हता. तेव्हा सद्दामला शिया इराणविरुद्ध अमेरिका मदत करत होती. पण इराकनं कुवेतवर हल्ला केला आणि ते संबंध बिघडले. सद्दामच्या आततायीपणामुळे तेलाचा बाजार धोक्यात आला होता. तेव्हा त्याचा काटा काढणं आवश्यक होतं, पण आम्ही तेलाच्या राजकारणापायी सद्दामवर हल्ला चढवत आहोत असं तर सांगता येत नाही. तेव्हा बुश यांनी कारणं काय दिली, तर सद्दामचे आणि अल कायदाचे संबंध आहेत. वास्तविक पाहता ओसामा आणि सद्दाम यांचं अजिबात पटत नव्हतं. पटणं शक्य नव्हतं. कारण सद्दाम हा पाहिजे तेवढा धार्मिक नव्हता. तेव्हा बुश यांनी आणखी एक कारण पुढं केलं. ते म्हणजे सद्दामकडं महासंहारक अस्त्रं आहेत आणि त्यामुळे अमेरिकेला धोका आहे. पुढं हे सगळंच खोटं असल्याचं सिद्ध झालं. पण तेव्हा अमेरिका आणि ब्रिटनचे नेते हेच ‘सत्य’ सांगत होते आणि सगळं जग त्यावर विश्वास ठेवत होतं. प्रोपगंडा कोणत्या पातळीवर चालतो, याचं हे उत्तम उदाहरण. या युद्धात सद्दामचा पराभव होणारच होता. तो झाला.

बुश यांनी ‘मिशन अकम्प्लिश्ड’ ही घोषणा केली. सद्दामला हटवणं हे मिशन पूर्ण झालं होतं. पण इराकचं काय? त्या देशाची पुरती वाट लागली होती. अमेरिकेनं तिथं नंतरही एवढा गोंधळ घातला की विचारू नका! त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, तर सद्दामच्या बाथ पार्टीचे जे सदस्य सत्तास्थानी होते, त्या सगळ्यांना हटवलं. इराकचं सैन्य खालसा केलं आणि सत्ता दिली शिया पंथीयांच्या हाती. त्यामुळे सुन्नी मुस्लीम खवळले. त्यांनी जिहाद पुकारला आणि सुन्नींच्या दहशतवादी संघटना इराकमध्ये हैदोस घालू लागल्या.

झरकावीसाठी हे म्हणजे मोकळं रानंच मिळालं. त्यानं एकीकडे अमेरिकी सैन्य आणि दुसरीकडं शिया मुस्लीम यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. शियांच्या इराकमधील प्रमुख धर्मगुरूंची त्यानं बॉम्बस्फोटात हत्या घडवून आणली. हे बिन लादेनला मान्य नव्हतं. पण २००४मध्ये त्यांच्यात तह झाला आणि आतापर्यंत अल कायदापासून दूर असलेल्या झरकावीनं ‘अल कायदा इन इराक’ या संघटनेची स्थापना केली.

अफगाणिस्तानमध्ये जे घडलं, त्याचीच पुनरावृत्ती इथं झाली. बाहेरील देशांतून म्हणजे सौदी अरेबिया, लीबिया, येमेन, उत्तर आफ्रिका, सीरिया येथून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी इराकमध्ये येऊ लागले. अमेरिकेनं कामावरून कमी केलेले अनेक इराकी सैनिकही झरकावीला सामील झाले होते. इराकमध्ये आता यादवी युद्ध भडकलं होतं. २००६मध्ये अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेला.

त्याच्या मृत्यूनंतर ‘अल कायदा इन इराक’चं कंबरडं मोडेल असं अमेरिकेला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. झरकावीच्या मृत्यूनंतर बिन लादेनचा सहकारी आयमान अल जवाहिरीनं एक शोकसंदेश प्रसिद्ध केला होता. त्यात त्यानं ‘अल कायदा इन इराक’ला एक सूचना केली की, एक सच्चा जिहादी आपण गमावला आहे. आता तुम्ही इस्लामी राज्याची स्थापना करा.

अशी खिलाफत स्थापन करणं हे प्रत्येक जिहादीचं स्वप्नंच. काही महिन्यांतच इराकमधल्या विविध जिहादी गटांची एक शिखर परिषद झाली. मुजाहिदीन शुरा कौन्सिल. त्यात इराकमध्ये खिलाफत स्थापन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तिचं नाव ‘आयएसआय’. ‘इस्लामिक स्टेट इन इराक’. तिचा पहिला नेता होता अबु ओमार अल बगदादी.

अमेरिकेच्या भोंगळपणामुळे इराकमध्ये शिया आणि सुन्नी यांच्यात संघर्ष भडकला होताच. त्या आगीत सत्तेवर आलेल्या शिया नेत्यांनी तेल ओतलं. सुन्नींना राज्यकारभारातून टिपून टिपून बाहेर काढण्यात येऊ लागलं. त्यातून सुन्नींनी आंदोलनं केली. ती इराकी सरकारनं चिरडली. त्यामुळे चिडलेले सुन्नी आपोआप आयएसआयच्या तंबूत येऊ लागले होते.

इकडं आता अमेरिकाही थकली होती. किती दिवस इराकमध्ये ती लढत बसणार? अमेरिकी नागरिकांकडूनही सरकारवरचा दबाव वाढत होता. बराक ओबामांनी सैन्य माघारीची घोषणा केली होती. हळूहळू अमेरिका तेथून काढता पाय घेऊ लागली. संपूर्ण देश उद्ध्वस्त झालेला आहे. सहा लाख इराकी त्या युद्धात मेले आहेत. सरकार नावाची गोष्ट सतत डळमळीत आहे. यादवी युद्ध पेटलेलं आहे. तिथलं उभं प्रशिक्षित लष्कर अमेरिकेने बरखास्त केलं. आता जे लष्कर आहे, त्यात बाजारबुणगेच अधिक अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत अमेरिकी लष्करानं तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे निर्माण झालेली सत्तेची पोकळी भरून काढण्यासाठी आयएसआय तयारच होती.

२०१०मध्ये आयएसआयचा नेता अबु ओमार अल बगदादी मारला गेला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वळण लावणारी एक घटना घडली. ती म्हणजे आयएसआयमध्ये एका नव्या नेत्याचा उदय झाला. त्याचं नाव अबू बक्र अल बगदादी.

तो कोण, कुठला याबद्दल नक्की कोणालाच माहिती नाही. पण असं म्हणतात की, त्याचं कुटुंब हे प्रेषित मुहम्मदाच्या वंशातलं आहेत. तो कडवा धार्मिक होता. इराक युद्धापर्यंत तो आपलं साधंच जीणं जगत होता. अमेरिकेनं हल्ला केला आणि तो जिहादकडं वळला. २००४ मध्ये त्याला अटक झाली होती. त्याला उचलून कैद्यांच्या छावणीत ठेवण्यात आलं. तिथं तो आणखीच कडवा झाला. तिथं त्याला आणखी जिहादी भेटले. हे तुरुंग म्हणजे एक प्रकारे जिहादींची कार्यशाळाच होती. बगदादीला तिथं अनेक सहकारी मिळाले. तुरुंगातून सुटल्यावर तो थेट सामील झाला तो आयएसआयला.

अबु ओमार अल बगदादी

हा अन्य जिहादी नेत्यांपेक्षा एका बाबतीत वेगळा होता. बिन लादेन हा बिझनेस कॉलेजमध्ये शिकला होता. अयमान अल जवाहिरी डॉक्टर होता. बगदादी मात्र इस्लामी कायद्याचा तज्ज्ञ होता. आयएसआयचा प्रमुख झाल्यावर त्यानं संघटनेची फेररचना केली. बाथ पक्षाचे नेते, लष्करी अधिकारी यांना पदं दिली. अमेरिकेनं केलेली ही सर्वांत मोठी चूक होती. त्यांनी सद्दामला मारल्यानंतर बाथ पक्षाच्या नेत्यांना आणि लष्कराला बरखास्त केलं. तीच चूक इराकी पंतप्रधान मलिकी यांनी नंतर केली. आज आयसिस जी मोठी झाली ती या चुकीतून.

२०१० ते ११ या काळात बगदादीनं एक वेगळीच नीती आखली होती. तो आधी जाहीर करून इराकी तुरुंगांवर हल्ला करायचा आणि तिथल्या जिहादी कैद्यांची सुटका करायचा. ते सगळे त्याच्या संघटनेत सामील होत. याच काळात त्यानं आयएसआयचा विस्तार केला. सीरिया हा इस्लामी स्टेटचा भाग आहे असं जाहीर केलं आणि आयएसआयची आयसिस झाली.

या कहाणीचा तिसरा भाग इथून सुरू होतो. सीरियातल्या यादवी युद्धापासून. बुश यांनी जे तीन देश ‘अॅक्सिस ऑफ इव्हिल’ म्हणून जाहीर केले होते, त्यातला एक म्हणजे हा सीरिया. बाकीचे दोन होते इराक आणि उत्तर कोरिया. इराकची धूळधाण झालेली आहे आणि सीरिया त्याच मार्गावर आहे. अमेरिकेची परराष्ट्र नीती कशी न बदलता सुरू असते याचं हे उदाहरण. सीरियाच्या या प्रकरणाची सुरुवात होते ती अरब स्प्रिंगपासून.

२०१० मध्ये ट्युनिशियातून या अरब क्रांतीला सुरुवात झाली. त्याला जस्मीन रिव्होल्युशन असंही म्हणतात. जस्मीन हे ट्युनिशियाचं राष्ट्रीय फूल. म्हणून हे नाव. तर तिथं एका फेरीवाल्यानं स्वतःला पेटवून घेतलं आणि त्यातून लोक सरकारविरोधात सत्तेवर उतरले. त्यांचं शस्त्र होतं फेसबुक आणि ट्विटर. त्याच्या साहाय्यानं लोकांनी तिथलं बेन अली यांचं सरकार उलथवून लावलं. त्यांना साथ होती ती पाश्चिमात्य माध्यमांची आणि सरकारांची. ट्युनिशियातून भडकलेला हा क्रांतीचा वणवा इतर देशांतही पसरला. २०१३पर्यंत ट्युनिशिया, इजिप्त, लीबिया आणि येमेनमध्ये सत्तापालट झाला. सीरियातही तोच प्रयत्न सुरू आहे.

या सीरियात सत्तेवर आहेत बशर अल असाद. ते शिया. पण कारभार बऱ्यापैकी सेक्युलर. आणि हुकूमशाहीचा. ट्युनिशियात क्रांतीची सुरुवात झाली एका फेरीवाल्यानं केलेल्या आत्मदहनातून. सीरियात झाली एका मुलाच्या छळातून. एका गावातलं हे एक पंधरा-सोळा वर्षांचं पोरगं. त्यानं भिंतीवर सरकारविरोधी मजकूर लिहिला. त्याला पोलिसांनी अटक केली आणि मग कोणत्याही हुकूमशाही देशात होतं तेच झालं. म्हणजे त्याचा अत्यंत छळ करण्यात आला. त्यात तो मेला. ते समाजमाध्यमांतून आल्यानंतर लोक संतापले. आपल्याकडं ‘अण्णा आंदोलन’ झालं, तसंच तिकडं झालं. त्या आंदोलकांवर सरकारनं गोळीबार केला आणि वातावरण पेटलं. लोकांनी बंदूक हाती घेतली.

आज तिथं कोण कोणाशी लढतंय हेच कळेनासं झालं आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे असाद यांच्याविरोधात सेक्युलर बंडखोरांचे विविध गट लढत आहेत. असाद यांच्या विरोधात आयसिस लढत आहे. आयसिसविरोधात सेक्युलर बंडखोर लढत आहेत. या बंडखोरांना पाश्चात्य राष्ट्रांकडून आणि मध्यपूर्वेतल्या सौदी अरेबिया, कतार यांच्यासारख्या सुन्नी राष्ट्रांकडून मदत होत आहे. सीरिया हा इराकनंतरचा मध्य-पूर्वेतला सर्वाधिक तेलश्रीमंत देश आहे. ही बाब इथं लक्षात घेतली पाहिजे. तर तिकडं अमेरिका सीरियान बंडखोरांच्या बाजूनं उतरली म्हटल्यावर असाद यांच्या बाजूनं रशिया उभी राहिली आहे. ते शिया असल्यानं इराण आणि लेबनॉनमधला हिझ्बुल्ला गट त्यांना समर्थन देत आहे. त्यात आणखी भर म्हणजे आयसिस आणि अल कायदा यांच्यात तिथं संघर्ष उभा राहिला आहे.

पण या गोंधळात आयसिसनं बाजी मारली. सीरियातील रक्का हे शहर आणि त्याच्या आजुबाजूच्या प्रदेशावर कब्जा केला. अलेप्पो जिंकलं. तिकडं इराकमध्ये त्यांनी फल्लुजा जिंकलं. मोसूल म्हणजे आपल्या ठाण्यापेक्षा जास्त लोकसंख्येचं शहर. ते त्यांनी जिंकलं. हे सगळं साधारण २०१४-१५ या दोन वर्षांत त्यांनी केलं.

सीरियातील रक्का हे उदध्वस्त झालेलं शहर

या विजयाइतकीच किंबहुना त्याहून महत्त्वाची गोष्ट आयसिसनं २०१४मध्ये केली. ती म्हणजे त्यांनी खिलाफत स्थापन झाल्याची घोषणा केली. आयसिसचं नाव बदललं. ते ‘इस्लामिक स्टेट’ असं केलं.

अबू बक्र अल बगदादी हा मुस्लिमांचा नवा खलिफा झाला. पूर्वी अबू बक्र याच नावाचा एक खलिफा होऊन गेला. आता हा नवा आला. पण यानं नाव बदललं. आता तो खलिफा इब्राहिम म्हणून ओळखला जातो.

ही खिलाफत स्थापन होणं ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. एकतर ही खिलाफत म्हणजे काही केवळ कागदावरची कल्पना नाही. पहिल्या दोन वर्षांत आयसिसच्या ताब्यात किती भूभाग होता? तर ब्रिटनएवढा. आपली एक कल्पना असते. म्हणजे दहशतवादी संघटना असून असून किती मोठी असणार? आपण माफिया टोळ्या पाहत असतो. तेव्हा त्या तुलनेत आपला सारा विचार असतो.

पण आयसिसकडे तेव्हा किमान दहा हजाराची खडी फौज होती. आज ती संख्या वाढली आहे.

आता युद्ध करायचं म्हणजे शस्त्रं आली. त्यासाठी पैसा आला. तो कोठून आला?

या पैशाच्या वाटा अनेक असतात.

आपल्याला आपलं उगाच वाटतं की, नोटबंदी आली की दहशतवाद्यांना मिळणारी रसद बंद होईल. म्हणजे आपली कल्पना अशी की, हे दहशतवादी असे नोटांची पुडकी घेऊन फिरत असतात. आता ते काही एटीएममधून पैसे काढत नसतात. त्यांचे व्यवहार चालतात ते हवाला व्यवसायातून. इलेक्ट्रॉनिक्स व्यवहारही चालतात. त्यासाठी अनेक बँका त्यांना मदत करत असतात. मोठं रॅकेट असतं ते. आता आयसिसकडे पैसे कोठून आले?

त्यांचे दोन मोठे मार्ग होते. एक म्हणजे तेलविक्री. त्यांच्या ताब्यातील तेलविहिरींतून ते काळ्या बाजारात तेल विकत होते. त्यातून महिन्याला किमान ५० कोटी डॉलरची कमाई होत होती.

दुसरी गोष्ट म्हणजे खंडणी. बडे व्यापारी, पाश्चात्य नागरिक यांना पकडायचं आणि त्यांच्या सुटकेसाठी खंडणी वसूल करायची. यातून ते महिन्याला किमान २० कोटी डॉलर मिळवत होते. शिवाय जिंकलेल्या शहरांतील बँकांतील रोकड तर त्यांचीच होती. यात पुन्हा त्यांना मिळत असलेल्या देणग्यांचाही मोठा भाग होता. यातून शस्त्र खरेदी, सैनिकांना पगार, ज्या भागात सत्ता स्थापन केली तेथील अधिकाऱ्यांना पगार दिला जातो. आता हे पैशाचे झरे आटत चालले आहेत. पण ही झाली पैशाची ताकद. त्यातून एखादं राज्य चालवता येईल. मग खिलाफतीचं काय महत्त्वं आहे?

या खिलाफतीचा संबंध आहे त्यांच्या धार्मिक धारणांशी. एकदा खिलाफत स्थापन झाली म्हटल्यानंतर जगभरातील मुस्लिमांना तिच्यावर निष्ठा ठेवणं भाग आहे. कारण तो धार्मिक प्रश्न आहे.

साधी गोष्ट आहे. सगळ्या कट्टरतावाद्यांचं स्वप्न काय असतं, तर शुद्ध स्वरूपात धर्माचं पालन करावं. इस्लामच्या मते हा जगातला सर्वांत शुद्ध धर्म. कारण तो परमेश्वरानं थेट सांगितला आहे. त्या पूर्वीचे धर्म सगळे अडाणी. तेव्हा ते नष्ट केले पाहिजेत. आज जगात ज्या समस्या आहेत, त्या सगळ्या लोक धार्मिक नसल्यानं म्हणजे इस्लाम पाळत नसल्यानेच निर्माण झालेल्या आहेत. आयसिसचं म्हणणं असं की, आमचं हे खरं धर्मराज्य आहे. इथं शुद्ध धार्मिक नियमांचं पालन होतं. लोकांना स्वर्गप्राप्ती कोठून होणार असेल तर ती या खिलाफतीमधूनच.

आयसिस खिलाफत आणते, दुसरं कोणी रामराज्य आणू पाहतं, तिसरं कोणी आकाशातल्या बापाचं राज्य आणू पाहतं... सगळ्यांचं आवाहन सारखंच असतं… सगळीकडं धर्माचा हा प्रचार जोरात सुरू आहे. आपला धर्म धोक्यात आहे, संस्कृती धोक्यात आहे, असं म्हणून तरुणांना भुलवलं जातं.

आयसिसची भूल तर दुहेरी आहे. एकीकडं आपल्यावर कसे अत्याचार होतात हे दाखवायचं. ‘इस्लाम खतरे में है’ असं सांगायचं आणि दुसरीकडं ‘आता आपलं धर्मराज्य उभं राहिलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमचे प्राणही दिले पाहिजेत’ असं सांगायचं. अत्यंत हुशारीनं हा प्रचार केला जातो. इंटरनेट आणि मोबाईल ही त्यांची दोन प्रभावी शस्त्रं. त्यामुळेच आज अनेक तरुण सीरिया आणि इराकमध्ये जात आहेत. अगदी आपल्या देशातूनही गेले आहेत.

डिसेंबर २०१०मध्ये अमेरिकेचा एक सैनिक इराणमध्ये हातात आयसिसचा ध्वज घेऊन

आयसिसच्या त्या प्रोपगंडा चित्रफितींमधील क्रूरपणा अगदी अंगावर येणारा आहे. बातम्यांमधूनसुद्धा त्यांचं किळसवाणं क्रौर्य आपल्याला दिसतं. काही पाश्चात्य नागरिकांचा शिरच्छेद करणाऱ्या चित्रफिती-व्हिडिओ आयसिसनं प्रसारित केल्या होत्या. आयसिसच्या ताब्यातील प्रदेशांतील महिलांवरील अत्याचाराच्या कहाण्या तर अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. बिगरमुस्लीम महिलांवर बलात्कार करणं, त्यांना लैंगिक गुलाम म्हणून वापरणं हे धर्ममान्य आहे, असा निकाल आयसिसनं दिला आहे. म्हणजे जगातील सर्व क्रौर्य, सगळा किळसवाणेपणा, सगळी असंस्कृतता यांना धर्माचा आधार देऊन पवित्र करून घेतलं जात आहे. लहान मुलांकरवी शिरच्छेद करवून, त्यांच्या समोर सगळी क्रूर कृत्यं करून त्यांची मनं हिंसक बनवली जात आहेत. हे भयानक असलं तरी वास्तव आहे आणि त्यामागे एक विचार आहे. तो आहे ‘सायकॉलॉजिकल वॉरफेअर’चा.

हे युद्ध खेळलं जातंय ते आतल्या आणि बाहरेच्या लोकांसाठी. जे शत्रू आहेत त्यांना यातून घाबरवलं जात आहे. पर्सेप्शन क्रिएशनचा तो भाग आहे आणि जे आतले आहेत त्यांची मनं बोथट केली जात आहेत. प्रत्येकाच्या मनात करुणेची भावना असते. ती मारून टाकली जात आहे. ती मेली की तिथं उगवतं क्रौर्य, हिंसकता. ती आयसिसला हवी आहे. लहान मुलांच्या हातून शिरच्छेद करवणं, त्यांना रक्ताची सवय लावणं, मुंडक्यांचे फुटबॉल खेळायला लावणं यातून ते नवे नागरिक घडवताहेत. लहान मुलांचा तर अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं तिथं वापर केला जातो. सेक्ससाठी तर आहेच, पण रक्तदानासाठी त्यांना वापरलं जातं.

मुलांना धार्मिक शिक्षण द्यावं, त्यांच्यावर धर्मसंस्कार व्हावेत असं सगळेच सांगत असतात. या धर्मराज्यातही तेच केलं जातं. लहानपणापासून त्यांना जे शिक्षण दिलं जातं, ते सगळं इस्लामच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत असंच. त्यामुळे जगातल्या सगळ्या अभ्यासकांसमोर एकच प्रश्न आहे की, आज आयसिसला संपवलं, तरी पुढं काय? आजच्या घडीला आयसिसच्या ताब्यातून बराच मोठा प्रदेश जिंकण्यात यश आलेलं आहे. पण तिथंही गोची अशी की, त्यांच्याविरोधात लढत आहेत ते कुर्द बंडखोर आणि इराकमधले शिया स्वयंसेवक. राज्य नावाच्या संकल्पनेबाहेरच्या या शक्ती आहेत. त्या पुढे राज्याला, व्यवस्थेलाच गिळून टाकू शकतात. परंतु सध्या तरी आयसिसला माघार घ्यावी लागत असल्याचं दिसतं आहे.

पण आयसिस संपली किंवा तिच्या नेत्यांना, त्या खलिफाला मारण्यात यश आलं, तरी त्यांनी हे जे सैन्य तयार करून ठेवलं आहे, ते शिल्लक राहणारच आहे. त्यांच्यापासून जगाला जी भीती आहे, ती कायम राहणारच आहे...

एकंदर आयसिसविरोधातला संघर्ष मोठा कठीण आहे. आणि म्हणूनच आपलं कर्तव्य आहे, की इस्लाममध्ये एक आयसिस तयार झाली. इतर धर्मांत तरी ती तशी उभी राहू नये.

जगणं हे सुंदर आहे. त्याच्यावर प्रेम करायचं असतं. ते सेक्युलर संसदीय लोकशाहीत अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतं हे सिद्ध झालेलं आहे.

.............................................................................................................................................

लेखक रवि आमले मुंबई सकाळचे निवासी संपादक आहेत.

ravi.amale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 29 October 2019

रवि आमले,

लेख चांगला आहे. फक्त रामराज्याला आयसिसच्या पंक्तीत बसवलेलं ठीक वाटलं नाही. मोहनदास गांधींना रामराज्य यायला हवं होतं. ते काही आयसिसइतकं भयंकर निश्चितंच नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......