अजूनकाही
मराठीतील नावाजलेल्या मोजक्याच संगीतकारांमध्ये श्रीनिवास खळ्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. निव्वळ लोकप्रियता म्हणून बघायला गेल्यास खळेकाका कधीही प्रचंड लोकप्रिय नव्हते. त्यांची काही गीतं खूप गाजली, आजही रसिक मनावर गारुड घालून आहेत, पण खळेकाका कधीही प्रसिद्धी, लोकप्रियता या गोष्टींवर अवलंबून राहिले नाहीत. हातात कविता आली की, त्याला चाल लावायला घ्यायची, हा नेम त्यांनी आयुष्यभर पाळला. ते ‘आधी शब्द मग चाल’ या पंथाचे आग्रही संगीतकार होते आणि या आग्रहापायी त्यांनी आयुष्यात अनेक संधी नाकारल्यादेखील. त्यांचं नेहमी म्हणणं असे की, चाल ही कवितेला लावायची असते आणि त्यामुळे हातात शब्दरचना येणं अत्यावश्यक असतं. आयुष्यात त्यांनी अशी काही तत्त्वं पाळल्यामुळे खळेकाकांना आर्थिक आपदांना तोंड द्यावं लागलं. परंतु ते आपल्या निष्ठा आणि तत्त्वांना कायम धरून बसणारे होते. त्यातील एक आग्रह म्हणजे गाण्यातील ‘जागा’ त्यांना जशा हव्या आहेत, तशाच गायकांकडून काढून घ्यायचे. तिथं त्यांनी अपवाद वगळता तडजोड स्वीकारली नाही.
थोडा विचार केला तर चार-पाच चित्रपट, दोन-तीन नाटकं आणि २००-२५० भावगीतं इतपतच खळेकाकांचा सांगीतिक संसार आहे. अर्थात ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचं उदाहरण ठरत नाही. खळेकाका यांचा उल्लेख ‘बुद्धिवादी संगीतकार’ असा बऱ्याच वेळा केला जातो. आता ‘बुद्धीवादी’ हा शब्द वापरणं सोपं असलं तरी या संज्ञेचा अर्थ लावणं तितकं सोपं नक्कीच नाही.
काही उदाहरणं बघू. ‘या चिमण्यांनो परत फिरा’, ‘अगा करुणाकरा’, ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी’ ही आणि अशीच काही गाणी ‘पुरिया धनाश्री’ किंवा ‘तोडी’ या रागाच्या सावलीतील स्वररचना आहेत. खळेकाका यशस्वीपणे त्या रागांची छाया निर्माण करतात, विस्तार न करता गायिकेला अनपेक्षित तरीही शोभाकर अशा सुरावटी देतात, वाद्यांना आपलं अस्तित्व जाणवून देता यावं इतपतच लयीची गती ठेवतात आणि हे सर्व करताना मर्यादित तारतेची स्वरपट्टी ठेवतात (मध्येच एखादा अंतरा तार सप्तकात जातो, पण मुखड्याकडे वळताना चालीचा ताण कमी केला जातो.)
बरं या गाण्यांत तालाचं चलन, विशेषतः ‘या चिमण्यांनो परत फिरा’ या गाण्यात तालाचं चलन असं ठेवलं आहे की, ठाय लयीत असून तिकडं लक्ष द्यावंच लागतं. तसंच शब्दांच्या मध्ये आणि अंताला खळेकाकांनी काही चमकदार हरकती दिल्या आहेत. या शिवाय काही ठिकाणी शब्द एका निश्चित स्वरावर न संपवता फक्त निर्देश केला आहे. खळेकाकांच्या स्वररचना बुद्धिवादी असतात त्या इथं!
आणखी एक खास वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास, हातात आलेली कविता विशिष्ट दर्जा राखून असेल तरच त्यांनी ती संगीतबद्ध करायला घेतली. मंगेश पाडगावकरांच्या कविता त्यांनी अधिकाधिक स्वरबद्ध केल्या, हा निव्वळ योगायोग नव्हे! कवितेतील आशयाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं. कवितेत दडलेला आशयाला स्वरांतून खोलवर असं मूर्त स्वरूप देण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे त्यांची एकूण वाटचाल ही अमूर्ताकडून मूर्त स्वरूपाकडे अशी झाली!
खळेकाकांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास साधे, मधुर, परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले आणि स्वरविस्तार शक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. ‘कमोदिनी काय जाणे’ किंवा ‘शुक्रतारा मंद वारा’, तसंच ‘पहिलीच भेट झाली’ ही गाणी वानगीदाखल अभ्यासायला हवीत. कुणालाही या गीताचे मुखडे सहज लक्षात येतील आणि गुणगुणावेसे वाटतील. इथं एक मुद्दा मांडावासा वाटतो. कुठल्याही स्वररचनेची मूलभूत ओळख ही नेहमीच मुखडा कसा बांधला आहे, या कौशल्यावर असते. खळेकाकांच्या गाण्यातील मुखडे या दृष्टीनं ऐकण्यासारखे आहेत. ते ऐकताना आपण सहज गाऊ शकतो, असा आभास निर्माण करतात, परंतु बऱ्याच वेळा त्यापुढील अंतरे वेगळ्याच स्वरांवर येतात आणि बारकाईनं ऐकणारा काही वेळा नि:स्तब्ध होतो. अंतरा संपताना तो कशा प्रकारे मुखड्याशी जोडला गेला आहे, हे वैशिष्ट्य खळेकाकांच्या बहुतेक गाण्यात आढळून येतं.
त्यांनी नेहमीच ताल पारंपरिक पद्धतीनं वापरले. याचा परिणाम असा झाला की, त्यांची चाल कधीही शब्दांवर कुरघोडी करत नाही. इथं शब्द वावरतो तो भाषिक आणि संगीत ध्वनीचा समूह म्हणून. त्यामुळे खळेकाकांना अतिशय चांगल्या अर्थानं ‘कारागीर’ असंही म्हणता येईल. ‘काल पाहिले मी स्वप्न गडे’ हे गीत वानगीदाखल बघूया. गीताला आधार किंवा पाया हा ‘गौडसारंग’ रागाचा आहे. गाण्याचा मुखडा फक्त पाच स्वरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून आपल्या समोर येतो. चालीची सामान बांधणी पुढे केली आहे, पण तशी करताना थोडं तांत्रिक भाषेत सांगायचं झाल्यास पुढील अंतरा मध्यम स्वराला षड्ज मानून पुढे येतो. याचा परिणाम असा होतो की, गीताच्या भावनेचा उत्कर्ष आणि तिचं स्फटिकीभवन अप्रतिम होतं. आपण सुरावटीची पुनरावृत्ती ऐकत नसून एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची प्रतीती येते.
त्यांच्या सर्जनशीलतेला संगीत आणि काव्य यांच्या दरम्यानची देवाण-घेवाण हीच अधिक मानवत असे. आपल्या संगीत भांडवलात फार लोकांनी भागीदारी मागावी, हे पटत नसे. या शिवाय आपल्या संगीत विधानात थोडातरी बौद्धिक अंश असावा, यावर त्यांची निष्ठा होती. ललित संगीतात असं काही करण्यासाठी भाराभार संधी मिळत नसतात आणि याचंच प्रतिबिंब त्याच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीवर पडलं, असं म्हणता येतं.
.............................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment