अजूनकाही
सुगम संगीत काय किंवा चित्रपट संगीत काय, त्यात सर्जनशीलता जरुरीची नसते, असं म्हणणारे बरेच ‘महाभाग’ भेटतात! वास्तविक, सामान्य रसिक (हा शब्दच चुकीचा आहे, जर रसिक असेल तर सामान्य कसा?) ज्या संगीतात मनापासून गुंतलेले असतात, ते संगीत सामान्य कसं काय ठरू शकतं? त्यातून स्वरांच्या अलौकिक दुनियेत जरी शब्द ‘परका’ असला तरी ते ‘कैवल्यात्मक’ संगीत जरा बाजूला ठेवलं तर, दुसऱ्या कुठल्याही संगीत आविष्कारात शब्दांशिवाय पर्याय नाही. तेव्हा शास्त्रोक्त संगीत वगळता (अर्थात रागदारी संगीतातदेखील शब्दांना महत्त्व देऊन गायकी सादर करणारे कलाकार आहेत!) अन्य कुठल्याही संगीतात शब्दांचं महत्त्व नेहमीच महत्त्वाचं ठरतं.
‘सर्जनशीलता’ हा शब्द जरा फसवा आहे, विशेषत: सुगम संगीतातील सर्जनशीलता कधीही, सहज जाता जाता ऐकून समजण्यासारखी नाही. खरं तर हे तत्त्व सगळ्याच कलांच्या बाबतीत लागू पडतं! आपल्याला ‘सर्जनशीलता’ हा शब्द ऐकायला/वाचायला आवडतो, परंतु आपण याचा नेमका अर्थ जाणून घेण्याची ‘तोशीस’ घेत नाही. इथं या शब्दाची ‘फोड’ करण्याचा उद्देश नाही, परंतु सुगम संगीतातील सर्जनशीलता हा संशोधनाचा विषय मात्र नक्की आहे… जर सुगम संगीत ‘संगीत’ म्हणून मान्य केलं तर!
सर्जनशीलता वेगवेगळ्या पातळीवर वावरत असते. म्हणजे चालीचा मुखडा, वाद्यवृंद, कवीचे शब्द, तसंच अखेरीस आपल्या समोर येणारं गायन! या सगळ्या सांगीतिक क्रियेत, संगीतकाराची भूमिका, नि:संशय महत्त्वाची! हल्ली जरा काही वेगळं ऐकायला मिळालं की, आपण लगेच ‘सर्जनशीलता’ हा शब्द वापरतो आणि या शब्दाची ‘किंमत’ कमी करतो! हिंदी चित्रपट संगीतात, असे फारच थोडे संगीतकार होऊन गेले, ज्यांना खऱ्या अर्थानं ‘सर्जनशील संगीतकार’ ही उपाधी लावणं योग्य ठरेल. या नामावलीत ‘सज्जाद हुसेन’ हे नाव अग्रभागी नक्कीच राहील! किती लोकांना या संगीतकाराचं नाव माहीत असेल, शंका आहे!
हा माणूस केवळ ‘अफाट’ या शब्दानंच वर्णावा लागेल. प्रत्येक वाद्य सुप्रसिद्ध करताना त्या वाद्याबरोबर त्या वादकाचं नाव कायमचं जोडलं जातं. जसं संतूर-शिवकुमार शर्मा, शहनाई-उस्ताद बिस्मिल्ला खान इत्यादी… मेंडोलीन वाद्य, भारतीय संगीतात रूढ करणारे वादक, म्हणून सज्जाद हुसेनचं नाव घेणं क्रमप्राप्तच आहे. वास्तविक हे मूळचं भारतीय वाद्य नव्हे, पण तरीही भारतीय शास्त्रीय संगीतात या माणसानं या वाद्याची प्रतिस्थापना केली, असं म्हटलं तर ते अजिबात चुकीचं ठरू नये.
दुर्दैवानं या माणसाची प्रसिद्धी अति विक्षिप्त, लहरी आणि अत्यंत तापट म्हणून झाली आणि त्यावरून त्यांची नेहमीच शेलक्या शब्दांत संभावना केली गेली. हा माणूस नक्कीच अतिशय तापट होता, परंतु त्यांची संगीतातील जाणकारी भल्याभल्यांना चकित करणारी होती. सुगम संगीतात नेहमी असं म्हटलं जातं की, गाण्याचा ‘मुखडा’ बनवण्यात खरं कौशल्य असतं! तो एकदा जमला की, पुढे सगळं ‘बांधकाम’ असतं.
त्यांनी सुमारे ७० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात केवळ १४ चित्रपटांना संगीत दिलं. संख्येच्या दृष्टीनं ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचं उदाहरण ठरत नाही! परंतु त्यामागे चित्रपट क्षेत्रातील राजकारण, व्यक्तीचा स्वभाव इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. नूरजहानच्या आवाजातील ‘बदनाम मुहोब्बत कौन करे’ हे गीत पाहूया. बागेश्री रागाच्या सावलीत तरळणारी चाल असली तरी ‘बदनाम’ हा शब्द जसा उच्चारला आहे, तो ऐकण्यासारखा आहे! (पुढे सी. रामचंद्र यांनी ‘मलमली तारुण्य माझे’मधील ‘मलमली’ शब्दामागे हाच विचार केला आहे. अर्थात, हे त्यांनीच सांगितलेलं आहे.) कुठलंही गीत ‘आपण गाऊ शकतो’ असा विश्वास जर ऐकणाऱ्याला झाला, तर ते प्रसिद्ध होऊ शकतं! इथं सुरुवातीला असंच वाटतं, पण जसं गाणं पुढे सरकतं, तसा चालीतील अंतर्गत ‘ताण’ कुठेच कमी होत नाही आणि स्वरपट्टी मर्यादित तारतेचीच आहे. त्यामुळे ऐकणारा आपली उत्कंठा ताणून धरतो!
‘भूल जा ऐ दिल’ हे लताबाईंनी गायलेलं गीत पाहूया. हेसुद्धा बागेश्री रागाचीच छाया घेऊन वावरतं. या गाण्याचं चलन द्रूत गतीत आहे, पण चाल बांधताना शब्दांच्या मध्ये आणि शेवटी चमकदार हरकती असल्यानं चाल अवघड होते, तसंच काही ठिकाणी शब्द निश्चित स्वरांवर न संपवता त्या दिशेनं लय जात आहे, असं नुसतं दर्शवलं आहे! हा जो सांगीतिक अनपेक्षितपणा आहे, हेच या संगीतकाराच्या सांगीतिक क्रियेचं व्यवच्छेदक लक्षण मानावं लागेल.
‘ये हवा ये रात ये चांदनी’ हे गीत आरंभी धीम्या लयीतलं आहे असा भास होतो. वास्तविक ते संथ लयीतलं नसून कवितेच्या शब्दांची लांबी दीर्घ असल्यानं त्याच्याबरोबर जाणाऱ्या सुरावटीमुळे तसा भास होतो. भैरवी रागीणीच्या छायेत वावरत असताना आपल्या पहिल्या मात्रेस ‘उठाव’ न देणाऱ्या सात मात्रांच्या रूपक तालामुळे हे गाणं फारच सुंदर झालं आहे.
‘रुस्तम सोहराब’ या चित्रपटातील ‘ऐ दिलरुबा’ ऐकताना असं जाणवतं की, हा संगीतकार आता अत्यंत वेगळ्या शैलीनं गाणी बनवत आहे. कारण एकाच वेळी भारतीय व अरब भूमीची संगीतसंपदा यात आहे. आवाजाचे विशिष्ट कंपयुक्त लगाव, आधारभूत घेतलेली स्वरचौकट आणि ओळीच्या मध्येच अनपेक्षितपणे वरच्या स्वरांत लय बदलण्यामुळे सगळं गीत अत्यंत उठावदार आणि परिणामकारक झालं आहे.
‘जाते हो तो जाओ’, ‘तुम्हे दिल दिया’, ‘दिल मी समा गये सजन’ ही आणि अशीच बरीचशी गाणी, ‘चाल’ या दृष्टिकोनातून ऐकावीत, म्हणजे या संगीतकाराच्या व्यामिश्रतेचे परिमाण समजून घेता येतात.
वास्तविक इतक्या अफलातून प्रतिभेचा धनी असूनदेखील केवळ १४ चित्रपट केल्यानं रसिकांचा तोटा झाला, हे निश्चित. त्यांच्या रचनांचा प्रभाव इतर संगीतकारांवर बराच होता. इतका की, बरीचशी गाणी, या चालीच्याच सावलीत वावरतात किंवा त्यांचा प्रभाव टाळू शकत नाहीत. काही उदाहरणं पाहूया.
१) ये हवा ये रात ये चांदनी – तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा (मदन मोहन)
२) आज प्रीत ने तोड दे बंधन – जीवन मे पिया तेरा साथ रहे (वसंत देसाई)
३) कोई प्रेम देके संदेसा – प्रीतम तेरी दुनिया में (मदन मोहन)
४) खयालो में तुम हो – (‘आह’ या चित्रपटात अॅकॉर्डियनचा तुकडा शंकर/जयकिशन यांनी वापरला.)
या संगीतचौर्यामुळे सज्जाद अधिक तापट झाले. त्यातून ही गाणी सगळी अमाप प्रसिद्ध झाली आणि आपल्या ‘मूळ’ चाली असून आपल्याला काहीच श्रेय मिळत नाही, यामुळे मनात सतत खंत बाळगून राहिले!
वास्तविक हा संगीतकार मेंडोलीन वादक, मेंडोलीनवर सतारीचे सूर काढू शकणारा असामान्य ताकदीचा कलाकार. या वाद्याला प्रतिष्ठा लाभावी, यासाठी त्यांनी अमाप धडपड केली. अगदी संगीत मैफलीतदेखील ते फक्त रागदारी संगीतच सादर करत. अशाच एका मैफलीत एका श्रोत्यानं ‘ये क्या क्लासिकल बजा रहे हैं आप, कुछ लाईट म्युझिक हो जाय’ अशी फर्माईश झाल्यावर सज्जादनी समोरच्या दिव्याकडे बोट दाखवलं आणि उठून नाराजीनं चालू पडले! अशा स्वभावावर काय औषध!
हाच प्रकार हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत घडला. ‘संगदिल’ या चित्रपटाची गीतं बनवणं चालू होतं, तेव्हा तिथं चित्रपटाचा नायक दिलीप कुमार आले आणि त्यानं काही सूचना केल्या! झालं, ठिणगी पडली! सज्जादनं तिथल्या तिथं ‘तुझ्या चेहऱ्याला ना आरोह, ना अवरोह आणि तू मला संगीताचे धडे देतोस?’ आता असं ऐकवल्यावर पुढे काय घडणार!
कारणं अनेक देता येतील, त्यांच्या दोषांवर पांघरून घालता येईल, परंतु अशा विक्षिप्त स्वभावानं त्यांनी चित्रपट क्षेत्रात बरेच शत्रू निर्माण केले! मित्रांपेक्षा शत्रू अधिक झाल्यावर त्या क्षेत्रातून बाहेर पडण्यावाचून वेगळं काय घडणार!
.............................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Jayant Raleraskar
Sat , 26 October 2019
सज्जाद एक अवलिया संगीतकार आणि मेंडोलीन वादक होता. त्याच्या मेंडोलीन वादनाचा आस्वाद सवाई गंधर्व येथे सुद्धा ऐकायला मिळाला होता. त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक खरे-खोटे किस्से आहेत. अनवट चालींचा हा माणूस आपल्याच धुंदीत आयुष्यभर जगला. अंबरीश मिश्र यांनी त्याचे केलेले वर्णन--"औटसायडर" असे केले होते. (तो लेख सुद्धा छान होता) ते अगदी सार्थ आहे.