अजूनकाही
दिवाळी हा भारतीयांचा सर्वांत आवडता सण. कालौघात हा सणही बदलला. पण दिवाळीचं माहात्म्य, मांगल्य आजही तसंच आहे. या दिवाळीविषयीचा हा एक लेख. तो ‘वाङ्मय-शोभा’ या वाङ्मयीन मासिकाचे संपादक म. म. केळकर यांनी ‘वाङ्मय-शोभा’च्या १९५५ सालच्या दिवाळी अंकात लिहिला होता. ६४ वर्षांपूर्वीची ही दिवाळी आजही तितकीच लोभस, हवीहवीशी वाटते. त्यामुळे हा लेख वाचताना अनेकांना पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळेल, अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, अनेकांना असंच काय काय आठवेल...
.............................................................................................................................................
पावसाळा संपतो आणि दिवाळी जशी जशी जवळ येते, तसतसा आकाशाचा रंग पालटू लागतो. संध्याकाळच्या वेळी बघितले तर आकाशात ढग दिसतात, पण ते मावळत्या सूर्याच्या तेजात न्हाऊन निघालेले आणि सोनेरी कडांचे असतात. ते तिथे असतात, पण त्यांचे अधिराज्य संपलेले असते. आणि ते आपले उगीचच रेंगाळत आहेत असे वाटत असते.
चातुर्मासात वास्तविक कितीतरी सण येतात, पण दिवाळीची गंमत कुठल्याच सणाला नाही. मंगळागौरीची जागरणे, गणपतीची आरास आणि उत्सव, हादग्याची गाणी हे सगळेच कार्यक्रम आपापल्या परीने गाजणारे असतात. तरीपण दीपोत्सवाची गंमत त्या कशातच नसते. मग जेव्हा नवरात्र संपून दसरा उजाडतो, तेव्हा दिवाळी खरेच जवळ आली असे वाटून सगळे जण तिची वाट पाहायला लागतात. कोजागिरीचे चांदणे मध्येच नवोढेची हुरहूर वाढवून जाते. एखादी माहेरचे बोलाविणे यायचे वाट पाहात असते, तर माहेरी आलेली, पती दिवाळ-सणाला येणार म्हणून दिवस मोजत असते. माणसे एकेक दिवस सुखाच्या अपेक्षेने मोजत बसतात, म्हणून तर सूर्याला ‘दिनमणि’ हे नाव मिळाले नसेल ना?
आश्विनात धनत्रयोदशी येते. बायकांची न्हाणी होतात. मुलांकरिता फटाके येतात. पणत्यांतून तेलवात होते. त्या रात्री प्रथम दिवे लागतात. तरीदेखील खरी दिवाळी दुसरे दिवसापासून म्हणून घरात तळण सुरूच असते आणि रात्री उशीरांपर्यंत घरात बायकांची कामे आणि पुरुषांचे पत्ते गाजत असतात. मोठ्या माणसांबरोबर आपणही जागत राहावे असे मुलांनाही वाटते. वडील माणसे त्यांना सारखी म्हणत असतात, ‘अरे, उद्या लवकर उठायचे आहे, तुम्ही आज लवकर निजा.’ पण ती ऐकत नाहीत. कारण त्यांना ‘दिवाळी कशी येते’ ते पाहायचे असते. गेले कित्येक दिवस ताईला आणि बाबूला दादा सांगत असतो की, ‘दिवाळी आज स्टेशनपर्यंत आली, आज गल्लीपर्यंत आली, आज दाराबाहेरच्या आंब्याच्या झाडापर्यंत आली, आता उद्या ती घरात येणार आहे.’ ती घरात कशी येते ते ताई-बाबूला पाहायचे असते. म्हणून ती दोघे पायरीवर जागत बसतात. ती वडील माणसांचे ऐकत नाहीत. पण झोप त्यांचे न ऐकता त्यांचेवर हळूहळू आपले हातपाय पसरते.
पण जे दिवाळीचे आगमन त्यांना जागतेपणी दिसत नाही, ते त्यांना स्वप्नात दिसते. पंख पसरून आणि एका हातात आकाशदिवा आणि दुसऱ्या हातात फुलबाजी घेऊन दिवाळी परीच्या रूपात झेपावत येताना त्यांना दिसते.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन. घरादारावर लक्ष्मीची कृपा असावी, दिवाळी सुखसमृद्धीची जावी म्हणून लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा त्या दिवशी व्हायची असते. आणि पूजेची पूर्वतयारी म्हणून सडासंमार्जन करून तिच्या स्वागताकरिता रांगोळी काढायचे काम घरातल्या सुनेचे किंवा मोठ्या मुलीचे असते.
तिसऱ्या दिवशी पाडवा येतो. त्या दिवशी मुलगी वडिलांना ओवाळते आणि ओवाळणी घेते, पण खरे महत्त्व असते ते पत्नीने पतीला ओवाळून त्याच्याकडून ओवाळणी घ्यायची! गृहिणी या नात्याने तिने वर्षभर त्याचे ‘घर’ सांभाळलेले असते त्याच्याबद्दलची जाणीव व्यक्त करायची त्याला संधी मिळते. आणि जेव्हा एखाद्या नवपरिणीत दंपतीला पाडावा साजरा करायचा असतो, तेव्हा संधी साधून, आसपास कोणी नाही असे बघून एका हातातून एक अंगठी हळूच दुसऱ्या एका नाजुक बोटांत सरकते.
चौथा दिवस असतो भाऊबीजेचा. आज भावाला आंघोळ घालायची, जेवायला घालायचे आणि ओवाळायचे. पण एखादेवेळी असे घडते की, बहीण वाट पाहून थकते. भाऊ काही येत नाही. शेवटी ती चंद्रालाच भाऊ समजून ओवाळायला जाते. तिला भास होतो की, चंद्र हसतो आहे. आणि ते खरेच असते. कारण तिचा भाऊ अचानक येऊन मागे उभा आहे ते चंद्र पाहत असतो. तिला चाहूल लागते आणि ती मागे पाहते तो भाऊ मोठ्याने हसत असतो. मग तिला पण हसू फुटतं. आणि त्यांच्या आनंदात चांदोबाही सामील होतो, तेव्हा त्यांचा आनंद गगनातही मावत नाही!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment