दिवाळीच्या सहा दिवसांचे सांस्कृतिक महत्त्व नेमके आहे तरी काय?
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 25 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 दिवाळी Diwali

मनुष्याच्या मनावर, इंद्रियांवर आणि शरीरावर सतत संस्कार करून त्यांना मुक्तिदायी स्वधर्माचरण करण्यास सक्षम करणे व ठेवणे हा ते संस्कार करण्यामागील मुख्य उद्देश होय. तो सफल होत राहावा म्हणून ऋषीमुनींनी व ज्ञानी महात्म्यांनी नित्य कर्मे, चालीरीती, रूढी, परंपरा, धार्मिक विधी, सण, उत्सव वगैरे सुरू करून दिले आहेत. त्यांच्या मनातील तो उद्देश समजून घेण्यासाठी उदा. दिवाळी या सणाचा रूढ व आध्यात्मिक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

पूर्वी आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंतच्या काही तिथींना आनंदकारक घटना घडून गेल्या. त्या घटनांचे श्रेयस्कर म्हणजे आत्मज्ञानवृद्धीस साहाय्यकारी अर्थ मनी बाळगून त्याप्रमाणे वागणे म्हणजे संस्कृतीचा पाईक बनण्याचा प्रयत्न करणे होय.

१) वसुबारस 

अ) रूढ अर्थ - धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी ‘गोवत्स द्वादशी’ असते. यास ‘वसुबारस’ असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सवत्स गायीची श्रद्धापूर्वक पूजा करतात. हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस मानला जातो.

ब) आध्यात्मिक अर्थ - अध्यात्मशास्त्रज्ञ संतांनी जी सवत्स गाय पूज्य असल्याचे सांगितले आहे, ती त्रिपदा म्हणजे तीन पायांची आहे. संत श्रीतुकाराम यांनी तिचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे -

आम्हां घरीं एक गाय दुभताहे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥

वान ते सावळी नाव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवने ॥२॥

संपूर्ण त्रैलोक्यरूपी वासरास जन्म दिलेल्या म्हणजे ३३ कोटी देव, अष्ट कोटी भैरव इत्यादीयुक्त अनंत ब्रह्मांडे जिच्या पोटात सामावलेली आहेत, त्या ॐकारस्वरूप देवाधिदेवरूपी गायीचे पूजन केल्यानेच सनकादिक समाधान पावले. म्हणूनच त्यांच्यासारखे साधुसंत ‘सदा सण सांत नित्य दिवाळी’ असल्याचे अनुभवत असतात. ‘ॐकार गाय ती । जेथोनी सकळांची उत्पत्ती ॥’ होत असल्याचे जगद्गुरू श्रीहंबीरबाबा यांनीही म्हटले आहे. संत श्रीएकनाथांनीदेखील ‘गाय’नामक रूपक अभंगात विविध अवतार घेणारी ही देवरूपी गाय नरसिंहरूप धारण करून प्रल्हादा घरी होती, पंढरीच्या पुंडलिकाकडे होती आणि जी जनी विजनी म्हणजे सर्वत्र आहे, तीच आपल्याही घरी दुभत असल्याचेही म्हटले आहे.

अध्यात्मज्ञानी संतांनी उल्लेखिलेल्या व फक्त दिव्य ज्ञानदृष्टीला दिसणाऱ्या त्या त्रिपदा गायीचे (म्हणजे विश्वाचे बीज असलेल्या आणि अ, उ, म हे तीन पाय असलेल्या ॐकाररूपी गायीचे) बाह्य प्रतीक म्हणून लोक आपल्या चर्मदष्टीला दिसू शकणाऱ्या चतुष्पाद गायीची गोमाता म्हणून पूजा करत असतात. चतुष्पाद गाय ही इतर प्राण्यांपेक्षा अधिक उपयुक्त असा एक प्राणी आहे. म्हणूनच कृषीप्रधान जीवनात गोमातेचे कृतज्ञतापूर्वक पालनपोषण करणे आवश्यक होय. थोडक्यात, अनुक्रमे ऐहिक व पारमार्थिक जीवनास उपयुक्त असलेल्या या दोन्ही प्रकारच्या गायींचे स्वरूप समजून घेऊन ‘वसुबारस’ साजरी करणे म्हणजे आपल्या अध्यात्मज्ञानप्रधान संस्कृतीतील संस्कार जतन करत वागणे होय.

२) धनत्रयोदशी 

अ) रूढ अर्थ - आश्विन वद्य त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ हे नाव आहे. मृत्युदेवता यमाने त्याच्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील त्याला अपमृत्यु येणार नाही’ असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून धनत्रयोदशीला मंगलस्नान करून दीप लावले जातात. यमासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावला जातो.

ब) आध्यात्मिक अर्थ - यथासांग योगसाधना करणारा जीव, आपण सारे जीव ज्योतीरूप आहोत, असे अनुभवतो. संत श्रीज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘ज्योतींची निजज्योती’ असलेला तो परमात्मारूपी विठ्ठल ज्या अनंत ज्योतीरूपांनी नटला आहे, त्या ज्योती म्हणजे आपण सारे ‘जीव’ होय, असे त्यास सदोदित होते. अर्थात गीतेत म्हटल्याप्रमाणे आपण सारे जीव देवांचेच अंश आहोत. या आपल्या मूळ देवस्वरूपाचे ज्ञान होण्यापूर्वी जीव वारंवार जन्मत व मरत राहतो. जन्ममरणरूपी फेऱ्यात अडकून राहणे ही आत्मज्ञानरूपी खऱ्या प्रगतीच्या तुलनेत जीवाची झालेली अधोगती असते. ही अधोगती म्हणजेच ‘अपमृत्यु’ होय. याउलट दीपदान करणे म्हणजे ‘यमराजा’चे (काळाचाही काळ असलेल्या देवाधिदेवाचे) आत्मज्ञानयुक्त वा अमर्त्यभावाने स्मरण करणे होय. आत्मानुभवसंपन्न जीव भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या आठव्या अध्यायात (श्लोक क्र. १३ ते २१मधून) सांगितलेली ऊर्ध्वगती पावतो, देह सोडून जाताना त्याला दु:ख होत नाही, तो संत श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे आपला मृत्युदेखील ‘अनुपम्य सुखसोहळा’ असल्याचे अनुभवतो. थोडक्यात, आपण अमर आत्मा आहोत, या सानुभव ज्ञानाची प्राप्ती हीच खरी अक्षय्य धनाची प्राप्ती होय आणि अशा प्रकारे ते अविनाशी धन प्राप्त करून घेणे ही खरी म्हणजे आध्यात्मिक धनत्रयोदशी साजरी करणे होय.

३) नरकचतुर्दशी 

अ) रूढ अर्थ - आश्विन वद्य चतुर्दशीस नरक चतुर्दशी म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासातून सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला. त्यावेळी त्याला मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. या घटनेची आठवण म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून लोक दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात.

ब) आध्यात्मिक अर्थ - सूर म्हणजे देव व देव नाही तो असूर होय. जीव आत्मज्ञानाअभावी असूर असतो. संत श्रीतुकाराम म्हणतात, ‘जीव अवघे देव । व्यर्थ नागवी संदेह ॥’ जीवरूपी असुराने स्वरूपविषयक अज्ञानामुळे स्वत:ला त्रिविध दु:खरूपी नरकात म्हणजे अनेक दोषयुक्त असलेल्या शरीरात वावरणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या अवगुणांच्या नरकात अडकून घेतलेले असते. अशा प्रकारे असूर बनलेला जीव गुरुकृपायुक्त सोऽहंसाधनेने स्वरूपाला जाणतो, म्हणजे आपण आत्मारूपी कृष्ण म्हणजे देवच असल्याचे अनुभवतो. अर्थात, जीव नरकातून मुक्त होतो व सर्व दु:खदारी विकारांचा समूळ नाश होतो. जो देह कफ, वात, पित्त या दोषांनी संत्रस्त असतो, जो गीता-ज्ञानेश्वरीत वर्णिलेल्या आसुरी संपत्तीचे म्हणजे दुर्गुणांचे जणू भांडार झालेला असतो, तो त्याचा ‘देहच देवाचे मंदिर’ बनतो, त्याचा ‘अवघाचि संसार’ सुखाचा म्हणजे संपूर्ण देह सच्चिदानंद होतो, स्वत:च्या देहात प्रकाशलेल्या आत्मज्योतीच्या ज्ञानाने विश्वात सगळीकडे सर्वत्र आत्मज्योतीरूप खरे म्हणजे कधीही न विझून जाणारे दीप दिसू लागतात. संत श्रीज्ञानेश्वरांच्या भाषेत, ‘डोळ्याला ते परतत्त्व दिसू’ लागते. थोडक्यात, आत्म्याविषयीची अज्ञानजन्य अविवेकाची काजळी काढून टाकल्यामुळे आत्मज्ञानरूपी विवेकदीप उजळतो, तेव्हा निरंतर दिवाळी असल्याचा अनुभव येत राहणे (पहा, ज्ञानेश्वरी, ४.५४) हाच खरा खऱ्या संतयोग्यांना अनुभवास येणारा नित्य दीपोत्सव होय.

४) लक्ष्मीपूजन 

अ) रूढ अर्थ - आश्विन वद्य अमावास्याच्या रात्री ‘लक्ष्मीपूजन’ असते. या निमित्ताने अष्टदलकमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक सन्मार्गाने धन संपादन केले तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करायची असते. केवळ या रात्रीच द्यूत खेळावे, असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल आहे, हे लक्षात आणून देण्यासाठीच या खेळाची योजना केली असावी. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते, अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्यांची रोषणाई करतात. घरातील कचरा, घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणाऱ्या केरसुनीलाही लक्ष्मी मानून तिची काही ठिकाणी पूजा केली जाते.

ब) आध्यात्मिक अर्थ - अष्टदलकमल म्हणजे अष्टधा प्रकृती होय. पुरुष व प्रकृती हे सृष्टीचे घटक होत. जीवाला पराप्रकृती असेही म्हणतात आणि तोच वा तीच खरी म्हणजे अविनाशी लक्ष्मी होय. पृथ्वी, आप, तेज, वायू व गगन ही पंचमहाभूते तसेच सत्त्व, रज व तम हे तीन गुण या आठ प्रमुख तत्त्वांपासून शरीर म्हणजे प्रकृती तयार होते. रूढ अर्थाने ज्या लक्ष्मीला चंचल म्हटले आहे, ती म्हणजे नाशिवंत शरीर व त्यासाठी लागणारे धनादी होय. मृत्युरूपी जुगारामुळे जीव क्षणात अशरीरी म्हणजे लक्ष्मीहीन होतो. ‘नाही देहाचा भरवंसा । कोण दिवस येईल कैसा ॥’ असे जणू तदर्थक व सूचक विधान श्रीरामदासांनी केले आहे. स्वच्छता, मांगल्य, प्रकाश हे शब्द आत्मज्ञानसूचक आहेत. जिथे आत्मज्ञान नाही, तिथे सर्व अस्वच्छ, अमंगल व अंधारमय असते. तोपर्यंत शरीर घाण म्हणजे अपवित्र वा ओवळे असते. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।’ असे श्रीकृष्णाच्या सच्चिदानंदी शरीराला उद्देशून बोलणाऱ्या संत श्रीज्ञानदेवांनीदेखील आत्मज्ञान नसताना जाणवलेल्या आपल्या सर्वांची शरीरे ‘वांगली’ म्हणजे सदोष असल्याचे उल्लेखिले आहे.

श्रीकृष्णाचे शरीर स्वगत, सच्चिदानंदी, शुद्ध सत्त्वगुणी, षड्गुणैश्वर्यसंपन्न आहे तर आपले शरीर रक्त, रेत, दुर्गंधी, जंतू, नरक, मूत्य इत्यादींनी भरलेले आहे. या शरिराला षडविकार व त्रिविध ताप लागलेले असतात. म्हणून योगसाधना करून श्रीकृष्णासारखी दिव्य काया होणे म्हणजेच खऱ्या लक्ष्मीची प्राप्ती होणे होय. त्यासाठी शरिराविषयी असलेली आसक्तीरूपी घाण आत्मज्ञानप्राप्तीविषयक निश्चयाने दूर करावी लागते. घर स्वच्छ करावयास उपयुक्त असणाऱ्या केरसुनीच्या पूजेने आत्मज्ञानाची उपासना करावी, असे ज्ञानी महात्म्यांनी सूचित करून ठेवले आहे.

५) बलिप्रतिपदा 

अ) रूढ अर्थ - हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिप्रदा म्हटले जाते. या दिवशी विष्णुने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाही, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. या दिवसापासून विक्रम संवत्सर सुरू होते. म्हणून याला ‘दिवाळी पाडवा’ म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा आहे. 

ब) आध्यात्मिक अर्थ - बळीराजा हा अनंत विश्वातील एक जीव होय. महान पुण्य संपादून तो श्रेष्ठ ठरणार होता. तेव्हा श्रीविष्णुने वामन म्हणजे लहान व्यक्तीचे रूप धारण करून बळीराजाकडे तीन पावलांची जागा मागितली. तिसरे पाऊल टाकण्यास जागा उरली नाही म्हणून बळीने स्वत:ला वामनाच्या पायातळी दिले. श्रीविष्णुचरणी समर्पित झालेल्या बळीराजाचे स्मरण म्हणून ‘बलिप्रतिपदा’ हा दिवस मानण्यात येतो. आपण सर्वजण बळीप्रमाणे जीवरूप आहोत. आत्मज्ञानापूर्वी जीवाला देवाच्या पायातळी द्यावे लागते. ‘तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥’ ‘शरीर म्हणजे मी’ हा भ्रम नष्ट करताना जीवाला अनेक कष्टसहन करावे लागतात. देहोऽहंभाव लय पावल्यानंतर आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाने सामर्थ्यसंपन्न झालेला बळीचा हा विश्वविक्रम होय. बळीची पूजा करणे म्हणजे म्हणजे आत्मज्ञानयुक्त सामर्थ्याची उपासना करणे होय. आत्मज्ञान नसताना जगलेले आयुष्य हे लटक्या वा मिथ्या वा क्षणिक सुखदु:खाचे असते. हे दु:ख कायमचे नाहीसे होऊन आत्मज्योत प्रज्ज्वलित होऊन जीवन प्रकाशित म्हणजे अखंड सुखमय होणे म्हणजे खऱ्या बळीचे राज्य येणे होय.

श्रीतुकाराम म्हणतात, “भक्ती ते कठीण शूळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥”

हेच श्रीकबीर ‘लाखो में देख और कोटी में एक’ या शब्दांनी सूचवतात. ‘तीर तोफ घेऊनी लढे तो शूर नव्हे हो खरा । त्यजूनी मारा करी भक्ती तो शोभे शूर खरा ॥’, असेही त्यांनी एका दोह्यात म्हटले आहे. अर्थात गीतेत म्हटल्याप्रमाणे हजारात एखादा आत्मदेवप्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि अशा हजारातीलही क्वचित एखादा मायेचा नियंता असलेल्या त्या परमेश्वराला तत्त्वत: जाणतो.

जीव हा दहा प्राणांच्या साहाय्याने शरीरव्यापार करीर असतो. ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात शरीराला ‘शेत’ व जीवाला ‘शेतकरी’ म्हटले आहे. जीव आत्मज्ञानसंपन्न होत असताना तो पंच प्राणांच्या ज्योतींनी ब्रह्मांडात म्हणजे मेंदूच्या पोकळीतील सहस्त्र दलकमलनिवासी देवाची आरती करतो. ‘पंचप्राणांची आरती’ हे शब्द सर्वांना परिचित आहेत. जीव हा पत्नी व देव हा पती होय. जीवाने देवाला ओवाळणे हा दिवाळी पाडव्याचा मूलगामी अर्थ होय. जो जीव ही ओवाळणी करतो तो ‘हो कां पुरुष अथवा नारी । बहिणी म्हणे तेचि पतिव्रता खरी ॥’ असतो, असे अभंग-विधान श्रीबहिणाबाईंनी केले आहे.

६) भाऊबीज 

अ) रूढ अर्थ - कार्तिक शुद्ध द्वितीयेला ‘भाऊबीज’ असे म्हणतात. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला, तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आपला आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची प्रथा सुरू झाली.

ब) आध्यात्मिक अर्थ - यम हा मृत्युदेवता अर्थात काळ होय. काळ म्हणजे परमेश्वर होय. परमेश्वराचा विशेष अंश म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात (सहस्त्रदल कमलात) असणारा शिव होय आणि त्याची बहीण म्हणजे परमेश्वराचाच अंश असलेला नाभिकमलात राहणारा आपला जीव होय. भावाने बहिणीच्या घरी जायचे याचा अर्थ जीवाला आत्मज्ञान झाल्यानंतर अर्थात सर्व विश्व एकाच परमेश्वरापासून निर्माण झाले आहे, असे अनुभवून पुन्हा देहाशी तादात्म्य कल्पिल्याने जीव बनलेल्या बहिणीला समाधान देणे होय.

अध्यात्मशास्त्रामध्ये व संतसाहित्यात अनेक रूपकांनी, दृष्टान्तांनी एकच तत्त्व प्रतिपादित केले गेले आहे. म्हणून कधी जीवाला पत्नी व देवाला पती तर कधी देवाला भाऊ व जीवाला बहीण लेखत अध्यात्मशास्त्रातील अतिशय गूढ पण अनुभवगम्य असलेले सिद्धान्त सूचित केले गेले आहेत. म्हणूनच भाऊबीजेचा कौटुंबिक व सामाजिक अर्थ घेऊन नंतर आध्यात्मिक अर्थ समजून घेणे क्रमप्राप्त होय.

संत श्रीतुकारामांनी आणखी एका अभंगात दिवाळीचा आध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. ते म्हणतात,

“धन्य आजि दिन । झाले संतांचे दर्शन ॥१॥

झाली पापातापां तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥२॥

झाले समाधान । पायी विसावले मन ॥३॥

तुका म्हणे आले घरां । तोचि दिवाळी दसरा ॥४॥

संपूर्ण विश्वात भरून उरलेल्या त्या ‘शेष’ परमेश्वराचे ज्ञान झाले की, व्यक्तीची प्रवृत्ती पूर्णत: शांत होऊन ती संत होते. अशा संत पुरुषांचे दर्शन झाल्याने मनाला प्रसन्नता लाभते. श्रीकबीर म्हणतात, ‘तयां भेटतां सुख भेटते.’ आपल्या मनातील किल्मिष, पापभावना, द्वैतभाव, अज्ञान, दु:ख इत्यादी दूर जाऊ लागते. त्यावेळेपुरते तरी संतत्व म्हणजे काय ते जाणवत राहते. अर्थात, खरे साधुसंत घरी आल्याने वा भेटल्याने जे वातावरण निर्माण होते, त्यालाही श्रीतुकारामांनी दिवाळी म्हटले आहे.   

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या भ्रूमध्य ही पिंड व ब्रह्मांड यामधील सीमारेषा होय. जीवरूपी साधक जोपर्यंत या सीमारेषेवर असलेल्या दशवेद्वारातून वर देव राहतो त्या ब्रह्मांडात जात नाही, तोपर्यंत तो अपूर्ण ज्ञानी म्हणजे अज्ञानीच राहतो. ही अज्ञानसीमा उल्लंघून जाण्याची प्रवृत्ती संतदर्शनाने होते. श्रीगुरुकृपायुक्त योगसाधना करत अज्ञानाची सीमा उल्लंघून गेल्यानंतरच श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे ‘देव पहावयासी गेलेला तो जीव देवाशी एकरूप’ होऊन जातो व संतत्व पावतो. म्हणूनच संतदर्शन दिनाला ‘दसरा’ म्हटले आहे. दसऱ्यानंतर दिवाळी येते म्हणजे संतदर्शनानंतर संत झालेल्या व्यक्तीच नित्य दिवाळीचा आनंद उपभोगत राहते.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 25 October 2019

प्राध्यापक बाणकर,

सुंदर माहिती आहे. धन्यवाद! :-)

आपला नम्र,
गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......