अजूनकाही
अनेक संगीत-संबद्ध क्षेत्रांत सहज विहार करणारा एक बंगाली संगीतकार म्हणून अभिमानानं उदाहरण देण्यासारख्या कलाकारांत हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. या लेखात आपण गायक आणि संगीतकार या दोन्ही पातळ्यांवर वावरताना दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचं विश्लेषण करणार आहोत.
हेमंतकुमार आधुनिक बंगाली गीतं, बंगाली चित्रपटसंगीत, हिंदी चित्रपटसंगीत स्वतः गात आणि त्यांची स्वररचनादेखील करत असत. याशिवाय आपल्या सादरीकरणातून रवींद्रसंगीताचा प्रसार आणि गायन करून, याही क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. याखेरीज विचारणीय बाब अशी, की गायक म्हणून वाटचाल करायला सुरुवात केली, तेव्हा बांगला गान आणि रवींद्रसंगीत प्रभावीपणानं सादर करणारे दुसरे अनेक कलाकार होते, तरीही हेमंतकुमारांनी आपला स्वतः:चा निश्चित असा ठसा उमटवला.
आपण आधी गायक म्हणून त्यांचं कर्तृत्व विचारात घेऊ. एक पार्श्वगायक म्हणून अपेक्षेनुसार त्यांनी विविध प्रकारच्या रचना गायल्या आहेत. हेमंतकुमारांचा आवाज रुंद असला तरी ढाला म्हणता येणार नाही. त्यात एक सूक्ष्म ध्वनिकंपदेखील आहे. त्यामुळे त्यांना एका खास भावपूर्णतेचा स्पर्श निर्माण करणं चांगलं जमलं. आवाजातील कंपामुळे काही वेळा स्वर लगाव थरथरता वाटलं तरी एकंदरीनं गायन सुरेल म्हणूनच प्रतीत होतं. काही वेळा स्वरकेंद्रापासून ढळणं अर्थातच फायद्याचं ठरतं. छोट्या स्वरसमूहांची द्रूत फेक त्यांचा आवाज सक्षमतेनं करतो.
त्यांच्या आवाजाचं वर्णन भारदस्त पण संथ असं करता येईल. काही गीतांच्या गायनात ज्याला ‘अप्पर रजिस्टर’ म्हणतात, तो लगाव वापरून, त्यांनी गती साधली आहे. पण अशा वेळी आवाज कोता आणि कमी ताकदीचा वाटतो आणि संगीताशय खात्रीपूर्वक पोहोचत नाही. एकंदरीत असं म्हणता येईल की, या गायकास सूक्ष्म स्वरेलपणाची आवड आहे आणि पुष्कळ सादरीकरणात या आवाजाला भरीव फेक जमते. इतर काही बंगाली गायकांच्या तुलनेत त्यांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या गायनात बंगाली छापाचा उच्चार कमी जाणवतो, पण मन्ना डे यांच्याइतका तो मोकळा नाही. एक वैशिष्ट्य आणखी सांगता येईल. ‘ओ’ या स्वरवर्णाच्या उत्पादनाची छाया त्यांच्या सगळ्या गायनात अधिक जाणवते.
याचा सकारात्मक परिणाम असा की, गायनात एक सहकंपन आणि गुंजनही सर्वत्र आढळतं. आणि सहकंपन हा एक प्रमुख गायनगुण आहे. यामुळे एक वेधक विरोधाभास लक्षात येण्यासारखा आहे. त्यांचं हिंदी शब्दांचं उच्चारण एकेरी, तर गायन वा आवाज मात्र भरीव असा प्रत्यय येतो.
हेमंतकुमारांच्या गायनाचा आणखी एक विशेषही आवाजाच्या गुणधर्माशी संबंधित आहे. त्यांच्या गायनात हुंकारयुक्त गायन आणि हुंकार भरपूर असतात. ‘ह’ हे प्राणव्यंजन इतर व्यंजनांच्या उच्चारणांत थोड्या फार ‘नक्की’ लगावाचा सहभाग ठेवून गाणं, हे हुंकाराचं स्वरूप होय. गायकांनी हेवा करावा, अशी बरीच अंगं या गायकाच्या आवाजात आहेत. पण तरीही शास्त्रोक्त संगीत त्यांना पेलवत नाही, असं म्हणावंसं वाटतं. जेव्हा केव्हा ते आलाप करतात, तेव्हा ते गायन नसून पठण करतात, असं वाटतं. उदाहरणार्थ, ‘दर्शन दो घनश्याम’ (नरसी भगत) किंवा ‘सो गया जाने कहाँ’ (मोहर-मदन मोहन) ही गाणी मुद्दामून ऐकावीत. या दोन्ही गीतांत लावलेला ‘आ’कार सायासानं, मर्यादित गुंजनानं आणि बाहेरून आल्यासारखा वाटतो.
हेमंतकुमारांचे संगीतकार म्हणून सुरुवातीलाच ‘आनंदमठ’, ‘शर्त’, ‘सम्राट’सारखे चित्रपट सांगीतिकदृष्ट्या बऱ्यापैकी गाजले, पण त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती, १९५४ साली आलेल्या ‘नागीन’ चित्रपटामुळे!
संगीतकार म्हणून त्यांना पाश्चात्य संगीत किंवा त्यातील आगळंवेगळं स्वनरंग यांचं फार आकर्षण होतं, असं दिसत नाही. त्याचप्रमाणे अतिद्रूत किंवा हिसकेबाज हालचालींस पूरक असं नृत्यसंगीत त्यांना फारसं आवडत नसे.
हेमंतकुमारांच्या संगीताविषयी आणखी मूल्यात्मक विधानं करणं शक्य आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ‘नागीन’ या चित्रपटाचं संगीत त्यांना अडचण वाटावी इतकं लोकप्रिय झालं. क्ले व्हॉयलीनच्या वेगळ्या स्वनरंगातील छोटी आणि प्रत्येक गीतांत पुनरावृत्त केलेली धून स्मरणात रेंगाळणारी खूण झाल्यासारखी वाटते.
एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ हे भाव हेमंतकुमारांना जवळचे वाटत असावेत. त्यांनी रचलेल्या आणि गायलेल्या अनेक परिणामकारक गीतांत हे भाव भरपूर आढळतात. ‘कहीं दीप जले’, ‘छुप गया कोई रे’, ‘भंवरा बडा नादान’, ‘तुम पुकार लो’ ही गाणी खास उल्लेखनीय आहेत.
एकाच गीतांत अनेक संदर्भ आणून आपल्या सांगीतिक व्यामिश्रतेची जाणीव करून देणं, अतिशय सुरेखरीत्या जमलं आहे. उदाहरणार्थ ‘जय जगदीश हरे’ (आनंदमठ) हे गीता दत्तबरोबरच्या गीतात भारतीय धर्मसंगीतातील अनेक प्रकार एकत्र आणले आहेत. पठण, भजन गान, द्वंद्वगीत आणि अलिप्तपणे पण तीव्रतेनं गायलेलं ‘बाउल’ पद्धतीचं सादरीकरण या सगळ्यांचा समावेश या स्वररचनेत दिसून येतो.
‘नाईट क्लब गीतं’ हा त्यांचा आवडीचा प्रकार निश्चित नव्हता आणि तशा रचना करताना, त्यांनी ‘उरकून’ टाकलं अशा पद्धतीनं स्वररचना केल्याचं दिसून येतं. परंतु चित्रपट उद्दिष्टास साहाय्यक संगीत कल्पनेचं एक चांगलं उदाहरण म्हणून ‘ना जाओ सैंय्या’ (साहब, बिबी और गुलाम) हे गीत पाहता येतं. यात लयहीन अंतर्लक्षी कुजबुज, मग्न पठण आणि मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदनं, अशा प्रतितास कारण होत हे गीत उभं राहतं.
हेमंतकुमारांचं आग्रहाचं म्हणणं असायचं - आपल्याला रवींद्रसंगीतापासून स्फूर्ती मिळाली आणि दुर्दैवानं तिकडे आधुनिक रचनाकार दुर्लक्ष करतात. दुसरं म्हणजे चित्रपटसंगीतातील आधुनिक रचनाकारांचा चित्रपट निर्मितीच्या सर्जनशील अंगाशी काहीही परिचय नसतो आणि याची त्यांना खंत वाटायची. ती त्यांनी वारंवार प्रगट केली.
त्यांचं काम बघता, त्यांना तसं म्हणण्याचा नक्कीच अधिकार होता!
.............................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment