अजूनकाही
‘अक्षरनामा’च्या दिवाळी २०१९च्या अंकातील हा पहिला परिसंवाद - गायक-संगीतकार. या परिसंवादाचं दुसरं वैशिष्ट्य हे की, हा परिसंवाद एक लेखकी आहे. म्हणजे यातील सर्व लेख एकाच लेखकानं म्हणजे अनिल गोलिवलकर यांनी लिहिले आहेत. या परिसंवादाचा हा पहिला हप्ता आहे.
.............................................................................................................................................
‘दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही’
सुप्रसिद्ध कवी आरती प्रभूंच्या या ओळी वाचताना मला नेहमी किशोर कुमार यांच्या ‘चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये’ या गाण्याच्या ओळी आठवतात आणि त्या मागोमाग अविस्मरणीय झालेला चित्रपटातील प्रसंग!
आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला एखाद्या लेबलात अडकवतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार. त्यांच्यावर ‘यॉडलिंग’ करणारा गायक असा मारलेला शिक्का चुकीचा आहे.
मध्य प्रदेश राज्यातील खांडवा इथं जन्म. पहिल्यापासून काहीसा हुडपणा अंगात भरलेला (उडत्या चालीची गाणी सहजपणे म्हणणं हा योगायोग नसावा!) आणि पहिल्यापासून मनावर सैगल यांच्या गायनाचा प्रभाव आणि त्याबाबतची कृतज्ञता या गायकानं आयुष्यभर व्यक्त केली. सैगल यांचा प्रभाव किती होता? आपला खास आवाज समजून लावणं हे कळेपर्यंत किशोर कुमार सैगल यांच्या गायनाची आणि आवाजाची नक्कल करत होते.
एक उदाहरण. १९४८-४९ मध्ये आलेल्या ‘जिद्दी’ या चित्रपटातील ‘यह कौन आया रे कर के सिंगार’, तसंच ‘मरने की दुआये क्यों मांगू’ ही गाणी ऐकावीत. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमारांना ‘सैगलप्रमाणेच गायचं’ असं स्पष्टपणे बजावलं होतं, असं वाचल्याचं आठवतं. ही गाणी ऐकताना ते जाणवतं. परंतु लगोलग आलेल्या ‘रिमझिम’ चित्रपटातील ‘जगमग जगमग करता निकला चाँद’ या गाण्यात मात्र किशोर कुमार ‘आपल्या’ आवाजात गायले. मजेचा भाग म्हणजे हीदेखील खेमचंद यांचीच निर्मिती! या गाण्यानंतर त्यांची जगाला ‘गायक’ म्हणून ओळख व्हायला लागली.
पुढे हसवणारा गायक-नायक म्हणून ‘छम छमा छम’ या चित्रपटामुळे त्यांचं नाव अधिक प्रसिद्ध झालं. रसिकांनी त्यांच्या आवाजाची सांगड प्रथम देव आनंद, पुढे राजेश खन्ना आणि नंतर अमिताभ बच्चन या नायकांशी घातली. यामागे अर्थात संगीतकार एस.डी. बर्मन यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
गायक म्हणून किशोर कुमार यांची ओळख प्रेमगीतं, युगुलगीतं आणि विडंबन गीतं यांतून यथार्थपणे कळून येते. निरनिराळे कंठगायनाचे परिणाम साधत असतानाही संगीताचा अनुभव देत राहण्याची त्यांची क्षमता आणि कुवत अनन्यसाधारण अशी होती! गायनाचा आरंभ करण्यापूर्वी हुंकार गायनदेखील अतिशय सुरेल करत आणि संभाषणात्मक वातावरण निर्माण करण्याची त्यांची हातोटीही अप्रतिम होती. वास्तविक हा सगळा नाट्यात्म परिणाम, तरीही त्यातील सांगीतिक गुणवत्ता सांभाळण्याचं कौशल्य त्यांच्याकडे भरपूर होतं. अर्थात त्यांनी निर्माण केलेल्या यॉडलिंगची तर तुलनाच नाही. उदाहरणंच द्यायची झाल्यास ‘पडोसन’ आणि ‘प्यार का मौसम’ या चित्रपटांतील गाणी ऐकताना त्यांच्या कंठकौशल्याचा पुरेपूर पडताळा घेता येतो.
नौशाद, शंकर-जयकिशन, मदन मोहन, हेमंतकुमार, चित्रगुप्त, एस.डी. बर्मन, आर.डी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी इत्यादी संगीतकारांकडे गायलेल्या रचना ऐकताना किशोर कुमारांच्या संगीत बहुलत्वाचं प्रत्यंतर येतं. रफीसारख्यांशी स्पर्धा असूनदेखील ते सुमारे १७ वर्षं उच्च स्थानी विराजमान होते. ‘आराधना’नंतर तर काही काळ लोकप्रियतेत इतरांपेक्षा फारच पुढे होते. इतर गायकांना डाचणारी ‘जनरेशन गॅप’ त्यांच्याबाबतीत संपूर्णपणे निष्प्रभ होती, असं म्हणायला कसलाच प्रत्यवाय नसावा.
शास्त्रोक्त संगीताची टाळी नसताना ते सर्व प्रकारची गाणी अधिकारानं गात असत. उदाहरणार्थ ‘मेरे नैना सावन भादो’ (चित्रपट- महेबुबा) सारखं लयीला अतिशय अवघड गाणं अतिशय ठोसपणे सादर केलं. आणि तसं करताना त्यातील शिवरंजनी रागासाठी बरीच मेहनत केली असावी, असं वाटतं.
किशोर कुमारांचा आवाज पातळ नव्हता, पण अगदी रुंद वा जाडदेखील नव्हता. जास्तीत जास्त दीड सप्तकाचा पल्ला धुंडाळणं त्यांना जमत असे, पण तसं गाताना कुठेही चाचपडणं नव्हतं. त्यांचं अष्टपैलुत्व असं की, रुंजी घालणाऱ्या ‘हुस्न भी है उदास’ (चित्रपट- फरेब) या गाण्यापासून ते अगदी आनंदानं धिंगाणा घालणारं गाणंही ते अतिशय रंगून गात असत. या संदर्भात पुढील काही उदाहरणं पाहता येतील-
राजकपूर, देवानंद आणि दिलीपकुमार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘तीन अभिनयशैली’ असं म्हटलं जातं. याच चालीवर पुढील टप्पा घ्यायचा झाल्यास किशोरकुमार यांनी ‘चौथी शैली’ प्रदान केली असं म्हणायला हवं. प्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांनी ‘किशोर कुमार हे सर्वोत्तम गायक होते’ असं मत व्यक्त केलं. ते त्यांनी मनापासून केलं असणार. कारण त्यांच्याच काळात सगळे जण रफींना घेत असताना बिस्वास यांनी अतिशय तुरळक किंवा अपवादात्मक प्रसंगीच रफींच्या आवाजात गाणी केली.
किशोर कुमार यांनी सर्वांत प्रथम ‘झुमरू’ या चित्रपटाची निर्मिती केली. साल होतं १९६१. त्या चित्रपटात त्यांनी ‘कोई हमदम ना रहा’ या अविस्मरणीय गीताची रचना रचना केली. याच चित्रपटात त्यांनी ‘मैं हूं झूम झूम झुमरू’सारखं गीत लिहिलं. या रचनेत त्यांनी आपल्याकडील सगळ्या कंठगत कौशल्यांना भरपूर वाव दिला, असं म्हणता येतं.
किशोर कुमार यांच्या गुणवत्तेचं मूल्यमापन कसं करता येईल?
त्यांच्या कंठगत-कारागिरीचा मोठा टप्पा ही त्यांच्या जमेची फार मोठी बाजू आहे. या बाबतीत समकालीनांत त्यांचा हात धरणारा कुणीही आढळत नाही. एका गायकांकडून इतके परिणाम मिळणं ही गोष्ट अजिबात सामान्य नाही! किशोर कुमार जे कंठध्वनी परिणामपट उपलब्ध करून देऊ शकत, त्यात पुढील काही गोष्टींचा समावेश करता येईल. यॉडलिंग आणि शिट्टी, विविध स्वरवर्णांवर हुंकारयुक्त गायन, ला ला ला वगैरेंचं गायन, नि:श्वास, खाकरणं - खोकणं, हा ही हू हे ध्वनी, अर्धमुक्त वा पूर्णमुक्त वा खुला आवाज.
१) एकापाठोपाठ पुरुष व स्त्री आवाजात गायन.
२) अगदी सपाट आवाजात गायन वा सहकंपनयुक्त आवाजात सादरीकरण.
३) स्वरवर्ण व व्यंजनवर्ण बंद करून अगदी एकरेषात्तम गायन
४) विविध प्रमाणात नाकातून गायन
५) आंदोलित वा द्रूतकंपनयुक्त गायन
६) संगीत चरणास गद्यत्व देऊन वा उलट प्रकारं गायन
७) द्रुतगती गायनात उत्साहपूर्ण स्वन कायम पातळीवर राखणं
८) सुरेल, नाजूक आणि अंतर्मुख गायन.
कॉमिक गीतं प्रकारची गीतं गाताना, त्यांनी त्या गायनाला खास लक्षणं प्रदान केली आहेत.
१) सुरावटीस न बिघडवता फेसाळणारा कॉमिक स्वर सांभाळण्यात तर त्यांचं कौशल्य अतुलनीय असंच होतं.
२) लोकगीत शैलीप्रमाणे चरण वा शब्द इत्यादी खाली न-स्वारी क्षेत्रात सोडूनही चालीतला सांगीत गुणधर्म राखणं सहजशक्य होत असे.
३) त्यांनी बोलीभाषेतील लगाव - शब्द वा चरणास लागू करून अनेक गाणी रंगवली आहेत.
४) वाद्यध्वनी किंवा त्यांचा रंग गायनांतून ऐकवणं, हादेखील कॉमिक शैलीचा एक मार्ग किशोर कुमार सहजपणे चोखाळू शकत.
सैगल आणि एस.डी.बर्मन यांचं सर्जक अनुकरण
सैगल याचं अनुकरण करूनच किशोर कुमारांनी गायनाच्या क्षेत्रात प्रवेश मिळवला. एस.डी. बर्मन यांचा एक खास लोकगायकांसारखा - सुरेल पण सरळ वा सपाट, काहीसा अलिप्त आणि थेट, पूर्ण ताकदीनं फेक केलेला लगाव होता. हे दोन्ही लगाव किशोर कुमार सुंदररीत्या उचलत असत.
तांत्रिक सफाई
या गायकाकडे असलेल्या तांत्रिक सफाई व कामगिरीमुळे बंगाली लोकसंगीत किंवा भक्तिसंगीत, रॉक अँड रोल, कर्नाटक शैलीचं शास्त्रोक्त संगीत आणि नाईट क्लब गाणी, या सगळ्या रचनांमधून ते विनासायास वावरत असत. लय या अंगाबाबत कधीही किशोर कुमार अडचणीत सापडलेले दिसत नाहीत.
मात्रांच्या तालात बसवलेली चाल, राहुल देव बर्मन यांचे एकसमयी अवतरणारे एकाधिक लयबंध, द्रूत गती किंवा आघाती किंवा कव्वाली प्रकारचे बांध - या सगळ्यांचं सादरीकरण किशोर कुमार अगदी बिनचूक आणि परिणामकारकतेनं करत.
एक गैरसमज
किशोर कुमार यांच्या अपरिमित लोकप्रियतेला भुलून अनेक गायक या क्षेत्रात आले. त्यांनी त्यांच्यासारखी गाणी गाण्याचा प्रयत्नदेखील केला. पण त्यातील अनेकांना त्यात अपयश आलं. त्या अपयशाची संगती लावताना किशोर कुमार काही शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतलेले कलाकार नव्हते, तेव्हा आपल्यालादेखील त्याची अजिबात जरुरी नाही, असा विपर्यास करू लागले आणि स्वतःचं अपयश लपवण्याचा नवीन मार्ग शोधू लागले. यातली मेख नेहमीच विसरली जाते की, किशोर कुमार अतिशय डोळस आणि दैवी देणगी लाभलेले गायक होते. अशी श्रीमंती लाभलेले कलाकार नेहमीच विरळा असतात. इथंच किशोर कुमार आणि इतर गायक यातील फरक स्पष्ट होतो.
.............................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment