‘अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अनार्किस्ट’ : वेळ पडल्यास शासकीय यंत्रणा ‘चोर सोडून संन्याशा’ला फाशी द्यायलाही कमी करत नाही!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अनार्किस्ट’मधील काही दृश्यं
  • Tue , 22 October 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अनार्किस्ट Accidental Death of an Anarchist डारिया फो Dario Fo

इटालियन नाटककार डारिया फो (१९२६-२०१६) यांना विसाव्या शतकात पाश्चात्य रंगभूमीवर फार मानाचं स्थान होतं. कम्युनिस्ट असूनही त्यांना १९९७ साली साहित्याचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं. मिखाईल शोलोकोव (१९०५-१९८४) या रशियन कादंबरीकाराबद्दलही असंच घडलं. शोलोकोव कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएत युनियनचे अधिकृत सभासद असूनही त्यांना १९६५ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला गेला.

फो यांची नाटकं जगातील सर्व महत्त्वाच्या भाषांत उपलब्ध आहेत. अलीकडेच मुंबर्इत त्यांच्या ‘अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अनार्किस्ट’ या नाटकाचा हिंदी प्रयोग बघायला मिळाला. हे दोन अंकी नाटक मुंबईस्थित ‘जेफ गोल्डबर्ग स्टुडिओ’ या नाट्यसंस्थेमार्फत सादर करण्यात आलं. हे नाटक मराठी रंगभूमीवर एकेकाळी सादर झालेलं आहे. माया पंडित आणि शफाअत खान यांनी १९८०च्या दशकात या नाटकाचं भाषांतर केलं होतं.

नास्तिक असलेले फो दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा १३ वर्षांचे होते. त्यांनी फॅसिझमचे दुष्परिणाम जवळून बघितले होते. तेव्हाच्या सर्व तरुणांप्रमाणेच फोसुद्धा मुसोलिनीच्या प्रभावाखाली होते. हे वास्तव पुढे त्यांनी कधी नाकारलं नाही. मात्र आपण असं का केलं हे विस्तृतपणे सांगितलं. त्यांचं कुटुंब फॅसिझमविरोधी गटात सक्रिय होतं. ‘फॅसिझम समर्थकांच्या डोळ्यांत आपल्या कारवाया येऊ नयेत म्हणून मी मुसोलिनीच्या पक्षात सामिल झालो,’ असं फो सांगत असत.

फो यांनी जीवनात व कलेत सतत प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका घेतली. ते शेवटपर्यंत अशा लढ्यात सक्रिय होते. अमेरिकेवर अल कायदानं केलेल्या हल्ल्याबद्दल (९/११) अमेरिकन प्रशासन जे समाजाला सांगत होतं, त्याबद्दल त्यांना शंका होत्या. या सर्व शंका त्यांनी ‘झिरो : अ‍ॅन इन्व्हेस्टिगेशन इन टू 9/ 11’ या चित्रपटात व्यक्त केल्या आहेत. अशा पण जरा वेगळ्या प्रकारच्या शंका इराण प्रशासनानं घेतल्या आहेत. इराणच्या मते इस्लामला बदनाम करण्यासाठी इस्त्रायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’नं अमेरिकेच्या मदतीनं हे हल्ले घडवून आणले. असो.

फो यांच्या गाजलेल्या महत्त्वाच्या नाटकांत ‘अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अनार्कीस्ट’चा समावेश केला जातो. या नाटकाचा पहिला प्रयोग डिसेंबर १९७०मध्ये इटलीतील मिलान शहरात झाला होता. या नाटकामागे १९६९ साली इटलीत घडलेली एक घटना कारणीभूत ठरली. रेल्वेत नोकरी करणाऱ्या एका जहाल विचारांच्या कर्मचाऱ्याला पोलीस एका बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक करतात. पोलीस त्याला उलटसुलट प्रश्न विचारून हैराण करतात. या दरम्यान तो पोलीस चौकीच्या चवथ्या मजल्यावरून पडून मरतो. पोलीस या घटनेला ‘आत्महत्या’ म्हणून घोषित करतात. मात्र पोलिसांच्या अहवालात असंख्य त्रुटी असतात. नंतर झालेल्या चौकशीत त्या रेल्वे कर्मचाऱ्याचा बॉम्बस्फोटाशी काहीही संबंध नसल्याचं सिद्ध होतं. या घटनेतून फो यांना हे नाटक स्फुरलं.

मुंबईत सादर झालेल्या या नाटकाचं भारतीयीकरण करण्यात आलं आहे. नाटकाचं कथानक मिलानऐवजी भारतातील उत्तर प्रदेश/बिहार राज्यातील एका गावात घडतं. त्यामुळे हिंदीला स्थानिक गोडवा प्राप्त झाला आहे. या नाटकातून फो यांनी शासकीय यंत्रणांतील भ्रष्टाचार व शासकीय यंत्रणा कशी वेळ आल्यास चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला कमी करत नाही, ही यंत्रणा प्रसंगी किती निर्दय होऊ शकते, सरकारच्या कारभारात सतत मानवी हक्कांची कशी पायमल्ली होत असते, वगैरे चित्रण तिरकस पद्धतीनं सादर केलं आहे.

असे प्रकार आपल्या देशातही आता सर्रास होत असल्यामुळे आपण एक इटालियन नाटक बघत आहोत, असं न वाटता अस्सल भारतीय कथावस्तू रंगमंचावर सादर होत आहे, असंच वाटत राहतं. हे कुठल्याही मोठ्या कलाकृतीचं यश असतं! ती स्थलकालाच्या मर्यादा उल्लंघून जाते, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आस्वाद्य ठरते.

नाटकाची सुरुवात होते, ती एका पोलीस स्टेशनात. पोलीस इन्स्पेक्टर व हवालदार बोलत असतात. हवालदार एका वेडसर तरुणाला पकडून आणतो. तो तथाकथित वेडा पोलिसांना हजारो तार्किक प्रश्न विचारून हैराण करतो. तो वेडा शहाणा की, हे पोलीस अधिकारी शहाणे असा प्रश्न आपल्या मनात निर्माण करण्यात नाटककार एव्हाना यशस्वी होतो. (असाच प्रकार ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या १९७५ साली आलेल्या इंग्रजी चित्रपटात आहे. या चित्रपटात ज्या प्रकारे जॅक निकोल्सन रुग्णालय प्रशासनाला प्रश्न विचारतो, त्यावरून कोण वेडा आणि कोण शहाणा, असा मूलभूत प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो.)

नाटककार फो यांनी ही सर्व हाताळणी विनोदी, फार्सिकल पद्धतीनं केलेली असल्यामुळे प्रेक्षक हसत हसत अंतर्मुख होतो. जी पोलीस यंत्रणा आपल्या सुरक्षेसाठी बनवलेली आहे, ती प्रसंगी कशी स्वतःच्या स्वार्थासाठी खोटेनाटे खटले उभे करते, हे पाहून आपण अंतर्बाह्य अस्वस्थ होतो. आता तर आपल्या देशातही पंतप्रधानांना अनावृत्त पत्र लिहिलं म्हणून मान्यवर लेखक/कलावंतांवर देशद्रोहाचे खटले भरले जात असल्याचं बघायला मिळतं. केवळ मार्क्सवादावरचं पुस्तक घरी ठेवलं म्हणून डॉ. विनायक सेन यांच्यासारख्या सेवाभावी डॉक्टरला वर्षानुवर्षं तुरुंगात डांबलं होतं.

दुसरा अंक पहिल्या अंकापेक्षा दाहक आहे. त्यात समाजातील विविध घटक कसे एकत्र येऊन सामान्य माणसांवर अन्याय करतात, यावर प्रकाश टाकला आहे. यात जर एखाद्या घटकांकडून अतिरेक झाला तर सर्व कसे एकमेकांना सांभाळून घेतात हेही दाखवलं आहे. पोलीस आयुक्त, इन्स्पेक्टर व हवालदार त्यांच्या बोलण्यातून प्रेक्षकांना कळतं की, त्या तथाकथित दहशतवाद्यानं केलेल्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी येणार आहे.येणाऱ्या अधिकाऱ्याला कसं मॅनेज करायचं याबद्दल चर्चा सुरू असताना पहिल्या अंकातला वेडा पुन्हा रंगमंचावर येतो. ही मंडळी त्यालाच चौकशी अधिकारी समजून सर्व सांगायला लागतात. यातील प्रत्येक जण असं काही निवेदन करतो की, ज्यामुळे तो यात कोठे पकडला जाणार नाही. यातील प्रत्येक निवेदनातील विसंगती वेडा बरोबर पकडतो. हळूहळू त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये काय घडतं, हे समोर यायला लागतं. वेडा उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्या रात्री काय घडलं, हे प्रत्यक्ष करून दाखवायला लावतो. त्यातून सिद्ध होतं की, त्या रेल्वे कर्मचाऱ्यानं चवथ्या मजल्यावरून उडी मारली नव्हती, तर पोलिसांनी त्याला ढकलून दिलं होतं.

खरा प्रकार सिद्ध होत असतानाच एक महिला पत्रकार तिथं येतं. तिला या प्रकरणावर लेख लिहायचा असतो. त्यामुळे मला माहिती हवी आहे, अशी ती मागणी करते. रंगमंचावर चौकशी अधिकारी, पोलीस आयुक्त, इन्स्पेक्टर हवालदार वगैरे सर्व असतात. महिला पत्रकाराला कोणी व किती माहिती द्यायची वगैरे गोंधळातून तिच्या हळूहळू सर्व प्रकार लक्षात येतो. तिला वाटतं, आपल्या हाती जबरदस्त स्टोरी लागली आहे. ती प्रसिद्ध करण्यासाठी महिला पत्रकार सज्ज होते.

नाटककार फो यांनी या नाटकाचे दोन शेवट कल्पिले आहेत- एक सुखान्त तर दुसरा दुःखान्त. अशोक पांडे दिग्दर्शित या प्रयोगात दोन्ही शेवट प्रेक्षकांना दाखवले आहेत. एक शेवटात महिला पत्रकाराला इतर सर्व जण बांधून ठेवतात आणि तिच्या खोलीत बॉम्ब लावून पळून जातात. दुसऱ्या शेवटात महिला पत्रकारसुद्धा विकली जाते आणि पोलिसांना हवी तशी स्टोरी लिहिण्याचं मान्य करते. 

नाटक संपतं, तेव्हा आपण गोंधळून जातो. कारण आपली पारंपरिक अपेक्षा अशी असते की, नाटकाचा एक शेवट असावा आणि तो नाटककारानं ठामपणे सांगावा. फो मात्र तसं करत नाहीत. मात्र जे नाटकात दाखवलं आहे, तशा घटना आपल्या आसपास नेहमीच घडत असतात. यात थोडंसं नवीन काही असेल तर तो माध्यमांच्या जगतातील भ्रष्टाचार. आपल्याला पोलीस स्टेशनात होत असलेला भ्रष्टाचार परिचित आहे. मात्र सत्य सांगणं हेच ज्यांचं कर्तव्य आहे, ते पत्रकारसुद्धा प्रसंगी कसे विकले जातात, हे रंगभूमीवर क्वचित बघायला मिळतं.

दिग्दर्शक अशोक पांडेंना ‘फार्स’ या प्रकाराची उत्तम समज आहे. त्यांनी या नाटकाला अशी काही गती दिली आहे की, आपण क्षणभरही कंटाळत नाही. यासाठी त्यांनी केलेली पात्ररचना तितकीच महत्त्वाची आहे. संजय गुर्बाक्षनी (पोलीस आयुक्त), अनिल मिश्रा (पोलीस इन्स्पेक्टर आहुजा), यशराज सिंग (वेडा माणूस), अक्षत मिश्रा (हवालदार), नितेश (इन्स्पेक्टर तिवारी) व शृती अगरवाल (महिला पत्रकार) या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. त्यामुळे हे नाटक बघणं एक प्रसन्न अनुभव ठरतो.

असं मुळात गंभीर प्रवृत्तीचं नाटक सादर करताना फार्सचा किती वापर करायचा, प्रेक्षकांना सतत हसत ठेवायचं की, अधूनमधून त्यांना कथानकातील दाहक भाग भिडेल अशा पद्धतीनं दिग्दर्शन करायचं? नाटककार फो यांनी नाटकाची मांडणी फार्सिकल पद्धतीनं केलेली आहे. पण इथं दिग्दर्शकाला ठरवावं लागतं की, फार्सिकल मांडणीला किती महत्त्व द्यायचं? या नाटकाचे दिग्दर्शक अशोक पांडे यांना ती धुसर रेषा नीट दिसली आहे. म्हणूनच नाटक बघताना आपण अनेकदा हसत असलो तरी योग्य वेळी रंगमंचावर उलगडत असलेली शोकांतिका अंतर्मुख करते.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख