अजूनकाही
‘लायन हार्ट’ हा २०१८चा नायजेरियाचा एक सिनेमा आहे. जिनीव्हियेव नाजी ही नायजेरिया सिनेजगतातील अतिशय नावाजलेली अभिनेत्री, निर्माती, पटकथाकार, उद्योजिका आणि पूर्वाश्रमीची मॉडेल राहिलेली, या फिल्मची दिग्दर्शिका आहे. हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. यात तिने मुख्य भूमिकाही केली आहे. या सिनेमाची दोन वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे नायजेरिया या देशाकडून ९२ व्या ऑस्करसाठी (आता येऊ घातलेल्या) ‘फॉरेन लँग्वेज कॅटेगरी’साठी हा सिनेमा पाठवला गेला आहे. नायजेरियानं पहिल्यांदा सिनेमा पाठवला आहे आणि तोदेखील एका स्त्रीनं दिग्दर्शित केलेला. (आपल्याकडेही झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला ‘गली बॉय’ हा सिनेमा याच कॅटेगरीसाठी पाठवला गेलेला आहे.) दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा नेटफ्लिक्सनं विकत घेतलेला आहे. नायजेरियासाठी निर्मिती केलेला हा नेटफ्लिक्सचा पहिला ओरिजनल नायजेरियन सिनेमा आहे. मागच्या ऑस्कर सोहळ्यात नेटफ्लिक्सच्या ‘रोमा’ या कमालीच्या सुंदर सिनेमानं खूप नामांकनं मिळवली होती. मागच्या वर्षीच्या मानाच्या अशा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘लायन हार्ट’चा वर्ल्ड प्रीमियर पार पडला होता.
वाहतूक व्यवस्थेच्या उद्योगात आपल्या मूल्यांवर नाव कमवत मोठी झालेली लायन हार्ट ही कंपनी. या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले चीफ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कंपनीत येणं शक्य होत नाही. अशा वेळी वडिलांची जागा आपल्याला मिळणार असं चीफच्या मुलीला म्हणजेच नायिकेला वाटत असतं, परंतु वडील मात्र आपल्या अनुपस्थित स्वत:च्या भावाला कंपनी बघायला सांगतात. यामुळे मुलगी नाराज होते. खरं पाहू जाता आपण जे काही ठरवतो, ते आणि तसंच आपल्याला मिळालं पाहिजे, असं दरवेळी होत नसतं, हा अत्यंत महत्त्वाचा धडा तिच्या वडिलांना तिला शिकवायचा असतो. तिचे हे काका अतिशय गमत्या स्वभावाचे आणि जगरहाटीचे पक्के ज्ञान असणारे असतात. काका आणि पुतणी कर्जात बुडालेल्या लायन हार्टला कसं वाचवतात त्याची ही गमतीशीर गोष्ट आहे.
कुटुंबाचा वारसा केवळ वंशाच्या दिव्यानेच नाही तर मुलीनंही पुढे नेला पाहिजे आणि तो पुढे नेण्यासाठी तिला मुलाइतकंच सक्षम समजलं पाहिजे. नायजेरियन समाज या विचाराकडे कसा बघतो, याचं चित्रण करण्यावर या सिनेमात भर दिला आहे. मोठ्या पदावर असलेले पुरुषदेखील थेट नायिकेच्या छातीकडे बघत मिटिंग करतात, तिच्या कंपनीत कामगार वर्गात धुसफूस होते, तेव्हा एक पुरुष सरळ नायिकेला म्हणतो की, ‘अमेरिकेत राहून आलीस म्हणजे स्वत:चं नायजेरियन असणं विसरू नकोस, तुमच्यासारखे आफ्रिकन अमेरिकन हे पूर्ण अमेरिकनच बनून येतात. नायजेरियात आली आहेस तर नायजेरियन बनूनच रहा,’ असे बारीकसारीक तपशील हा सिनेमा टिपत राहतो.
बदल हा अपरिहार्य असतो, असणार, परंतु यात मागील पिढीचं अनुभवातून आलेलं ज्ञानदेखील तितकंच महत्त्वाचं याकडेही हा सिनेमा बोट दाखवतो. हा मुद्दा आपल्याकडे जरा जास्त पटणारा आहे. हा एक नायिकेला जिंकवणारा ‘फॅमिली ड्रामा’ आहे.
बाईकडे ‘सेक्स ऑब्जेक्ट’ म्हणून बघणाऱ्या पुरुषप्रधान समाजात एक बाई कसा एका महत्त्वाच्या उद्योगसंस्थेचा चार्ज हातात घेते, त्या विषयीचा हा सिनेमा आहे. हा चार्ज हातात घेत असताना तिला कोणकोणत्या ताणांना सामोरं जावं लागतं, हे ओघानं येतंच. विषय गंभीर असला तरी हाताळणी मात्र हलक्या फुलक्या पद्धतीनं केलेली आहे. परंतु त्यामुळे कधी कधी काही प्रसंगांत टेन्शन फक्त दाखवण्यापुरतं वाटतं. नायिकेला संकटातून सोडवण्यासाठीचे सगळे प्रसंग आधीच गुंफून ठेवलेले लक्षात येतात.
तसं पाहू जाता हा तसा फार काही थोर सिनेमा नाही. साधारणपणे ऑस्कर मिळवणारे सिनेमे - मग ते मुख्य नामांकनामधील असोत किंवा ‘फॉरेन लँग्वेज कॅटेगरी’तील - एकूण मानव्याला कवेत घेणारे, वैश्विक दु:ख मांडून त्याकडे करुणेच्या नजरेनं पाहणारे, सध्याच्या जगातील ज्वलंत प्रश्नाकडे बघणारे अशा पद्धतीचे असतात. ही लक्षणं पाहता ‘लायन हार्ट’ त्यात कुठेही बसत नाही. त्यातल्या त्यात एका बाईचा लढा असं जरी स्वरूप असलं तरी ते त्यामानानं सिनेमात ढोबळमानानं येतं.
अशा वेळी लक्षात येतं की, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मला आपलं मार्केट वाढवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागत असतील. नायजेरियासारख्या आफ्रिकेतील वेगानं विकसित होणाऱ्या देशाची बाजापेठ मिळवणं हे धोरणीपणाचं लक्षण आहेच आणि जगभरचा नायजेरियन प्रेक्षक मिळवण्यासाठी याचा फायदा होणार हे निश्चितच. नायजेरियामधील टॅलेंटला यामुळे संधी मिळणार आणि हेही नसे थोडके.
.............................................................................................................................................
लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.
madhavi.wageshwari@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment