अजूनकाही
राही बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ प्रदर्शित होऊन अलीकडेच एक वर्ष पूर्ण झालं. ‘तुंबाड’ आणि ‘लाल कप्तान’ दोन्ही चित्रपट आनंद एल. रायच्या ‘कलर यलो प्रॉडक्शन्स’ने समोर आणले आहेत, हा काही निव्वळ योगायोग नसावा. कारण जेव्हा या दोन्ही चित्रपटांचा एकत्रित विचार केला जातो, तेव्हा त्यांच्यातील साम्य लक्षात येते. दोन्ही चित्रपट काही सोप्या, ढोबळ नि मूलभूत कल्पनांवर आधारलेले आहेत. मात्र या दोन्हींची प्रभावी मांडणी, हाताळणी इथली जमेची बाजू आहे. इथली अचूक आणि परिणामकारक तांत्रिक बाजू चित्रपटकर्त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची असावी. ‘तुंबाड’मध्ये ‘हाव वाईट आहे’वजा तात्पर्य असणाऱ्या मूलभूत कथानकात एका काल्पनिक रहस्यकथेच्या माध्यमातून भयाविष्कार निर्माण केला जातो, तर ‘लाल कप्तान’मध्ये जीवन-मृत्यू आणि एकूणच आयुष्यातील घटनांचं चक्र सुरू राहणं, ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
‘लाल कप्तान’ घडतो तो अठराव्या शतकादरम्यान. वर्तमानात घडणाऱ्या घटनाक्रमात गोसावी (सैफ अली खान) या नागा साधूला केंद्रस्थानी ठेवत कथानक सुरू आहे. त्यात रहमान खान (मानव वीज) या त्याच्या शत्रूला मारून कसला तरी सूड घेण्याचे त्याचे प्रयत्न दिसतात. या कालखंडात गोसावीबाबत नि त्याच्या भूतकाळाबाबत रहमान जितका अनभिज्ञ आहे, तितकेच प्रेक्षक म्हणून आपणही अनभिज्ञ आहोत. (अर्थात आपल्याला तरी पंचवीसेक वर्षांपूर्वीच्या घटनेचे फ्लॅशबॅक्स दिसत असतात.) यातूनच चित्रपटाला त्याचं रहस्याचं अंग प्राप्त होतं. आता पंचवीस वर्षांपूर्वी शेरगडाजवळ घडलेली घटना गोसावी आणि खानला जोडणारा दुवा आहे.
आता दृकश्राव्य पातळीवर नानाविध देशी-विदेशी चित्रपटांकडून घेणारा सदर चित्रपट म्हणजे एक सिनेमॅटिक सूडकथा आहे. गोसावी हा अमेरिकी वेस्टर्न चित्रपटांतील पैशांसाठी गुन्हेगारांना मारणाऱ्या एखाद्या शिकाऱ्याच्या थाटात वावरतो. हिंसा आणि क्रूरतेचं इथल्या वातावरणातील अस्तित्व कमालीचं ठळक आहे. घोड्यांवरून एकमेकांचा पाठलाग करणारे लोक समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर जात असताना क्षितीजसमांतर रेषेवर तिला बंदुकीनं गोळी झाडण्याची दृश्यं, रक्तानं माखलेली मृत शरीरं हे घटक इथं पदोपदी दिसून येतात.
चित्रपटातील हिंसक दृश्यांत जितकी तीव्रता आहे, तितकीच विक्षिप्तता आणि गूढता इथल्या इतर पात्रांमध्ये आहे. कधी ही विक्षिप्तता, गूढपणा लिखाणातील चातुर्यातून येणारा आहे, तर कधी दोषांतून. गोसावी आणि खान अनेकदा एकमेकांसमोर येऊनही त्यांना एकमेकांना मारावंसं न वाटणं, ही अतर्क्य विक्षिप्तता इथल्या पात्रांच्या विश्वात शोभून दिसण्यापेक्षा चित्रपटकर्त्यांना आणखी बराच काळ कथानक पुढे ताणायचं आहे, याकडे बोट करणारी अधिक आहे. तर, गोसावीचा माग काढण्याकरिता अफगाणी ते मराठा, सर्वांनाकडून पैसे घेणाऱ्या सांचो पान्झाचा (दीपक डोब्रियाल) विक्षिप्तपणा इथं न्याय्य ठरणारा म्हणता येतो.
या प्रवासात गोसावीच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींपैकी एक असलेली अनाम स्त्रीदेखील (झोया हुसैन) आपल्याभोवती गूढतेचं एक विलक्षण वलय तयार करून आहे. रहमानच्या बेगमला (सिमोन सिंग) या खालच्या जातीतील काळ्यासावळ्या स्त्रीकडे पुरुष कसे आकर्षित होतात हे उमगत नाही. तिच्या दृष्टीनं ही म्हणजे केवळ एक निर्लज्ज स्त्री आहे. मात्र, तिला तिच्या भेदक डोळ्यांतील दुराग्रहीपणा, त्यातून निर्माण होणारं उपजत सौंदर्य दिसत नसावं. एका दृश्यात ती जेव्हा काळी वस्त्रं परिधान करून घोड्यावर स्वार झालेली असते, तेव्हा तिच्या डोळ्यांतील करारीपणा पहावा. (यावेळी वेस्टर्न चित्रपटांपासून प्रेरित अशा या प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात ‘लाँग कूल वुमन इन अ ब्लॅक ड्रेस’ हे गाणंच काय तेवढं पार्श्वभूमीवर वाजणं बाकी राहिलं होतं.) तिची हीच न्यूनतम, तरीही ठळक वैशिष्ट्यं तिला अधिकाधिक आकर्षक बनवणारी आहेत. ‘सुन रहे हो हमारा दिल कितने जोरों से धडक रहा है?’ अशा अर्थाच्या तिच्या संवादाचं उपशीर्षकातील भाषांतर ‘डू यू हियर माय हार्ट बीटिंग सो व्हायलन्टली?’ असं आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहता इथल्या तिच्या हृदयाच्या वाढत्या ठोक्यांकरिता वापरलेलं ‘व्हायलन्स’ (हिंसा) हे विशेषणही नको तितकं अचूक वाटणारं आहे.
‘लाल कप्तान’ हा सर्वस्वी त्यातील अभिनेत्यांची, कमी-अधिक फरकानं अत्यंत प्रभावी असलेली कामगिरी आणि दिग्दर्शन, चित्रणाच्या पातळीवरील सफाईदारपणा यांवर अवलंबून असणारा चित्रपट आहे. मुळातच लिखाणाच्या पातळीवर इथल्या संकल्पना अगदीच मुलभूत स्वरूपाच्या आहेत. शिवाय, लांबलेलं कथानक चित्रपटाला काही प्रमाणात रटाळ बनवणारं आहे. अशा वेळी शंकर रमणचे छायाचित्रण आणि बेनेडिक्ट टेलर, नरेन चंदावरकर यांचं प्रभावी पार्श्वसंगीत चित्रपटाच्या एकूण परिणामात भर घालणारं ठरतं.
‘एनएच १०’ दिग्दर्शित करणारा नवदीप सिंग आणि तिथल्याप्रमाणेच इथंही प्रादेशिक भाषांचा समावेश असलेले संवाद लिहिणारा सुदीप शर्मा यांचा हा चित्रपट अनेक स्तरांवर थक्क करणारा आहे. सोबतच अधिक एकसंध पटकथा असती तर तो किती प्रभावी बनू शकला असता याची खात्री देणाराही आहे. त्यामुळे तो दोषपूर्ण असला तरी त्याकडे दुर्लक्ष करायला नको. त्यात पुन्हा वेस्टर्न चित्रपटांचे चाहते असाल, तर अजिबातच नाही.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment