अजूनकाही
कालचा, १८ ऑक्टोबरचा दिवस हा ‘ जागतिक रजोनिवृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘Women are not born, they are made’ (स्त्री जन्म घेत नसून - व्यवस्थेकडून - बनवली जाते) असं स्त्रियांविषयी बोललं जातं. हे वाक्य खूप बोलकं आहे. हा दिवस सगळ्यांनी आठवणीत ठेवावा असा नाही, पण आपल्या सभोवताली एक तृतीयांश महिला या ‘रजोनिवृती’ वयोगटातील असतात. त्यामुळे ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. रजोनिवृत्ती होते म्हणजे नेमकं काय होतं? रजोनिवृती ही अवस्था का येते? रजोनिवृती झाल्यावर काय लक्षणं दिसतात? ‘पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम’ म्हणजे काय? त्यावर काय उपाययोजना आहेत?
आपल्या रक्तात अनेक घटकांपैकी हार्मोन हा एक घटक असतो, ज्याला मराठीमध्ये ‘संप्रेरक’ म्हणतात. शरीरातील विविध ग्रंथींमधून स्त्रवणारे हे हार्मोन अतिशय अल्प प्रमाणात आपल्या रक्तात असतात, पण शरीराच्या जडणघडण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. स्त्री जन्मल्यापासून हे हार्मोन शरीरात असतात, पण त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य सुरू होतं पहिल्यांदा पाळी (MC) सुरू होते तेव्हा. याला आम्ही वैद्यकीय भाषेत ‘मैनर्च’ असं म्हणतो. ही २८ दिवसीय सायकल म्हणजे हार्मोन्सचं एक चक्र असतं. ईस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन हे दोन हार्मोन्स गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या स्त्री बीजांड (ओवरी) मधून तयार होतात. गरोदरपणातील आणि प्रसूतीनंतरचे काही दिवस सोडले तर हे हार्मोन पाळीची सायकल नियमितपणे चालू ठेवतात. गरोदरपणी हार्मोन्समध्ये होणारे बदल काही महिन्यांत पुन्हा पूर्वरत होतात.
हे बदल स्त्री सहजतेनं व स्वागतार्ह म्हणून स्वीकारते. पण हेच बदल वयाच्या ४५व्या वर्षानंतर कायम स्वरूपात पुढील आयुष्यभरासाठी होतात, तेव्हा अनेक समस्या तयार होतात. ईस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन या हार्मोन्सचं रक्तातील प्रमाण खूप कमी होतं. या बदलामुळे पाळी येणं कायमचं बंद होतं. यालाच आम्ही वैद्यकीय भाषेत ‘रजोनिवृती’ म्हणजे ‘मेनोपॉज’ असं म्हणतो. ही रजोनिवृती साधारणत: वयाच्या ४५व्या वर्षी येते. कधी कधी दोन-तीन वर्षं अगोदर किंवा पाच-सात वर्षांनंतरही येऊ शकते.
२८ दिवसांच्या पाळीच्या सायकलमध्ये स्त्रियांच्या स्वभावामध्ये अल्प काळासाठी अनेक बदल (किंवा चढ-उतार) होतात. जेव्हा पाळी बंद होते, तेव्हा स्त्रीच्या स्वभावामध्ये व शरीरात अनेक बदल होतात. उदा.-
१) क्षणात उत्साही, क्षणात नैराश्य आल्यासारखं वाटणं.
२) भावनिक पातळीवर टोकाची भूमिका घेणं.
३) चिडचिड होणं, मानसिक ताण वाढणं.
४) हॉट फ्लैशस (शरीरातून गरम वाफा निघाल्यासारखं वाटणं), योनीच्या ठिकाणी शुष्कता येणं.
५) रात्री घाम येणं, डोकं दुःखणं, हात-पाय, सांधे दुखणं
६) मन/चित्त एकाग्र न करता येणं, भीती वाटणं
७) दुःखी होणं, अधीर होणं, निरुत्साहित वाटणं.
८) जोडीदार आपल्याला सोडून जाऊन दुसरं लग्न करेल का, याची भीती वाटणं.
९) एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. (Obsessive compulsive disorder सारखी लक्षणं).
१०) पाळीची अनियमियतता (जास्त रक्तस्त्राव, जास्त दिवस रक्तस्त्राव किंवा पंधरा दिवसांनी रक्तस्त्राव होणं).
वरील पैकी सर्वच लक्षणं एकाच स्त्रीमध्ये दिसतील असं नाही. यापैकी अनेक लक्षणं असतील तर त्याला आम्ही वैद्यकीय भाषेत ‘पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम’ असं म्हणतो. पाळी सुरू झाल्यावर भावनिक पातळीवर बदल होतात, हे आपल्याला माहीत असतं. त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचे बदल रजोनिवृतीनंतर होतात. गृहिणी असो किंवा नोकरी करणारी महिला असो, ही लक्षणं विविध स्वरूपात व्यक्त होतात. मात्र याची माहिती आपल्या समाजातील अनेक शिक्षित महिलांनासुद्धा नसते. त्यामुळे अनेक महिला काहीतरी समज किंवा गैरसमज करून घेतात.
खरं तर यात घाबरण्यासारखं काही नाही. ज्या स्त्रीमध्ये ‘पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम’ची लक्षणं असतील त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की, तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही. तुमच्या शरीरात जे काही बदल होत आहेत ते भावनिक आहेत. रजोनिवृतीबद्दल समुपदेशन (कॉउंसलिंग) होणं गरजेचं आहे. गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्रीरोग तज्ज्ञ)ला दाखवल्यास ते गरजेनुसार हार्मोनल थेरपी करतात. लक्षणांमध्ये तीव्रता जास्त असेल आणि रोजच्या जीवनात काही व्यत्यय येत असेल तर मानसरोग तज्ज्ञाकडे पाठवलं जातं. लक्षणांच्या तीव्रतेनुसार मानसरोग तज्ज्ञ औषधं देतात. तीव्र स्वरूपाची लक्षणं असून उपचार न घेतल्यास पुढील आयुष्यभरासाठी मानसिक आजाराप्रमाणे लक्षणं राहू शकतात. त्यामुळे योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. रजोनिवृतीनंतर ऑस्टियोपोरोसीस (हाडाचा ठिसूळपणा) आदी बदल होऊ शकतात. या बरोबर अनेक आजारही होतात. त्या आजाराविषयी सविस्तर माहिती घ्यायला हवी.
आपल्या समाजातील अनेक स्त्रिया शिळं अन्न खातात किंवा घरातील पुरुष व मुलं जेवल्यानंतर जेवतात. त्यामुळे रक्तशय (अॅनिमिया) होऊ शकतो. पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोममधील मानसिक लक्षणं व अॅनिमियासारखे आजार, यांमुळे त्या स्त्रीच्या जीवनास धोका निर्माण होऊ शकतो.
या सर्वांत महत्त्वपूर्ण असतं स्त्रीनं आपलं शरीर समजून घेणं. अशा वेळी योगा किंवा आध्यात्मिक कामात (स्पिरिचुअल हेल्थ) लक्ष गुंतवलं पाहिजे. ‘जिथं साधु-बाबा, तिथं बाई’ ही म्हण खरी करण्यास ‘रजोनिवृती’ वयोगटातील महिला (योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे) जास्त कारणीभूत असतात असं मला वाटतं. पण अशा ढोंगी बाबा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण असल्या मानसिक लक्षणांचा गैरफायदा हे ढोंगी बाबा घेतात. आपल्या देशात स्त्रीचं आरोग्य नेहमीच दुर्लक्षित राहिलं आहे. त्यामुळे ‘रजोनिवृती दिना’निमित्तानं ‘रजोनिवृती’ या संकल्पनेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.
.............................................................................................................................................
pratapvimalkeshav@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment