अजूनकाही
हा मराठवाड्यातील एका खेडेगावातील प्रेमकथा सांगणारा सिनेमा आहे. मराठवाड्यातील बोलीभाषा, तिथल्या माणसांची जीवनशैली, परस्परातले व्यवहार आणि नातेसंबंध या सिनेमातून मांडले आहेत.
नायक राहुल (विजय गिते)ला सिनेमाचं वेड असतं. त्याचं सिनेमात काम करायचं स्वप्न असतं. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तो गावातल्या मित्रासमोर आपली कला सादर करतो. पारावर उभा राहून गावकऱ्यांसमोर वेगवेगळ्या नायकाची नक्कल करून दाखवत असतो. त्याचे वडील (किशोर कदम) आणि आई (छाया कदम) लोहाराचं काम करत असतात. राहुलच्या खोडकर स्वभावामुळे लोक त्यांच्याकडे सतत तक्रार करत असतात. तेवढ्यात नायिका सुमनचा (मधुरा वैद्य) प्रवेश होतो. राहुल तिच्या प्रेमात पडतो. आणि मग हळूहळू तिचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो.
या प्रेमकथेला पुढे घेऊन जाताना दिग्दर्शकाने अनेक प्रयोग केले आहेत. पहिल्या अर्ध्या तासात सिनेमा पकड निर्माण करतो. मात्र पुढे पुढे ती सैल होत जाते. दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांच्या अभ्यासाच्या मर्यादा सिनेमावर आणि पटकथेवर पडल्या आहेत.
‘रॉम-कॉम’ हे नाव सिनेमाचा गाभा अधोरेखित करणारं आहे. ‘रॉम’ म्हणजे ‘रोमँटिक’ आणि ‘कॉम’ म्हणजे ‘कॉमेडी’! पटकथा या नावाला साजेशी आहे. त्यात रोमँटिकपणा आहे, कॉमेडीही आहे. मात्र त्याची पकड शेवटपर्यंत टिकून राहत नाही.
ग्रामीण भागाचं चित्रण उभं करताना दिग्दर्शकानं त्यातल्या गमतीजमती उत्तम प्रकारे दाखवल्या आहेत. एका दृश्यात दोन बायका भांडत असतात. एकमेकींना शिव्या देताना दोघीही एकमेकींच्या नवऱ्यांची लफडी उकरून काढतात. त्या वेळी त्यांच्या नवऱ्यांची होणारी अवस्था दिग्दर्शकानं उत्तम प्रकारे दाखवली आहे. अशा विनोदी संवादाचा मोठा भाग सिनेमात येतो. मात्र कथा जेव्हा गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाते, तेव्हा त्यातल्या कल्पनाविलासचा गडदपणा आणि संवादाची पुनरावृत्ती अप्रस्तुत वाटते.
नायक तालुक्यात एका दुचाकी दुरुस्तीच्या दुकानावर काम करतो आणि नायिका दररोज त्याच्या दुकानासमोरून जाते, असं एक दृश्य सिनेमात आहे. नायक हातात एक फलक घेऊन नायिकेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. फलकावर लिहिलेलं वाक्य वाचून नायिका हसत पुढे निघून जाते. पार्श्वभूमीला कसलं तरी संगीत वाजतं, हे दृश्य जवळपास आठ वेळेस सिनेमात दिसतं. अशा दृश्याचा भडिमार उत्तरार्धात वाढत जातो.
एका ठिकाणी नायक नायिकेला भेटायला तालुक्याला येतो. येण्यापूर्वी त्याला नायिका काय करते? कुठे राहते? याची माहिती नसते. नायिकेच्या घराचा पत्ताही माहीत नसतो. मात्र त्याला अचानक ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यासारखं तिची सगळी माहिती मिळते. या दृश्याची कुठलीही पार्श्वभूमी न दाखवल्यामुळे आपल्याला ते अंदाज लावून समजून घ्यावं लागतं. असा विरोधाभास अनेकदा दिसतो.
विजय गिते आणि मधुरा वैद्य यांचा हा पहिला सिनेमा, तरी अभिनयाचं आव्हान पेलण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे. किशोर कदम आणि छाया कदम यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. काही नवखे कलाकारदेखील या सिनेमात आहेत. त्यांनीदेखील साजेसा अभिनय केला आहे. सिनेमाचं संगीत, संवाद, कॅमेरा आणि दिग्दर्शनाचा प्रयत्न चांगला म्हणावा असा आहे.
दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांचा हा थोडा विनोदी पण अतिरोमँटिक सिनेमा आहे. एकदा दुचाकी दुरुस्तीच्या दुकानाच्या मालकाला नायक म्हणतो, ‘हमारा दिल आपके पास और आपका दिल फकीर के पास!’ सिनेमा पाहिल्यावर आपली अवस्थाही यापेक्षा वेगळी राहत नाही!
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment