वाढता असुसंस्कृतपणा... 
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 19 October 2019
  • पडघम राज्यकारण शरद पवार रावसाहेब दानवे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना उद्धव ठाकरे

हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल हाकेच्या अंतरावर आलेला असेल आणि त्याबद्दल मुद्रित तसंच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून निकालाची भाकितं व्यक्त झालेली असतील, तेव्हा त्या तपशीलात जाण्यात काहीच हशील नाही. मात्र माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची पत्रकार परिषद पाहताना त्यांचा सुसंस्कृतपणा पुन्हा अनुभवयाला मिळाला आणि कवी आरती प्रभू यांच्या दोन ओळी, तसंच त्या ओळींचं विडंबन मनात घोळू लागलं. मूळ ओळी अशा-

जीभ झडली तरी जे गात असतात शब्द शब्द शाबूत ठेवून

त्यांना मरण म्हणजे एक अफवा वाटत असते

आरती प्रभू यांची क्षमा मागून विडंबन असं-

जीभ घसरली तरी जे राजकारण करत असतात कोडगेपणानं

त्यांना सुसंस्कृतपणा ही एक अफवा वाटत असते

अलीकडच्या काळात प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात जी काही भाषा घसरतच चालली आहे, ती बघता काही वर्षांनी निवडणुकात सुसंस्कृतपणा कायमचा गाडून ‘भ’काराची भाषा उजागर झाली तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, एसेम जोशी, श्री.अ. डांगे, आचार्य अत्रे, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, ग.प्र. प्रधान, मारोतराव कन्नमवार, शेषराव वानखेडे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर अशा कित्ती तरी सुसंस्कृत नेत्यांची परंपरा आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात जबरदस्त मोहीम उघडलेली होती तरी, या दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी आणि त्या कटू वातावरणातही ते दोघे परस्परांना न चुकता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा सुसंस्कृतपणा दाखवत असत. निवडणुकीच्या प्रचारात वापरली जाणारी भाषा, ती परंपरा अस्ताला जात असल्याची जाणीव करून देणारी आणि विषण्ण करणारी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या नेत्यांचीही प्रचारात जीभ घसरते हे या अधोगतीचे निदर्शक आहे.

सगळ्या गोष्टींकडे राजकीय रंगाच्याच चष्म्यातून बघण्याची/वाद घालण्याची/प्रतिवाद करण्याची घातक प्रथा रूढ होतीये. समाजाच्या सर्वच क्षेत्रात झुंडशाही फोफावताना दिसते आहे. बलात्कार झालेली स्त्री आपल्या जातीची नाही याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडण्याची अभद्र मानसिकता अनुभवायला मिळू लागली आहे. आपण सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील म्हणून दिवसेंदिवस अधिक समंजस होतोय, हा भ्रम असून एका विचित्र अराजकाकडे आपली वाटचाल सुरू आहे का, अशी निराशा दाटून यावी, असं हे राजकीय आणि सामाजिक वातावरण आहे. अशा वेळी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांनी अत्यंत जबादारीनं वागावं, अशी रास्त अपेक्षा असते. महाराष्ट्रात (तसं तर देशातही!) ते घडत नाहीये. असुसंस्कृत, असभ्य आणि बेताल वागण्याची कुरूप अहमहमिका बहुसंख्य राजकारण्यांना लागलेली आहे.

आपल्या अशा बेताल वागण्याचं समर्थन करताना समोरचा पूर्वी कसा असंस्कृत/रासवट वागला होता याचे असमर्थनीय दाखले दिले जाताहेत. महाराष्ट्रात बहुसंख्य राजकीय नेते ज्या पध्दतीनं सध्या बरळत आहेत आणि त्या वागण्याचं समर्थन (ते, त्यांचे समर्थक आणि अंधभक्त पत्रकारांकडून) केलं जात आहे, ते उद्वेगजनक आणि चिंताजनकही आहे. काही सर्वपक्षीय नेत्यांचा जन्मच असंस्कृतपणे वागण्यासाठी, वाचाळवीरपणा आणि कर्कश्श एकारलेपणा करण्यासाठी झालेला आहे, अशी स्थिती एकंदरीत आहे.   

एक आठवण सांगतो, १९९५साली युती सरकार येण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यावर एकामागोमाग एक जबरदस्त राजकीय आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या दरम्यान किनवटजवळ त्यांच्या यात्रेवर एक हल्ला -आता नीट आठवत नाही, पण बहुधा गोळीबार- झाला होता. त्यावेळी, ‘हा हल्ला शरद पवार यांनी घडवून आणला असेल काय?’ असं प्रश्न पत्रकारांनी मुंडेंना विचारलं.

या प्रश्नाच्या होकारार्थी उत्तराने तेव्हाच्या वातावरणात गोपीनाथ मुंडे यांना कदाचित राजकीय लाभ झाला असता, पण मुंडे म्हणाले, ‘राजकीय विरोधकावर असले हिंसक हल्ले करण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या हल्ल्यात पवारांचा किंवा काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही.’ मुंडेंची ही प्रगल्भता हे कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काळी असलेल्या मतभेदांपार राजकीय सौहार्दाचं शेवटचं उदाहरण असेल. त्यानंतर असं चित्र कधीही दिसलेलं नाहीये.

महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीचे देशभर गोडवे गाणारे शरद पवार प्रचारात नाच्याचे हातवारे करतात, बांगड्या, कुंकू, कुस्ती आणतात आणि त्याचं भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतात हा कोणता सुसंस्कृतपणा? देशातील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकेकाळी सुसंस्कृतपणाचा आदर्श समजले जात. शरद पवार यांचं राज्य आणि देशातल्या राजकारणातलं योगदान मोठं आहे. तेही अलीकडच्या काही वर्षांत ‘या’ भाषेच्या आहारी गेले आहेत, हे आश्चर्यकारक समजायचं का वैफल्याचं लक्षण?

कन्नडचे मावळते आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जी भाषा उच्चारली, ती इतक्या खालच्या पातळीवरची आहे की विचारता सोय नाही. हा माणूस रायभान जाधव यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा मुलगा आहे, यावर विश्वास बसू नये अशी ही भाषा आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री, भाजप म्हणजे संस्कारी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे हर्षवर्धन हे जावई आहेत आणि जावयानं गटार ओकली तरी सासरे गप्प आहेत. यावरून रावसाहेब दानवे यांच्यावरचे संस्कार कसे बेगडी आहेत हे स्पष्ट होतं. अर्थात ‘५० करोड की गर्लफ्रेंड’ अशी टवाळी करणारे नरेंद्र मोदी ज्यांचे नेते आहेत, त्या दानवे यांच्याकडून जावयाची कानउघाडणी करण्याची अपेक्षा बाळगताच येणार नाही म्हणा! हर्षवर्धन यांचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचं मला ठाऊक आहे असं सेनेचे एक नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, सेनेने हर्षवर्धन यांना उमेदवारी दिली तेव्हा खैरे यांनी ही बाब पक्षाच्या लक्षात का आणून दिली नाही?

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची घुसमट झालेली आहे. राज्यातली सामाजिक आणि राजकीय स्थिती जास्त चिघळली आहे. समाजात धर्म आणि जात-पोटजात-उपजात अशी दरी निर्माण करण्याचे उद्योग सर्वपक्षीय राजकारण्यांकडून सुरू असतानाच त्यात आता असुसंस्कृतपणाचा कळस गाठण्याची भर पडली आहे.

हा महाराष्ट्र कधी समतेचा विचार मांडत होता, सामाजिक सौख्याचा आग्रह धरत होता, या राज्याचे नेते कधी काळी सुसंस्कृत होते यावर विश्वास न बसण्यासारखी आणि त्यामुळे कोणीही संवेदनशील माणूस भयकंपित व्हावा, अशी ही स्थिती आहे. कथित स्वयंघोषित उजवा असो की डावा, स्वयंघोषित पुरोगामी असो की प्रतिगामी, कुणीही सुसंस्कृतपणे आणि विवेकानं वागायला तयार नाही. सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर असलेलं सध्याचं वातावरण सामाजिक समता, सलोख्यासाठी मुळीच हिताचं नाही, याचं भान राजकारण्यांनी कोणत्याही परिस्थितीत विसरता कामा नये. त्यातून संवेदनशील माणसाच्या मनात ‘भय इथले संपत नाही’ ही भावना निर्माण न होऊ देण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाचीच आहे.

थोडसं विषयांतर होईल, पण सध्या शरद पवार यांच्या माणुसकी आणि औदार्याच्या आरत्या गाण्याची स्पर्धा समाज माध्यमात त्यांच्या भक्तांकडून सुरू आहे. पण अशी कामगिरी बजावणारे शरद पवार एकटेच नाहीत हे लक्षात घ्या.  इथं एक नमूद केलं पाहिजे माणुसकी दाखवणारे आणि आर्थिकही सहाय्याचं कर्तव्य बिनबोभाट बजावणारे शरद पवार यांच्यासह किमान पन्नास राजकीय नेते मला माहिती आहेत आणि त्यांनी केलेलं सहाय्य किस्से नाहीत तर हकिकती आहेत, हे लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, दिवाकर रावते, सुधाकरराव नाईक, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे, अजित पवार, आर. आर. पाटील, नारायण राणे, दत्ता मेघे, अब्दुल रहेमान अंतुले ही सहज आठवली ती नावं इथं दिली. नितीन गडकरी यांनी तर केवळ नागपूर शहर आणि जिल्ह्यात एक लाखावर लोकांना अशी मदत केल्याचं मला ठाऊक आहे.

पण एकदा आरत्या ओवाळण्याचा अंध भक्तीभाव आला की वास्तवाचं भान सुटतं. हे काही एकट्या शरद पवार यांच्याच बाबतीत घडतं असं नाही, तर राजकारण प्रशासन आणि बहुसंख्य पत्रकारांबाबत अशीच परिस्थिती आहे. कुणा एकाच्या आरत्या ओवाळण्यात पत्रकारही एकारलेपणानं सहभागी होतात याचा अर्थ त्यांच्यातलं वास्तवाचं भान सुटलं आहे आणि विवेक विझला आहे, ते आता भाट झाले आहेत.

असुसंस्कृत राजकारणी, भ्रष्ट व असंवेदनशील प्रशासन आणि भाट झालेले पत्रकार, हे काही समाज निरोगी असल्याचं लक्षण नाही. 

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......