‘विरोधी पक्ष’ कसा काय निवडायचा बुवा?
पडघम - राज्यकारण
संजय पवार
  • राज ठाकरे. रेखाचित्र - संजय पवार
  • Fri , 18 October 2019
  • पडघम राज्यकारण राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS शिवसेना Shivsena भाजप BJP काँग्रेस Congress

महाराष्टू नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व व व्यक्तित्व आहे. शिवसेनेत घरातूनच कोंडी झाल्यावर ‘विठ्ठल व बडवे’ अशी प्रतिमा वापरत सेनेतून बाहेर पडणे असो की, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना, त्याचा ध्वज, निवडणूक चिन्ह, याबाबतचे त्यांचे विचार सुस्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे एक आकर्षण, औत्सुक्य आणि विश्वास निर्माण झाला. त्याचा परिणाम २००९च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दिसला.

त्यानंतर नाशिक महापालिकेत सत्ताधारी होत; पुणे, मुंबई महापालिकेतही लक्षणीय उपस्थिती लावली.

मात्र त्यानंतर टोल, स्थानिकांना प्राधान्य, मराठी पाट्या, मराठी उदघोषणा, पोलिसांवर हल्ला करणारे मुस्लीम संघटक, रस्त्यावरचे खड्डे, कंत्राटातले कमिशन अशा अनेक विषयांना त्यांनी आंदोलने करून तोंड फोडले. त्यामुळे काही निर्णय झाले, काही प्रलंबित राहिले. राज ठाकरेंवर आंदोलने अर्धवट सोडल्याचा ठपका अनेक लोक व माध्यमेही करतात. पण केलेल्या किंवा झालेल्या कामाची विलोभनीय आकडेवारी, तितक्याच विस्मयकारी खर्चातून जाहीर करत राहण्याची युक्ती जी भाजप करते, ते अन्य कुठलाच पक्ष करू शकत नाही, ज्यात मनसेही येते.

राज ठाकरेंना आंदोलने अर्धवट सोडली म्हणणारे काही गोष्टी विसरतात. राज ठाकरेंना सध्याच्या काळात सतत मोर्चे वगैरे काढण्यापेक्षा, शिष्टमंडळासह संबंधित उच्चाधिकाऱ्यांना (यात राज्यपाल, मुख्यमंत्री, आयुक्तही आले) भेटून निवेदन देणे, यावर त्यांनी भर दिला. एकदा निवेदन दिल्यावर पुढील कारवाईची वाट पहावी लागते. राज ठाकरे यांनी दुसरा मार्ग निवडला तो न्यायालयाचा. टोल संदर्भात काही याचिका प्रलंबित आहेत. एकदा प्रश्न न्यायालयात गेला की, त्यावर वाट पाहणे हाच सनदशीर मार्ग राहतो. राज ठाकरेंची चूक झालीच असेल तर ही की, ते सातत्याने प्रसिद्धीमाध्यमात चर्चेत राहिले नाहीत. पुन्हा पुन्हा आंदोलने, इशारे, देत राहिले नाहीत (आठवा मराठा, धनगर आरक्षण आणि शेतकऱ्यांची सततची विविध आंदोलने) त्यामुळे राज ठाकरे आंदोलने अर्धवट सोडतात, कदाचित तोडपाणी करतात, अशा गोष्टी पसरल्या वा पसरवल्या गेल्या.

यानंतर त्यांचे टीकाकार टीका करतात ते त्यांच्या संघटनाबांधणी बद्दल आणि नेतॄत्वाची दूसरी फळी उभी न केल्याबद्दल. किंवा त्यांच्या कमी संपर्काबाबत, मुंबई, पुणे, नाशिकच्या पलीकडे गेले नाही याबाबत.

या सर्व आक्षेपाबाबत चालू विधानसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरे उत्तरे देताहेत ते आपण ऐकतो, पाहतोय.

२०१४च्या निवडणूकीपासूनच मनसेची घसरण दृश्य स्वरूपात दिसू लागली. एकच आमदार निवडून आला तर पुणे, मुंबई महापालिकेतील प्रतिनिधीत्व कमी झाले, नाशिकमधून सत्ता गेलीच पण माजी आमदार, नगरसेवक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. इतर पक्षात जसे नाराजांना कुरवाळण्याचे, समजावण्याचे प्रयत्न केले जातात वा रोखून धरले जातात, तसे राज ठाकरेंनी वा मनसेने केले नाही. कारण राज ठाकरेंचा सिद्धान्त आहे की, माणूस पक्ष सोडतो तो एका रात्रीत सोडत नाही. त्याचा विचार पूर्वीच झालेला असतो. अशांना थोपवण्यात काही अर्थ नसतो. साहजिकच राज ठाकरेंच्या मनसेला गळती लागली तरी राज ठाकरे ना विचलित झाले, ना त्यांनी आकांडतांडव केले किंवा पूर्वीच्या शिवसेनेसारखे राडे केले नाहीत.

राज ठाकरेंची आणखी एक प्रतिमा आहे, ती थोडी लोकप्रिय नेतॄत्वाच्या स्वभाववैशिष्ट्यांच्या विरोधी आहे. सभा सुरू होत असताना तुतारी, हाळी, घोषणा, ही शिवसेना व बाळासाहेब ठाकरेंनी प्रस्थापित केलेली रीत. तीच पुढे सेनेत व मनसेतही चालू राहिली. सुरुवाती सुरुवातीला राज ठाकरे हे शांतपणे पहात विराम घ्यायचे. पण नंतर नंतर ते अशा प्रकारांवर वैतागून डाफरू लागले. ‘ए बंद कर’, ‘ए गप्प बस...’, ‘तो झेंडा खाली ठेव’ असे जरा खेसकूनच ते म्हणतात. राजकारणात, त्यातही जाहीर सभात अशी शिस्त उपयोगाची नसते. मास सायकॉलॉजीचा विचार संयमाने नेत्याला करावा लागतो. काँग्रेस किंवा आजच्या भाजपच्या सभा पहा. व्यासपीठावरची गर्दी, घुसखोरी, भाषणांची हौस वा मानपान. शिवाय फेटे बांधाबांध, तलवारी भेट, १० किलोचे हार वगैरे उपचार शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेताही विनातक्रार प्रसंगी सावळ्यागोंधळासह स्वीकारतो.

अलिकडे ही लवचीकता उद्धव ठाकरेही दाखवतात. पण राज ठाकरे मात्र स्वत:ला या अशा ‘मॉब’पासून तोडून घेतात. हे अशा प्रकारचे सार्वजनिक व पक्षांतर्गत अंतर राखून राहण्याचा परिणाम मनसेच्या वाढीवर झाला. कार्यकर्ते तुटत जाणे वा इतर पक्ष संघटनात जाणे सुरू झाले. मनसैनिकांना कार्यक्रम दिला नाही, हा आरोप खोडून काढताना राज ठाकरे पुन्हा आंदोलनांची यादी देतात वा स्थानिक पातळीवर कार्यकर्ते काम करत असतात असे सांगतात. पण हे दोन्ही प्रकार ‘कार्यक्रम’ सदरात मोडत नाहीत. कार्यक्रम देण्यासाठी नेतॄत्व, पक्ष नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यात सतत संवाद लागतो. मनसेत हा संवाद दिसत नाही. असलाच तर पुन्हा तो ‘विठ्ठल-बडवे’ पद्धतीचाच आहे, असे कार्यकर्ते सांगतात.

संवादाचा अभाव हे जसे एक कारण मनसेच्या उतरणीस सांगता येते, तसेच राज ठाकरे यांच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका!

सुरुवातीला मोदींची भरपूर स्तुती, नंतर लोकसभेला स्वत:चे उमेदवार युतीविरोधात रिंगणात उतरवूनही पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा असा उफराटा खेळ सामान्य मनसैनिकाच्या आकलनापलीकडे तर सर्वसामान्य मतदारांसाठी राज ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला.

लोकसभेच्या त्या पराभवानंतर त्यांनी जेमतेम अर्ध्यातासाची सभा मुंबईत घेतली. त्यासाठी आठ दिवस आधी मोठमोठी होर्डिंग्ज लावून मला तुमच्याशी बोलायचय टाईप्स संदेश! सभेत जाहीर केलं, येत्या विधानसभेला मी स्वत: उभा राहणार! अपेक्षित प्रतिसाद व प्रसिद्धी मिळाली. मनसैनिकांत उत्साह संचारला. पण पुढच्या पंधरा दिवसातच कुणी ठाकरे निवडणूक लढवत नाही म्हणत माघार!

२०१९ची लोकसभा लढवली नाही, पण मोदी सरकार विरोधात धडाकेबाज डिजीटल प्रचार करून देशभराच्या माध्यमात व राज्याराज्यात राज ठाकरे पोहचले. मात्र मोदी व भाजपाच्या विजयानंतर अनाकलनीय म्हणत ते व पक्ष विजनवासातच गेले. नंतर ईव्हीएमवर त्यांनी देशभर राजकीय पक्षात मतैक्य निर्माण करायचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार, हे त्यांचे म्हणणे कुठल्याच राजकीय पक्षाला पटले नाही. या सर्व घडामोडीत पक्ष विधानसभा लढवणार का नाही अशी स्थिती होती. सर्व राजकीय पक्ष उमेदवार फायनल करत होते तोवरदेखील यांचे ठरत नव्हते. ते जवळपास अखेरच्या क्षणी ठरले व १०४ उमेदवार जाहीर झाले. सभा सुरू झाल्या व राज ठाकरे गर्जले मला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या!

कार्यकर्ते व जनता पुन्हा गोंधळात! मला सत्ता द्या असं कालपर्यंत म्हणणारा नेता आता विरोधी पक्ष बनवा म्हणतो हा काय प्रकार?

आता गंमत अशी आहे की, आपल्याकडे सत्ता कुणाहाती असावी यासाठी मतदान होते, विरोधी पक्षासाठी नाही! सत्ताधारी बनण्यासाठी स्पष्ट बहुमतासाठी महाराष्ट्र विधानसभेत १४४ आमदार निवडून यावे लागतात. अन्यथा सर्वाधिक आमदार ज्या पक्षाचे तो मित्रपक्षासह सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. मित्रपक्ष धरूनही स्पष्ट बहुमतापर्यंत पोहचता आले नाही, तर मतदानोत्तर युती/आघाडी करून इतर विरोधी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करता येते.

थोडक्यात मतदान अथवा मतदानोत्तर जे राजकारण होते, ते सत्ता स्थापनेसाठी.सत्तास्थापने एवढे आमदार नसतील आणि सत्तेसाठी कुणालाही पाठींबा न देऊ इच्छिणारे पक्ष हे आपोआपच विरोधी पक्ष म्हणून संबोधले जातात. त्यातही ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळते.

हा सर्व संसदीय व्यवहार पहाता विरोधी पक्ष अथवा पक्षनेता हे सत्ता समीकरण काय व कसे बनते यावर अवलंबून असते.

आता राज ठाकरे जेव्हा म्हणतात ‘मला विरोधी पक्ष म्हणून संधी द्या’, तेव्हा दुसरीकडून ते लोकांना सत्ताधारी निवडण्याचे स्वातंत्र्यही देतात.

अशा वेळी प्रश्न पडतो की, या पद्धतीने २८८ आमदारात जर भाजप-सेना व मित्रपक्ष यांना २२०+ जागा मिळाल्या तर उरतात ६८ जागा. त्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीने व मित्रपक्षांनी ५० (विसर्जित विधानसभेत त्यांच्या एकत्रित जागा यापेक्षा अधिक होत्या, हे लक्षात घेता.) जागा मिळवल्या तर मनसेला किती जागा उरतील?

मग नियमाने आघाडी विरोधी पक्ष व विरोधी नेता बनेल.

त्या वेळी राज ठाकरेंची भूमिका काय असेल? ते म्हणतील का तुम्ही मला विरोधी नेता बनवला नाही?

आणखी एक मुद्दा उरतोच. १३ आमदारांसह मनसेला विरोधी पक्षाचे कामच करायला पाठवले होते.

तो इतिहास काय सांगतो?

त्यामुळे ‘विरोधी पक्ष बनवा’ म्हणजे नेमके काय करायचे बुवा?

...............................................................................................................................................................

‘हमरस्ता नाकारताना’ या बहुचर्चित पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5071/Hamrasta-Nakartana

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......