सर सय्यद अहमद खान : मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कधी भीक मागून तर, कधी छायाचित्रं विकून निधी जमवणारा अवलिया!
पडघम - देशकारण
सरफराज अहमद
  • सर सय्यद अहमद खान आणि अलिगढ मुस्लीम विद्यापीठ
  • Thu , 17 October 2019
  • पडघम देशकारण सर सय्यद अहमद खान Sir Syed Ahmad Khan अलिगढ मुस्लीम विद्यापीठ Aligarh Muslim University

अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांची आज २०२वी जयंती. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर इंग्रजी सत्तेने मुस्लीम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लीम समाजाला बाजूला सारले. मुस्लीम समाजाची मदरसा शिक्षण प्रणाली मोडीत काढली. व्यापार-व्यवसायावर निर्बंध लादून राजकीय भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांच्या दुर्बलीकरणाच्या ऐतिहासिक पद्धतीची मुहूर्तमेढ रोवली. अनेक मौलवींना फासावर टांगले. मुस्लीम विद्वानांच्या कत्तली घडवून आणल्या. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय दमनाचे प्रयत्न चहुबाजूने सुरू होते. या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या अभ्युदयासाठी मोहम्मदन कॉलेजची स्थापना केली. १८७५ मध्ये स्थापन झालेल्या या कॉलेजचे नंतर अलिगढ विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. कालांतराने विद्यापीठातून अलिगढ चळवळ उदयास आली. त्यातून जन्मलेला विचारप्रवाह आजही मुस्लीम समाजाला दिशा देण्याचे काम करतो. हा विचारप्रवाह समृद्ध व्हावा म्हणून सर सय्यद यांनी खूप खस्ता खाल्ल्या. अवहेलना सहन केली. हाल-अपेष्टा सोसल्या. मोहम्मदन कॉलेज उभे करण्यासाठी सर सय्यद यांनी अक्षरशः भीक मागितली.

मुस्लीम समाजाच्या विरोधात घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे इंग्रजांविषयी समाजात पराकोटीची द्वेषभावना होती. मदरसा शिक्षणप्रणालीवरील आघातामुळे मुस्लीम समाजात इंग्रजीविषयीही रोष होता. इंग्रज आपली भाषा आणि संस्कृती मोडीत काढत आहेत, असे त्यांना वाटत होते. अशा विरोधी परिस्थितीत सर सय्यद यांनी वास्तवाचे भान घेऊन इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा विचार मांडला. त्यामुळे सर सय्यद यांना विरोध होणे स्वाभाविक होते. मुस्लिमांना सर सय्यद इंग्रजीच्या व इंग्रजांच्या समर्थनात आहेत, असे वाटे. त्यामुळे ते त्यांच्याविरोधात गेले. अनेक वर्तमानपत्रात सर सय्यद यांच्याविरोधात लेख प्रकाशित झाले. काहींनी तर फतवेही आणले. पण सर सय्यद या साऱ्यांना बधले नाहीत.

प्रख्यात विद्वान मौलाना अल्ताफ हुसैन हाली हे सर सय्यद यांचे मित्र होते. त्यांनी सर सय्यद यांचे पहिले चरित्र लिहिले आहे. ‘हयात-ए-जाविद’ या नावाने ते विख्यात आहे. त्यामध्ये सर सय्यद यांनी कशा पद्धतीने निधी जमवला त्याची माहिती दिली आहे. सर सय्यद यांनी सुरुवातीला बनारसमधील आपल्या काही हिंदू आणि मुस्लीम मित्रांकडे मदत मागितली. सर सय्यद हे बनारसमध्ये इंग्रजांच्या सेवेत कार्यरत होते. मोहम्मदन कॉलेजच्या स्थापनेनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. बनारसमधून मिळालेल्या रकमेतून महाविद्यालयाची उभारणी अशक्य होती. मग अलिगढ, लाहोर, पटियाला, पटना, मिर्झापूर, हैदराबाद अशा अनेक शहरांत देणग्या गोळा करण्यासाठी फिरायला लागले. अख्ख्या भारतभर सर सय्यद यांनी पायपीट केली.

बक्षीस योजनेतून वीस हजार रुपये जमवले      

नवाब अमुजान हे सर सय्यद यांचे जवळचे नातवाईक होते. एकदा सर सय्यद यांनी त्यांना मुस्लीम समाजातून शिक्षणसंस्थेसाठी दहा लाखांचा निधी जमवता येईल का, असा प्रश्न केला. त्या वेळी अमुजान यांनी दहा लाख पैसेही जमवणे शक्य नसल्याचे सांगून सर सय्यद यांचा विचार मोडीत काढला होता. कालांतराने मोहम्मदन कॉलेज उभे राहिले. मौलाना हाली हा प्रसंग नोंदवून लिहितात, ‘‘असे अनुभव आल्यानंतरही सर सय्यद थांबले नाहीत. अवघ्या वीस वर्षांच्या काळात महाविद्यालयाची सात–आठ लाख रुपयांची इमारत उभी राहिली. आणि महाविद्यालयाचे वार्षिक निधी संकलन ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.’’

सर सय्यद यांनी मोहम्मदन कॉलेजसाठी निधी जमवताना प्रचंड खस्ता खाल्या. स्वतःची आणि कुटुंबांची सर्व संपत्ती महाविद्यालयाला दिली. सुरुवातीच्या काळात सर सय्यद यांनी महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध होईना, तेव्हा एक बक्षीस योजना जाहीर केली. अनेक वस्तू बक्षिसाच्या रूपात ठेवल्या. मुस्लीम समाजातून ही बक्षीस योजना जुगारासारखी असल्याची टीका झाली. धार्मिक दृष्टीने हे ‘हराम’ (निषिद्ध) कार्य असल्याचे म्हटले गेले. मात्र सर सय्यद यांचा विचार बदलला नाही. त्यातून संस्थेला तब्बल २० हजार रुपयांचा नफा झाला. तो सर सय्यद यांनी महाविद्यालयासाठी वापरला.

ओवाळणीच्या रकमा घेतल्या, स्वतःचे ग्रंथालयही विकले

पटियाला संस्थानचे वजीर खलिफा सय्यद मोहम्मद हसन खाँ यांना नातू झाल्याचे सर सय्यद यांना समजले. त्यांनी वजीरसाहेबांना ओवाळणी म्हणून पाच रुपये मागितले. पण सर सय्यद ओवाळणी का मागत आहेत, याची वजीर साहेबांना कल्पना होती. वजीर साहेबांनी सर सय्यद यांच्या महाविद्यालयाला मोठी रक्कम निधी म्हणून दिली. महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली, त्यावेळी सर सय्यद यांनी स्वतःच्या ग्रंथालयातील ग्रंथ विकले. त्यातूनही गरज भागेना तेव्हा मित्रांच्या ग्रंथालयातील ग्रंथ निधी म्हणून घेऊन ते विकले. तर कधी गाण्याच्या कार्यक्रमात गजला गाउन पैसा मिळवला. तर कधी स्वतःच्या चित्रकलेचे वेड त्यांच्या कामी आले. चित्रे बनवून ती विकली. त्यातून त्यांनी पैसा उभा केला. सर सय्यद यांचा जन्म उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. त्यांचे अजोबा सर सय्यद यांची उर्दू बिघडू नये म्हणून त्यांना गल्लीतल्या मुलांमध्ये खेळायलाही पाठवत नसत. ते सर सय्यद महाविद्यालयासाठी स्वतःची पत, प्रतिष्ठा विसरुन पडेल ते काम करायला लागले. कधी बाजारात पुस्तकांचे दुकान लावत, तर कधी त्याच बाजारात झोळी पसरून भीक मागायला लागत. एकदा सर सय्यद  मदत मागायला येत असल्याचे पाहिल्यानंतर काही विरोधकांनी लघवीनंतर स्वच्छतेसाठी वापरलेल्या विटांचे तुकडे त्यांच्या झोळीत टाकले. सर सय्यद यांनी आनंदाने त्याचाही स्वीकार केला. पण आपली ध्येयनिष्ठा अढळ राखली.

हास्यकथा कथन

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात शहरामध्ये विनोदविरांच्या हास्यकथा कथनाचे कार्यक्रम व्हायचे. लोक त्यातून आनंद घ्यायचे. पण कथाकथनकाराकडे अतिशय तुच्छ नजरेने पाहायचे. त्यांना समाजात विदुषकांसारखे अत्यंत वाईट स्थान होते. पण त्यातून पैसा चांगला मिळायचा. सर सय्यद यांना मोहम्मदन महाविद्यलयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू करायची होती. त्याकरीता पैसा जमवण्यासाठी सर सय्यद यांनी हास्यकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. पण सर सय्यद यांच्या मित्रांनी समाजात अप्रतिष्ठा होईल म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सर सय्यद निर्णयावर ठाम होते. त्यांनी हास्यकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर सय्यद यांनी अत्यंत जोशपूर्वक भाषण केले. मौलाना हाली यांनी त्यातील काही अंश ‘हयात ए जावीद’ मध्ये दिला आहे.

सर सय्यद त्या भाषणात म्हणाले, ‘‘कौन है जो आज मुझको स्टेज पर देखकर हैरान होता होगा? वही जिनके दिल में कौम का दर्द नहीं. वही जिनका दिल झुठी शेखी और झुठी मशख्त (मोठेपणा) से भरा हुआ है । आह उस कौमपर जो शर्मनाक बातों को अपनी शेखी और इफ्तेखार (गर्व/अहंकार) का बाईस समझे और जो काम कौम और इन्सान की भलाई के लिए नेक नियती से किए जाएं उनको बेइज्जती के काम समझे। आह उस कौमपर जो लोगों को धोका देने के लिए मुकर व पिंदार (धोका आणि दुराभिमान) के काले सुत से बने हुए तखद्दुस के बुर्खे को अपने मुंह पर डाले हुए हो, मगर अपनी बदसुरती और दिल कि बुराई का कुछ इलाज न सोचें । आह उसपर जो अपनी कौम को जिल्लत और निकबत के समंदर में, डुबता हुआ देखे, और खुद किनारे पर बैठा हसता रहे अपने घर में खुले खजाने ऐसी बेशरमी और बेहयाई के काम करें जिनसे बेशरमी व बेहयाई भी शरमा जाए, लेकीन कौम के भलाई के काम को शरम और नफरे  का काम समझे। (लाजिरवाणे आणि हेटाळणीचे काम)

ऐ रईसों और दौलतमंदो । तुम अपनी दौलत व हिश्मत पर मगरुर होकर यह मत समझो की कौम की बुरी हालत हो और हमारे बच्चों के लिए सबकुछ है, यही उन लोगों का खयाल था जो तुमसे पहले थे । मगर अब इन्हीं के बच्चों की वह नौबत है, जिसके लिए हम आज स्टेज पर खडे हैं । ऐ, साहिबों । हर कोई तस्लीम करता है के, तालीम न होने से कौम का हाल रोज बरोज खराब होता जाता है । कौम के बच्चे इखराजात ए तालीम के सरअंजाम न होने से (शिक्षणाचा खर्च उचलण्याची ऐपत नसल्याने) जलील और रजील होते जाते हैं । (अपमानित होणे)  मैने कोई पहलू ऐसा नहीं छोडा जिससे कौम के गरीब बच्चों के इखराजात ए तालीम में मदत पहुंचे । मगर अफसोस कामयाबी नहीं हुई । खुद लोगों से भिख मांगी मगर कलील मिली । (कमी प्रमाणात मिळाले.) व्हॉलेंटर बनाने चाहे मगर बहोत कम बनें और जो  बने उनसे कुछ बन न आई । पस मैं स्टेज पर इसलिए आया हूं के कौम के बच्चों की तालीम के लिए कुछ कर सकूं ।’’

सर सय्यद यांच्या या भाषणावरून त्यांची भूमिका व त्याविषयीची तडफ दिसून येते. सर सय्यद अनेक संस्थानिकांकडेही निधीसाठी गेले होते. आपल्या अनेक मित्रांकरवी त्यांनी संस्थानिकांशी संपर्क केला. हैदराबादचे सहावे निजाम मीर महिबूब अली यांना सर सय्यद भेटायला गेले. पण मीर महिबूब अलींशी त्यांची भेट झाली नाही. तर प्रवासाचा खर्च निघावा म्हणून सर सय्यद यांनी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला. स्वतः नर्तकाच्या भूमिकेत स्टेजवर उभे राहिले. मोठ–मोठ्या श्रीमंत व्यक्तींनाही त्यांनी निधीसाठी साद घातली. निधीसाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने मुस्लीम समाजाने त्यांच्या या कार्याची दखल त्यांच्या हयातीत आणि मृत्युनंतरही म्हणावी तशी घेतली नाही.       

.............................................................................................................................................

लेखक सरफराज अहमद हे टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आणि गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूरचे सदस्य आहेत.

sarfraj.ars@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 20 October 2019

सरफराज अहमद,

सय्यद अहमद खान यांच्या वैयक्तिक कार्याबद्दल आदर आहे. मात्र ते द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक आहेत, हे माझ्यासारखा हिंदू ठामपणे लक्षात ठेवणार. ते स्वत:स मुस्लिम अभिजन म्हणवून घेतात. ते नावापुरते का होईना राज्यकर्त्या वर्गातले असतीलही. मात्र 'आम्ही राज्यकर्ते होतो' हा दावा सामान्य मुस्लिमाच्या गळी उतरवून नंतर भारताची फाळणी करवण्यात आली. एक हिंदू म्हणून हे मी कदापि विसरणार नाही. सय्यद अहमद खान यांना भारताची फाळणी अभिप्रेत होती का? त्यांनी स्थापन केलेल्या अलिगड येथल्या शिक्षणसंस्थेतल्या विद्वानांनी फाळणीस हातभार लावलाय, हे खरंय. यावर अधिक विचारमंथन व्हायला हवं. मी सुरुवात करून देतो.
फाळणीच्या वेळेस निरपराध हिंदूंच्या कत्तली केल्या गेल्या. त्याच्या ९० वर्षं आधी १८५७ सालीही निरपराध्यांच्या कत्तली झाल्या होत्या. असे कत्तलखोर खुनी खरे मुस्लिम नव्हेतच असं सय्यद अहमद यांचं मत आहे. ते त्यांनी त्यांच्या 'The Causes of the Indian Revolt,' by Sir Sayyid Ahmad Khan या पत्रकात स्पष्टपणे मांडलं आहे. मग खुनाखुनी करणाऱ्या समाजकंटकांनी पाकिस्तान ओरबाडून काढला, असं म्हणावं का? तर याचं उत्तर खणखणीतपणे हो असंच आहे.
मुस्लिम राज्यकर्तेपणाच्या जोरावर पाकिस्तान उत्पन्न झाला खरा, पण पुढे या देशाने काय दिवे लावले? अवघ्या २५ वर्षांत त्याचेही दोन तुकडे पडले आणि वेगळा बांगलादेश निर्माण झाला. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानने मुस्लिमांचं भयंकर नुकसान करून ठेवलं आहे ते वेगळंच! जगभर आज दहशतवादी म्हंटला की एका मुस्लिमाची प्रतिमा उभी राहते. इस्लामच्या या अवनतीस फार मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानंच जबाबदार आहे.
त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी सय्यद अहमद खान यांच्या आधुनिक विचारसरणीचा स्वीकार जरूर करावा. मात्र मुस्लिम राज्यकर्तेपणाचा जो भ्रम जोपासला आहे त्याच्या आजिबात आहारी जाऊ नये. असं माझं मत आहे.
आपला नम्र,
गामा पैलवान


Ram Baheti

Sun , 20 October 2019

हा लेख माझ्या श्रमिक विश्व मासिकात प्रसिद्ध करण्याची परवानगी द्यावी ही विनंती .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......