‘राजा’ने वाढवली ‘युवराजांची’ डोकेदुखी, तर शेठजींना ‘मोदी मॅजिकची उम्मीद’!
पडघम - राज्यकारण
हमीद शेख
  • अमित देशमुख, शैलेश लाहोटी आणि राजा मणियार
  • Tue , 15 October 2019
  • पडघम राज्यकारण विधानसभा निवडणूक Vidhan Sabha Election लोकशाही Democracy अमित देशमुख Amit Deshmukh शैलेश लाहोटी Shailesh Lahoti राजा मणियार Raja Maniya काँग्रेस Congress भाजप BJP वंचित बहुजन आघाडी VBA एमआयएम MIM

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात पोहचला आहे. राज्यातील नेत्यांसोबतच देशभरातील दिग्गज नेत्यांच्या सभांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. अर्ध्या राज्यात ओला आणि अर्ध्यात कोरडा दुष्काळ असूनही राज्याच्या वातावरणात राजकीय ज्वर वाढला आहे. राज्यभरात सुरू असलेला हा राजकीय ज्वर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातही पाहायला मिळतोय. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरात मागच्या काळात भाजपनं सुरूंग लावला आहे. या मतदार संघातून काँग्रेसकडून अमित देशमुख तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपच्या तिकिटावर शैलेश लाहोटी दुसऱ्यांदा आपलं तकदीर आजमावत आहेत. तर ‘जय भीम, जय मीम’चा नारा देत लोकसभेपूर्वी राज्याच्या राजकारणात आलेल्या वंचित आघाडीनं राजा मणियार यांना पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे. यामुळे यंदाची लातूर विधानसभेची निवडणूक त्रिशंकू होणार असल्याची चिन्हं आहेत.

१९८०पासून १९९५चा अपवाद वगळता लातूर शहराचं नेतृत्व काँग्रेसकडे म्हणजेच देशमुख परिवाराकडे आहे. स्व. विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित देशमुख मागच्या १० वर्षांपासून शहराचे आमदार आहेत. ते वारसा हक्कानं आमदार झाले, पण त्यांना जनसामान्यांत विलासराव देशमुख यांच्यासारखी ‘लोकनेता’ ही इमेज मात्र बनवता आलेली नाही. (दुसरे विलासराव होणंही अशक्यच म्हणा!) तसंच मागच्या १० वर्षांत आमदार म्हणूनही अमितरावांना आपल्या कार्याची विशेष छाप लातूरकरांवर सोडता आलेली नाही.

पाणीप्रश्न, वाढती बेरोजगारी, रस्ते, कचरा हे लातूरकरांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आमदार म्हणून अमित देशमुख अयशस्वी ठरल्याची खंत सामान्य लातूरकर बोलत असतात. दहा वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का? कधी होणार लातूरचं शांघाय? या प्रश्नांची उत्तरं लातूरकर मागत आहेत. साडेचार वर्षं आमदार मुंबई/विदेशात राहतात, भेटत नाहीत, आमच्या समस्यांशी त्यांना काही देणंघेणं नसल्याची तक्रार सामान्य लातूरकर करत आहेत. अर्थात त्यात तथ्यही आहे. या व इतर कारणांमुळे लातूरकरांच्या मनात आमदारांबद्दल नाराजीचा स्वर दिसतोय, याची जाणीव आमदारांनीही झाली असावी. 

मागच्या महिन्याभरापासून अमित देशमुख यांनी मतदारसंघात गाठीभेटींचा सपाटा लावला आहे, पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचून आपण केलेल्या कामाबद्दल सांगून लातूरच्या विकासासाठी परत एकदा संधी देण्याचं आवाहन लातूरकरांना करत आहेत. सोबत ‘जगवू या स्वप्ने साहेबांची’ हे इमोशनल कार्डही वापरत आहेत.

२०१४ला देशभरात असलेल्या मोदी लाटेवर स्वार होत अनेक जण भाजपवासी झाले होते, शैलेश लाहोटीही त्यातलेच. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शैलेश लाहोटींनी अमित देशमुख यांना चांगली टक्कर दिली होती. २०१४च्या तुलनेत यंदा शहरात भाजपची ताकद वाढली आहे. जिल्हापरिषदे पाठोपाठ भाजपनं महानगरपालिकेतही कमळ फुलवलं आहे. शुन्यावरून महापालिकेच्या सत्ता हस्तांतरापर्यंतचा झालेला भाजपचा हा प्रवास त्यांच्या वाढत्या ताकदीची प्रचिती देणारा असून, त्यातून कधी नव्हे ते भाजपकडून तब्बल दोन डझन इच्छुकांनी भाजपकडून शहर विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती, शेवटी पक्षानं शेठजींवर विश्वास ठेवत परत एक संधी दिली आहे. शहरात वाढलेल्या ताकदीसोबतच वाढती गटबाजी भाजपसाठी तापदायक ठरत आहे. तसेच ही ताकद लातूरऐवजी मोठ्या प्रमाणात औसा आणि निलंग्यात गुंतलेली दिसत आहे.

ब्रँड मोदी, देशभक्ती, राष्ट्रवाद, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राइक व प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करत भाजपनं २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवलं होतं. या निवडणुकीतही भाजपकडून याच मुद्यांसोबत कलम ३७०चंही भांडवल केलं जाईल आणि किल्लारीत  झालेल्या अमित शहा यांच्या सभेतून भाजपचा राज्यासाठी तयार असलेला चुनावी अजेंडा स्पष्टही झाला आहे. येत्या काही दिवसांत लातूरात नरेंद्र मोदी यांची सभा अपेक्षित आहे. ही सभा मरगळ झटकत पक्षासाठी जादूची कांडी ठरेल, या आशेवर शेठजी आणि भाजपचा प्रवास सुरू आहे.

२०१९ लोकसभेपूर्वी  निर्माण झालेली, काँग्रेस व मित्रपक्षांसाठी डोकेदुखी ठरलेली वंचित आघाडीही राज्यभरात पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवत आहे. एमआयएमशी आघाडी नसली तरी एमआयएमने आपला उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे  ‘हम साथ साथ हैं’चा संदेश दिला आहे.

लातूर शहरात दलित-मुस्लीम मतदारांची मोठी संख्या ध्यानी घेत वंचितनं राजा मणियार यांना उभं केलं आहे. अनेक प्रभागांचा नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव, सर्व समाजातील लोकांशी असलेला वैयक्तिक संपर्क, ही राजा मणियार यांची जमेची बाजू. शहरात मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक, सोबत देशभरात सुरू असलेलं धार्मिक अस्मितेचं राजकारण यामुळं तरुणांकडून ‘अबकी बार मुस्लीम आमदार’ हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालवला गेला. शहरातील मुस्लीम मतदार आजपर्यंत काँग्रेसच्या पाठिशी खंबीरपणे राहिला आहे. पण मागील काळात देशात घडलेल्या मॉब लिंचिंग, तिहेरी तलाक, आरक्षण या मुद्द्यांवर काँग्रेसनं घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवर समाजात रोष आहे. तसेच स्थानिक पातळीवर शादीखाना हॉस्टेल यामुळेही काँग्रेसविरोधी वातावरणाची निर्मिती झाली आहे. यांनाच किती दिवस निवडून द्यायचं? आपलं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, आपलंही नेतृत्व पुढे आलं पाहिजे, असा विचार करणारा तरुणांचा मोठा वर्ग मागच्या काही काळात तयार झाला आहे. दलित-मुस्लीम ऐक्य झाल्यास ‘औरंगाबाद पॅटर्न’ निर्माण होऊ शकतो, हा आशावादही वाढला आहे. आणि सोबत राजा मणियारसारखा राजकीय जाण असलेला मुरलेला उमेदवार आल्यानं काँग्रेसचा पारंपरिक मतदार दुरावण्याचा वाढलेला धोका अमित देशमुख यांची डोकेदुखी वाढवत आहे. 

अशा एकूण परिस्थितित लातूरचा ‘राजा’ कोण हे लातूरकर येत्या २४ तारखेला स्पष्ट करतीलच. पण लातूर शहर विधानसभेची ही निवडणूक यंदा ‘वन वे’ असणार नाही, हे मात्र नक्की. 

.............................................................................................................................................

लेखक हमीद शेख लातूरस्थित मुक्तपत्रकार आहेत

hamidsha21@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......