‘नेटफ्लिक्स’ची घसरण होतेय आणि ‘डिस्ने प्लस’, ‘अ‍ॅपल टीव्ही प्लस’ येताहेत…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस आणि अ‍ॅपल टीव्ही
  • Mon , 14 October 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र नेटफ्लिक्स Netflix डिस्ने प्लस Disney+ अ‍ॅपल टीव्ही प्लस Apple TV+

‘नेटफ्लिक्स’चा जुलै २०१९ मध्ये दुसरा तिमाही आर्थिक अहवाल (Q2) प्रसिद्ध झाला आणि सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नेटफ्लिक्सच्या शेअरची किंमत जवळपास २३ टक्क्यांनी घसरली. त्यामुळे अमेरिकेतलीत वॉल स्ट्रीट आता नेटफ्लिक्सच्या तिसऱ्या तिमाही आर्थिक अहवालाकडे (Q3) लक्ष लावून आहे. हा अहवाल अमेरिकेतील ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्यांचं भवितव्य ठरवणारा आहे, असं मानलं जात आहे.

नेटफ्लिक्सचे जवळपास ६० दशलक्षांहून अधिक स्वदेशी सबस्क्रायब्रर आहेत, तर ९० दशलक्षांहून अधिक परदेशी सबस्क्राईबर आहेत. दुसऱ्या आर्थिक अहवालानंतर नेटफ्लिक्सच्या स्वदेशी ग्राहकांची मोठी घसरण झाल्याचं आढळून आलं आहे. तब्बल १२,६००० सबक्रायबर्सनी नेटफ्लिक्सशी फारकत घेतली आहे. अ‍ॅप्लिकेशन डाउनलोडचं प्रमाण दर वर्षी १८ टक्क्यांनी वाढत असणाऱ्या अमेरिकेत १३ टक्क्यांनी डाउनलोडचं प्रमाण घसरलं आहे.

या उलट उर्वरित जगात ते ३४ टक्क्यांनी वाढलं आहे. ‘नेटफ्लिक्स’ची स्वदेशात झालेली ही घसरण गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून गेली आहे. तेव्हा कंपनीकडून याचं कारण असं सांगण्यात आलं की, नेटफ्लिक्स सध्या अतिउच्च शिखरावर असल्यानं ही घसरण अपेक्षित होती, तसंच वाढवलेल्या मासिक शुल्काचाही परिणाम झाला. त्याच महिन्यात आलेल्या ‘स्ट्रेंजर थिंग ३’चा सकारात्मक परिणाम तिसऱ्या तिमाही अहवालावर (Q3) होईल, असंही सांगण्यात आलं.

दुसरीकडे १२ नोव्हेंबर २०१९पासून वॉल्ट डिस्ने ही कंपनी अमेरिकेत आपली ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग ‘डिस्ने प्लस’ या नावानं सुरू करत आहे. तसंच अ‍ॅपल कंपनीदेखील ‘टीव्ही प्लस’च्या माध्यमातून व्हिडिओ ऑन डिमांडच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. या दोन्ही कंपन्या नेटफ्लिक्सला मोठं आव्हान निर्माण करू पाहत आहेत. त्यामुळे स्वदेशी घसरण तूर्त थांबेल की, वाढेल हे पाहावं लागणार आहे.

या सगळ्याच्या परिणामी नोव्हेंबर २०१९ पासून अमेरिकेतील व्हिडिओ ऑन डिमांड कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहावयास मिळणार आहे. स्ट्रेंजर थिंग्जच्या तिसऱ्या सीझनमुळे झालेली वाढ, तसंच परदेशी मोठ्या प्रमाणावर केलेली गुंतवणूक या सर्वांचा परिणाम कशा स्वरूपात समोर येतो, ते पाहावं लागेल.

त्यामुळे नेटफ्लिक्सचा येणारा तिसरा तिमाही आर्थिक अहवाल (Q3) हा अमेरिकेतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा बनला आहे.

अमेरिकेत निर्माण झालेली ही स्पर्धा जागतिक पातळीवर येण्यासाठी जास्त वेळ घेईल असं वाटत नाही. त्यामुळे नेटफ्लिक्स स्वदेशी ग्राहक गमावत असेल तर भविष्यकाळात जागतिक पातळीवरतीदेखील मोठी घसरण पाहावयास मिळणार नाही, असं म्हणता येणार नाही.

तसंच ‘डिस्ने प्लस’ लाँच होत असताना त्याचे सर्व कार्यक्रम ‘हॉट स्टार’वर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झाल्यास क्रिकेट स्ट्रीमिंगमुळे पॉप्युलर झालेली ‘हॉट स्टार’ वाहिनी येत्या काळात टीव्ही सीरिअल, फिल्ममध्ये नेटफ्लिक्सला मोठं आव्हान दिल्याखेरीज राहणार नाही. मात्र यामुळे भारतातील प्रेक्षकांना ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर दर्जात्मक विविधता पाहावयास मिळणार आहे.

म्हणूनचं नेटफ्लिक्सचा पुढील आर्थिक अहवाल आणि डिस्ने प्लस, अ‍ॅपल टीव्ही प्लस यांचं अमेरिकेतील स्ट्रीमिंग क्षेत्रांत होत असलेलं पदार्पण, हे आर्थिक आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख