अजूनकाही
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि एक निर्विवाद लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचं प्रचाराच्या रणधुमाळीत धुमधडाक्यात आगमन झालं आहे. पहिल्याच सभेपासून राज ठाकरे नावाची मुलुखमैदानी तोफ गरजू लागली आहे. माध्यमांत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळू लागलेली आहे, यात आश्चर्य काहीच नाही, कारण राज हे मुंबईच्या माध्यमांचे लाडके नेते आहेत. शिवाय त्यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानं तर माध्यमांतल्या ज्येष्ठांचे राज हे जास्तच लाडके आहेत. त्यामुळेही माध्यमांचा झोत राज यांच्यावर जरा जास्तच असतो. मात्र प्रचाराच्या या रणधुमाळीत राज यांच्या झालेल्या या ‘एन्ट्री’चं वर्णन करण्यासाठी मला अंदलीब शहदानी यांच्या आणि जगजितसिंग यांच्या स्वरांनी अजरामर झालेल्या एका गजलच्या मुखड्याची आठवण झाली. तो मुखडा असा-
देर लगी आने में तुमको
शुकर हैं फिर भी आये हो ...
‘सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकेल असा विरोधी पक्ष होण्याइतकं बळ मला द्या’ असं आवाहन जनतेला करून पहिल्याच सभेत राज ठाकरे यांनी मोठा ‘यू टर्न’ घेतलेला आहे. याचा अर्थ राज यांना त्यांच्या पक्षाची ताकद काय आहे, याची जाणीव झालेली आहे, असाही होतो. कारण याआधी ‘माझ्या हाती राज्याची सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो’ अशी भाषा राज ठाकरे यांची होती. राज्यातल्या जनतेनी काही राज यांच्या मनसेच्या हाती आजवर सत्ता दिलेली नाही आणि ती देण्याची यानंतरही जनतेची इच्छा नाही, हे वास्तव राज ठाकरे यांनी आता मान्य केलेलं आहे, असाही त्यांच्या पहिल्या प्रचार सभेतील विधानाचा अर्थ आहे.
एक आधीच सांगून टाकतो. राज्यातले जे राजकीय नेते मला आवडतात त्यात राज ठाकरे हे आहेत. (माझ्या ‘नोंदी डायरीनंतरच्या’ आणि ‘दिवस असे की...’ या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे.) ज्यांच्याकडून आशा बाळगावी अशा नेत्यांपैकी राज ठाकरे हे एक आहेत असंही माझं मत आहे. त्यांचं घणाघाती आणि फर्ड वक्तृत्व, हजरजबाबीपणा, त्यांच्यातला चिकित्सक वाचक, त्यांचं आकलन, त्यांच्यात असणारी सांस्कृतिक आस्था, त्यांची वेध घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी असणारी मला भावलेली आहे. पण...
या ‘पण’नीच राज ठाकरे यांचा घात केलेला आहे. काही भ्रमातून ते अजूनही बाहेर आलेले नाहीत. मार्च २००६ नंतरचे ‘ते’ दिवस आठवा जरा- शिवसेनेतून फुटल्यावर राज यांची राजकारणातली एन्ट्री फारच आशादायक झोकात झाली. याबाबतीत त्यांनी शरद पवार यांनाही मागे टाकलेलं होतं. माध्यमांनी तर राज यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेत्यांपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली होती.
एव्हाना उद्धव ठाकरे यांच्या मवाळ राजकारणाचा शिवेसेनेत उदय झालेला होता आणि लोकांना बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमकता हवी होती. राज यांच्या रूपात बाळासाहेब ठाकरे यांची ती आक्रमकता, सेनेची ‘खळss खट्याक’ची शैली लोकांना राज यांच्यात दिसली, आवडली आणि भावलीही. त्यातच महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ देण्याची भाषा राज यांनी केली. अशी हमी देणारे राज ठाकरे हे पहिलेच नेते होते. त्यामुळे तर लोकांनी तर राज यांना प्रचंड प्रतिसाद दिला. राज्याच्या विविध भागात त्यांच्या होणाऱ्या सभांना लाखांत गर्दी उसळत असे. ही गर्दी भाड्यानं आणलेली नाही, अशी खात्री तेव्हा पोलीस आणि गुप्तचर खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी तेव्हा खाजगीत बोलतांना दिलेली होती.
स्थापन झाल्यावर लढवलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत (२००९) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दुहेरी आकडा पार करत आला. या पक्षाचे चक्क १३ उमेदवार विधानसभेवर विजयी झाले तर २४ जागांवर मनसेचे उमेदवार दुसऱ्या जागी होते. मग महापालिका निवडणुकातलं यश, नासिक महापालिकेत तर चक्क सत्ता... त्यानंतर तर हा पक्ष तसंच राज यांची तर क्रेझच राज्यभर निर्माण झाली. राज ठाकरे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांकावर पोहोचल्यासारखी आणि नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत येणार असल्यासारखी ती अवस्था होती, हे राज्यभर फिरताना अनुभवणाऱ्या पत्रकारांपैकी मीही एक आहे.
राज ठाकरे स्पष्ट बोलतात पण इतरांनी स्पष्ट बोलेलेलं त्यानं आवडत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तर ते मुळीच रुचत नाही; कार्यकर्ते लग्गेच ‘खळss खट्याक’ प्रयोग करतात. तरी स्पष्टच सांगतो, हळूहळू राज ठाकरे यांची क्रेझ वगळता राज यांच्यातला राजकारणी आणि राजकीय पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. मिळालेला अफाट प्रतिसाद पाठिंब्यात बदलण्यात राज ठाकरे यांना यश आलं नाही, कारण त्यांच्या नावाचा जो काही करिष्मा निर्माण झाला, जी काही प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यातून जे ‘स्टार’पण आलं, त्यात राज ठाकरे अडकले.
अगदी स्पष्ट सांगायचं तर ते स्व-प्रतीमेच्या प्रेमात (narcissism) पडले असावेत असं दिसू लागला. राजकारण पूर्णवेळाचं काम आहे आणि राजकारण करताना त्यात गांभीर्य हवं हे विसरले. त्याच्यातला नेता सरंजामदार वाटू लागला. अडचणीत आणणाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना जरबेच्या आवाजात ते दाबू लागले.
मनसे राजकीय पक्ष म्हणून तसाही एकखांबी तंबू होता. राज यांच्यात झालेल्या या बदलामुळे पक्षाला कार्यक्रम मिळणं बंद झालं. जो पक्ष कार्यक्रम देत नाही, त्या पक्षाचे कार्यकर्ते निष्क्रिय होत जातात. मनसेत तेच घडलं. जे काही पक्ष संघटन बांधलं गेलेलं होतं, ते मुंबईत नाही तरी, राज्याच्या अन्य भागात विसविशीत होत गेलं. या सर्वाचा एकत्रित परिणाम २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जोरदार बसला. नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात त्याचीच पुनरावृत्ती झाली. भाजप आणि सेना राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निष्प्रभ करत असताना मनसेला तिसरा भक्कम पर्याय म्हणून उभं करण्याऐवजी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या यांच्या वळचणीला राज ठाकरे गेले. सेना आणि भाजपला पर्याय ठरू पाहणारं त्यांचं हिंदुत्व, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला असणारा विरोध, आक्रमकता, लोकांना विश्वासात न घेता ‘सॉफ्ट’ झालं. त्याने अचानक सेनेसोबतच भाजप आणि मोदी यांच्याशी पंगा घेणं मनसेच्या सैनिकांना बुचकाळ्यात टाकणारं ठरलं. लोकसभा निवडणुकीत तर पक्षाचे उमेदवार न लढवता भाजप-सेनेला विरोध आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा असा अनाकलनीय राजकीय आत्मघात राज यांनी केला. कार्यकर्ते सैरभैर झाले. मात्र असं असलं तरी, राज ठाकरे यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली, नाही हे ‘सूर्य प्रकाश देतो’सारखं वास्तव आहे!
भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी विधानसभेच्या तयारीत लोकसभा निवडणुका संपताच गुंग झाल्या. महाजनादेश, आशीर्वाद, संघर्ष अशा अनेक यात्रांनी राज्याचं वातावरण ढवळून निघालं. सर्वच पक्षांचे नेते रस्त्यावर उतरून जनतेत मिसळताना दिसू लागले पण, मनसेच्या आघाडीवर शांतताच होती. निवडणूक लढवण्याचा निर्णय ‘साहेब’ घेतात का नाही, या उत्सुकतेच्या सावलीत मनसे नेते आणि कार्यकर्ते विसावलेले होते. म्हणूनच म्हटलं, निवडणुका लढवण्याचा निर्णय घेताना राज ठाकरे यांनी उशीर केलेला आहे.
भाजप-सेनेच्या विरोधात शरद पवार यांनी वयाच्या ७९व्या वर्षी कंबर कसलेली आहे. अनेक नेते पक्ष सोडून भाजप आणि सेनेच्या आश्रयाला गेलेले आणि अजूनही जात असताना शरद पवार मात्र वयाला न शोभेशी अविश्वसनीय व अतुलनीय तडफ दाखवत आहेत. त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. ‘अभी तो मैं जवान हूं’ म्हणत शरद पवार दररोज सहा-सात सभा घेत फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केलाय. हे दोघ मिळून दिवसभरात बारा-पंधरा सभा घेत आहेत आणि इकडे प्रचार बंद होण्याला जेमतेम दहा दिवस उरलेले असताना राज यांची पहिली सभा झालेली आहे!
मनसेचे केवळ १०४ उमेदवार रिंगणात आहेत. दररोज तीन-चार प्रचार सभा या गतीनं राज ठाकरे फार फार तर ३०-४० उमेदवारांचा थेट प्रचार करू शकतील तरी त्यांना विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष व्हायचं आहे. विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठी मनसेचे किमान २९ उमेदवार निवडून यावे लागतील; जे की सध्याच्या स्थितीत अशक्य आहे हे राज ठाकरे यांना समजलेलं नसेल असं म्हणणं आत्मवंचना ठरेल. हे सगळं तीन चार महिने आधी झालेलं असतं, राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र किमान एकदा ढवळून काढला असता तर शक्य झालं असतं, यात शंकाच नाही. म्हणूनच म्हटलं, देर लगी आने में तुमको...
लोकप्रियता, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, आकलन आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी आत्यंतिक तळमळ असणारा राज ठाकरे यांच्या वयोगटातला दुसरा नेता आज तरी राज्यात दुसरा कुणी नाही.
म्हणूनच ‘देर आये दुरुस्त आये...’ या शब्दांत राज ठाकरे याचं निवडणुकीच्या रिंगणात स्वागत आहे.
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment