‘आप्पा आणि बाप्पा’ : जणू कितीही विघ्नं आली तरी खुद्द विघ्नहर्ताच या सिनेमाच्या पाठीशी उभा आहे!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘आप्पा आणि बाप्पा’चं पोस्टर
  • Sat , 12 October 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie आप्पा आणि बाप्पा Appa Ani Bappa भरत जाधव Bharat Jadhav सुबोध भावे Subodh Bhave

‘आप्पा आणि बाप्पा’ची सुरुवात ‘देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर’ या गाण्यानं होते आणि शेवटपर्यत ईश्वर व माणूस यांच्यातल्या कल्पित पारंपरिक संवादानं सिनेमा निराशा होत राहते. त्यातलं तत्त्वज्ञान सर्वसामान्य प्रेक्षकांची जणू परीक्षाचं बघतं.

विनोदी हिंदी मालिका आणि सिनेमाचे नवनवीन प्रयोग करणारा धीर परिवार या सिनेमाचा निर्माता आहेत. ‘सन ऑफ सरदार’, ‘अतिथी तुम कब जाओगे’सारखे सिनेमा या परिवारानं बनवले आहेत. त्यामुळे ‘आप्पा आणि बाप्पा’तला विनोदीपणा या सिनेमांच्या प्रभावाखाली असल्याचं जाणवत राहतं. त्यात भर म्हणजे दिग्दर्शनसुद्धा धीर परिवारानंच केलं आहे. परिणामी सिनेमातला विनोद हा ‘मराठी विनोद’ वाटत नाही.

गोविंद कुलकर्णी म्हणजे आप्पा (भरत जाधव) पुण्यातील सभ्य गृहस्थ त्यांची पत्नी मेधा (संपदा जोगळीकर) या दाम्पत्याला दोन मुलं असतात. गोविंदरावांचे वडील रमाकांत कुलकर्णी (दिलीप प्रभावळकर) देवभोळे असतात. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस मनोभावे पूजा करायची त्यांची इच्छा असते. मात्र मिठाईच्या दुकानात (पात्र काय काम करतं, त्याची फक्त ओळख करून देण्यापुरतं दुकान दाखवलं आहे. पुन्हा त्याचा साधा उल्लेखही येत नाही!) काम करणाऱ्या गोविंदला आर्थिकदृष्ट्या ती पूजा परवडणारी नसते. पण पत्नीच्या आणि वडिलांच्या अट्टहासापायी गोविंद पूजा घालतो. मोठा खर्च करतो. त्यामुळे त्याचं दिवाळं निघतं. मग लोकांची देणी फेडता येत नाहीत म्हणून गोविंद एकटा डोंगरावर जाऊन मोठ्या आवाजात ओरडत बसतो. तिथं अचानक बाप्पा (सुबोध भावे) सामान्य माणसाच्या वेशात प्रकट होतो. मग गोविंदरावची आणि बाप्पाची मैत्री होते आणि पुढे भक्त व ईश्वर यांच्यातले वाद-संवाद सिनेमा संपेपर्यत संपत नाहीत. ‘आप्पा आणि बाप्पा’च्या गप्पांचा रटाळपणा प्रेक्षकांचा मात्र अपेक्षाभंग करतो.

पुणे शहरातील गणेशोत्सवाची संस्कृती आणि त्यातल्या दहा दिवसांचं उदात्तीकरण करताना त्यातला विनोदीपणा अंगावर येतो. सिनेमा पूर्वार्ध आणि उत्तरार्धात एकसारखाच गती टिकवून ठेवतो. मात्र कथेत रोमांचक वळण घेण्याच्या प्रयत्नात दोन्हीतली लयबद्धता विस्कळीत होते. सिनेमात दोन-तीन वेळा दुचाकीचं दृश्य येतं. त्या दृश्याच्या पाठीमागे जे काही शहर दाखवलं आहे, त्यातला कृत्रिमपणा हास्यास्पद आहे. अशा अनेक परस्परविरोधी बाबींचा मेळ घालताना केलेल्या चुका पडद्यावर विनोदी दृश्यांचीही मजा घालवतात.

सुबोध भावे आणि भरत जाधव यांच्या विनोदी जुगलबंदीचा फुसका बार ‘आप्पा आणि बाप्पा’मध्ये पाहायला मिळतो. भौतिक जगातल्या समस्यांवर थेट ईश्वराचा नानाविध प्रकारे संबंध जोडून कथा पुढे रेटली आहे. पटकथेतले चढउतार प्रेक्षकाला गोंधळात टाकतात. बाप्पा (सुबोध भावे) हे महत्त्वाचं पात्र, मात्र त्याचा प्रवेश का होतो, ते काही शेवटपर्यंत कळत नाही. निव्वळ हवं म्हणून हे काल्पनिक पात्र ओढूनताणून सिनेमात घुसवलं आहे.

अभिनयाच्या दृष्टीनं भरत जाधव आणि सुबोध भावे आपल्या नेहमीच्या शैलीतून बाहेर पडत नाहीत. सुबोध भावेंनी तर गणेशाची सोंड बसवून केलेला अभिनयही कृत्रिम आहे. भावे कधी दबंग होतो, तर कधी अत्यंत कनवाळू गणेश होतो. मात्र अभिनयाच्या बाबतीत पारंपरिक सुबोध भावेच राहतो. भरत जाधव तसा दीर्घ कालावधीनंतर पडद्यावर दिसतो. मात्र त्याचा अभिनय पात्राला साजेसा नाही. दिलीप प्रभावळकराचा अभिनय विनोदी पात्राला न्याय देतो. संपदा जोगळेकर, शिवानी रंगोळे यांनी आपल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत.

सिनेमा जसा पुढे जातो तसा त्याच्या मूळ गाभ्यापासून दूर जात राहतो. ‘आप्पा आणि बाप्पा’ अनेक ठिकाणी ‘ओह माय गॉड’ या हिंदी सिनेमाचा सूर पकडतो. त्यामुळे त्यातले संवाद हिंदी भाषेत ऐकल्यासारखे वाटत राहतात. तांत्रिक बाबी समाधानकारक आहेत. दिग्दर्शन आणि संगीत या पातळ्यांवरही सिनेमा फार काही वेगळा नाही. त्यामुळे सिनेमा असंख्य थांबे घेत शेवटाकडे जातो आणि आनंदी शेवटाला जवळ करतो. जणू कितीही विघ्नं आली तरी खुद्द विघ्नहर्ता सिनेमाच्या पाठीशी उभा आहे!

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख