‘द स्काय इज पिंक’ : मृत्यूभोवती फिरणारं वैचित्र्यपूर्ण नि हृदयस्पर्शी कौटुंबिक नाट्य 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘द स्काय इज पिंक’चं पोस्टर
  • Sat , 12 October 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie द स्काय इज पिंक The Sky Is Pink प्रियंका चोप्रा Priyanka Chopra फरहान अख्तर Farhan Akhtar झायरा वसीम Zaira Wasim

चित्रपटाला त्याचं शीर्षक त्यातील एका महत्त्वाच्या दृश्यातून मिळतं. लंडनमध्ये राहणारी आई तिच्या मुलाशी संवाद साधतेय. तो तिला आज त्याला शाळेत शिक्षिकेनं मारल्याबाबत सांगतोय. कारण असतं त्यानं आकाशाला गुलाबी रंगात रंगवणं. ती त्याची समजूत घालत असताना एक महत्त्वाचं वाक्य बोलते. ती म्हणते, ‘द स्काय कॅन बी एनी कलर यू वॉन्ट इट टू बी’. इथं अभिप्रेत असलेला अर्थ साधा-सरळ आहे. शेवटी तुमच्या अवकाशाचा रंग तुम्ही तुमच्या जाणिवांचा, संवेदनांचा विचार करत ठरवायचा असतो. चौधरी कुटुंबाची ही कथा म्हणजे याच, आपल्या कॅनव्हासवर अवकाशात हवे ते रंग भरण्याच्या उक्तीवर खरं उतरण्याची कथा आहे. 

मृत्यूची जाणीव, प्रत्यक्ष मृत्यूची घटना हे इथल्या कथेचे उत्प्रेरक ठरणारे घटक आहेत. आएशा चौधरीला (झायरा वसीम) एक दुर्मीळ तऱ्हेचा आजार झालेला असतो. हा आजार तिच्यात आई-वडिलांकडून अनुवंशिकपणे आला आहे. लहानपणापासूनच शस्त्रक्रिया, उपचार, लहानसहान गोष्टींची काळजी घ्यावी लागणं, किमोथेरपी वगैरे शब्द पालकांच्या तोंडावर मारले जाणं, या सगळ्या गोष्टी दिसत राहतात.

चित्रपटाला सुरुवात होते ती आएशाच्या कथनापासून. पुढेही चित्रपटाचा चौधरी कुटुंबाच्या आयुष्यातील निरनिराळ्या कालखंडामध्ये मुक्त वावर सुरू असताना उत्साहवर्धक आवाजातील तिचं कथन सुरू असतं. मृत्यूनंतरही आपल्याला तिची कथा सांगू पाहणाऱ्या मला, म्हणजे आएशाला भूत वगैरे समजू नका असे विनोद करत ती कथन करत राहते. आपल्या अवकाशात हवे ते रंग भरणं इथं महत्त्वाचं आहे. इथल्या मृत्यू नामक संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर एक वैचित्र्यपूर्ण तऱ्हेचा, काहीसा कारुण्यपूर्ण विनोद कायम अस्तित्वात असतो. १९८८ मधील पालकांचं प्रेमप्रकरण ते २०१५ मधील मृत्यू, आणि त्याहीनंतरच्या घटनांपर्यंत सर्वत्र या विनोदाचं अस्तित्व आढळतं. कुणाच्या मृत्यूविषयीची कथा एकाच वेळी हृदयद्रावक, कारुण्यपूर्ण आणि उत्साहवर्धक कशी असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. 

अदिती ऊर्फ मूस (प्रियंका चोप्रा-जोनास) आणि निरेन ऊर्फ पांडा (फरहान अख्तर) म्हणजे आएशाचे पालक. चित्रपट कालखंडाच्या दृष्टीनं उड्या मारत असताना निरनिराळ्या वयातील त्यांच्यातील नात्याचे वेगवेगळे रूप समोर उभं राहतं. कधी ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं अविवाहित प्रेमी युगुल असतं, कधी ते लग्नानंतर मधाळ भांडणारं जोडपं असतं, तर कधी ती दोघं म्हणजे केवळ आपल्या मुलीला वाचवण्यासाठी झगडणारे पालक असतात. आएशा म्हणजे त्यांच्या कौटुंबिक, भावनिक विश्वातील महत्त्वाचा भाग असते. त्यांच्या याच अवकाशावर मृत्यूची गडद छाया पडलेली असताना त्यांचं झगडा देणं स्वाभाविक असतं. 

आता हा झगडा जितका तिला वाचवण्याच्या पातळीवरील आहे, तितकाच स्वतःच्या नात्याला वाचवण्याच्या पातळीवरील आहे. सुरुवातीला ही ओढाताण एकमेकांपासून शारीरिक पातळीवर दूर असण्याच्या रुपात अस्तित्वात असते. आधी आएशाच्या उपचाराकरिता तिला लंडनला घेऊन जावं लागल्यानंतर एकानं तिथं, तर एकानं भारतात राहणं त्यांना भाग पडतं. नंतर दोघं लंडनमध्ये असूनही कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्यानं एकानं घरात थांबून मुलांची देखभाल करणं नि दुसऱ्यानं काम करणं घडत राहतं. (इथं आलटून-पालटून स्त्री आणि पुरुष अशा दोघांच्या नजरेतून दिसणाऱ्या, ‘नसतेस घरी तू जेव्हा…’च्या धर्तीवरील घटना घडतात असं म्हणायला वाव आहे.) तर पुढे कधीतरी तिच्या आजारपणावरून यांच्यात होणारे वाद दिसून येतात. ज्यातून एक सर्वंकष असं कौटुंबिक नाट्य समोर उभं राहतं. 

लेखिका-दिग्दर्शिका शोनाली बोस आणि सहलेखक निलेश मनियार या भावविवश कौटुंबिक नाट्याला वैचित्र्यपूर्ण, तरीही विशिष्ट आणि अचूक अशा विनोदशैलीची जोड कशी देतात ते इथं महत्त्वाचं ठरतं. ‘मी अँड अर्ल अँड द डाईंग गर्ल’सारख्या (२०१५) त्यांच्या सिनेमॅटिक प्रेरणा तशा उघड आहेत. पण, त्यांच्या विनोदाच्या (किंवा अगदी कारुण्याच्याही) शैलीला भारतीय चित्रचौकटीत अचूकपणे बसवणं इथं खरं कौतुकास्पद ठरणारं आहे.

इथं विनोद येतो, त्यापाठोपाठ त्यामागे अस्तित्वात असलेला करुण भावही येतो. लोक मृत्यूवर विनोद करताना दिसतात, पण सोबतच त्याच्याशी प्राणपणाने झगडताना दिसतात. पात्रांची विक्षिप्त विनोदबुद्धी म्हणजे मृत्यू नामक गंभीर समस्येकडे तिची अगदी संयतपणे खिल्ली उडवत पाहण्याचा एक प्रकार आहे. अशा वेळी ‘मी अँड अर्ल…’सोबतच अलीकडेच आलेल्या ‘पॅडलटन’ (२०१९) या चित्रपटाचीही इथं आठवण येते. 

मिकी मकक्लेरी या वेड्या संगीतकारानं या चित्रपटाला दिलेलं न्यूनतम, संयत आणि प्रभावी पार्श्वसंगीत त्याच्या परिणामात अधिक भर घालतं. तर गुलज़ारांनी लिहिलेलं ‘दिल ही तो हैं’ हे गीत चित्रपटाचा भावनिक अवकाश सामावून घेणारं ठरतं. छायाचित्रकार कार्तिक विजय आणि निक कुक दिग्दर्शिका बोसच्या विश्वाला प्रभावीपणे पडद्यावर आणण्यात सहाय्यक ठरतात. 

दिग्दर्शिका शोनाली बोस ‘द स्काय कॅन बी एनी कलर यू वॉन्ट इट टू बी’ला जागत सत्यघटनेवर आधारित या कथेत आपल्याला हवे ते रंग भरत एका नितांतसुंदर कलाकृतीची निर्मिती करते. साहजिकच तिची ही नानाविध रंगांची, भावभावनांची उधळण आवर्जून पहावीशी ठरते. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......