‘हिंदस्वराज्य’ : भारतीय परंपरेतील आधुनिक ‘क्लासिक’
ग्रंथनामा - झलक
सदानंद मोरे
  • ‘निवाड्याचा ठाव’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 11 October 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक निवाड्याचा ठाव Nivadyacha Thav सदानंद मोरे Sadanand More हिंदस्वराज्य Hind Swaraj महात्मा गांधी Mahatma Gandhi

प्रसिद्ध लेखक-संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह ‘निवाड्याचा ठाव’ या नावाने नुकताच हर्मिस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहातली प्रा. सु. श्री. पांढरीपांडे यांच्या ‘महात्मा गांधींचे ‘हिन्दस्वराज्य’ आणि नवे मन्वंतर’ (प्रतिमा प्रकाशन, पुणे, २०१०) या पुस्तकाला लिहिलेली ही प्रस्तावना…

...............................................................................................................................................................

महात्मा गांधींचा विचार संपवण्यासाठी त्यांच्या काही विरोधकांनी कट शिजवून त्यांची हत्या केली, या घटनेला आता सहा दशके उलटून गेली आहेत. या कटवाल्यांनी गांधीजींच्या पंचभौतिक देहाची हत्या केली; परंतु गांधीजींचा विचार मात्र ते मारू शकले नाहीत. उलट, जसजसा काळ पुढे सरकतो आहे, तसतशी गांधीविचारांच्या उपयुक्ततेची अधिकाधिक खात्री भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलही सुजाण लोकांना पटत चालली आहे. गांधीजींचा विचार काठेवाड-गुजरातपुरता किंवा हिंदू धर्मापुरता किंवा भारत देशापुरता मर्यादित कधीच नव्हता; तो अखिल मानवमात्रांसाठी होता. याउलट, त्यांचे विरोधक कोणत्या तरी संकुचित दृष्टिकोनातून विचार करत होते.

गांधीजींचे नाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी अतूटपणाने जोडले गेले आहे यात शंका नाही. कोणी कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी गांधीजींचे महत्त्व जीना आणि चर्चिल यांच्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकांनीच अधोरेखित केलेले असल्यामुळे हे नाकारणे निरर्थक ठरते. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा आणि इस्लामी फुटीरवादाचा खरा शत्रू गांधीच आहे, हे या दोघांनीही पुरतेपणी ओळखले होते आणि त्यांचा सारा मारा ‘गांधीजी’ हे लक्ष्य पुढे ठेवूनच चालला होता.

पण भारताचा स्वातंत्र्यलढा ही आता इतिहासजमा झालेली घटना आहे. ज्या देशांनी गांधीजींपासून प्रेरणा घेऊन आपापल्या स्वातंत्र्यलढ्याचे निशाण रोवले, तेही आता स्वतंत्र झाले आहेत. परंतु गांधीजी हे या इतिहासालाही पुरून उरणारे व्यक्तित्व ठरले आहे. किंबहुना, नित्यनूतन या अर्थाने सनातन ठरलेली आधुनिक काळातील एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गांधीजींचा विचार. गांधीजींच्या या नवनवोन्मेषशाली विचारातील कोंभ आणि धुमारे हुडकून त्यांना खतपाणी घालून वृक्ष वाढवायचे, हे गांधीजींचा वारसा मान्य असलेल्या अभ्यासकांचे काम आहे. आपल्या सुदैवाने असे काही अभ्यासक आपल्या आसपासच वावरत आहेत. सु.श्री. पांढरीपांडे हे त्यांच्यातील एक बिनीचे नाव. गेली काही दशके गांधीविचारांवर समर्थपणे भाष्य करण्याचे कार्य पांढरीपांडे सातत्याने करत आहेत. गांधीजींसारख्या समर्थ विचारवंतांच्या विचारांचा भाष्यकारही तशाच सामर्थ्याचा पाहिजे. नाही तर त्याचे लेखन हे भाष्य न होता भक्तिभावाने केलेली आरती होईल.

नव्वदच्या दशकात पांढरीपांडे यांचे ‘ध्रुवपद’ हे गांधींवरील पुस्तक प्रकाशित झाले. त्याचे परीक्षण करताना मी असे म्हटले होते की, “ ‘ध्रुवपद’ ही गांधींवरील नव्या चिंतनाची नांदी आहे.” नव्वदच्या दशकात अशी नांदी आवश्यकच होती. याच काळात नव्या अर्थव्यवस्थेच्या वाहणाऱ्या, नव्हे घोंगावणाऱ्या वाऱ्याने भारतातही प्रवेश केला होता. दरम्यान, रशियासारख्या एका बलाढ्य देशाचा बळी घेऊन त्याने त्याचा पाचोळा चहूकडे उडवला होता. हे वादळ आपल्या अर्थव्यवस्थेच्या शिडात भरून त्याला, तिला हव्या त्या दिशेने हाकारण्याचा आपल्या राज्यकर्त्यांचा इरादा नेक असेलही. परंतु, मुळात हे वादळच नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे याचा शोध घेऊन त्याला अटकाव करण्याची शक्यता अजमावणे तितकेच जरुरीचे होते आणि अटकाव करण्याची क्षमता फक्त गांधीविचारात असल्याने पांढरीपांडे यांनी ती नांदी गायिली.

परंतु नांदी केली म्हणजे इतिकर्तव्यता झाली, असे नाही. निदान आपल्या नाट्यपरंपरेत तरी नांदीनंतर नाटकाचा सूत्रधार पुढील प्रयोग नटांच्या हाती सोपवून अंतर्धान पावत नाही, तर पुढील सूत्रेही तोच हलवतो. सुदैवाने पांढरीपांडे यांनीही ही सूत्रे आपल्याकडे घट्ट पकडून ठेवली आहेत आणि त्यामुळे सध्याची परिस्थिती काहीही असो; हे नाटक एक सुखात्मिका ठरेल आणि त्याचे भरतवाक्यही पांढरीपांडेच म्हणतील, अशी अपेक्षा करणे अनाठायी ठरणार नाही.

पांढरीपांडेसरांचे प्रस्तुतचे ‘हिंदस्वराज्य आणि नवे मन्वंतर’ हे पुस्तक गांधीजींच्या हिंदस्वराज्यावरील महत्त्वपूर्ण भाष्य आहे. ‘हिंदस्वराज्य’च्या लेखन-प्रकाशनाची शताब्दी हे पांढरीपांडे यांच्या पुस्तकाचे निमित्त झाले. चांगल्या गोष्टींनाही निमित्त लागतेच, तसे या ग्रंथाच्या बाबतीतही घडले. परंतु ‘हिंदस्वराज्य’चे महत्त्व त्याच्या वरावर अवलंबून नाही आणि शताब्दी नावाची ‘इव्हेन्ट’ मॅनेज केल्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष जावे इतके तर ते अडगळीतले नाहीच नाही. ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचा विभाग ही तर त्याची जागा नव्हेच. ‘हिंदस्वराज्य’ हे भारतीय परंपरेतील आधुनिक ‘क्लासिक’ आहे, असे म्हटले तरी चालेल. श्रीकृष्णाच्या जीवनात व विचारात भगवद्गीतेचे जे स्थान, तेच गांधीजींच्या जीवनात व विचारांत ‘हिंदस्वराज्य’चे आहे. कृष्णाच्या कार्याचा व विचारांचा अन्वयार्थ लावताना गीतेला केंद्रस्थानी ठेवावे लागते. त्याप्रमाणे गांधींच्या बाबतीत ‘हिंदस्वराज्य’चे करावे लागेल. गीता ही कृष्णाने अर्जुनास आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात, परिपक्व दशेत सांगितली. ‘हिंदस्वराज्य’ गांधींनी अगदी तरुण वयात लिहिले आहे. तरीही त्यांना हिंदस्वराज्यातील आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा किंवा त्यात काही बदल करावा, असे नंतर कधीही वाटले नाही.

एक गोष्ट हीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे की, कृष्णापेक्षाही गांधीजींचे काम अवघड होते. गीता ज्याला उद्देशून सांगितली, तो अर्जुन कृष्णाला पूर्ण श्रद्धेने शरण गेला असून जिज्ञासू या नात्यानेच तो कृष्णाशी बोलत होता. आपण गोंधळात सापडलो आहोत, हे त्याने अगोदरच मान्य केले होते. हिंदस्वराज्यातील संपादक (म्हणजे गांधी) ज्याला उद्देशून सांगत आहेत, तो वाचक काही त्यांना शरण आलेला त्यांचा शिष्य नाही. त्याची भूमिका नम्र जिज्ञासूची नसून उलट तो स्वत:च्या विचारांशी ठाम असून, संपादकांशी बरोबरीच्या पातळीवर वाद करत आहे. अर्जुन आणि गांधींचा वाचक यांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे; ते म्हणजे आपले गेलेले स्वराज्य परत मिळवायचे. त्यासाठी रूढ म्हणजे हिंसक युद्धाचा मार्ग नको, असे म्हणणाऱ्या अर्जुनाला कृष्ण युद्ध करायला सांगतो आहे, तर स्वराज्य मिळवण्यासाठी शस्त्र घेऊन शत्रूची हत्या करायला आधीच सज्ज झालेल्या वाचकाला संपादक तसे न करण्याचा उपदेश करत आहे. अर्थात गांधीजींनी नंतर स्वत:च गीतेतील युद्ध हे आलंकारिक असल्याचे गृहीत धरून तिचा वेगळा अन्वयार्थ लावला व हा फरक दूर केला.

कृष्णाचा शिष्य असलेल्या अर्जुनाने भगवद्गीतेतील विचार मान्य केला व त्यानुसार तो वागलादेखील. ‘हिंदस्वराज्य’तील वाचक गांधींचा शिष्य असण्यापेक्षा विरोधक असल्यामुळे त्याने तसे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण गांधींचे शिष्य असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही (एक हिंसेचा मुद्दा सोडला) ‘हिंदस्वराज्य’तील उपदेश पटत नव्हता!

थोडक्यात सांगायचे झाले, तर कौरव-पांडवातील युद्ध आणि भारतीय स्वातंत्र्यलढा उपरोक्त दोन ग्रंथांचे तात्कालिक संदर्भ असले तरी त्यांनी एकूणच मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले असल्यामुळे ते संदर्भ जरी आता इतिहासजमा झालेले असले, तरी त्यांच्यातील तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी झालेले नाही. डॉ. पांढरीपांडे यांनी ‘हिंदस्वराज्य’मधील तत्त्वज्ञानाकडे लक्ष वेधले आहे.

कोणतेही तत्त्वज्ञान मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्याने मानवी जीवनातील मूलभूत समस्यांना उत्तरे दिली पाहिजेत, अशी आपली अपेक्षा असतेच. त्याने ते जेव्हा निर्माण झाले, त्या काळातील प्रश्नांना उत्तरे दिली होती, हेही आपणास ठाऊक असते. त्याच्यात भविष्यकालीन समस्यांना उत्तरे देण्याची क्षमता असण्याची शक्यताही आपण गृहीत धरलेली असते. परंतु आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्या आजच्या समस्यांची सोडवणूक करण्यात ते तत्त्वज्ञान उपयुक्त आहे काय? पांढरीपांडे यांच्या प्रस्तुत ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी किंवा भविष्यातील आशा-आकांक्षा यांच्यावर भर देण्याऐवजी ‘हिंदस्वराज्या’ला थेट वर्तमानात उभे करून त्याची छाननी केली असून, त्याची उपयुक्तता व सद्योचितता वाजवून घेतली आहे.

‘हिंदस्वराज्य’मध्ये गांधीजींनी संपादकाच्या भूमिकेतून वाचकांशी जो संवाद केलेला आहे, तो स्वराज्यप्राप्तीच्या साधनांबाबत आहे असे वाटले, तरी तो फक्त त्यांच्याबाबत नाही. स्वराज्यप्राप्तीसाठी पिस्तुल आणि बॉम्ब यांचा उपयोग करून भारतातील ब्रिटिश सत्ताधाऱ्यांची हत्या करायची म्हणजे हिंसक मार्गाचा अवलंब करायची वाचकाची इच्छा आहे. या हिंसात्मक प्रवृत्तीचा संबंध गांधीजी पाश्चात्य सभ्यतेशी लावतात. त्यामुळे त्यांनी हिंसात्मक मार्गावर केलेली टीका संपूर्ण पाश्चात्य सभ्यतेची, मूल्यव्यवस्थेची समीक्षा बनते. पाश्चात्य सुधारणांची समीक्षा बनते. सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे, ती पाश्चात्य अर्थव्यवस्थेचीही समीक्षा बनते आणि शेवटी विज्ञानाचीही समीक्षा बनते. या सर्व गोष्टी त्यांच्या बारीकसारीक तपशिलांसह पांढरीपांडे यांनी दाखवून दिलेल्या आहेत.

‘हिंदस्वराज्य’च्या निर्मितीची पार्श्वभूमीही पांढरीपांडे सविस्तर सांगतात. दक्षिण आफ्रिका सरकारने तेथील भारतीय म्हणजे काळ्या वंशाच्या नागरिकांवर चालवलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी गांधीजी दोन वेळा लंडनला गेले होते. लंडनमध्ये त्या वेळी स्वराज्येच्छू भारतीय विद्यार्थ्यांचा गट कार्यरत होता. त्याला पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे मार्गदर्शन व मदत होती. स्वराज्य हे हिंसेच्या मार्गानेच मिळणे शक्य आहे, अशी या गटाची खात्री होती व त्याच दिशेने त्याचा प्रवास चालला होता. गांधीजी १९०६ मध्ये पहिल्यांदा तेथे गेले तेव्हा वर्मांच्या इंडिया हाऊसमधील या गटात विनायक दामोदर सावरकर नुकतेच दाखल झाले होते आणि १९०९ मध्ये गांधीजी दुसऱ्यांदा तेथे गेले तेव्हा सावरकर त्या गटाचे नुसते नेतेच झाले होते असे नाही, तर त्यांनी मदनलाल धिग्रांकरवी ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली याची हत्याही घडवून आणली होती. इकडे बंगालमध्येही बॉम्बस्फोट होत होते. गांधीजींचे इंडिया हाऊसमध्ये येणे-जाणे होते. तेथील क्रांतिकारी तरुणांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा परिचय करून घेतला. आफ्रिकेला परत जाताना त्यांनी बोटीमध्ये या संवादावर आधारित जे पुस्तक लिहिले, तेच ‘हिंदस्वराज्य.’

इटलीचा सुप्रसिद्ध सशक्त क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी हा इंडिया हाऊसमधील क्रांतिकारकांचा आदर्श होता. स्वत: सावरकरांनी लंडनमध्ये उपलब्ध असणाऱ्या वाचनसामग्रीचा उपयोग करून मॅझिनीचे मराठी चरित्र लिहून ते पुण्याहून प्रसिद्ध करवले होते. (‘हिंदस्वराज्य’तील एक प्रकरण मॅझिनी आणि इटलीवर आहे) याशिवाय त्यांनी १८५७च्या उठावावर पुस्तक लिहून त्याचे ‘स्वातंत्र्यसमर’ म्हणून समर्थन करणारा ग्रंथही प्रकाशित केला होता. नेपाळनरेशापासून ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांपर्यंत सशस्त्र क्रांतीचा संदेश त्यांनी पोहोचवला होता. सावरकरांवरील विज्ञानाचा प्रभाव सर्वज्ञातच आहे. भारतीय संस्कृती ही अद्ययावत वैज्ञानिक संस्कृती व्हायला हवी, हा त्यांचा आग्रह अखेरपर्यंत कायम राहिला. हिंसा करण्यासाठी शस्त्रास्त्रे लागतात, शस्त्रास्त्रनिर्मितीसाठी प्रगत तंत्रज्ञान लागते व प्रगत तंत्रज्ञानासाठी विज्ञान लागते; ही विचारसाखळी यामागे आहे.

थोडक्यात, गांधीजींचा संपादक ज्या वाचकाशी वाद करतो आहे, तो वाचक इंडिया हाऊसमध्ये पंडित वर्मांच्या तालमीत तयार झालेला कोणताही युवक असणे शक्य असले तरी तो जास्त करून सावरकरच आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. ‘हिंदस्वराज्या’मधील वाद हा गांधी आणि सावरकर यांच्या दोन परस्परविरोधी जीवनदृष्टींमधील वाद आहे आणि तो विशेषत: सावरकरांच्या लेखनातून सतत डोकावत राहिला, हे निदान महाराष्ट्रातील वाचकांना तरी मुद्दाम सांगायची गरज नाही.

गांधीजींच्या विचारांची मांडणी करताना गांधीजींच्या स्वत:च्या प्रयोगशील अनुभवसमृद्धतेवर भर दिल्यावर पांढरीपांडे गांधींवरील प्रभावही स्पष्ट करारला विसरत नाहीत. राजचंद्र अथवा रायचंदभाई या जैन दार्शनिकाच्या माध्यमातून आत्मसात केलेले भारतीय तत्त्वज्ञान, रस्किन आणि थोरोंसारखे पाश्चात्य विचारवंत आणि समकालीन लिओ टॉलस्टॉय ही गांधीजींची विचारसामग्री आहे. युद्ध आणि हिंसा यांच्याविषयीची आपली मते टॉलस्टॉयच्या मतांशी खूपच जुळतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी टॉलस्टॉयशी पत्रव्यवहार सुरू केला. टॉलस्टॉयने लिहिलेले ‘अ लेटर टु हिंदू’ छापून त्याच्या प्रती वितरीत केल्या.

‘हिंदस्वराज्या’ची मूळ संदर्भचौकट भारताचा स्वातंत्र्यलढा असल्याने ते राजकीय पुस्तक वाटते; परंतु मुख्यत्वे ते नैतिक किंवा नीतिशास्त्रीय असल्याचे पांढरीपांडे यांचे निरीक्षण आहे. आता स्वत: पांढरीपांडे त्यानंतर शतकभराने या पुस्तकावर भाष्य लिहायला प्रवृत्त झाले आहेत, तेव्हा त्या भाष्याची संदर्भचौकट स्वातंत्र्यलढ्याची नसली तरी त्याचा गाभा मुख्यत्वे नैतिक असणार, हे उघड आहे. त्याला धक्का लावायचे काहीच कारण नाही. परंतु आता ते ज्या संदर्भचौकटीत मांडायचे आहे, ती बदललेली संदर्भचौकट आर्थिक विचारांची आहे, हे एकदा सांगितले म्हणजे त्याचा संबंध जागतिकीकरण आणि उदारीकरणावर आधारित नव्या आधुनिक अर्थव्यवस्थेशी आहे, हे ओघाने आलेच. या बदलालाच ‘मन्वंतर’ समजण्याची चूक शहाणेसुरते लोक करत आहेत. पांढरीपांडे गांधीप्रणित व्यवस्थेला ‘खरे मन्वंतर’ मानतात. गांधीजींचा मुळातला ग्रंथच मानवी जीवनाच्या मूलभूत तत्त्वांविषयी असल्यामुळे त्यांच्या प्रकाशात या व्यवस्थेची समीक्षा करणे, हे नव्या भाष्यकाराचे काम पांढरीपांडे यांनी चोखपणाने पार पाडले आहे आणि ही तत्त्वे त्यांनीच सांगितल्याप्रमाणे मुख्यत्वे नैतिक आहेत.

अर्थशास्त्राची (खरे तर कोणत्याच मानवी व्यवहाराची) नीतीपासून फारकत करता येत नाही, याची कल्पना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या अ‍ॅडम स्मिथलाही होती. मधल्या काळात हा तुटलेला सांधा परत जोडण्याच्या दिशेने काही एक काम अमर्त्य सेन यांनी केल्याचे आपण जाणतो. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।’ अशा सरळ साध्या शब्दांत तुकोबांसारख्या मराठी संताने अर्थव्यवहारास नियंत्रित करणारी नैतिक सूत्रेच सांगितली आहेत.

पाश्चात्य जगात निर्माण झालेल्या भांडवलशाही व्यवस्था, साम्राज्यवाद, हिंसक घुसखोरी, उपभोगवाद या गोष्टी एकमेकांपासून अलग करता येत नाहीत, असे गांधीजींचे निरीक्षण आहे. ज्याला विज्ञान म्हटले जाते, त्याला या गोष्टी साध्य करण्यासाठी राबवण्यात येते आणि विज्ञानामुळे वाढणाऱ्या कार्यक्षमतेमुळे या गोष्टींचा प्रभावही वाढीस लागला आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे, पाश्चात्य संस्कृती हे एक ‘पॅकेज’ असून, त्यातील अमुक गोष्ट घ्यायची व अमुक टाकायची, असे करणे फार अवघड आहे. ‘हिंदस्वराज्य’ कोणाला यंत्रावरील टीका वाटली तर कोणाला ते विज्ञानविरोधी पुस्तक वाटले. वस्तुत: त्याचा असा एकांगी विचारच करता येत नाही. मानव आणि मानवी जीवन यांच्याकडे पाहण्याच्या एक विशिष्ट दृष्टिकोनातून केलेले ते चिंतन आहे आणि हा दृष्टिकोन पाश्चात्य-युरोपियन दृष्टिकोनापेक्षा एकदम वेगळा आहे. पाश्चात्य दृष्टिकोन हा मनुष्यकेंद्रित आहे. निसर्ग हा माणसासाठीच असून, माणसाला अमर्याद उपभोग घेण्याचा विशेष हक्क आहे, असे हा दृष्टिकोन सांगतो. निसर्गाच्या नियमांचे ज्ञान-विज्ञानामुळे होते, हे खरे आहे; परंतु निसर्गावर नियंत्रण ठेवून त्याचे आपल्या अनिर्बंध भोगलालसेला तृप्त करण्यासाठी अमर्याद शोषण करण्यासाठीच, हे ज्ञान मिळवण्यामागची प्रेरणा होती. आधुनिक विज्ञानाचा प्रवक्ता फ्रॅन्सिस बेकन ‘नॉलेज इज पॉवर’ असे म्हणायचा, ते याच अर्थाने. विज्ञान म्हणजे सत्याचा शोध, असा अर्थ असेल, तर गांधीजी या विज्ञानाचे स्वागत आणि समर्थनच करणार, हे उघड आहे. त्यांचा विरोध होता तो विज्ञानाच्या गैरवापराला. या गैरवापरामुळे मानवाच्या नैतिक क्षमतांसह अनेक अंगभूत गुणांवर विपरीत परिणाम होतो आहे, हे त्यांच्या लक्षात आल्रामुळेच त्यांना असे लिहावे लागले. या संदर्भात आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानला जाणाऱ्या रेने दकार्तच्या मताचाही उल्लेख पांढरीपांडे यांनी केला आहे. माणसांनी निसर्गाने Masters and Posserers व्हावे, अशीच त्याचीही इच्छा होती. पांढरीपांडे म्हणतात त्याप्रमाणे ही एकप्रकारची साम्राज्यवादी मनोवृत्तीच म्हणावी लागते. पांढरीपांडे असेही म्हणतात की, “ही मनोवृत्ती भारतीयांच्या मनात पेरावी व त्यायोगे हा समाज कायम इंग्लंडच्या मानसिक-वैचारिक मांडलिकत्वासाठी आणावा, हा मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेचा खरा हेतू होता. गांधीजींनी हे जसे ताडले होते, तसे कुणीच ओळखले नव्हते.”

गांधीजींनी केलेली आधुनिकतेची आणि आधुनिक विज्ञानाची समीक्षा ही मुख्यत्वे भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यातून, परंतु म्हणजेच बाहेरून केलेली होती. मात्र, तिची आंतरिक किंवा आतून समीक्षा करणाऱ्यांच्या लक्षातही अशा काही गोष्टी आल्याखेरीज राहिल्या नाहीत. दकार्तप्रणित गणितनियंत्रित विज्ञानाच्या संकल्पनेच्या मर्यादा हुसरसारख्या तत्त्वज्ञाने दाखवून दिल्या. अलीकडच्या काळात तर मानवी विवेकाची स्वायत्तता व समीक्षाक्षमता नाकारणाऱ्या प्रत्यक्षार्थवादी (पॉझिटिव्ह) विज्ञान संकल्पनेला हॅबरमास या तत्त्ववेत्याने ती मानवाला नियंत्रणामध्ये असलेल्या स्वारस्यामुळे निर्माण झाली असल्याचे सांगून ती अपुरी असल्याचे प्रतिपादन केले आहे. प्रत्यक्षार्थवादी मानवाच्या इतर ‘इंटरेस्ट्स’कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची मानवी जीवनाबाबतची कल्पनाच संकुचित ठरते, असे हॅबरमास सांगतात. ही गोष्ट जशी मानवी विवेकाच्या स्वायत्ततेला बाधक आहे, तशीच ती मानवाच्या प्रतिष्ठेलाही बाधक आहे. येथे मानवाचा विचार फक्त भौतिक-शारीरिक पातळीवर केला जाऊन त्याच्या जीवनाला याच पातळीवर रोखण्यात येते. त्याच्या आत्मिक विकासास हे घातक आहे.

पाश्चात्य संस्कृतीच्या या भांडवलशाही-साम्राज्यवादी प्रवृत्तीला पर्याय देण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्सने केला. मार्क्स व त्याची विचारधारा ही जवळजवळ शतकभर तिच्या शत्रुस्थानी प्रबळ ग्रह म्हणून वावरली. पण शेवटी तिला माघार घ्यावी लागली. असे का झाले, याची फार चांगली मीमांसा पांढरीपांड्यांनी केली आहे. मार्क्सवाद झाला तरी तीसुद्धा पाश्चात्य संस्कृतीचीच निर्मिती असल्यामुळे त्याला भांडवलशाहीची मूलभूत तत्त्वे मान्यच आहेत आणि पांढरीपांडे यांनी मांडलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा तर मार्क्सवादातील अंगभूत विसंगतीतूनच पुढे आला आहे. इतिहासातील बदलत्या अवस्थेमध्ये उत्पादनतंत्र, उत्पादनाची साधने बदलतात, हे त्याने बरोबर सांगितले. प्रत्येक उत्पादन अवस्था ही वेगळे उत्पादनतंत्र घेऊन आलेली असते किंवा ती मुळात वेगळ्या उत्पादनतंत्रामुळेच अस्तित्वात येते. सध्याची अवस्था भांडवलशाहीची आहे आणि श्रमिकांच्या क्रांतीनंतर साम्यवादी किंवा समाजवादी व्यवस्था अस्तित्वात येणार, हे मार्क्स सांगतो. परंतु भांडवलव्यवस्था ज्या उत्पादनतंत्रावर आधारलेली आहे, त्याच उत्पादनतंत्रावर समाजवादी व्यवस्थाही उभी राहील, असे मार्क्स सांगतो. पण मग समाजवाद ही भांडवलशाहीपेक्षा प्रगत अवस्था समजायची, ती का? यावर मार्क्सचे उत्तर आहे की, समाजवादी व्यवस्थेतील उत्पादनसंबंध वेगळ्या प्रकारचे असतील. भांडवलशाहीत उत्पादन साधनांची मालकी भांडवलदार व्यक्तींकडे असते. समाजवादी व्यवस्थेत ती भांडवलदारांकडे न राहता समाजाकडे जाईल. त्यांचे नियंत्रण समाज करील, परंतु उत्पादन साधने तीच राहतील. नेमक्या याच बाबीवर बोट ठेवून पांढरीपांडे लिहितात, “उत्पादनाच्या स्वामित्वाच्या साधनांच्या अनुषंगाने करण्यात येणारी मीमांसा आपल्याला शोषण कसे होते, या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. मात्र ते का होते, त्याचा प्रारंभ कसा व केव्हा झाला; हे मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहतात!”

मानवी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर कोठे तरी त्या ज्या व्यवस्थेत वावरतात आणि जिच्यामुळे परस्परसंबंध प्रस्थापित करतात, त्या रचनेचा किंवा व्यवस्थेचाही परिणाम होत असतो आणि ही रचना मुख्यत्वे उत्पादनसंबंधाची असते, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून मार्क्सने ज्ञानक्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली, याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. परंतु त्यामुळे व्यवस्था बदलली की सर्व काही ठीक होईल, हा भ्रम उत्पन्न झाला. व्यक्तीकडे दुर्लक्ष झाले, संबंध बदलले तरी ते संबंध ज्यांच्यात असतात, त्या व्यक्ती ‘त्याच’ असतात. मालक आणि गुलाम या संबंधात बदल होऊन त्याऐवजी जमीनदार आणि कूळ हा संबंध आला. जमीनदार व कूळ हा संबंध जाऊन त्याची जागा भांडवलदार आणि श्रमिक यांच्यातील संबंधाने घेतली आणि आता तोही जाऊन तेथे कम्युनिस्ट क्रांतीने ज्या कोणत्या संबंधाची प्रस्थापना केली, त्याने प्रश्न सुटला का? या प्रश्नाचे उत्तर रशियाने दिलेले आहे. तेव्हा व्यवस्थेचे महत्त्व मान्य करूनही ती व्यक्तीला पर्याय ठरू शकत नाही. मानवी स्वभाव नावाची स्थिर वस्तू नसतेच; तो व्यवस्थेने घडतो, असे कितीही म्हणत राहिले तरी रशियात व्यवस्था बदलल्यानंतर रशियन लोकांचा स्वभाव का बदलला नाही, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गांधीजींनी स्वामित्वाऐवजी विश्वस्ताची कल्पना मांडली, तेवढ्यावरून त्यांना युरोपियन कसे ठरवता येईल? व्यक्तिवादी म्हणून वासलात कशी लावता येईल? पांढरीपांडे यांचे मुद्दे विचार करायला लावणारे आहेत, यात शंका नाही.

गांधीजींनी ‘हिंदस्वराज्य’ लिहिले, तेव्हा भारतीय चिंतनाची प्रदीर्घ व समृद्ध परंपरा त्यांच्या मागे तर होतीच; शिवाय दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात त्यांना आलेला अनुभवही त्यांच्या गाठी होता. परंतु दरम्यान पाश्चात्य विचारवंतांनीही अंतर्मुख होऊन आपल्या परंपरेचे आत्मपरीक्षण सुरू केले होते. त्यांच्या आत्मटीकेचाही लाभ गांधींना झाला व त्यातून स्वतंत्र जीवनदर्शन अर्थात नवा जीवनादर्श स्वत:च्या चिंतनातून सिद्ध केला, असे पांढरीपांडे दाखवतात. या नव्या ‘पॅरेडाइम’ किंवा प्रमाणकामध्ये राष्ट्रभक्तीला स्थान असले तरी राज्यवादाला थारा नसल्याचे पांढरीपांडे सांगतात. या अर्थाने गांधीजी मार्क्सप्रमाणेच पक्के अराज्यवादी आहेत. पाश्चात्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे अनुकरण करत वासाहतिक काळात भारतीय विचारवंतांनी जो राष्ट्रवाद मांडला, तो खरे तर सत्ताकेंद्रित असा राज्यवाद होता आणि त्यासाठी हिंसेची आवश्यकता होती. गांधीजींनी विकेंद्रित ग्रामराज्यपद्धतीचा पुरस्कार केला तो त्यांना राष्ट्रवादाच्या नावाखाली येणारा राज्यवाद नको होता, म्हणून.

स्वराज्यासाठी लढणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या त्यागाबद्दल आणि क्लेशाबद्दल गांधींनी त्यांचा नेहमीच गौरव केलेला आहे; परंतु ते त्यांना ‘वाट चुकलेले’ म्हणत, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. ‘हिंदस्वराज्या’तही हा विषय आलेला आहे. वस्तुत: या मंडळींची स्वराज्याची संकल्पना ब्रिटिशांना भारतातून घालवून देणे, अशा मर्यादित स्वरूपाची होती आणि त्यासाठी ते ब्रिटिशांच्याच म्हणजे हिंसेच्या मार्गाचे अवलंबन करणार होते. या दोन्ही बाबींत गांधींना पाश्चात्य सभ्यतेचे अनुकरण दिसले. गांधीजींचा काळ हा प्राच्यवादाच्या (ओरिएंटॅलिझम) भरभराटीचा काळ होता. पाश्चात्य भारतवेत्यांनी व इतिहासकारांनी उभी केलेली भारताची प्रतिमा प्रमाण मानूनच भले-भले विचारवंत विचार आणि कृती करत होते आणि या प्रतिमेत कोठे उणीव दिसली तर ती पाश्चात्यांच्याच अनुकरणाने भरून काढण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या ज्ञानविज्ञान-तत्त्वज्ञानाची मांडणी पाश्चात्य विचारांच्या चौकटीत आणि त्या चौकटीत उपलब्ध असणाऱ्या ‘कॅटेगरिज’च्या साह्याने करत होते. पण याचाच अर्थ असा होतो की, पाश्चात्यांचे श्रेष्ठत्व मान्य करून, त्यांचे आदर्श स्वीकारून आपणही त्यांची बरोबरी करू शकतो, हे दाखवण्याची ती धडपड होती. पाश्चात्य- विशेषत: ब्रिटिश पद्धतीची लोकशाही पूर्वी आमच्याकडे होती, असे दाखवण्याचा प्रयत्न ही अशीच एक प्राच्यवादी गफलत होय. गांधीजींनी या प्राच्यवादाला बळी पडायचे नाकारले. त्यांनी पाश्चात्य कल्पनांनाच आव्हान दिले. ब्रिटिशांच्या पार्लमेंटरी लोकशाही पद्धतीचाच पंचनामा केला.

गांधीजींनी मानवाबद्दल आणि विश्वाबद्दल जे विचार मांडले, ते विज्ञानविरोधी असल्याचे समजून त्यांच्यावर तेव्हा टीकाही झाली; परंतु नंतरच्या काळात विज्ञानात जी भर पडत गेली, तिच्यामुळे गांधीविचारांना विज्ञानाचेही पाठबळ मिळणे शक्य असल्याचे पांढरीपांडे निदर्शनास आणतात. गांधींच्या या प्रतिभासामर्थ्याला व द्रष्टेपणाला दाद दिलीच पाहिजे.

इस्पितळे, न्यायालये आणि रेल्वे या ब्रिटिश राज्याच्या ‘देणग्यां’बद्दल भारतात कौतुकाची भावना सार्वत्रिक असताना गांधीजींनी त्याच्यावर टीका केली, तेव्हा अनेकांना ते विक्षिप्त वाटणे स्वाभाविक आहे. गांधीजींच्या या टीकेचा रोख नेमका कशावर होता याचे समर्पक स्पष्टीकरण पांढरीपांडे करतात, ते मुळातूनच वाचायला हवे. स्वराज्य म्हणजे परक्यांच्या नियंत्रणापासून मुक्ती, असा संकुचित अर्थ न घेता गांधीजींनी स्वत:चे स्वतःवरील राज्य म्हणजे नियंत्रण, असा तो सकारात्मक केल्यामुळे गरजांवरील नियंत्रण महत्त्वाचे ठरते. आधुनिक अर्थव्यवस्था ही आधी माणसांच्याच गरजा वाढवते, नसलेल्या गरजा निर्माण करते; मग त्या पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवणे, त्यांची जाहिरात करून ती खपवणे, हे एक दुष्टचक्र झाले आहे. या चक्रामुळे सृष्टीचेच चक्र धोक्यात येण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत गांधीप्रणित ‘स्वराज्या’ची संकल्पना उपयोगी ठरू शकते.

मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असल्राच्या गृहितावर आधारलेल्या पाश्चात्य सभ्यतेने माणसात अंगभूत असलेल्या बौद्धिक क्षमतांना बोथट करून माणसाची ‘उपभोक्ता’ हीच खरी ओळख असल्याची हाकाटी चालवली आहे. उपभोगाच्या या धगधगत्या कुंडात कशाचीही आहुती द्यायला ती सिद्ध झाली आहे. अशा प्रसंगी गांधींसारखा एखादा आस्तिक मुनी भर यज्ञमंडपात उभा राहून हे संहारसत्र संपवण्याचे आवाहन करत आहे, असे जे चित्र ‘हिंदस्वराज्य’ वाचल्यानंतर उभे राहायला हवे, ते पांढरीपांडे यांचा ग्रंथ वाचल्यानंतर राहते. गांधीविचारांचे प्रमुख भाष्यकार महाराष्ट्रात होऊन गेले, हे आपण जाणतोच. विनोबा भावे, काका कालेलकर, शं.दा. जावडेकर, दादा धर्माधिकारी आदींच्या या समृद्ध परंपरेत प्रा.सु.श्री. पांढरीपांडे यांचा समावेश झाला आहे. पांढरीपांडे ही परंपरा अधिक समृद्ध करतील याची मला पूर्ण खात्री आहे.

...............................................................................................................................................................

डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘निवाड्याचा ठाव’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5129/Nivadyacha-Thav

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 15 October 2019

सदानंद मोरे,

तुमच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने गांधींची भलामण केलेली पाहून सखेदाश्चार्य वाटलं. मला पंढरीपांडे यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. त्यांनी अंगभूत श्रद्धा व बुद्धीच्या बळावर गांधींवर टिपण केलं आहे. ते त्यांच्या जागी योग्य असतीलही.
मात्र गांधीबद्दल जे गैरसमज या लेखातनं डोकावतात त्यांचं निराकरण करायला हवं. १.

महात्मा गांधींचा विचार संपवण्यासाठी त्यांच्या काही विरोधकांनी कट शिजवून त्यांची हत्या केली,

साफ चूक. गांधींनी टेररिस्ट फायनान्सिंग केलं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. शिवाय त्यांनी उपोषण थांबवण्यासाठी ज्या ७ अटी टाकल्या होत्या त्या सर्व हिंदुविरोधी होत्या. हा गांधी जर जिवंत राहिला असता तर त्यानं हिंदूना विकून खाल्लं असतं. काश्मिरातल्या आक्रमकांना ५५ कोटी दिल्यावर हा गांधी हैदराबादचा तुकडा पाडायला निघाला होता. म्हणून त्याला उडवला.
२.
या कटवाल्यांनी गांधीजींच्या पंचभौतिक देहाची हत्या केली; परंतु गांधीजींचा विचार मात्र ते मारू शकले नाहीत.

हा जो काही गांधीविचार आहे तो मारण्यासाठी त्यांची हत्या करायची काहीही गरज नाही. हा विचार काँग्रेसने कधीच ठार मारला होता. म्हणून गांधीनी १९४६ साली काँग्रेसचे विसर्जन करावे असं सुचवलं होतं.
३.
गांधीजींचा विचार काठेवाड-गुजरातपुरता किंवा हिंदू धर्मापुरता किंवा भारत देशापुरता मर्यादित कधीच नव्हता; तो अखिल मानवमात्रांसाठी होता.

तीच तर नेमकी रड आहे. भारताची फाळणी केली ती याच गांधींच्या विचारांच्या आधारावर ना? मग भारतीयांनी या विचाराला का म्हणून डोक्यावर घ्यायचं? हा विचार जर काठेवाडात अडकून राहिला असता तर सरदार पटेलांनी त्या जुनागडच्या नबाबासारखा विसर्जित केला असता. पण भारताच्या दुर्दैवाने हा विचार भारतभर पसरला.
४.
याउलट, त्यांचे विरोधक कोणत्या तरी संकुचित दृष्टिकोनातून विचार करत होते.

साफ चूक. गांधी जर जिवंत राहिला असता तर हैदराबादचा तुकडा पडला असता. नथुराम गोडसे आणि कोट्यावधी भारतीयांना नेमकं हेच टाळायचं होतं.
५.
गांधीजींचे नाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी अतूटपणाने जोडले गेले आहे यात शंका नाही.

परत एकदा साफ चूक. गांधींनी जी काही आंदोलनं चालवली त्यांची फलनिष्पत्ती नगण्य होती. गांधींमुळे भारतास स्वातंत्र्य मिळालेलं नाही. नेताजींनी आझाद हिंद सेना उभारली तिच्यामुळे भारतास स्वातंत्र्य मिळालं. दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिकांना ब्रिटीशांकडनं हीन वागणूक मिळाल्याने भारतीय सैनिक ब्रिटीश वरिष्ठांवर नाराज होता. ब्रिटिशांकडे निष्ठावान सैन्य न उरल्यामुळे त्यांन काढता पाय घ्यावा लागला.
६.
ब्रिटिश साम्राज्यशाहीचा आणि इस्लामी फुटीरवादाचा खरा शत्रू गांधीच आहे,

गांधी हा ब्रिटीशांचा चमचा होता. हे माझं मत नसून तुर्कस्थानातली खिलाफत नष्ट करून त्याजागी लोकशाहीचे स्थापना करणाऱ्या कमाल पाशा अतातुर्क याचं म्हणणं आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे आणि इस्लामी फुटीरवादाचे खरे शत्रू गांधी नसून सावरकर व नेताजी सुभाष आहेत.
७.
पण भारताचा स्वातंत्र्यलढा ही आता इतिहासजमा झालेली घटना आहे.

तरीपण याच लढ्यातून निर्माण झालेला फाळणीचा धडा आजिबात इतिहासजमा झालेला नाही. गांधीविचारांच्या नावाखाली भारताचा आजूनेक तुकडा पाडायचा डाव नसेल कशावरून ?
८.
या हिंसात्मक प्रवृत्तीचा संबंध गांधीजी पाश्चात्य सभ्यतेशी लावतात.

हेच तर चुकीचं आहे. राम, अर्जुन व शिवाजी महाराजांनीही हिंसेचाच मार्ग अवलंबला होता. कंटाकांचे निर्दाळण ही सुद्धा एक प्रकारची दयाच आहे. पण गांधींची दया हिंदूंच्या मुळावर उठणारी आहे. गांधीदयेचा त्याग करणं सर्वस्वी इष्टं.
९.
थोडक्यात सांगायचे म्हणजे, पाश्चात्य संस्कृती हे एक ‘पॅकेज’ असून, त्यातील अमुक गोष्ट घ्यायची व अमुक टाकायची, असे करणे फार अवघड आहे.

का म्हणून अवघड आहे? मेकॉलेछाप शिक्षणातनं बुद्धी धारदार होत नाही. म्हणून हे कार्य अवघड वाटतं. मला यथोचित काटछाट करून भारतीय संस्कृतीस सुविहित तेव्हढंच घ्यायला फार आवडेल. त्यासाठी जे काही बौद्धिक परिश्रम घ्यावे लागतील ते घ्यायची माझी तयारी आहे.
असो.
बाकी उर्वरित लेखाशी बऱ्यापैकी सहमत. गांधींची शैक्षणिक मतं मला पटतात.
आपला नम्र,
गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......