अजूनकाही
२ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी झाली. जगभरात जेव्हा डाव्या चळवळीत उदयास येत होत्या, तेव्हा भारतात ‘गांधी’ नावाचा झंझावत डाव्या चळवळीसमोर खूप मोठा विरोधाभास तयार करत होता. गांधी कम्युनिस्टविरोधी आहेत, या प्रचार\समजाला डावे बळी पडले. गांधींनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर ‘हिंसावजा डावा विचार असेल तर स्वागतच करू’ हे स्वीकारले होते.
१९५७मध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले जगातले पहिले कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये स्थापन झाले. या सरकारचे पहिले मुख्यमंत्री ई. एम. एस. नमुद्रीपाद होते. त्यांनी गांधींसोबत स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय काम केले होते. पुढे वैचारिक मतभेदामुळे झाल्याने ते कम्युनिस्ट चळवळीत सक्रीय झाले. त्यांनी गांधींवर ‘महात्मा इन इझम’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. (हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध आहे.)
हिंदुत्ववाद्यांनी गांधींची हत्या केली, ती त्यांचे विचार समजून न घेतल्याने. पण गांधीविचाराची हत्या करण्याचे श्रेय काँग्रेससोबत येथील डाव्या चळवळीकडेही जाते. या सर्व विपरीत परिस्थितीत एक अपवादात्मक नाव घेता येईल, ते म्हणजे कॉम्रेड शंकर गुहा नियोगी. गांधी जयंतीच्या तयारीसाठी भिलईला (छत्तीसगढमधील एक औद्योगिक शहर) आलेले असताना त्यांची २७ सप्टेंबर १९९१ रोजी भाडोत्री गुंडांनी हत्या केली. एक कॉम्रेड दर वर्षी गांधी जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतो, हे स्वीकारणे सोडा, ऐकणेही अनेकांच्या पचनी पडण्यासारखे नव्हते.
२८ सप्टेंबर २०१० रोजी नियोगींच्या शहिद दिनानिमित्त भिलईच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. हजारो लोक लाल-हिरव्या रंगाचे कपडे घालून लाल-हिरवा झेंडा हातात घेऊन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘कॉम्रेड नियोगीजी को लाल जोहर’ व ‘नियोगी एक व्यक्ती नहीं, धारा थी और धारा रहेगी।’ अशा अनेक घोषणा दिल्या जात होत्या. मुख्य व्यासपीठावर जनकवी फगुराम यादव यांच्या क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम चालू होता. भाषणेही होत होती. एक वक्ता आपल्या भाषणात छत्तीसगढ़ीमधून म्हणाला- “पूंजीपती मनह, कॉम्रेड शंकर गुहा नियोगीला मारे नहीं, बलकी हमर छत्तीसगढ़ के गांधीला मारे है। हमन लाल हरा परिवार पूंजीपतीला बतातह, नियोगीके के रास्थाला हम कभी नहीं भूलना है। शहिद का सुरता मा यह जंग जारी रखना है।” (“भांडवलदारांनो, तुम्ही कॉ. शंकर गुहा नियोगींना मारलं नसून आमच्या ‘छत्तीसगढ़च्या गांधी’ला मारलं आहे. आम्ही लाल-हिरवा परिवार भांडवलदारांना सांगतो आहो की, नियोगींनी दाखवलेला मार्ग आम्ही कधीही विसरणार नाही. शहिदाच्या आठवणीत आम्ही ही लढाई चालू ठेवू.”)
गांधींना जाऊन ६२ वर्षे झाली. इतक्या वर्षांनंतर एका कम्युनिस्ट नेत्याला ‘छत्तीसगढ़चा गांधी’ संबोधले जाते, हे आश्चर्यजनक वाटत होते. एका राज्यातील जनता आपल्या नेत्याला ‘गांधी’ संबोधते, डाव्या विचाराच्या दृष्टिकोनातून एका कॉम्रेडला असे संबोधणे खूप आव्हानात्मक वाटत होते.
१९४२मध्ये पश्चिम बंगालमधील जलपाईगुड़ी जिल्ह्यात जन्म झालेला ‘धीरेश’ छत्तीसगढ़मध्ये येऊन ‘शंकर’ झाला, इथपर्यंतचा नियोगींचा प्रवास थक्क करणारा आहे. १९६३पासून संघर्ष, नंतर सीपीआय, सीपीएमपासून पीपल्स वॉर ग्रुप (नक्षलवादी गट) पर्यंत सर्व संघटना बाजूला सारत १९७७च्या आणीबाणीनंतर तुरुंगातून बाहेर पडल्यावर ‘छत्तीसगढ़ मुक्ती मोर्चा’ बनवण्यापर्यंतचा नियोगींचा वैचारिक बदल हा ‘सर्जनशीलते’चा परमोच्च बिंदू म्हणता येईल.
आणीबाणीनंतर बंगाल व केरळमधील कम्युनिस्ट प्रभाव वाढला असला तरी हिंदी भाषिक प्रदेशात तो कमी होत गेला. पण मध्य प्रदेशाचा भाग असलेला आणि त्या वेळी सात जिल्हे असलेला छत्तीसगढ़ नियोगींनी डाव्या चळवळीचा गड बनवला होता. १९७७ ते १९९१ अशा १४ वर्षांच्या कालखंड एक कॉम्रेड गांधी, आंबडेकर आणि मार्क्सच्या मार्गाने संघटना बांधणी करत होता. त्या वेळी भारतातील कम्युनिस्ट चळवळीत सर्वत्र नेतृत्व करणारे ब्राह्मण होते, पण छत्तीसगढ़ याला अपवाद होता. ‘छत्तीसगढ़ मुक्ती मोर्चा’चे नेतृत्व स्थानिक आदिवासी, दलित, ओबीसी व महिला करत होत्या. भारतातील कम्युनिस्ट संसदीय किंवा सशस्त्र मार्गाने संघर्ष करून राजसत्ता हस्तगत करण्याचे आणि क्रांती करण्याचे स्वप्न पाहत होते. आणि नव्या पिढीलाही हेच स्वप्न दाखवत होते. पण या विचाराला कॉम्रेड नियोगी अपवाद ठरतात. संवेदनशील माणूस निर्मितीत गांधीनंतर मास लेवलवर काम करणारा नियोगींशिवाय दुसरा नेता मला तरी स्वतंत्र भारतात दिसत नाही.
नियोगींच्या हत्येनंतर लिहिलेले ‘संघर्ष व निर्माण’ हे सहाशे पानी पुस्तक वाचल्यावर आणि मागच्या काही वर्षांपासून गांधी समजून घेतल्यावर असे वाटते की, गांधी ही सतत विकसित होणारी सर्जनशीलची अवस्था होती. ‘नयी तालीम’ या गांधींच्याची शिक्षण पद्धतीत सर्वसमावेशकता अभिप्रेत होती. कदाचित सर्वच अर्थाने जमली नाही, पण जेवढी शक्य तेवढी सर्जनशीलता नियोगींनी प्रत्यक्ष उतरवली. नियोगी १९७७ ते १९९१ या १४ वर्षांच्या काळात संघटित व विकेंद्रित (decentralized) स्वरूपात ‘संघर्ष व निर्माण’ काम करत होते. याकडे गांधींचा चष्मा घालून एकदा बघायला पाहिजे, तेव्हा समजेल की, त्यांना ‘छत्तीसगढ़चा गांधी’ का म्हणतात!
मार्क्सवादी विचारवंत अंतोनियो ग्राम्ची यांनी ‘वॉर ऑफ पोझिशन’ म्हणजे ‘स्थिती युद्व’ व ‘गती युद्ध’ या नावाने एक सिद्धान्त मांडला आहे. गांधींनी भारतात तीन मोठी आंदोलने केली, ज्याला ‘गती युद्ध’ म्हणता येईल. १९२१चे असहकार आंदोलन, १९३१चा मिठाचा सत्यग्रह आणि १९४२चे भारत छोड़ो आंदोलन. या प्रत्येक संघर्षात दहा-दहा वर्षांचा कालखंड होता. हे होते ‘स्थिती युद्व’. नियोगींनी या विधायक कामासाठी ‘निर्माण’ हा शब्द वापरला.
ज्या वेळी आपण अनेक मुद्दे (आरोग्य, शिक्षण, रोजगार) घेऊन एखाद्या माणसाकडे जातो, ते असते ‘निर्माण’. ही सृजनाची अवस्था आहे. यात दवाखाना, शाळा, श्रमिक संकृती, खेळ, संगीत, मोहला कमिटी असे असंख्य विषय जोडता येतात. आपण ज्या वेळी प्रस्थापित शासन किंवा प्रशासन यांच्याकडे एखादी मागणी करतो, तेव्हा ती पूर्ण होईलच असे नाही. तेव्हा ती आपण स्वत: निर्माण केली पाहिजे. या निर्माणच्या प्रक्रियेमधून समतामूलक ‘माणूस’ बनला पाहिजे. नियोगींनी भांडवलदारांना फक्त विरोधच केला नाही, तर प्रत्यक्ष भांडवलदार निर्माण करत असलेल्या ‘वस्तूं’चे अजून जास्त प्रमाणात उत्पादन कसे घेता येईल, याचे मार्गदर्शन भिलईमधील अनेक व्यापाऱ्यांना केले होते.
नियोगींनी दल्ली राजहराच्या लोखंडाच्या खाणीसाठी बनवलेला ‘अर्ध मशीनीकरणा’चा सिद्धान्त हा ‘निर्माण’चा उत्तम पुरावा आहे. या निर्माणच्या प्रक्रियेने छत्तीसगढ़मधील श्रमिक जात-वर्गाचे जनजीवन ढवळून निघाले होते.
नियोगींचा संघर्ष खूप व्यापक अर्थाने असला तरी मला जो समजला तो असा की, एकच मुद्दा घेऊन सत्ताधारी शासन व प्रशासनासोबत लढाई करणे. या काळात छत्तीसगढ़ मुक्ती मोर्चाचे ३५च्यावर कार्यकर्ते मारले गेले, पण चळवळ डगमगली नाही. सर्वहारा वर्ग संघटित करून शासन व प्रशासन यांच्यावर लोकशाही मूल्यावर आधारित जरब बसवली. हा संघर्ष तीव्र करायचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त निर्माण करावे लागणार आहे, हे छत्तीसगढ़ी जनतेला दाखवून दिले.
गांधींची ‘अहिंसा’ नियोगींनी आंदोलनात प्रत्यक्ष मास लेवलवर उतरवली. एवढे मोठे जन संघटन असून कोणतीही हिंसात्मक कृती झाली नाही. उलट पोलिसांना हा विश्वास होता की, छत्तीसगढ़ मुक्ति मोर्च्यामध्ये कितीही मोठा जनसागर आला तर हिंसा होणार नाही. नियोगींच्या हत्येनंतर प्रचंड मोठा जन समुदाय भिलईला निषेधासाठी एकत्र आला, पण आपला आक्रोश शांततामय मार्गाने व्यक्त केला. भारतात ‘निर्माण व संघर्ष’चे राजकारण देणारा नियोगी हा एकमेव कम्युनिस्ट नेता होऊन गेला, जो इतर प्रस्थापित कम्युनिस्ट नेत्यांपेक्षा कितीतरी वेगळा होता!
२८ सप्टेंबर २०१९ला नियोगींना शहिद होऊन २७ वर्षे पूर्ण झाली. ज्यावेळी धर्मांध सरकार संसदीय लोकशाही मार्गाने सत्तेत येते, तेव्हा त्या सत्तेला प्रश्न विचारून जन आंदोलन उभे करायला पाहिजे. या जन आंदोलनात मार्क्स, गांधी, आंबेडकर व नियोगींनी सांगीतलेल्या ‘संघर्ष व निर्माण’शिवाय पर्याय नाही!
pratapvimalkeshav@gmail.com
............................................................................................................................................................
रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India
............................................................................................................................................................
लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 09 October 2019
डॉक्टर प्रताप विमल केशव, प्रत्येक गोष्टीत गांधी घुसडायला हवाच का? शांततामय मार्गाने निषेध नोंदवणे ही केवळ गांधींची मक्तेदारी नाही. भले नियोगीना जनतेने गांधी म्हंटलं असेल, पण त्यावरून गांधी जनतेचे नेते होत नाहीत.
शिवाय गांधींची हत्या त्यांनी केलेल्या टेररिस्ट फायनान्सिंगमुळे झाली. तिचा त्यांच्या विचारांशी वगैरे सुतराम संबंध नाही.
आपला नम्र,
गामा पैलवान