‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश’ या घटकांचे मिळून राष्ट्र तयार होते. इटलीचा स्वातंत्र्यसेनानी जोसेफ मॅझिनी याचे हे मत. सावरकरांनी मॅझिनीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रभाव मराठी ब्राह्मण तरुणांवर एकेकाळी फार मोठा होता. हाच वर्ग पुढे हिंदू सभा व संघाच्या माध्यमाने देशभर स्वयंसेवक वा शाखाप्रमुख म्हणून गेला. परिणामी मॅझिनीची भाषा ही संघाची व त्याच्या परिवाराचीही भाषा झाली. त्याआधी भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भाषा संघाचे संस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांनीही वापरली होती. संघाच्या आरंभीच्या व नंतरच्याही स्वयंसेवकांना तशा प्रतिज्ञा त्यांनी दिल्या व घ्यायला लावल्या होत्या. संघाच्या वेगाने व विस्तारानुसार ही भूमिका देशातील ब्राह्मण कुटुंबात व तरुणांतही रुजत गेली. (देशातील ज्या दोन जाती अखिल भारतीय आहेत, त्यांत ब्राह्मण व चर्मकार यांचा समावेश आहे. ही गोष्ट लक्षात घेतली की हा विचार अल्पावधीत देशाच्या अनेक भागांत, एका जातीपुरता का होईना कसा रुजला असावा याची कल्पना येते.)
आपल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात गांधीजींनीही मॅझिनीविषयी लिहिले आहे. हे पुस्तक त्यांनी इंग्लंडमधून आफ्रिकेला जाताना बोटीवरच्या प्रवासात लिहिले. त्यात त्यांनी मॅझिनीच्या सेनापतिपदाचा व शस्त्रसामर्थ्याचा गौरव करण्याहून त्याच्या लोकशाही प्रेमाला अधिक महत्त्व दिले. ज्या इटलीच्या एकीकरणासाठी तो लढला ते एकीकरण झाल्यानंतर अखेरच्या मानवंदनेच्या लष्करी कवायतीत तो खांद्यावर साधी बंदूक घेऊन सामान्य शिपायासारखा अखेरच्या रांगेत उभा होता. त्याचे तेव्हाचे दुःख होते, ‘एवढे सारे लढून आणि इतक्या साऱ्या सैनिकांचे रक्त सांडून आम्ही इटलीत जनतेचे लोकशाही राज्य आणू शकलो नाही. इटलीची सत्ता पुन्हा राजेशाहीच्याच ताब्यात राहिली.’
मॅझिनीकडे पाहण्याचा गांधींचा दृष्टिकोन सावरकरांच्या व हेडगेवारांच्या दृष्टीहून वेगळा होता हे यावरून स्पष्ट व्हावे. हेडगेवारांना संस्था, संघटना उभारायला, ते स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिल्याने वेळ मिळाला. गांधींना ‘हिंद स्वराज्य’ यापलीकडे त्या क्षेत्रात जाता आले नाही. १९१५ मध्ये भारतात आलेले गांधी १९२० मध्ये देशाचे नेते झाले. १९४८ मध्ये त्यांचा खून झाला. हाती असलेल्या २८ वर्षांतील दहा वर्षे त्यांनी तुरुंगात घालविली. स्वातंत्र्याचा लढा, ब्रिटिशांशी वाटाघाटी, काँग्रेसची उभारणी आणि समाजाला एकत्र ठेवण्यासाठी प्राणार्पणापर्यंत जाण्याची त्यांची तयारी या सार्या गोष्टींमुळे त्यांना मॅझिनी व त्यांचा विचार त्याच्या खऱ्या स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचवता आला नाही. उलट एक विचार, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झाल्याने मिळालेला वेळ व एक जात यामुळे हेडगेवार आणि त्यांचे अनुयायी यांचे काम सोपे व सरळ होते. गांधीजींच्या पश्चात सत्तेवर आलेल्या नेहरूंसमोर राष्ट्रउभारणीचे काम अग्रक्रमाचे होते. शिवाय ते समाजवादी होते आणि काँग्रेसमधील बुजुर्गांना समाजवाद मान्य नसतानाही ते त्या बाजूने उभे होते. स्वातंत्र्यलढा, विविध विचारसरणी, कार्यबाहुल्य आणि तुरुंगवास यांत अडकलेली काँग्रेस आणि एका विचाराच्या प्रसाराखेरीज दुसरी जबाबदारी नसणारा संघपरिवार यांची ही वाटचाल लक्षात घेतली की, संघपरिवाराचे आजचे यश व काँग्रेसच्या राजकारणाची एवढ्या वर्षांत झालेली उताराची व काहीशी अधोगतीची वाटचाल यांचा परिणाम व त्यातील अंतर लक्षात घेता येते. आजच्या पडत्या काळातही काँग्रेसला स्वातंत्र्यलढ्याचा अभिमान व त्यातील मूल्यांचा गौरव करता येतो. उलट संघाला तो लढा व ती मूल्ये पुसून काढायची असल्याने ते त्यांचा उच्चारही करत नाहीत. जमलेच तर त्याविषयी ते टवाळखोरीच्या व छद्मी भाषेत बोलताना अधिक दिसतात. यातला दोष ऐतिहासिक वाटचालीचा व तिच्या संस्कारांचा आहे. तेवढाच तो मूळ विचारांमागील भूमिकांचा आहे.
हा काळ कम्युनिस्ट, समाजवादी, हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी या सार्यांचाच, गांधी व त्यांची चळवळ यांवर टीका करण्याचा होता. त्यातल्या हिंदुत्ववाद्यांचा व आंबेडकरवाद्यांचा तर तो त्या चळवळीपासून दूर राहण्याचाही होता. कारणे अनेक होती. गांधी एकटे होते आणि विरोधक विविध मठांत संघटित होते. स्वातंत्र्य हे लक्ष्य आणि त्यासाठी सर्वस्व यावर गांधींचा व त्यांच्या अनुयायांचा भर तर इतरांचा त्यांच्या विचारसरणीवर, जातींच्या उत्थानावर, संघटनांच्या उभारणीवर आणि गांधीजींची चळवळ लहान करून दाखविण्यावर होता. गांधीजींचा खून ही एकच घटना या सार्यांवर लख्ख उजेड पाडणारी किंवा काळोख फिरवणारी आहे.
गांधीजी भारतात येण्यापूर्वी वा त्यांचे नेतृत्व भारतात रुजण्यापूर्वी बॅ. जिना व लो. टिळक यांच्यातील लखनऊ करार झाला होता. त्या कराराने मान्य केलेले मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ हे देश व समाज यात फूट पाडणारे आहेत असे गांधींचे तेव्हापासूनचे म्हणणे होते. परंतु तो करार झाला होता आणि १९१९ च्या मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड कायद्यात तो आलाही होता. पुढे पुणे कराराच्या वेळीही ‘दलितांना विभक्त मतदारसंघ देण्याने देशातच नव्हे तर हिंदू समाजात फूट पडेल व ती तशी पाडण्याचा ब्रिटिशांचा डाव आहे.’ असे गांधीजी म्हणाले. त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध करून संयुक्त मतदारसंघाचा पर्याय दिला व तो सर्वमान्य झाला. नंतरच्या काळात प्रत्यक्ष फाळणीच्या वेळी जिनांना सगळा बंगाल व सगळा पंजाब हवा होता. मात्र तसे केले तर बंगालमधील ३९ टक्के हिंदूंवर तो अन्याय होईल आणि पंजाबातील तेवढ्याच शिखांवर व हिंदूंवर पाकिस्तान लादले जाईल असे गांधींचे म्हणणे होते. त्यासाठी त्या दोन प्रांतांच्या विभाजनाची मागणी करून त्यातील हिंदू व शीख या वर्गांना गांधींनी जिनांच्या ताब्यातून मुक्त केले. गांधीजींची हिंदूविषयक भूमिका समजून घ्यायला या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ही भूमिका गांधींना हिंदुत्ववादी बनवणारी नाही. हिंदूंवर अन्याय होऊ न देण्याची व त्यांच्याच फूट पडू न देण्याची आहे एवढेच येथे लक्षात घ्यायचे. ही भूमिका हिंदू राष्ट्रवादाची वा हिंदू वर्चस्ववादाची नाही.
मॅझिनीची राष्ट्रकल्पना जगाने व इतिहासाने कधीचीच नाकारली आहे. धर्मवर्णादी गोष्टी समाजात ऐक्य राखू शकणार्या असल्या तरी तो म्हणतो तसा एकही देश आज जगात नाही. बहुतेक सारे देश भारतासारखे बहुधर्मी, बहुवर्णी, बहुभाषी व संस्कृतिबहुल आहेत. इंडोनेशिया, फिलिपाईन्स व जपान हे तर शेकडो बेटांवर वसलेले देश आहेत. भारताचीही अंदमान, निकोबार किंवा लक्षद्वीप ही बेटे मुख्य भूमीपासून दूर आहेत. एकधर्मी असणाऱ्या देशातही पंथोपपंथांच्या, आर्थिक वर्चस्वाच्या आणि सांस्कृतिक वेगळेपणाच्या बाबी युद्धस्तरावर आहेत. धर्म व भाषा एक असूनही जगात अरब देशांची संख्या एवढी का? किंवा सोव्हियत युनियन हे संघराज्यांचे संघराज्य १५ स्वतंत्र देशांत तुटले का? पाकिस्तानचे दोन तुकडे झाले ते का? आणि कॅनडामध्ये क्युबेकच्या वेगळेपणाची चळवळ का होते? चीनमध्ये झिजियांग प्रांत वेगळेपण का मागतो? अगदी श्रीलंकेसारख्या चिमुकल्या देशात तामिळांची सिंहलींशी लढत कशी होते?
भारताच्या १३२ कोटी लोकसंख्येत १८ कोटी मुसलमान, २ कोटी शीख, २ कोटी ख्रिश्चन व लक्षावधींच्या संख्येने अन्य धर्माचे लोक आहेत. (शिवाय आजच्या जगात ११४ कोटी लोक स्वतःला सेक्युलर म्हणविणारे आहेत आणि त्यांची भारतातील संख्याही मोठी आहे.) या देशात १४ मान्यताप्राप्त भाषा आहेत. सांस्कृतिक व प्रादेशिक वेगळेपण आहे. दर दहा मैलांनी येथे भाषा बदलते असे आपणच म्हणतो. यातील प्रत्येक गट आपली अस्मिता सांभाळणारा व परंपरा जपणारा आहे. त्या साऱ्यांना त्यांचे सारे विसरून हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आणण्याची संघाची आकांक्षा आहे. तर धर्मासाठी मरू, धर्मासाठी मारू, भाषेच्या वेगळेपणासाठी लढा देऊ, संस्कृती रक्षणार्थ उभे राहू अशी त्यातल्या प्रदेशांची भाषा आहे. या देशात एकाच वेदाचे पठण शतकानुशतके झाले. तीच उपनिषदे सर्वत्र आळवली गेली हे खरे असले तरी हे वेदपठण करणाऱ्यांची व उपनिषदांचे वाचन करणाऱ्यांची, पोथ्या व पुराणे सांगणाऱ्यांची संख्या केवढी होती? त्यातही एकाच जातीची माणसे होती की नाही? हा वर्गही किती टक्क्यांचा होता आणि तो धर्माच्या नावावर हे करीत होता की त्यामागच्या सत्तेच्या आधाराने करीत होता? या प्रश्नांची उत्तरे फार वेगळे सांगणारी आहेत. समाजाचा केवढा वर्ग ते सांगणारा होता, केवढा नुसतेच ऐकणारा होता, केवढा दुर्लक्ष करणारा होता आणि केवढ्यावर ते ऐकू न देण्याचे बंधन होते? शिवाय धर्म एक असला तरी शैवांची आणि वैष्णवांची युद्धे त्यात किती काळ चालली आणि त्यात किती माणसे मारली गेली? हे सारे विसरायला लावण्याचा व समाजाला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांचा, तर त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपानिशी बहरू देण्याचा प्रयत्न उदारमतवादी सेक्युलरांचा आहे. समाज व वर्ग इतिहास विसरतो काय? देश स्वातंत्र्यासाठी लढत असतानाही ते स्वातंत्र्य समाजातील वरिष्ठ वर्गांचे असेल, आमचे नसेल असे म्हणणारे वर्ग देशात होते की नाही आणि आज त्यांच्या भूमिका अधिक धारदार झाल्या आहेत की नाही? राजकीय यश म्हणजे सामाजिक ऐक्य नव्हे. तसे ते एका वर्गाचे वर्चस्वही नव्हे. सामाजिक ऐक्याची साधना व समरसताही ती नव्हे.
जगातली किती राष्ट्रे धर्माने एक केली व किती राष्ट्रे याने तोडली? ख्रिश्चन धर्माचे जगात अनेक देश का आहेत? शिवाय त्यात प्रोटेस्टंट व कॅथलिक यांच्यात संघर्ष का आहे? इंग्लंडसारखा अतिप्राचीन देश याच आधारावर तुटून त्यातून आयर्लंड वेगळे झाले. ज्यू धर्माचे लोक जगात सर्वत्र आहेत. पण युरोपात त्यांना जाळणारे ‘पोग्रोम्स’ किती शतके सुरू होते? धर्माने एकत्र केलेले समाज स्वतंत्र किती व कायद्याने धास्तावलेले किती? ‘स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येक चेटकीण ही वध्य असते.’ असे चौथ्या शतकात सांगणार्या पोपनंतर सोळाव्या शतकापर्यंत युरोपात किती स्त्रिया जाळल्या गेल्या? एकट्या बिकानेर या राजस्थानातील शहरात ओसवाल या एकाच जातीची ३६ सतीमंदिरे आहेत. त्यांची बंगालातली व राजस्थानातली संख्या किती? १८व्या शतकापर्यंत स्त्रीला तिचा विचार लिहू न देण्याची सक्ती युरोपातील किती देशात होती? मुसलमान हा धर्म एक, त्याचा संस्थापक व धर्मग्रंथ एक, पण शिया व सुन्नी हे त्यांचे दोन पंथ परस्परात लढले किती आणि त्यात त्यांनी केलेला रक्तपात केवढा? अजूनही अहमदिया पंथाच्या लोकांना मारणे हा धर्माचा अपराध आहे असे तो का समजत नाही? जपानात बौद्ध व शिंटो या धर्मात किती युद्धे झाली? चीनमध्ये लाओत्से आणि कन्फ्युशिअसच्या धर्ममतांशी बौद्धांनी किती लढाया केल्या? श्रीलंकेत सिंहली बौद्ध व तामीळ हिंदू यांच्यात कितीसे सख्य आहे? मॅनमारमध्ये रोहिंग्यांचे बळी कोण घेतो? ख्रिश्चन व मुसलमान या दोन धर्मात सातव्या शतकात सुरू झालेले धर्मयुद्ध सातशे वर्षे चालून चौदाव्या शतकात संपले. भारतावरची इस्लामची पहिली चढाईही सातव्या शतकातली. येथे गादी कायम करायला त्यांना सातशे वर्षे लागली. या साऱ्या धर्मांनी मिळून मध्ययुगातील त्यांच्या लढायांत किती माणसे मारली? हिंदूंनी माणसे मारल्याच्या नोंदी फारशा नाहीत. पण त्यांनी आपल्याच समाजाचा केवढा मोठा भाग अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर राखला.
धर्म व वंश यांच्या श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना माणसांच्या हत्येला सिद्ध करतात, हा मध्ययुगाचा सांगावा आहे. सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचे अहंकार माणसांना गुलाम करतात हे गोर्यांनी काळ्यांबाबत, हिंदूंमधील सवर्णांनी अवर्णांबाबत आणि मुसलमानांमधील अरबांनी जगातल्या अन्य मुसलमानांबाबत दाखवले. ‘निळ्या डोळ्यांचे व सरळ नाकाचे आर्य हेच जगातले सर्वश्रेष्ठ लोक असून त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे’ असे हिटलर म्हणाला. रोम म्हणाले, ‘आमची भूमी जगातली सर्वांत श्रेष्ठ.’ भारतीय म्हणतात, ‘आमची भूमी ही विश्वगुरूंची भूमी आहे.’ या अहंतांनीही आजवर किती माणसे मारली? या अहंता राजकारणात येतात, त्याला धर्मकारण जोडतात आणि त्यालाच इतरांच्या द्वेषाचीही कडा आणतात. तसे झाले, की त्या हिंस्र होतात.
भाषेचे अहंकारही असेच असतात. आमच्या प्रांतात अन्यभाषिक नकोत. त्यांना नोकर्या नकोत. त्यांना आमच्या प्रांताबाहेर घालवा अशा मागण्या आजही देशात होतात की नाही? इंग्रजी राज्याची स्थापना प्रथम बंगालमध्ये कलकत्त्यात झाली. स्वाभाविकच त्या सरकारात बंगाली बाबूंची भरती मोठ्या प्रमाणावर झाली. आणि त्यांनी आपली मनमानीही त्यात केली. या लोकांनी प्रथम आसामी लिपी नाहीशी केली व त्या भाषेचे वेगळेपणही संपविण्याचा प्रयत्न केला. आजही आसामच्या जनतेत त्याविषयीचा बंगाल्यांवर राग आहे. कोणतीही गोष्ट, मग तो धर्म असो वा संस्कृती ती लादण्याचा प्रयत्न प्रतिक्रियांना जन्म देतो. हे सामाजिक वास्तव लक्षात घेऊनच धोरणे आखावी लागतात. देश एकरंगी बनवायचा की आहे बहुरंगी राखायचा आहे? त्याला त्याचे चेहरे राखू द्यायचे की त्यावर एकच एक मुखवटा चढवायचा?
शिवाय हा देश जातींचा आहे. त्यातला आजचा सार्यात उपद्रवकारक प्रश्न आरक्षणाचा आहे. आरक्षणाने जातिव्यवस्था मजबूत होते की सामाजिक न्यायाची मांडणी? देशातली प्रत्येकच जात आरक्षण मागत असेल (व ते दिले पाहिजे असे म्हणणारे लोक देशात असतील) तर नोकऱ्याच कमी होत जाणार्या या देशात हा विषय वादाचा होईल की संवादाचा? जात, पंथ, वर्ण, भाषा व संस्कृती हे सारे जन्मदत्त विषय आहेत आणि जन्मदत्त विषयांच्या अहंता जन्मभर टिकणाऱ्याही आहेत. स्वातंत्र्याचे आंदोलन हे प्रामुख्याने उत्तरेचे व हिंदी लोकांचे आंदोलन आहे असे म्हणत त्याला विरोध करणारी दक्षिणेतील जस्टिस पार्टी १९२० ते १९५२ पर्यंत बहुमतात राहिली. १९५२च्या निवडणुकीत नेहरूंनी तिचा पराभव केला तेव्हा तिची अहंता ओसरली हा इतिहास आहे. दक्षिणेवर हिंदी लादण्याचे प्रयत्न आजवर फसले. (मुळात हिंदीला विशेष भाषेचा दर्जा तिच्या बाजूने घटनासमितीत एक मत जास्तीचे पडल्यामुळे व काही हिंदीविरोधी सभासदांना गैरहजर ठेवल्यामुळे मिळाले हे कसे विसरायचे?) हिंदीला राष्ट्रभाषा बनविण्याच्या प्रयत्नांविरुद्ध सारा दक्षिण भारत कसा पेटून उठला? केंद्र सरकारने एनसीसीतील आज्ञा हिंदी बनविल्या तेव्हा तामिलनाडूने त्या राज्यातील सारी एनसीसीच बरखास्त केली. याचे स्मरण ठेवायचे की नाही? भाषा प्रादेशिक अहंता जागविते व प्रसंगी केंद्राला त्यापुढे माघारही घ्यावी लागते. याचे एक आणखी उदाहरण पाकिस्तानचे आहे. पाकिस्तान सरकारने पूर्व-पाकिस्तानवर उर्दूचे नियंत्रण लादले तेव्हा तेथील बंगाली मुसलमानांनी तो देश व धर्म विसरून त्याविरुद्ध आंदोलन केले. त्यात लाखो माणसे मेली, लाखो स्त्रियांवर अत्याचार झाले. एक कोटी दहा लक्ष लोक तो देश सोडून भारतात आले. ही घटना तर केवळ साठ वर्षांआधीची.
भारतात भाषावार प्रांतरचना आहे. प्रदेशवार संस्कृतिभिन्नता आहे. धर्म व जातींचे समूह त्यांच्या श्रद्धा-समजुतींचे आग्रह धरून आहेत. जगात एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेल्या देशांची संख्या शंभरावर जाणारी आहे. लोकसंख्येबाबत फ्रान्स हा देश आपल्या कर्नाटकाएवढा. कॅनडा तेलंगणाएवढा, इंग्लंड महाराष्ट्राएवढा तर रशिया व अमेरिका उत्तरप्रदेशांएवढे. ते छोटे देश आपली एकात्मता कशी राखतात? स्वित्झर्लंडची लोकसंख्या पन्नास लाखांहून कमी असली तरी त्यात २२ प्रांत (कॅन्टन्स) आहेत. जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमान्श ह्या चार भाषांना तेथे राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता आहे. त्या चारही भाषांतून कायदे प्रसिद्ध होतात. तसे न केल्याने रशियाचे महासंघराज्य तुटले. चीनचा शांघाय विभाग आणि तिबेट यात साम्य किती आणि आपले मिझोरम, मणिपूर आणि मद्रास व महाराष्ट्र यातला वेगळेपणा किती? लोकांचे प्रेम त्यातल्या वेगळेपणावर किती आणि साऱ्यांच्या ऐक्यावर किती? यातली किती राज्ये आपणही लष्कराच्या बळावर ताब्यात ठेवली आहेत? शिवाय ऐक्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्नही देशात आहेत. जर्नेलसिंगाचा उदय, बाबरी मशिदीचा विध्वंस, ओरिसातील चर्चेसची जाळपोळ, दिल्लीतील शिखांचे हत्याकांड, गुजरातेतील मुसलमानांची कत्तल, मिझोरम व मणिपुरातील अत्याचार आणि काश्मीर? तेथे सामान्यपणे दरमहा पाच ते सात तरुण मारले जातात. गेल्या साठ वर्षात ही संख्या कुठवर गेली असेल? या प्रश्नांची काळजी किती जण करतात आणि त्याला टाळ्या वाजवून शाबासकी किती जणांकडून मिळते?
मिझोरम व नागालँड हे प्रदेश ब्रिटिशांनी १९२६ मध्ये यांदाबुच्या तहाने जिंकून भारताला जोडले. त्यानंतर देशात आलेल्या सायमन कमिशनसमोर त्या प्रदेशाच्या लोकांनी ‘तुम्ही भारत सोडाल तेव्हा आम्हांलाही मोकळे करा.’ अशी मागणी केली. पुढे स्वातंत्र्य आले तेव्हा तीच मागणी त्यांनी माऊंटबॅटनसमोर ठेवली. त्यावर ‘तुम्ही गांधीजींशी चर्चा करा’ असे माऊंटबॅटन यांनी त्यांना समजावले. तेव्हा ‘वीस वर्षे ब्रिटिशांसोबत राहिलात, दहा वर्षे आमच्यासोबत राहा. कदाचित आपण एक होऊ.’ असा दिलासा गांधींनी दिल्यानंतर ते प्रदेश भारतात राहायला राजी झाले. १९५७ मध्ये नागांनी तीच मागणी केली तेव्हा भारताने तेथे सैन्य पाठवून ती दडपून टाकली. १९६७ मध्ये मिझोराममध्येही त्याने तेच केले. तेव्हापासून ते प्रदेश लष्करी कायद्याखाली आहेत. काश्मीरही त्याच कायद्याखाली आहे. शर्मिला इरोम नावाची मुलगी लष्करी अत्याचारांविरुद्ध सोळा वर्षे उपोषण करते तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? ती निवडणुकीत पराभूत झाली असेल पण दीड दशकांचा तिचा आकांत तेथील लोकांच्या मनात भरून असणारच की नाही? पूर्वी इम्फाळजवळ मनकर्णिका नावाच्या तरुणीवर लष्करी जवानांनी बलात्कार केला व तिचे प्रेत जंगलात फेकून दिले. त्याविरुद्ध मणिपुरातील सार्या महिला अधिकाऱ्यांनी, प्राध्यापक, पत्रकार, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जगातला पहिला नग्न निषेध मोर्चा काढला तो कोण कसा विसरेल?
देश एक आहे. त्याची प्रादेशिकता अखंड आहे. मात्र त्यातली माणसे त्याची नागरिक असूनही वेगवेगळ्या प्रकारचे जीवन अनुभवणारी व जगणारी आहेत. त्यांना तसे जगू द्यायचे की त्यांना एका चरकात घालून त्यांचा रस काढायचा? आता तर कित्येक दशके देशात राहिलेल्या व त्याचे नागरिकत्व अनुभवलेल्या लोकांना आसामातून काढायचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. तो एखादे वेळी काश्मिरातही केला जाईल. पंजाबात याचे दुष्परिणाम, त्याचा आरंभ कोणीही करो, आपण अनुभवले आहेत. देशात खलिस्तानची चळवळ होती. द्रविडीस्तानची होती. काश्मीरची आहे. मणिपूर-मिझोरमच्या आहेत. या सार्या संघर्षरत वर्गात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे आव्हान मोठे आहे.
नुकतेच न्या. रंजन गोगोई म्हणाले, ‘देश म्हणजे सर्वसमावेशकता आणि राज्य म्हणजे न्याय. हा बंधुत्वाचा व्यवहार आहे.’ राज्यात अन्याय असेल, राज्य लोकांच्या भावभावनांचे व वेगळेपणाचे मारक असेल, तर वेगळे काय व्हायचे असते? समाजाचे प्रश्न देवाणघेवाणीतून व त्यातही मोठ्यांनी जास्तीचे सोडूनच यशस्वी होतात. ही वृत्ती कुठे आहे? इथे तर बहुसंख्यच जास्तीच्या मागण्या घेऊन इतरांना त्यांचे मोल मागताना दिसत आहेत. हे चित्र बदलेल. किमान ते बदलावे अशीच सगळ्या राष्ट्रप्रेमींची भावना असेल.
धर्मवंशासारख्या जन्मदत्त श्रद्धाच माणसांना हिंस्त्र बनवतात असे नाही. विचारांचे कडवेपणही तो हिंसाचार समाजात आणत असते. जगात धर्माने अधिक माणसे मारली की विचारांनी? या प्रश्नाचे उत्तर अजून अभ्यासकांनी शोधले नाही. ऑर्थर पामर या अमेरिकेन राष्ट्रदूताने मांडलेल्या हिशेबात एकट्या विसाव्या शतकात विचारसरणीच्या कडवेपणाने आणि त्यावर स्वार झालेल्या हुकुमशहांनी जगातली सोळा कोटी नव्वद लाख माणसे मारली आहेत. यात हिटलरने दोन कोटी, स्टॅलिनने पाच कोटी तर माओने सात कोटी माणसे मारली वा ती मरतील अशी व्यवस्था केली. (यात युद्धात मारले गेलेल्यांचा समावेश नाही.) याखेरीज ख्मेरूजसारख्या बारीकसारीख व स्थानिक हुकुमशहांनी मारलेल्या माणसांची आकडेवारी टाकली की ही बेरीज पूर्ण होते. तात्पर्य, प्रश्न विचारांचा नाही, मूल्यांचा नाही आणि जन्मदत्त श्रद्धांचाही नाही. तो आहे त्यांच्यात येणाऱ्या कडवेपणाचा व अहंतांचा. या अहंता जेव्हा शांत होतात, तेव्हाच जगात व समाजात शांतता नांदते. दुर्दैवाने आजचा आपला काळ श्रद्धांना वा अशा अहंतांना धार चढवण्याचाच आहे.
समाज आणि देश यांचे वैविध्य राखून त्यात एकात्मता आणायची की त्याला थेट एकरूपच बनविण्याचा अट्टहास धरायचा? हा प्रश्न आहे. असा अट्टहास कधी यशस्वी होत नाही आणि वेगळेपण राखून एकात्मता आणायची तर ती मूल्यांच्याच आधारे आणता येते. हे वास्तव विस्मरणात गेले की, समाज तुटतात आणि देश विखुरतात. याचे भान राखले की देश, समाज व माणूसही समाधानी, स्थिर आणि सुखी होत असतो.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या २७ जुलै २०१९च्या अंकातून साभार)
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 08 October 2019
सुरेश द्वादशीवार,
लेख ढिसाळ झाला आहे. कहना क्या चाहते हो भाई? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्याशिवाय चैन पडंत नाही का? तुमचं हे विधान बघूया :
जर उपरोक्त विधान खरं असेल तर मग गांधीजींनी १९४७ साली काँग्रेस विसर्जित करायला का सांगितलं? त्याऐवजी संघ विसर्जित करायला हवा ना? तुमच्या विधानांत सुसंगती नाही. लेखात माहिती बरीच आहे. पण निष्कर्ष काढता येईल अशी सुसूत्रता नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान